आम्हाला 'पाणीदार' व्हायचंय... (महेश बर्दापूरकर)

mahesh bardapur
mahesh bardapur

आमिर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमावरून "वॉटर कप' ही संकल्पना पुढं आली. त्याचं काम नक्की कसं चालतं, गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो, याविषयी उत्सुकता होती. त्यासाठी या स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत (21 व 22 मे) मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी दिल्या. पाण्याची समस्या व आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी ही गावं अविश्रांत मेहनत घेत आहेत, "पाणीदार' होण्यासाठी लढत आहेत...पाण्यासाठीच्या, जगण्यासाठीच्या या "चळवळी'चा हा वृत्तान्त...

मराठवाडा...कायम दुष्काळात होरपळणारा, आत्महत्यांचा कलंक घेऊन जगणारा प्रदेश. मैलोन्‌मैल ओसाड शिवारं, पाण्याचा टिपूस नाही. इथला रापलेला, काळवंडलेला, पिचलेला शेतकरी कायमच जगण्याची धडपड करताना दिसतो. नाही म्हणायला गेल्या तीन वर्षांत चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. आधीच्या तीन वर्षांच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांत (2016 आणि 2017) बरा पाऊस पडला आणि बळिराजा थोडा सुखावलाही. याच काळात अभिनेता आमिर खान यानं राज्यभर सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या "वॉटर कप'चं वारं वाहू लागलं. गावं ग्रामसभा घेऊन या स्पर्धेत भाग घेऊ लागली आणि आपलं गाव "पाणीदार' करण्यासाठी मेहनतही घेऊ लागली. याचं फळ आता दिसू लागलं आहे.

खरे "पुंडलिक' व्हा...
या वर्षीचा "वॉटर कप' सात एप्रिलला सुरू झाला आणि 45 दिवसांच्या या स्पर्धेचा समारोप 22 मे रोजी झाला. या भागात काम नक्की कसं चालतं हे पाहण्याची उत्सुकता होती. अंबाजोगाईत "ज्ञानप्रबोधिनी'चं काम करणारा माझा मित्र प्रसाद चिक्षे या स्पर्धेसाठी गावकऱ्यांना तयार करण्याचं काम करतो. यासंदर्भातल्या त्याच्या फेसबुक-पोस्ट वाचत होतो, त्याचाशी थोडं बोलणंही होत होतं. तो म्हणाला ः ""तू ये. शेवटचे दोन दिवस 21 व 22 मे रोजी भरपूर काम होणार आहे. गाडी घेऊन ये. गरज पडेल.'' "ज्ञानप्रबोधिनी'तला पुण्याचा मित्र प्रवीण पायगुडे येण्यासाठी तयार होताच. आम्ही 20 तारखेला निघून 21 तारखेला पहाटेच अंबाजोगाईत प्रसादच्या दारात हजर झालो. त्याचं वेळापत्रक खूपच व्यग्र होतं. ""लगेच तयार व्हा, आपल्याला औसा तालुक्‍यातल्या एकंबीवाडीत जायचंय. गावानं मस्त काम केलंय. तिथं ग्रामसभा घ्यायची आहे,'' असं त्यानं सांगताच आम्ही निघालो. गाडीत प्रसादशी चर्चा सुरू झाली. तापमानाचा आकडा 44 अंश सेल्सिअस दाखवत होता. प्रसादचं फोनवर पुढच्या कामांचं नियोजन सुरू होतं. स्पर्धेसाठी प्रत्येक गावाला माणशी सहा घनमीटर कामाचं लक्ष्य देण्यात आलेलं होतं. त्यात "माथा ते पायथा' या निकषानुसार कामं करावी लागतात. केवळ जेसीबीनं काम न करता 50 टक्के काम श्रमदानातून झालं पाहिजे, हा नियमही आहे. गावातल्या प्रत्येक घरात शोषखड्डा आणि प्रत्येक माणसामागं दोन रोपं लावणंही अनिवार्य असल्याचं समजलं. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात अतिशय कच्च्या रस्त्यानं प्रवास करत आम्ही अखेर एकंबीवाडीत येऊन पोचलो. प्रसादचं भाषण ऐकण्यासाठी गावातली बरीच मंडळी पारावर जमा झाली होती. त्यानं गावकऱ्यांना माती, पाऊस आणि पीक याचं महत्त्व विठ्ठल, पुंडलिक, श्रीकृष्ण यांचे संदर्भ देत पटवून दिलं. तो म्हणाला ः ""माती आपली आई आहे, पाऊस बाप आणि पिकं ही पोरं. आपल्या आई-बापाला कुणी घराबाहेर काढतं का? मग तुम्ही तुमच्या शेतातली माती वाहून जाऊ देता...शेतात पडलेला पाऊसही जिरवून न ठेवता वाहून जाऊ देता. ही काही आई-बापाची सेवा नाही. खरा "पुंडलिक' व्हायचं असेल तर शेतात बांध घाला. पाणी अडवा, जिरवा. असं केलंत तर आई-बापाची खरी सेवा होईल...'' प्रसादचं म्हणणं गावकऱ्यांना पटत असल्याचं जाणवत होतं. ते त्याला प्रतिसाद देत होते. शेवटी प्रसाद म्हणाला ः ""चला, कामाला लागा. शेवटचे दोन दिवस राहिलेत. सगळी कामं पूर्ण करा. आई-बापाच्या सेवेला लागा. केलेली कामं "पाणी फाउंडेशन'च्या ऍपमध्ये व्यवस्थित भरा. सगळ्यांनी कामाचं स्वरूप, त्याची शास्त्रीय माहिती समजून घ्या. मी आजपर्यंत तुमच्या गावात पाण्याचा आणि अन्नाचा कणही घेतलेला नाही. तुम्ही "पाणीदार' व्हा, मग मी जेवायला येणार आहे...''

