जाणिवांचं प्रगल्भ क्षितिज (महेश बर्दापूरकर)

जाणिवांचं प्रगल्भ क्षितिज (महेश बर्दापूरकर)

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) शेकडो चित्रपटांतून कोणते चित्रपट पाहायचे, हे ठरवणं अवघड काम. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतल्या पंधरा चित्रपटांना मिळून सर्व पुरस्कार दिले जात असल्यानं हे चित्रपट पाहणं अनिवार्य ठरतं. सर्वच पातळ्यांवर एकापेक्षा एक असलेल्या या चित्रपटांतून एकाची निवड करणं प्रेक्षकांप्रमाणंच परीक्षकांसाठीही अवघड काम असतं. या वेळी प्रेक्षकांच्या अंदाजांना निकालानं नेहमीप्रमाणंच हूल दिल्याचं चित्र दिसलं. स्पर्धेतल्या या चित्रपटांचा धावता आढावा...

पणजीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) ८२ देशांतले १९५ चित्रपट सहभागी झाले होते. यातल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले पंधरा चित्रपट पाहणं हा सर्वांत रोमांचकारी अनुभव असतो. पणजीतल्या गोवा कला अकादमीच्या प्रेक्षागृहात बहुतांशपणे हे चित्रपट प्रदर्शित होतात आणि एक हजारच्या जवळपास आसनक्षमता असलेल्या या प्रेक्षागृहाबाहेर मोठ्या रांगा लागतात. तिकीट आरक्षित केलेल्यांना प्रवेश सोपा असतो; मात्र आसनं शिल्लक राहिल्यास इतरांना ‘रशलाइन’मधून प्रवेश मिळतो. यावर्षीही या पंधरापैकी नक्की कोणता चित्रपट बाजी मारणार यावर प्रेक्षकांत चर्चा रंगल्या होत्या आणि निकालही (नेहमीप्रमाणं) अनपेक्षितच लागला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘बीट्‌स पर मिनिट’ (बीपीएम) या एड्‌सग्रस्त व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘ॲक्‍ट अप’ या संघटनेच्या संघर्षाची सत्यकथा मांडणाऱ्या चित्रपटानं स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला. पॅरिसमध्ये नव्वदच्या दशकात झालेल्या आंदोलनाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात दिग्दर्शकानं संघटनेच्या मागण्या आणि त्याला प्रशासन व राजकारण्यांकडून मिळणारा थंडा प्रतिसाद यांबद्दल खोचक भाष्य केलं. त्याचबरोबर समलिंगी संबंधांतून एड्‌सच्या जाळ्यात अडकणाऱ्या तरुण पिढीलाही कानपिचक्‍या दिल्या. आंदोलकांची भूमिका रास्त असली, तरी मूळ समस्येला भिडणंही गरजेचं असल्याचं चित्रपटानं अधोरेखित केलं आणि त्यामुळंच तो प्रेक्षकांबरोबरच परीक्षकांच्याही पसंतीस उतरला. या चित्रपटासाठी आंदोलक आणि समलिंगी संबंधांमुळं एड्‌सग्रस्त झालेल्या युवकाची भूमिका साकारणाऱ्या न्याहूल बिस्कायार्डला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मिळाला. आंदोलनादरम्यानचा त्याचा उत्साह, चीड आणि एड्‌समुळं तब्येत खालावल्यानंतर झालेली वाताहत साकारत न्याहूलनं वाहवा मिळवली. ‘एंजल्स वेअर व्हाइट’ या चित्रपटासाठी व्हिवान क्‍यू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. आयुक्त दर्जाचा एक अधिकारी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करतो आणि ही घटना रिसॉर्टमधली अल्पवयीन कर्मचारी मुलगी पाहते. ही घटना दडपून टाकण्यासाठी मोठा दबाव आणला जातो आणि त्यासाठी या तिन्ही मुलींना वेठीस धरलं जातं. प्रसिद्ध हॉलिवूड तारका मर्लिन मन्‍रोच्या पुतळ्याचा सूचकपणे संदर्भ मांडलेली ही कथा लक्षवेधक ठरली आणि त्याचं बक्षीस दिग्दर्शकाला मिळालं. कतारचे दिग्दर्शक किरो रुसो यांना त्यांच्या ‘डार्क स्कल’ चित्रपटासाठी पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. आयुष्यात नव्यानं उभं राहण्यासाठी खाणीत काम करणाऱ्या युवकाची कथा चित्रपटात मांडण्यात आली. खाणकामाची दृश्‍यं, तिथला संघर्ष आणि हे सर्व कर्मचारी एका सहलीनिमित्तानं बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात झालेली स्थित्यंतरं याचं नेमकं चित्रण करण्यात आलं.

