दर्शन गंगेच्या उगमस्थळांचं

भारताची जीवनदायी नदी म्हणजे गंगा. अगदी लहानपणापासून गंगानदीबद्दल एक सुप्त आकर्षण होतं.
travel origin of Ganga river Darshan nature beauty
travel origin of Ganga river Darshan nature beautysakal
Summary

भारताची जीवनदायी नदी म्हणजे गंगा. अगदी लहानपणापासून गंगानदीबद्दल एक सुप्त आकर्षण होतं.

- मालोजीराव जगदाळे

दहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं खोरं आणि त्यात राहत असलेले ४० कोटींपेक्षा जास्त लोक, सुमारे २५२५ किलोमीटर लांबी, एक हजारपेक्षाही जास्त उपनद्या, जे या नदीच्या पाण्यावर आजही अवलंबून आहेत...

ही भारताची जीवनदायी नदी म्हणजे गंगा. अगदी लहानपणापासून गंगानदीबद्दल एक सुप्त आकर्षण होतं. या नदीचा उगम कसा होत असेल, कुठं होत असेल, उगमाजवळ या नदीचा प्रवाह किती मोठा असेल, याबद्दलचं प्रचंड कुतूहल माझ्या मनात होतं.

सह्याद्रीमुळे ट्रेकिंगची गोडी लागली आणि ट्रेकिंगमुळे हिमालयाबद्दलसुद्धा आकर्षण निर्माण झालं आणि हिमालयात फेऱ्या सुरू झाल्या. कानपूर आणि प्रयागराज येथील गंगेची आत्ताची जी स्थिती आहे, ते पाहून मन विषण्ण होतं; पण याच गंगेचं पात्र जसजसं उत्तरेकडे जात राहील, तसतसं अधिकाधिक स्वच्छ आणि नेत्रसुखद होत जातं.

हरिद्वार बऱ्यापैकी भाविकांनी गजबजलेला असल्यामुळे हरिद्वारला खो देऊन मी ऋषिकेशला जाऊन पोहोचलो, जिथं माझी आणि गंगेची पहिली भेट झाली. योग कॅपिटल म्हणून प्रसिद्ध असलेलं ऋषिकेश हिमालयाचा पायथा आहे, जिथून हिमालयातल्या शिवालीक पर्वतरांगा सुरू होतात.

पुढे शिवालीक ते हिमाल आणि हिमाल ते मुख्य हिमालय असा हिमालयाचा चढत्या क्रमाने प्रवास आहे. गंगेचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रमुख मानले जाणारे असे दोन प्रवाह आहेत, एक म्हणजे गंगोत्रीजवळ उगम पावणारी भागीरथी नदी आणि दुसरा प्रवाह म्हणजे बद्रीनाथजवळ उगम पावणारी अलकनंदा नदी. म्हणूनच गंगेच्या दोन्हीही प्रवाहांच्या उगमस्थानांना भेट देण्याचा संकल्प मी केला.

बस स्टँडमधून पहाटे पाचलाच गंगोत्रीला थेट जाणारी एकमेव अशी उत्तराखंड राज्य परिवहनची बस असते. ऋषिकेश, चंबा, उत्तरकाशी, हर्षिल ते गंगोत्री असा २७० किलोमीटरचा प्रवास आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून हा प्रवास होत असल्याने २७० किलोमीटर जरी अंतर असलं, तरीसुद्धा वेळ मात्र दहा तासांपेक्षा अधिक लागतो आणि ऋषिकेशमधून समुद्रसपाटीपासून ३०० फूट उंचीवरून सुरू झालेला प्रवास हा गंगोत्रीमध्ये दहा हजार फूट उंचीवर येऊन थांबतो.

सर्वसाधारणपणे लोक गंगोत्रीला जाऊन गंगेचं उगमस्थान आहे या भावनेतून दर्शन घेऊन परत फिरतात; परंतु गंगोत्रीपासून सुमारे दोन दिवस चालत किंवा ट्रेकिंग करत खडतर मार्गाने गंगोत्री ग्लेशियरपर्यंत जावं लागतं, जिथे खऱ्याअर्थाने गंगेच्या एका मुख्य प्रवाहाचा म्हणजे भागीरथीचा उगम आहे.

