वेगळ्या वळणाचा अझरबैजान...

अझरबैजान फिरताना मनात उमटणारी पहिली प्रतिमा म्हणजे देशावर असलेला शंभर टक्के युरोपियन प्रभाव आणि प्रचंड स्वस्ताई.
Malojirao Jagdale writes Azerbaijan trip exprience Azerbaijan Tour Packages taxi railway transport
Malojirao Jagdale writes Azerbaijan trip exprience Azerbaijan Tour Packages taxi railway transport sakal
Summary

अझरबैजान फिरताना मनात उमटणारी पहिली प्रतिमा म्हणजे देशावर असलेला शंभर टक्के युरोपियन प्रभाव आणि प्रचंड स्वस्ताई.

मालोजीराव जगदाळे

अझरबैजान फिरताना मनात उमटणारी पहिली प्रतिमा म्हणजे देशावर असलेला शंभर टक्के युरोपियन प्रभाव आणि प्रचंड स्वस्ताई. मागील शतकात तेलाचे आणि मागील दशकामध्ये गॅसचे प्रचंड साठे या देशात सापडल्याने इंधनाचे दर येथे अगदीच कमी आहेत

आणि त्यामुळे पर्यायाने येथील टॅक्सी सेवा, रेल्वे, इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट यांचे सुद्धा दर एकदम वाजवी आहेत. इतर कोणत्याही आधुनिक देशात टॅक्सी न वापरणारा मी मात्र इथे आठवडाभर फक्त टॅक्सीनेच फिरलो.

युरोपचे पूर्व प्रवेशद्वार समजला जाणारा देश. कॉकेशियन पर्वतरांगांनी वेढलेला, समोर कॅस्पियन समुद्र उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, बर्फाळ पर्वतरांगांसह वाळवंटसुद्धा अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना लाभलेला अझरबैजान देश इतकी वर्ष आपल्या नजरेतून कसा काय सुटला याचे राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

अबुधाबीच्या रखरखत्या उन्हातून विमान जेव्हा अझरबैजानची राजधानी बाकू या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा बाहेरचं तापमान साधारणतः दोन ते तीन डिग्री असावं. बर्फाळ वारं आणि आजूबाजूचं वातावरण बघून मध्य आशियातील एखाद्या देशात आलोय अस अजिबातच वाटत नव्हतं.

थोडं विचित्र भौगोलिक स्थान, भारतातून बऱ्यापैकी लांब आणि युरोपला एकदमच लागून असल्यानं त्याच बरोबर इथे येण्या- जाण्यासाठी लागणारा विमानाचा खर्च हा अन्य युरोपियन देशांइतका असल्याने या देशाकडं भारतीय पर्यटकांकडून पाठ फिरवली जाते आणि इतका सुंदर देश बघायचा राहून जातो.

माझ्या मनातसुद्धा नेमका हाच विचार त्यावेळी आला परंतु या संदर्भात एक पर्याय मला सापडला. भटकंतीदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई आणि अबुधाबी या शहरांची जर आपण भटकंती करणार असाल तर त्याला जोडून तुम्हाला अझरबैजान करता येईल. जर काही महिने आगाऊ तिकीट केलं तर अबुधाबीहून काही लो कॉस्ट एअरलाइन्स फक्त साडेचार हजारात आपल्याला बाकूला नेऊन सोडतात.

रशियन फेडरेशनचा भाग असलेला हा देश १९९१ मध्ये बाहेर पडून स्वतंत्र झाला. परंतु येथील भाषा, संस्कृती, राहणीमान यांच्यावर मोठा प्रभाव रशियाचा आढळतो. अझेरी आणि रशियन या दोन प्रमुख भाषा इथे बोलल्या जातात.

तर इथले स्थानिक चलन ‘मनात’ असे आहे. नकाशावर जरी हा देश आशियामध्ये मोडत असला तरी याच्या भौगोलिक स्थानवैशिष्ट्यामुळे याचे राजकीय हितसंबंध युरोपात जास्त आहेत.

राजधानीचे शहर असलेले बाकू देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे त्यामुळे जवळपास २५ लाख लोक या शहरात राहतात. इथल्या मध्ययुगीन आणि आधुनिक काळातल्या पण वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैली असलेल्या इमारतींसाठी बाकू प्रसिद्ध आहे.

अझरबैजान ला गालिच्यांची राजधानीसुद्धा म्हटले जाते, एक हजार वर्षांपासून विविध जमातींकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या वैशिष्ट्यपूर्ण गालिचांची निर्मिती केली जाते. हा संपूर्ण इतिहास बाकू मधील कार्पेट म्युझियमच्या माध्यमातून मांडला गेला आहे. या म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीचा आकारसुद्धा गुंडाळलेल्या गालीच्या सारखा आहे. जगप्रसिद्ध आर्किटेक्ट झाहा हादिद याने डिझाईन केलेले हैदर अलियेव

संग्रहालय हे जगभरातील मोजक्या सर्वात सुंदर इमारतींमध्ये गणले जाते. अझरबैजानमधील नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांमुळे या देशाला ‘लँड ऑफ फायर’ असं सुद्धा म्हटले जाते. याचे प्रतीक म्हणून राजधानीमध्ये ‘फ्लेम टॉवर्स’ची निर्मिती करण्यात आली. रात्रीच्या वेळी या इमारती मधून ज्वाला बाहेर निघतात असा भास निर्माण केला जातो.

