हवामान बदलाच्या ज्वाळा

युरोपातील तापमान आतापर्यंत कधीच ऐकिवात नव्हते इतक्या विक्रमावर पोहोचले आहे. परिस्थिती भयानक आहे.
Climate Crisis
Climate CrisisSakal
Updated on
Summary

युरोपातील तापमान आतापर्यंत कधीच ऐकिवात नव्हते इतक्या विक्रमावर पोहोचले आहे. परिस्थिती भयानक आहे.

- मालिनी नायर nairmalini2013@gmail.com

युरोपातील तापमान आतापर्यंत कधीच ऐकिवात नव्हते इतक्या विक्रमावर पोहोचले आहे. परिस्थिती भयानक आहे. स्पेन, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये प्रचंड उष्णतेमुळे लागलेल्या आगींमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. ब्रिटन आणि स्कॉटलंडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये अतिउष्णतेमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला. लंडन भागात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. तसेच डझनभर मृत्यूंची नोंद झाली. सर्वांत धक्कादायक गोष्टी ही होती, की ल्युटन विमानतळावरील धावपट्टी उष्णतेमुळे वितळली. हवामान बदलाच्या ज्वाळाने युरोपला घेरले आहे...

संपूर्ण युरोपमध्ये तापमान वाढत आहे. अशात दरवर्षी अतिउष्णतेच्या लाटा येणे ही सामान्य बाब झाली आहे. या वर्षी अनेक युरोपीयन देशांनी आतापर्यंतच्या सर्वांत वाईट उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेतला. या उष्णतेमुळे विमानतळाच्या धावपट्ट्या वितळल्या, अनेक ठिकाणी आग लागली आणि उष्माघातामुळे हजारो मृत्यू झाले. युरोपातील अनेक प्रदेशांत ३५ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली; तर काही प्रदेशांत हे तापमान आतापर्यंत कधीच ऐकिवात नव्हते इतके म्हणजे ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. थोडक्यात, परिस्थिती भयानक आहे. स्पेन, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये प्रचंड उष्णतेमुळे लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.

ब्रिटनमध्ये या आठवड्यात आगीच्या चार घटना घडल्या. १९ जुलै रोजी संपूर्ण ब्रिटन आणि स्कॉटलंडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये अति उष्णतेमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला. तिथे तापमान ४० अंश सेल्सिअस आणि अनेक प्रदेशांमध्ये त्याहून अधिक झाले. आतापर्यंतचे हे विक्रमी तापमान आहे. महामार्गावर वाहनधारकांना इलेक्ट्रॉनिक चिन्हांच्या माध्यमातून अतिउष्णतेचा इशारा देण्यात येत आहे आणि त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. लंडन आणि आसपासच्या भागांत आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. तसेच डझनभर मृत्यूंची नोंद झाली. एवढेच नाही, तर दुसऱ्या जागतिक युद्धानंतर १९ जुलै हा सर्वांत व्यग्र दिवस असल्याचे लंडन अग्निशमन दलाने म्हटले आहे. त्या दिवशी त्यांना अगणित आगी विझवण्याचे काम करावे लागले. येथील हिथ्रो विमानतळावर मंगळवारी ४० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्याने तापमानाचा राष्ट्रीय विक्रम स्थापन केला. पूर्व लंडनमध्ये गवताला आग लागून जवळपास पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. लंडनच्या उपनगरांमध्ये आगीच्या काही घटना घडल्या. सर्वांत धक्कादायक गोष्टी ही होती की ल्युटन विमानतळावरील धावपट्टी उष्णतेमुळे वितळली. त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. लंडनच्या उत्तरेकडील केंब्रिजशायर येथील ए १४ रस्ता अतिउष्णतेमुळे वितळला. लंडनच्या उत्तरेकडील अनेक मार्गांवर प्रवासी गाड्याही थांबल्या, ज्यामुळे वाहतूक विस्कळित झाली.