‘रेसर अँड द जेलबर्ड’ या मायकेल रोस्कम दिग्दर्शित चित्रपटानं स्पर्धेत रंग भरले. बालपणापासून गुन्हेगारीचं आकर्षण असलेल्या गिनो या युवकाची ही कथा. तो कार रेसर असलेल्या बेनेडिक्‍टेच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडतो. गिनोची पार्श्‍वभूमी माहीत नसलेली बेनेडिक्‍टे त्याच्यावर हातचं राखूनच विश्‍वास ठेवते. मित्रांच्या मदतीनं केवळ साहस म्हणून बॅंकांवर दरोडे टाकणाऱ्या गिनोचं सत्य तिला कळते. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला असतो. ती मैत्रिणीच्या मदतीनं गिनोला पोलिसांच्या ताब्यात देते; मात्र तीच एका जीवघेण्या आजाराची शिकार बनते. आपल्या शेवटच्या काळात तिनं गिनोच्या भवितव्यासाठी खेळलेली चाल आणि गिनोचा पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा थरार खिळवून ठेवणार ठरला. कलाकारांचा अभिनय, कारच्या शर्यती व दरोड्यांचं भेदक चित्रण, संगीत यांमुळं परिपूर्ण चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला. ‘फ्रीडम’ या जर्मनीच्या चित्रपटामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पती आणि मुलांना सोडून घराबाहेर पडलेल्या महिलेची कथा सांगण्यात आली, तर तैवानच्या ‘द ग्रेट बुद्धा’नं गरीब व श्रीमंतांतली दरी, मानवी आकांक्षा आणि देवावरचा विश्‍वास यांमधल्या द्वंद्वांबद्दल भाष्य केलं. जपानचा ‘ब्लॅंक १३’ नर्मविनोदी कथनशैलीमुळं गाजला. कोजी या युवकाचे परागंदा वडील १३ वर्षांनंतर सापडतात; मात्र कर्करोगानं त्याचं निधन होतं. अंतिम संस्कारांच्या वेळी मृताला आठवताना खऱ्या गोष्टी सांगितल्यास काय धमाल घडू शकते, याचं वर्णन दिग्दर्शकानं केलं आहे. इराणच्या ‘अ मॅन ऑफ इंटिग्रिटी’ या चित्रपटानं प्रेक्षकांना खूष केलं. उत्तर इराणमधल्या खेड्यात घडणाऱ्या या कथेमध्ये गावातल्या सर्व जमिनींवर एका खासगी कंपनीचा डोळा असतो. रझा या शेतकऱ्याची जमीन हडप करण्यासाठी त्याला विविध प्रकारे त्रासही दिला जातो. मात्र, या सर्वांवर रझा अक्कलहुशारीनं कशी मात करतो, याची ही कथा. शह आणि प्रतिशहाचे रोमांच उभे करणारे क्षण हे चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यामुळं टीनएजर्समध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी वृत्ती यांवर ‘मेरियोनेट’ या दक्षिण कोरियाच्या चित्रपटानं भाष्य केलं. केवळ गंमत म्हणून वर्गातल्या मुलींना फसवून त्यांचं अश्‍लील चित्रण व्हायरल करणाऱ्या मुलांची गोष्ट चित्रपट सांगतो. शाळेतली तरुण शिक्षिका सिओरिनला हीच मुलं फसवतात. या गटाची सूत्रं ‘मास्टर’ नावाची अज्ञात व्यक्ती चालवत असल्याचं तिच्या लक्षात येतं. या जाळ्यात अनेक मुलींना ओढलं गेल्याचं समजल्यावर सिओरिन जीवाची बाजी लावत या प्रकाराचा छडा लावण्याचा निर्णय घेते. चित्रपटानं भविष्यातल्या गुन्ह्यांचं अंगावर शहारे आणणारे चित्र उभं करत धोक्‍याची सूचना दिली. अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण आणि संगीत या जमेच्या बाजू असलेला हा चित्रपट महत्त्वाचा स्पर्धक होता. ‘शटल लाइफ’, ‘अना, मोन आमोर’, ‘स्टील लाइट, स्टील नाइट’ हे स्पर्धेतले इतर चित्रपट पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

भारतीय चित्रपटांचाही प्रभाव
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मराठीतल्या प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’, रिमा दास दिग्दर्शित ‘व्हिलेज रॉकस्टार’ (आसाम) आणि महेश नारायण दिग्दर्शित ‘टेक ऑफ’ या तमीळ चित्रपटाचा समावेश होता. ‘कच्चा लिंबू’बद्दल इतर राज्यांतले, तसंच परदेशांतले प्रेक्षक आवर्जून माहिती घेत होते आणि त्याच्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसादही मिळाला. या सर्वांत बाजी मारली ती ‘टेक ऑफ’ या चित्रपटानं. भारतानं इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका केल्याच्या सत्यघटनेवर हा चित्रपट बेतला आहे. समीरा या परिचारिकेच्या संघर्षाच्या माध्यमातून २०१४मध्ये घडलेली ही सत्यकथा सांगण्यात आली आहे. या भूमिकेसाठी मल्याळी अभिनेत्री पार्वतीला महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर महेश नारायण यांना दिग्दर्शनासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘क्षितिज’साठी मनोज कदम यांना पुरस्कार
युनेस्को-गांधी पुरस्कारामध्ये ‘क्षितिज’ या चित्रपटासाठी मनोज कदम यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. चित्रपटात महाराष्ट्रातील दुष्काळी भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा संघर्ष वाची या बारा वर्षांच्या मुलीच्या गोष्टीच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी उभं राहून अभिवादन केलं आणि पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला. याबद्दल बोलताना कदम म्हणाले ः ‘‘माझा चित्रपट सर्व आंतरराष्ट्रीय निकषांमध्ये योग्य ठरला आणि त्यामुळंच पुरस्कार मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्यावर मला गेली आठ वर्षं घेतलेल्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आता या चित्रपटाला आठ विविध महोत्सवांसाठी नामांकन मिळालं असून, राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांसाठीच चित्रपट पाठवला जाईल. पुढील वर्षी एप्रिलमध्ये आम्ही चित्रपट प्रदर्शित करणार आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com