दुपारनंतर अंबाजोगाईत पोचलो. ""थोडी विश्रांती घ्या, आपल्याला पुन्हा ग्रामसभेला जायचं आहे,'' असं सांगत आईला भेटायला प्रसाद घरी गेला. पुढचं गाव होतं बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्‍यातलं दिपेवडगाव. आमचा प्रवास आता या गावाच्या दिशेनं सुरू झाला. केवळ बैलगाडीच जाईल अशा रस्त्यानं मोटार चालवण्याचा थरार अनुभवायला मिळत होता. सकाळचीच पुनरावृत्ती झाली. प्रसादचं म्हणणं ऐकायला गावातली बरीच मंडळी जमली होती. पुढचा दिवस शेवटचा असल्यानं सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सगळ्या गावानं श्रमदान करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केलं जात होतं. या भारावलेल्या वातावरणात पुन्हा एकदा प्रसादची ग्रामसभा सुरू झाली. त्यानं पुन्हा एकदा गावकऱ्यांना उत्साहित केलं. आई-बापाच्या सेवेसाठी कंबर कसण्याचं आवाहन केलं. रात्री उशिरा आम्ही अंबाजोगाईत पोचलो. ""या गावाला आणखी थोडं काम करणं गरजेचं आहे. तुम्ही उद्या सकाळीच काही कार्यकर्त्यांना घेऊन या गावात येऊन श्रमदान करा. मी आणखी एका गावात जाऊन नंतर दिपेवडगावला येतो,'' असं सांगत तो घराकडं गेला.

जिद्द आणि केवळ जिद्द!
दुसऱ्या दिवशी (ता. 22) सकाळीच आम्ही दिपेवडगावमध्ये हजर झालो. गाव पहाटेच श्रमदानाला लागला होता. शेवटचा दिवस असल्यानं कामाची लगबग होती. उन्हाच्या तडाख्यातही "ज्ञानप्रबोधिनी'चे कार्यकर्ते गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. थोड्या वेळात प्रसाद गावात हजर झाला. त्यानं पुन्हा एकदा गावकऱ्यांना काही सूचना दिल्या आणि आमचा प्रवास तिथून 80 किलोमीटरवरच्या स्वराजतांडा गावाच्या दिशेनं सुरू झाला. डोंगरउतारावरच्या या तांड्यात मोठ्या उतारावरून ओढ्याकडं जाणाऱ्या भागात संपूर्ण गाव श्रमदान करताना दिसत होतं. या उतारावर दीड किलोमीटर लांबीचा आणि चार फूट उंचीचा दगडी बंधारा घालण्याचं काम सुरू होतं. एकेक ओळ करून उतारावरचे दगड बंधाऱ्यापर्यंत पोचवले जात होते. ओढ्यामध्ये दोन जेसीबी सखोलीकरणाचं कामही करत होत्या. पाच-सात वर्षांची एक मुलगी माझ्याच बाजूला उभी राहून मातीत फसलेला एक दगड काढण्याचा प्रयत्न करत होती. तिला तो दगड निघत नसल्याचं पाहून मी तिला म्हणालो ः ""हा माझा दगड ने, मी तो दगड काढतो.'' माझ्या हातातला दगड तिच्या हातात ठेवताना मी हादरलोच. त्या मुलीच्या हातांना बोटं नव्हती आणि तरीही ती दगड काढण्याचा प्रयत्न करत होती...! त्या मुलीसह गावकऱ्यांची जिद्द पाहून या पावसाळ्यात गावकऱ्यांना नक्की भरपूर पाणी मिळणार, असा विश्‍वासही वाटला...