फ्रान्समध्ये वणव्याचा उद्रेक झाला आणि सुमारे २४ हजार लोकांना सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थांचा आधार घेणे भाग पडले. ‘टूर डी फ्रान्स’ या प्रसिद्ध बाईक शर्यतीच्या वेळी रस्ते वितळण्याची दुर्घटना घडू नये म्हणून रस्त्यावर पिंप भरून भरून पाणी ओतण्यात आले. नैर्ऋत्येकडील ‘गिरोंदे’ या लोकप्रिय पर्यटनस्थळाला आग लागली ती वेळ अग्निशमन दलासाठी कठीण होती. त्या ठिकाणी झाडे बॉम्ब फुटल्यासारखी फुटत होती. त्यातून आग आणि धूर पसरत होता. यामुळे गुदमरून लोकांचा मृत्यूही होऊ शकतो. एका आठवड्याच्या आत या प्रदेशातील ३४ हजार एकर जमीन आगीमुळे ध्वस्त झाली. ‘ला-तेस्ते-दी बुच’ आणि ‘लँदिरस’ या गिरोंदे प्रदेशातील कम्यूनमध्ये उष्ण आणि चक्राकार वाऱ्यांमुळे आग आटोक्यात आणणे अग्निशमन दलाला अशक्य होऊन बसले. गिरोंदे येथील आग आटोक्यात आणण्यासाठी दीड हजार अग्निशमन दलाच्या जवानांच्या जोडीला दोनशे सैनिकांची कुमक मागवण्यात आली. जिथे द्राक्षमळे आगीत भस्मसात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘ऑर्क्याकॉन’ला धुराच्या लोटांनी वेढले आहे. यामुळे ऑयस्टर आणि समुद्रकिनाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे, जी येथील विशेष ओळख आहे.

या उष्णतेला ‘उष्णतेची परिसिमा’ (apocalypse of heat) म्हटले गेले आहे. वायव्य ब्रिटनीमधील ब्रेस्तसारख्या प्रदेशांमध्ये जुलै महिन्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. जे आतापर्यंतचे इथले सर्वोच्च तापमान आहे. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये उष्माघातामुळे हजारो मृत्यू झाले आहेत आणि ही संख्या वाढतेच आहे. कॅटालोनिया, झामोरा, कॅस्टिला वाय लिओन, गॅलिसिया, कॅस्टिले, अँडालुसिया आणि एक्स्ट्रेमादुरा या स्पॅनिश प्रदेशांमध्ये आगीमुळे घरे, पशुधन तसेच जीवितहानी झाली. ३० पेक्षा जास्त जंगलांना आग लागल्यामुळे हजारो लोकांना निर्वासित व्हावे लागले. तसेच २२० चौ. कि.मी. वनक्षेत्र जळून खाक झाले. पोर्तुगालपासून बाल्कनपर्यंत आगीमुळे सर्वत्र नासधूस होत आहे. आयबेरियन पेनिसुलामध्ये उष्णतेमुळे शेकडो मृत्यू झाले; तर उत्तर इटलीतील अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोर्तुगालमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. राष्ट्रीय हवामानशास्त्र कार्यालय ‘आयपीएमए’नुसार आग लागून तीव्र दुष्काळी परिस्थितीचा धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. देशाच्या एक तृतीयांश भागात २०१७ मध्ये आगीमुळे ६६ मृत्यू झाले होते आणि हे वर्ष आणखी वाईट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ७ ते १३ जुलै या कालावधीत देशात दर ४० मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोर्तुगाल आधीच तीव्र दुष्काळाशी झुंजत होता. आग आणि जीवितहानीमुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी ‘पर्यावरण संशोधन : हवामान’ नावाने संशोधन केले आहे. तसेच ‘वर्ल्ड वेदर अॅट्रीब्युशन क्लायमेट’द्वारे केलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले, की हवामान बदलांमुळे उष्णतेच्या लहरींची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे आणि ही उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. याला हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनेलने दुजोरा दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे, की या १०० वर्षांच्या औद्योगिक क्रांतीच्या युगात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता अधिक होत आहे. हरितगृह वायू उत्सर्जनामुळे औद्योगीकपूर्व काळाच्या तुलनेत या काळात १.१ अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. गेल्या वर्षी शास्त्रज्ञांना प्रति दशलक्ष ४१९ कार्बन डायऑक्साईडचे कण आढळले. जे लाखो वर्षांतील सर्वोच्च प्रमाण आहे. कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर हरितगृह वायू उत्सर्जित झाल्यानंतर ते शतकापर्यंत वातावरणात जिवंत राहतात. सध्या अनुभवल्या जाणाऱ्या उष्णतेच्या लाटा भूतकाळातील अशा उत्सर्जनामुळे उद्‍भवतात आणि याची वारंवारता वाढतच राहील.