अझरबैजानला मोठा इतिहास लाभला आहे. बाकू च्या मध्यभागी ओल्ड सिटी किंवा स्थानिक भाषेत इशेरी शेहेर म्हणून ओळखले जाणारे अकराव्या शतकातील जुने शहर आहे. येथील स्थानिक राजे असलेल्या शिरवानशाह घराण्याच्या अनेक इमारती तसेच त्यानंतर आलेली राजवट सफाविद यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक इमारती येथे आहेत. मुघलांना अनेक युद्धात हरवणारा तसेच औरंगजेबाला शिवरायांच्या स्तुतीचे पत्र पाठवणारा शाह अब्बास (द्वितीय) हा याच देशाचा शासक होता.

इशेरी शेहेर मधील शिरवानशाह राजवाडा, मुलतानी कारवानसराई, बुखारा कारवानसराई, सिनिगला मिनार या वास्तु आवर्जून बघण्यासारख्या आहेत. या ओल्ड सिटीच्या तटबंदीलगत असणारी जवळपास १०० पेक्षा जास्त दुकाने ७००-८०० वर्षे तिथं आहेत.

अझरबैजानला लाभलेला सांस्कृतिक वारसासुद्धा अतिशय मोठा आहे अतिशय नामवंत कवी, लेखक या देशाने दिले आहेत. लैला मजनू या प्रसिद्ध काव्याचा लेखक निजामी गंजावी हा येथील ऐतिहासिक गंजा शहरातील होता.

अझरबैजानमध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा या देशावर असणारा प्रभाव. राज कपूर, अमिताभ बच्चन पासून ते शाहरुख खानपर्यंत जवळपास सर्वच बॉलीवूड स्टार्स इथे प्रसिद्ध आहेत. इथल्या कॅफे, रेस्टॉरंटमध्ये आपल्याला हिंदी गाणी वाजताना दिसतील. आणि यामागे एक गंमतीशीर इतिहास सुद्धा आहे,

सोवियत रशियाच्या अधिपत्याखाली अनेक दशके हा देश होता त्यावेळी कोणत्याही प्रकारचे अमेरिकन चित्रपट अथवा कलाकृती यांच्यावर येथे बंदी होती. त्यामुळं मनोरंजनाचे इतर साधन लोकांना उपलब्ध करून देणे ही येथील प्रशासनाला गरजेचे होते.

त्यावेळी पर्याय म्हणून येथील टीव्ही, सिनेमाघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट आणि मालिका दिसू लागल्या. त्यामुळे काही वर्षात ही गोष्ट अंगवळणी पडून या चित्रपटांची इथल्या लोकांना सवय झाली.

देशातील ९० टक्के नागरिकांचा धर्म हा इस्लाम जरी असला तरी सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने लोकांच्या राहणीमानातून याचे ठळक प्रतिबिंब उमटते. दिवसभराचे आपले कार्यालयीन काम उरकून लोक संध्याकाळी मित्रांसोबत अथवा घरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी अथवा पार्टीसाठी बाहेर हा इथला दिनक्रम आहे असे जाणवले.

बाकू शहरातील निझामी रस्ता पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मोठ्या प्रमाणावर कॅफे, बार, स्ट्रीट शॉपिंग, मॉल येथे आहेत. भारतात प्रसिद्ध नसलेले पूर्व युरोपातील देशांचे अनेक मोठे ब्रँड येथे बघायला मिळतात. अगदी भारताच्या तुलनेतसुद्धा येथील कपडे तुलनेने स्वस्त आहेत.

त्यामुळे शॉपिंग करण्याचा जर इरादा असेल तर हा देश तुमच्या विशलिस्टमध्ये असायला हवाच. देश फिरण्यासाठी अतिशय सुरक्षित असून देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही बिनदिक्कत प्रवास करू शकता.

अझरबैजानची सांस्कृतिक राजधानी गंजा शहर सुद्धा अतिशय सुंदर असून अनेक सुंदर मध्ययुगीन इमारती येथे आहेत. भारतीयांसाठी अझरबैजानचा इ व्हिसा उपलब्ध आहे. अर्ज केल्यावर अगदी चोवीस तासांच्या आत तो आपल्याला मिळतो.

येथील स्थानिक खाद्यसंस्कृती थोड्याफार फरकाने भारतासारखीच आहे, प्रामुख्याने येथील पदार्थांवर तुर्कस्तान, रशिया, भारत, इराण या देशांचा प्रभाव जाणवतो. अझरबैजान देश कझाकिस्तान, जॉर्जिया, संयुक्त अरब अमिराती अथवा युरोपातील एखादा देश यांच्यासोबत केल्यास जास्त सोयीस्कर आणि फायदेशीर तुमचा प्रवास होईल. थोडा वेगळ्या धाटणीचा उत्कृष्ट आधुनिक स्थापत्य शैलीच्या इमारतीने नटलेला सांस्कृतिक, भौगोलिकरित्या संपन्न असा देश आवर्जून बघायला हवा.

(लेखक जगभर भटकंती कऱणारे असून साहसी पर्यटनावर त्यांचा विशेष भर आहे. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com