आत्महत्यांचा कलंक पुसायचाय...
या पाड्यावरून पुन्हा अंबाजोगाईच्या दिशेनं निघालो. गावात येऊन जेवण करून लगेचच व्हटकरवाडी या गावात श्रमदानाला जाण्याचं नियोजन होतं. व्हटकरवाडीला निसर्गानं भरभरून दिलं आहे. चारी बाजूंनी डोंगर असलेलं व एखाद्या बशीत असल्याप्रमाणं दिसणारं हे 600 लोकसंख्येचं गाव, तरीही टंचाईग्रस्त. गावच्या सरपंचानं (म्हणजे सरपंच-बाईंच्या पतीनं) "पाणीदार' होण्याचं मनावर घेतलेलं दिसलं. गावानं झपाटल्यासारखं काम केलं होतं. डोंगरउतारावर बंधारे बांधण्याचं लक्ष्य पूर्ण झालं होतं, तरीही गाव आणखी बंधारे बांधत सुटलं होतं. आम्ही एका
पथकात मिसळलो. बंधारा बांधण्याचं ज्ञान असलेल्या एका गावकऱ्यानं हातातल्या कुऱ्हाडीनं दोनच मिनिटांत आखणी केली आणि आमच्यासह 50 जणांचं पथक कामाला लागलं. केवळ एका तासात 10 मीटर लांब, एक मीटर रुंद आणि दोन मीटर उंचीचा दगडी बंधारा तयार झाला होता! असे अनेक बंधारे गावकऱ्यांनी बांधले आहेत. त्याबरोबर मोठी शेततळी, गावातील शेतांमधील बंधाऱ्यांचं काम अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. "स्पर्धेमध्ये गावाचा नंबर खूप वरचा असणार,' हे प्रत्येक गावकरी अभिमानानं सांगत होता. सरपंचांनी आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलं; पण आम्हाला आणखी एका गावात श्रमदानासाठी जायचं होतं. प्रसाद आणखी एका गावातून व्हटकरवाडीपासून जवळच असलेल्या निमला या गावात येणार होता. आम्ही निमल्याच्या दिशेनं निघालो. गावात भल्यामोठ्या शेततळ्याचं काम गाणी म्हणत, हातातल्या टिकावानं खड्डे खणत सुरू होतं. या गावात गेल्या वर्षभरात नापिकीमुळं दहा आत्महत्या झाल्या आहेत. "वॉटर कप' सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी कर्जबाजारीपणामुळं एका महिलेनं आत्महत्या केली. गावाचा स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय होत नव्हता. शेवटी त्या महिलेचा नवराच कुदळ-फावडं घेऊन निघाला आणि गावानं "पाणीदार' होण्याचा चंग बांधला. या परिसरातलं सर्वाधिक श्रमदान झालेलं हे गाव. "तुफान आलंया' या मालिकेंतर्गत इथं चित्रीकरण सुरू होतं. गावकऱ्यांना शुभेच्छा देऊन आम्ही पुन्हा व्हटकरवाडीच्या दिशेनं निघालो. सरपंचाकडं जेवण झाल्यावर पुन्हा निघताना प्रसाद म्हणाला ः ""आपण चांगलं काम केलेल्या शिंगणावाडी या गावात जाऊ.'' रात्रीचा एक वाजला होता. गावकरी काम संपवून प्रसादची वाट पाहत थांबले होते. तयार झालेल्या एका शेततळ्यात वाद्यांच्या तालावर गाणी आणि भजनांतून श्रमपरिहाराचा कार्यक्रम सुरू झाला. "ग्यानबा-तुकाराम'च्या तालावर 400 वस्तीचं हे गाव नाचत होतं, पाऊस पडल्यावर "पाणीदार' होण्याचं स्वप्न पाहत होतं...

"वॉटर कप'चं काम नक्की कसं चालतं, मराठवाड्यासह राज्यातली गावं "पाणीदार' कशी होत आहेत याचा रसरशीत अनुभव या दोन दिवसांनी दिला. कुणी लढण्याची प्रेरणा आणि किंचितसं बळ दिल्यास गाव काय करू शकतो, याची ही प्रातिनिधिक उदाहरणं. "आपल्याला जगायचं असेल, प्रगती साधायची असेल तर सरकारवर विसंबून चालणार नाही, आपणच कंबर कसली पाहिजे,' हे या गावकऱ्यांना उमजलं आहे. प्रचंड श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यांमध्ये, शेततळ्यांमध्ये, शेतांमध्ये आता पाणी साठेल...पाण्यासाठी तीळ तीळ तुटणारे, वणवण भटकणारे आणि असह्य झाल्यावर आत्महत्या करणारे जीव आता नक्की वाचतील. गावं "पाणीदार' होतील आणि आपल्या यशाचा मार्ग आपल्याच हिमतीवर पुन्हा एकदा आखतील...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com