आठवणींचा समृद्ध दस्तावेज

बालपण हे सर्वांसाठी आयुष्यभर आठवणीत साठवून ठेवणारे संचित असते. जसजसा माणूस मोठा होतो, समज येते तसतशा जगण्यातल्या चौकटी वाढत जातात.
आठवणींचा समृद्ध दस्तावेज
Summary

बालपण हे सर्वांसाठी आयुष्यभर आठवणीत साठवून ठेवणारे संचित असते. जसजसा माणूस मोठा होतो, समज येते तसतशा जगण्यातल्या चौकटी वाढत जातात.

अमरावतीचे प्रसिद्ध लेखक, कवी आणि चित्रकार सुनील यावलीकर यांनी बालपणीच्या आठवणी अलीकडेच चित्रबद्ध केल्या. ती चित्रे २२ मार्चपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात प्रदर्शित होणार असून, रसिकांना २८ मार्चपर्यंत ती बघता येणार आहेत. या चित्रांच्या माध्यमातून चित्रकाराच्या समकालीन रसिकांना त्यांच्या बालपणात जाता येईल. आजच्या पिढीला मागच्या पिढीतले बालपण कळू शकेल. त्यामुळे ही चित्रमालिका फक्त आठवणीच नाही तर सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचा एक दस्तावेज आहे.

बालपण हे सर्वांसाठी आयुष्यभर आठवणीत साठवून ठेवणारे संचित असते. जसजसा माणूस मोठा होतो, समज येते तसतशा जगण्यातल्या चौकटी वाढत जातात. निरागसता हरवत जाते. खेळण्यावर आणि बोलण्यावरही मर्यादा येतात. बालपणात अशा चौकटी नसतात. मनसोक्तपणा असतो. निर्व्याज जगण्याचा आनंद अनुभवण्याचा तो यादगार काळ असतो. अशाच काही आठवणी सुनील यावलीकर यांनीही मनात साठवून ठेवल्या आणि आता त्या कॅनव्हॉसवर साकारून, त्यांच्या बालपणीचा दस्तावेज रसिकांसमोर पेश केला आहे.

या पेन्टिंग फक्त यावलीकरांच्या बालपणीचा दस्तावेज नाहीत तर बदलत गेलेल्या काळाचे हे कालदर्शक पुरावे आहेत. यावलीकरांचे बालपण हे साधारणत: ५० वर्षांपूर्वीचे आहे. म्हणजे विसाव्या शतकातील ७०-८० चे दशक. तो काळ आणि त्यानंतर २१ व्या शकतकाच्या प्रारंभीची काही वर्ष, सर्वांच्याच जगण्यात मोठे बदल झाले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण हे जागतिकीकरण आहे. आज साठीत असलेल्यांचे आयुष्य दोन टप्प्यांत आपोआपच विभागले गेले आहे. जागतिकीकरणापूर्वी आणि त्यानंतर असे हे दोन तुकडे झाले. या दोन तुकड्यांत झपझप बदलत गेलेल्या आयुष्याची साक्ष नोंदवणाऱ्या या कलाकृती आहेत.

चित्र म्हणून या कलाकृती जराशा वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या आणि जराशा अमूर्त शैलीत आहेत. मूर्त-अमूर्त ही संमिश्र शैलीही आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. चित्रात आकार, उकार आणि अवकाश वेगवेगळ्या रंगावृत्तीत मांडताना यावलीकर यांनी वास्तवतेचा समतोल संयतपणे साधला आहे. यातील सर्वच चित्र एकेक करून बघण्यापेक्षा, ती चित्र मालिका म्हणून बघितली तर त्याला तत्कालीन बालपणीच्या जगण्यातला एक सुरेल धागा गवसतो. बालपणाचा एक प्रवास वाटतो. चित्रात मांडलेले हे आत्मकथन म्हटले तरी हरकत नाही, पण... ते फक्त चित्रकाराचे नाही, तर त्या काळातील बहुतांश माणसांची ही गोष्ट वाटेल. प्रत्येकाला आपापले हरवलेले बालपण पुन्हा या चित्रांतून शोधता येणार आहे.

