esakal | कौशल्य आहे? जर्मनीत आहे संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कौशल्य आहे? जर्मनीत आहे संधी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जर्मनी आणि महाराष्ट्र या दोघांमध्ये एक अतूट नाते निर्माण होत चालले आहे. त्याचे कारण असे की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आणि शहरांमधून अनेक नोकरदार तसेच विद्यार्थी मास्टर्स (पोस्ट ग्रॅज्युएशन) च्या निमित्ताने जर्मनीमध्ये सध्या येत आहेत. जर्मनी मध्ये आलेला प्रत्येक मराठी माणूस हा नक्कीच डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, किंवा अन्य एखाद्या विषयातला उच्चशिक्षित असतो त्या कारणास्तव मराठी माणूस इथे नक्कीच उत्तम करियर करतो अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्याच अनुषंगाने जर्मनी आता इमिग्रेशन धोरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे.

महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी जे विद्यार्थी बॅचलर्स डिग्री झाल्यानंतर मास्टर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर ते मास्टर्स मध्येच सोडू शकत नव्हते त्यांना मास्टर डिग्री घेतल्यानंतरच नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकत होता पण आता ग्रॅज्युएशन झालं असेल आणि मास्टर्सला ऍडमिशन घेतलं असेल तर मास्टर्स मध्येच सोडून तुम्ही पूर्णवेळ नोकरी करू शकता. या बदललेल्या नियमाचा फायदा भारतीय तरुण तरुणींना होऊ शकतो.

जर्मन तज्ज्ञांचा असा अभ्यास आहे की जर्मनीमध्ये आता दरवर्षी चार लाख स्किल्ड वर्कर्स चा तुटवडा भासणार आहे कारण तरुणांची घटती संख्या आणि निवृत्त होणारे लोक यांच्यातली तफावत भरून काढण्यासाठी जर्मनीला दरवर्षी इथून पुढे चार लाख तरुण तरुणी दरवर्षी हवे आहेत. असे न झाल्यास सोशल सिक्युरिटी सिस्टीम चे नुकसान होऊ शकते, स्किल्ड वर्कर म्हणजे डॉक्टर्स इंजिनिअर्स पासून ते प्लम्बर्स, इलेक्ट्रिशियन, बांधकाम करणारे वर्कर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुटवडा काही प्रमाणात आत्ता भासत नक्कीच आहे आणि इथून पुढे खूप भासणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील आपल्या मराठी तरुणांना ही एक नामी संधी चालून आलेली आहे, त्याचा फायदा आपण नक्कीच घ्यायला हवा. मात्र याकरता एक आव्हान पेलावे लागणार आहे, ते म्हणजे भाषेचे. पण ते काही फार अवघड नाही. मराठी माणूस लढवय्या आहे आणि तो या आव्हानावरती नक्की मात करेल.

भारतामध्ये सध्या ‘आयटीआय’ मध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कार्पेन्टर असा अभ्यासक्रम शिकणाऱ्या तरुण-तरुणी आहेत त्यांनी जर का जर्मन भाषेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली तर मराठी तरुण - तरुणींना जर्मन भाषा सहज शिकता येईल. महाराष्ट्र सरकारने सर्व ‘आयटीआय’मध्ये जर्मन भाषा शिकवण्याचा प्रयोग केला तर पुढील पाच वर्षात तरुण-तरुणींना जर्मन भाषा सहज रित्या शिकता येईल आणि जर्मन भाषेचा प्रसार होईल आणि जर्मन बोलणाऱ्यांची संख्या वाढेल जेणेकरून सर्वांना जर्मनीतील विद्यापीठामध्ये मास्टर्स साठी अर्ज करता येईल आणि नोकरीसाठी संधी मिळू शकेल. महत्त्वाचं म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीत्झर्लंड या तीन देशांमध्ये जर्मन भाषा बोलली जाते जेणेकरून जर्मन भाषा शिकल्यावर या तिन्ही देशांची दरवाजे सहजपणे उघडले जातील. हा निर्णय नक्कीच ऐतिहासिक असेल कारण कुठल्याही राज्यांनी आत्तापर्यंत असा प्रयत्न केलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे जर्मन भाषा ही जर्मनीमध्ये नोकरी करण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे. असे केल्याने मराठी माणसाचा जर्मनीमध्ये शंभर टक्के डंका वाजल्या शिवाय राहणार नाही हे नक्की.