हा संपूर्ण प्रदेश आणि इथली हिमशिखरं ही गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहेत, त्यामुळे इथे प्रवेश करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी यांच्याकडून ट्रेकिंग परमीट मिळवावं लागतं, सध्या ते ऑनलाइनसुद्धा उपलब्ध आहे. तसंच, सोबत गाइड घेणं कंपल्सरी आहे. दुसरी परवानगी म्हणजे चीनच्या सीमेलगत असल्याने इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यांच्याकडून घ्यावी लागते.

आम्हा दोघांना मिळून जिल्हाधिकारी कार्यालयामधून हिकमत सिंह नावाचा सत्तर वर्षांचा तरणाबांड गाइड देण्यात आला. परवानग्यांचे सोपस्कार घेण्यातच संपूर्ण दिवस गेल्याने गाइडसोबत पुढची बोलाचाली करून गंगोत्रीमध्ये मुक्काम केला आणि पहाटे पहाटेच गंगोत्री मंदिरामध्ये आरती झाल्यावर गंगोत्री ग्लेशियरकडे प्रयाण केलं.

आमचा गाइड हिकमत सिंह अतिशय बोलका होता. बोलताना त्याच्याकडून माहिती मिळाली की, त्याने एकेकाळी कॅप्टन मोहन सिंह कोहली यांच्यासोबतसुद्धा काम केलं होतं. कॅप्टन एम. एस. कोहली म्हणजे भारताच्या पहिल्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख. आम्ही साधारणपणे १२ हजार फुटांची उंची गाठली होती, त्यामुळे वातावरणातला ऑक्सिजन कमी झालेला जाणवत होता आणि आम्हाला चालताना धापसुद्धा लागत होती.

श्वसनाचे आजार असलेल्यांनी, तसंच इतर आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या ठिकाणी ट्रेकला यावं. तर... गंगोत्रीमधून आम्ही सकाळी लवकर निघून मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे भोजबसा इथे येऊन पोहोचलो.

या ठिकाणी एका साधूचा आश्रम आहे, तिथंच आम्ही राहण्याचं ठरवलं. साधू महाराजांनीसुद्धा आमचं चांगलं आगतस्वागत केलं. अनेक परदेशी ट्रेकर्ससुद्धा त्यादिवशी मुक्कामाला आश्रमात होते.

त्या दिवशीची रात्र अतिशय खडतर गेली, कारण की प्रचंड थंडीचे दिवस होते आणि रात्री थंडी जवळपास मायनस दहा डिग्री सेल्सिअस इतकी होती. रात्रभर झोप लागली नाही आणि सकाळ व्हायची सगळेजण वाट बघत होते. पहाटेच आम्ही सर्व व्हरांड्यात येऊन बसलो. समोर उभी ठाकलेली भगीरथ पर्वताची अशी २२ हजार फुटी शिखरं सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेली होती.

भगीरथ पर्वतासोबतच शिवलिंग पर्वत, सुदर्शन पर्वत, मेरू पर्वत, केदार डोम अशी हिमालयातील उत्तुंग शिखरं आम्हाला अगदी जवळून न्याहाळता येत होती. सकाळच्या बर्फाळ वातावरणात न्याहारी करून आम्ही गंगोत्री ग्लेशियरकडे निघालो. साधारणतः तीन तासांनी आम्ही गंगोत्री ग्लेशियरजवळ पोहोचलो.

निसर्गाची अद्‍भुत किमया म्हणजे ही गंगोत्री हिमनदी आहे. तीस किलोमीटर लांब, दीड किलोमीटर रुंद आणि मुखाजवळ जवळपास शंभर फूट उंच अशी ही भव्य हिमनदी आहे. या हिमनदीच्या मुखातून वितळलेल्या बर्फाचा अतिशय लहान झऱ्यासारखा पाण्याचा प्रवाह वाहतो, तेच हे गंगेचं उगमस्थान, ज्याला गोमुख नावाने ओळखलं जातं.