दुर्दैवी सत्य हे आहे, की हवामान बदलाचा परिणाम बहुधा निष्पाप आणि सर्वांत दुबळ्या लोकांवर होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर अति उष्णतेमुळे विषमतेचा गंभीर अनुभवही येतो. श्रीमंतांपेक्षा गरिबांना जास्त धोका असतो. उघड्यावर काम करणाऱ्या गरीब मजुरांसाठी बाहेर काम करणे हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असते. त्यामुळे उष्णतेची लाट ते टाळू शकत नाहीत. गरीब आणि बेघर लोकांना उष्णता आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी निवारा मिळत नाही, त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच ज्यांना परवडते त्यांच्याकडून जास्त उष्णतेपासून वाचण्यासाठी वातानुकूलन यंत्रांचा अधिक वापर केला जातो. हे लोक हरितवायू उत्सर्जनात आपले योगदान देतात. कारण रेफ्रिजरेटरमध्ये गरम हवेला थंड करण्यासाठी हायड्रोफ्लोरोकार्बनचा (HFCs) वापर केला जातो. हायड्रोफ्लोरोकार्बन हा वायू कार्बन डायऑक्साईडपेक्षा कैकपटीने उष्णता शोषून घेतो. जेव्हा असे वायू वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा उष्णतेच्या लाटांचा धोका वाढतो. गरिबीत राहणाऱ्या लोकांचा अधिक धोकादायक जीवनशैलीशी थेट संबंध येतो. विजेच्या उच्च किमतींविषयी तर बोलायलाच नको. १.२ अब्ज लोकांपर्यंत अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो. जंगलातील प्राणीदेखील निसर्गावर अवलंबून असतात. अनेकदा जंगलात लागलेल्या आगीमुळे आणि मानवी कृत्यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊन त्यांचा जीव जातो.

अमेरिकेतील डार्टमाऊथ महाविद्यालयाने नुकताच एक अभ्यास केला. यात असे आढळून आले, की श्रीमंत देश मोठ्या प्रमाणात हानीकारक हरितग्रह वायू उत्सर्जन करतात. ज्याचा परिणाम हवामान बदल आणि आर्थिक वाढ या दोन्ही बाबतीत उर्वरित देश आणि जगावर होतो. हा परिणाम कल्पनातीत आहे. या संशोधकांना असे आढळून आले, की हरितगृह वायूंच्या टॉप १० जागतिक उत्सर्जकांमुळे ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, जे जगभरातील नुकसानाच्या दोन तृतीयांश आहे. उत्सर्जन करणाऱ्यांच्या यादीत अमेरिका आणि चीन अव्वल स्थानावर आहेत. गेल्या अडीच दशकांत त्यांनी प्रत्येकी सुमारे १.७९ ट्रिलियन युरो इतके जागतिक उत्पन्नाचे नुकसान केले आहे (१९९०-२०१४). भारत, रशिया आणि ब्राझील या इतर तीन देशांनी याच कालावधीत प्रत्येकी ४९८ अब्ज युरोपेक्षा जास्त नुकसान केले. या पाच देशांनी मिळून जगभराचे सुमारे सहा ट्रिलियन युरोचे एकत्रित नुकसान केले आहे. जे जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ११ टक्के इतके आहे.