हा अनुभव आवर्जून नमूद करावा वाटतोय की जर्मनीला आल्यावर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे इथे श्रमाला असलेली किंमत आणि प्रतिष्ठा. उदाहरणार्थ आपल्याकडे जर भिंतीवर एखादा दिवा बसवायचा असेल तर तो बसवणारा गडी (त्याला हँडवर्कर म्हणतात), तो आपल्या चकचकीत मोटारीतून. पोलंड-वगैरे देशातून येणारा हा गवंडी कम सुतार कम वायरमन कम प्लंबर कम माळी -जर्मनीत ही मजुरी करून मिळालेल्या पैशाने बंगलेबिंगले बांधून असतो. जर्मनीतही त्याचं स्वत:चं चांगल्यापैकी घर असतं. त्याची अपॉइंटमेंट मिळायला कमीतकमी पंधरावीस दिवस लागतात. वर्षातून दोनतीनदा तरी सुटी घेऊन तो गावी किंवा युरोपभर कुठेतरी फिरायला जातो, कारण तेवढ्या पातळीचे पैसे त्या कामातून त्याला इथे मिळतात. तो जर्मन भाषा कामापुरती का होईना, व्यवस्थित बोलतो, आणि त्याच्या कामाचा दर्जा उत्तम असतो.

अशा हॅंडवर्करला किरकोळ कामानिमित्च ताशी २५ ते पन्नास युरो (साधारण दोन ते चार हजार रुपये) देताना माझ्या मनातही विचार येऊन जातो, की अरे आपल्याकडचीही हुषार, अशी कामं करणारी भारतातली तरुण पोरं इकडे येऊन राहू शकली तर किती छान होईल! ती मुलं, त्यांची कुटुंबं, भारत, जर्मनी- सर्वांसाठी एकदम विन-विन-विन-विन सिच्युएशनच की! एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दशकांपासून जर्मन कंपन्या जर्मनीतील प्रॉडक्शन इतर देशांमध्ये शिफ्ट करत आहेत आणि जर्मनीमध्ये - आर एन डी सेंटर्स डेव्हलपमेंट सेंटर्स, डिझाईन सेन्टर्स अशी जी महत्त्वाची डिपार्टमेंट आहेत ती जर्मनी मध्येच ठेवत आहेत, त्यांच्यासाठी कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे.आपल्या देशात आज हरयाना स्पोर्ट्स मध्ये अग्रेसर असून ऑलिंपिकमध्ये किंवा अन्य स्पर्धात पदक मिळवते. तसं महाराष्ट्र देखील जर्मनी ला डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आणि वर उल्लेख केल्याप्रमाणं कुशल कारागीर पुरवू शकतो.

आपल्या राज्यात इतकी विद्यापीठे आहेत की त्यातून बाहेर पडणाऱ्या पदवीधर तरुणांनी हा वेगळा मार्ग निवडला व जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवले तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य घडवता येईल. इथे काम करत असताना आम्हाला जे जाणवलं ते आम्ही सांगतोय की जागे व्हा ही संधी सोडू नका. जर्मन भाषा शिकल्यावर तो जर्मनीमध्ये नोकरी साठी अर्ज करू शकेल. मराठी माणूस कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि आहे. तो देशाबाहेर पडलेलाच नाही आणि इतर राज्यांनी त्यामध्ये बाजी मारली आहे. जसे कॅनडामध्ये पंजाबचा डंका आहे आणि केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा प्रभाव दुबई, अन्य आखाती देशात आहे. महाराष्ट्राला ही संधी आहे की जास्तीत जास्त व्यक्ती आपण जर्मनीला पाठवू शकतो.

(हा लेख जर्मनीत काम करणाऱ्या तीन महाराष्ट्रीयन तरुणांनी लिहिला आहे.)

loading image
go to top