Mahesh Elkunchwar : ‘वाडा चिरेबंदी’च्या ‘विरासत’मधून रंगावकाशाचा नवा अनुभव; नेपथ्यापलीकडचं नाट्यविश्व

Wada Chirebandi Trilogy : महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ नाट्यत्रयीचे ‘विरासत’ हे हिंदी सादरीकरण बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा आणि समाजसंस्कृतीचा वेध घेते. नेपथ्यापलीकडे जाऊन रंगावकाशीय मांडणी प्रेक्षकांचा नाट्यानुभव कसा घडवते, हे या प्रयोगातून स्पष्ट होते.
 Wada Chirebandi Trilogy

Wada Chirebandi Trilogy

esakal

Updated on: 

आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com

दिल्लीत काही दिवसांपूर्वी दोन संस्मरणीय दिवस अनुभवले. तिथे, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टने प्रायोजित केलेला ‘विरासत’ हा विलक्षण नाट्यप्रयोग सादर झाला. प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या त्रिनाट्यधारेचं हे हिंदी सादरीकरण. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही एलकुंचवारांची नाट्यत्रयी स्वातंत्र्योत्तर भारतातल्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा आणि माणसांच्या मनातल्या घालमेलीचा वेध घेते. बदलत्या काळात, वेगवेगळ्या पिढ्यांना ही नाटके बदलत्या समाजसंस्कृतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडतात. मराठीत चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाट्यत्रयीचं दिग्दर्शन करून आठ तासांचा प्रयोग उभा केला होता. अनुराधा कपूर यांनी २०१३ मध्ये ‘विरासत’चा प्रयोग पहिल्यांदा रंगमंचावर सादर केला होता. मी मराठी प्रयोग-मालिका पाहिली होती. आता हिंदीतील संपादित संहिता-प्रयोग. एकाच नाटकाला वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या रंगावकाशांत नव्याने उभं राहताना पाहणं हा समृद्ध करणारा अनुभव. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या माजी संचालिका अनुराधा कपूर यांनी ‘विरासत’चे दिग्दर्शन केले, तर दीपन शिवरामन यांनी रंगावकाशी मांडणी. प्रयोगासाठी लाकडी चौकटी वापरून वाड्याची रचना उभी केली होती आणि चारही बाजूंनी प्रेक्षक बसले होते.‘वाडा’ नाट्यत्रयीच्या प्रयोगातील ठळक जाणवलेली बाब म्हणजे नाटकाची सृजन-मांडणी. नाटकाची मांडणी म्हटलं, की नेपथ्य आणि रंगावकाशी मांडणी, म्हणजेच सेट आणि सीनोग्राफी, यांच्यात नेमका फरक काय? असा प्रश्न मनात येऊ शकतो. सामान्यतः नेपथ्य म्हणजे नाटकाची पार्श्वभूमी दाखविण्यासाठी दाखवलेल्या रंगमंचावरच्या वस्तू. उदाहरणार्थ, घर दाखवायचं तर घर उभं करायचं, त्यात घरात असणाऱ्या वस्तू ठेवायच्या. पण रंगावकाशीय मांडणी यापेक्षा अधिक असते. ती नाटकात फक्त काय दिसणार हे ठरवत नाही, तर संपूर्ण अनुभव कसा उभा राहणार हे ठरवते. कलाकार कुठे उभे राहतील, कसे वावरतील, प्रकाश-ध्वनी कसे असतील इथंपासून प्रेक्षकाला हे सारे कसे दिसेल याचा विचार करते. उत्तम रंगावकाशीय मांडणी रंगमंचावर जे दिसते त्या पलीकडच्या विश्वाचे भान करून देते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com