संशोधक पुढे सांगतात, की हरितगृह उत्सर्जनामुळे तापमान वाढते, ज्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी होते.

तसेच कामगारांची उत्पादकता कमी होते. परिणामी, अन्न उत्पादनावर परिणाम होतो. तसेच इतर देशांचे आर्थिक नुकसान होते. उदाहरणार्थ अमेरिकेच्या उत्सर्जनामुळे मेक्सिकोच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात १९९०-२०१४ दरम्यान ७९ अब्ज युरोचा घाटा झाला. त्याचप्रमाणे अमेरिकेमुळे ब्राझिलला ३०८ अब्ज युरो, भारताला २५५ अब्ज युरो आणि इंडोनेशियाला १२३ अब्ज युरोचे आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु उत्तरेकडील थंड प्रदेशांना उष्ण तापमानाचा वाढत्या अन्न उत्पादनाच्या दृष्टीने फायदाही झाला आहे. (जी पिके थंड हवामानात उगवत नाहीत त्यांना किंचित उष्ण तापमानात वाढणे सोपे जाते.) त्यामुळे वर नमूद केलेल्या कृषिप्रधान देशांनी उच्च तापमानामुळे उत्पादन गमावले. अमेरिका आणि कॅनडाला जागतिक तापमानवाढीचा मोठा फायदा झाला आहे. अमेरिकेने यामुळे १८२ अब्ज युरोपेक्षा जास्त; तर कॅनडाने सुमारे २४६ अब्ज युरोपेक्षा जास्त कमावले आहे. याचा अर्थ असा, की दक्षिणेकडील उष्ण आणि गरीब देशांना सर्वांत उष्णतेचा जास्त फटका बसला आहे.

या संशोधनातून हे स्पष्ट होते, की श्रीमंत देश जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहेत, पण त्याचबरोबर ते इतर देशांच्या विकासावर गंभीर नकारात्मक परिणाम करतात. या संशोधनातील आकडेवारीच्या साह्याने या देशांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच गरीब देशांना त्यांच्याकडून नुकसान भरपाई दिली जाऊ शकते आणि त्यांच्या हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रणदेखील आणले जाऊ शकते. हवामान संकट आपल्या डोक्यावर घोंघावत आहे हे तर स्पष्टच आहे.

दुर्दैवाने सर्वांत मोठे प्रदूषक देशच सर्वांत जास्त शक्तिशाली आहेत. युक्रेन-रशिया संघर्षामुळे युरोपमधील ऊर्जा संकटावर तोडगा निघत नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘सीओपी२६’ परिषद पार पडली. यात जीवाश्म इंधनावर पूर्णपणे बंदी घालण्याचे अनेक देशांनी मान्य केले होते, पण त्यांनी या निर्णायावरून घूमजाव केले. यामुळे जागतिक तापमानवाढीत भर पडणार आहे. हे दुष्टचक्र पृथ्वीला विनाशाकडे नेत आहे. मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी पुनर्निर्मितीक्षम स्रोतांचा वापर सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोवर परिस्थिती गंभीरच राहील. श्रीमंतांच्या चुकांचा फटका निर्दोष आणि दुबळ्यांना (गरीब देश, लोक, पशुधन, वन्यजीव) बसू नये यासाठी ‘पर्यावरणीय न्याया’ला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांपासून युरोपला प्रचंड उष्णता आणि थंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्तेबांधणी, पायाभूत सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. लोकांना तीव्र हवामानाचा सामना करता यावा या दृष्टीने प्राधान्य देणे गरजेचे आहे. बेघरांसाठी अधिक निवारे बांधले जाणे आवश्यक आहे. तसेच आपत्कालीन मदत जोमदार आणि प्रभावी करण्यासाठी अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानासाठी योजनांमध्ये बदल करणेही आवश्यक आहे, पण तरीही प्रश्न उरतोच, की आपण आधीच खूप उशीर केला आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.