समुद्रसपाटीपासून १३ हजार ५०० फूट उंचावर हे अक्षरशः नजरबंदी व्हावी असं ठिकाण आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असतं ते खऱ्या अर्थाने इथे बघायला मिळालं. एकेकाळी ३० किलोमीटर लांबीचं असणारं गंगोत्री ग्लेशियर आता फक्त साडे २८ किलोमीटर राहिलेलं आहे, ज्यामुळे गंगेचं उगमस्थान असणारं गोमुखसुद्धा दीड किलोमीटर मागे सरकलं आहे.

असो, तर मिशन भागीरथी फत्ते झालं, आता पुढे अलकनंदाकडे कूच करायचं होतं, त्यासाठी लवकरात लवकर बद्रीनाथ गाठणं गरजेचं होतं. पुन्हा मागे ऋषिकेशमध्ये येत दोन दिवस आराम केला आणि तिसऱ्या दिवशी मात्र बाइक भाड्याने घेतली आणि पुढचा बद्रीनाथपर्यंतचा प्रवास बाइकनेच केला.

देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग असे पाचही प्रयाग पार करून मी बद्रीनाथमध्ये पोचलो. भगवान बद्रीविशाल यांचं दर्शन घेऊन बद्रीनाथपासून दोन किलोमीटर लांब असलेल्या माना या गावातून मी माझ्या दोन दिवसांच्या ट्रेकला सुरुवात केली. पांडवांनी याच गावातून सदेह स्वर्गात जाण्यासाठी स्वर्गारोहिणी पर्वताकडे कूच केल्याची आख्यायिका आहे.

या प्रवासातसुद्धा गाइड घेण्याची गरज असून, गाइडसोबत कूक, टेंट व इतर ट्रेकिंग इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. ते घेऊन आम्ही माना ते वसुधारा, वसुधारा ते लक्ष्मीवन, लक्ष्मीवन ते सतोपंथ ग्लेशियर असा पायी प्रवास करून दोन दिवसांनी अशा ठिकाणी येऊन पोहोचलो, ज्या ठिकाणी दोन हिमनद्यांचा संगम होतो.

दोन नद्यांचा संगम होणं ही तशी सामान्य बाब; परंतु दोन हिमनद्यांचा संगम पाहायला मिळणं ही तशी दुर्मीळ बाबच. चौखंबा पर्वत आणि सतोपंथ पर्वत येथून उगम पावणारे सतोपंथ ग्लेशियर व भगीरथ खडक ग्लेशियर या दोन हिमनद्यांचा हा संगम... आणि या संगमाच्या इथेच हिमनदीचं मुख आहे, ज्या मुखातून अलकनंदा नदीचा उगम होतो.

या संपूर्ण भागाला अलकापुरी असं म्हणतात. अलकापुरी इथे गंगेच्या या दुसऱ्या उगमस्थळाचं दर्शन घेतलं, काही काळ इथे रेंगाळलो... आसपास दिसणारे नीलकंठ पर्वत, चौखंबा पर्वत, पार्वती पर्वत, बलाकुन पर्वत, नरनारायण पर्वत यांचा नजारा डोळ्यांत साठवून घेतला आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो.

गंगेचा उगम नक्की कुठे आणि कसा होतो, गंगेला बाराही महिने पाणी कसं काय असतं, हिमनदी नक्की कशी दिसते याचं कुतूहल शमलं; परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा होत असलेला हा ऱ्हास बघून मन चिंतातुर झालं.

सुरुवात भागीरथी नदीपासून करण्याचं ठरलं. ऋषिकेशमध्ये दोन दिवस मुक्काम केला, सर्व वस्तूंची जुळवाजुळव केली. भारतातली सर्वात उंच शिखरं ही उत्तराखंड राज्यामध्ये आहेत, त्यामुळे एकप्रकारे ऋषिकेश हा ट्रेकरसाठी बेस कॅम्पच ठरतो. ऋषिकेशमध्ये ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या वॉकिंग स्टिक्स, उबदार अशी डाउन जॅकेट्स, ट्रेकिंगसाठी लागणारे शूज, रकसॅक, हाय अल्टिट्यूडवर लागणाऱ्या इतर गोष्टी सहज उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com