कलावंत हा आपले अनुभव आपल्या कलाकृतीत मांडत असतो. त्याने बघितलेल्या वास्तवावर भाष्य करत असतो. चित्रकार असो वा नाटककार, त्याने साकारलेल्या कलाकृतींतून समाजमनाला सावध करत असतो. यावलीकर यांची ही चित्रेही तशीच आहेत. जागतिकीकरणानंतर झपाट्याने बदललेली जीवनशैली सुखदायी वाटते आहे. पण बालपण जगण्याचा आनंद आजच्या मुलांना मिळतो, की त्यांचे जगणेच आपण चौकटीत बांधून ठेवले आहे, असा सवाल करणाऱ्या या कलाकृतीत आहे. यावलीकर यांच्या या चित्रमालिकेच्या विषयांत डोकावले तरी तो आनंद, ते निरागस जगणे आणि बालपणी मिळणारे स्वातंत्र्यही आपण आपल्या मुलांकडून हिरावून तर घेतले नाही ना, असा प्रश्‍न आजच्या पालकांच्या मनात येईल.

शहरापासून दूर असणाऱ्या गावखेड्यातूनही आज काचेच्या गोट्या हरवल्या आहेत. गोट्या खेळणे आणि हरल्यानंतर गोट्या ढोपरण्याचा खेळ आता कुठेही मांडला जात नाही. शहरातल्या मुलांचे बालपण तर बहुतांश चार भिंतींच्या आत डिजिटल पडद्यांतच गुंडाळल्याचे दिसते आहे. या वास्तवाची जाणीव करून देणे हा या चित्रमालिकेचा उद्देश नसेलही कदाचित; पण ही चित्रे आजच्या काळाशी, आजच्या जगण्याशी जोडताना वास्तव अधोरेखित होणारच आहे. सुनील यावलीकर यांनी साकारलेली चित्र बालपणी खेळलेल्या अनेक खेळांची, गमती-जमतींची आठवण करून देणारी आहेत. त्यात एकमेकांविषयीची सलगी होती. निरागसता होती. एकी होती. एकमेकांना जोडणारी संघभावना होती. अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी सराव करायला लावणारी ती तालीम होती. आयुष्याचा पुढचा प्रयोग यशस्वी करण्याची ताकद त्या तालमीत होती. आता ती तालीम हरवली आहे. गावगाड्याशी नाते सांगणारे हे खेळ बालपण रम्य व्हावे, एवढ्यापुरतेच नव्हते. त्या खेळात खाण्या-पिण्याची, एकमेकांशी संवाद साधण्याची, कठीण प्रसंगी एकमेकांना मदत करण्याची, मैत्रत्वाचे नाते घट्ट विणणारी, भावभावना समृद्ध करण्यासाठीची एक शिदोरी होती.

हा सारा विचारवाही पट चित्रात मांडून सुनील यावलीकर यांना कलारसिकांना फक्त आनंद द्यायचा असेल, असे वाटत नाही. आपल्यातून काहीतरी हरवत चालले याची जाणीव करून देत अस्वस्थ करणे, हा संवेदनशील कलावंतांचा स्थायीभाव असतो. यावलीकर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे अध्यापक आहेत. मुलांच्या भावविश्‍वाशी त्यांचा रोजचा ऋणानुबंध आहे. आजच्या पिढीतील मुलांच्या जगण्यातली बलस्थाने माहीत असतानाच, त्यांच्यातल्या उणिवा दूर करण्यासाठी त्यांचा संघर्ष अव्याहतपणे सुरूच असतो. त्या अनुषंगाने या चित्रमालिकेतील विषय आजच्या मुलांच्या जगण्यातील उणिवांचे मूळ शोधण्याकडे जाणारा असू शकतो.

सुनील यावलीकर यांचा आजवरचा कलाप्रवास मानवी मनातील अस्वस्थता, सामाजिक, राजकीय, धार्मिक घटनांचे पडसाद, निसर्गाला दिलेली साद याविषयांभोवती झालेला आहे. नवे अनुभव, नव्या कलाकृती अशी नवनिर्मिती हाच त्यांचा व्यासंग आहे. शब्द, रंग, रेषा, लयीचा अभ्यास करत त्यांनी आजवर असंख्य कथा, कविता, चित्र साकारली आहेत. त्यांच्या चित्रकलाकृतींचे अनेक ठिकाणी प्रदर्शने भरली आहेत. स्वत:च्याच बालपणात डोकावून अंतर्मनातील आठवणींना दिलेला हा उजाळा, कलारसिकांना दाखवलेली एक वेगळी प्रकाशवाट आहे.

mahendra.suke@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com