Amer Fort
Amer Fortsakal

जागतिक वारसास्थळं आणि आपण

जागतिक वारसा दिवस नुकताच साजरा झाला. आपली वारसा स्थळे जपणं जशी आपली महत्त्वाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपली वारसा स्थळे जागतिक नकाशावर येणे हीसुद्धा मोठी जबाबदारी.
Summary

जागतिक वारसा दिवस नुकताच साजरा झाला. आपली वारसा स्थळे जपणं जशी आपली महत्त्वाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपली वारसा स्थळे जागतिक नकाशावर येणे हीसुद्धा मोठी जबाबदारी.

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

जागतिक वारसा दिवस नुकताच साजरा झाला. आपली वारसा स्थळे जपणं जशी आपली महत्त्वाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपली वारसा स्थळे जागतिक नकाशावर येणे हीसुद्धा मोठी जबाबदारी एक नागरिक म्हणून, एक समाज म्हणून आपल्यावर आहे. युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड झालेली संपूर्ण जगभरात केवळ ११५७ वारसा स्थळे आहेत तर भारतात फक्त ४० ठिकाणे आहेत . वारसा स्थळे मुख्यत्वे दोन प्रकारची असतात सांस्कृतिक आणि नैसर्गिक. सांस्कृतिक गटामध्ये स्थळाला लाभलेला अतिशय महत्त्वाचा इतिहास तसेच संबंधित देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये असलेले योगदान यामुळे अशा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले जाते. नैसर्गिक मध्ये स्वतःच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध असलेली काही ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ ताजमहाल सांस्कृतिक वारसा स्थळ आहे तर पश्चिम घाट हे नैसर्गिक वारसा स्थळाचे उदाहरण आहे.

विविध देशांमध्ये असणारी वारसा स्थळे ही त्या देशांचे प्रमुख पर्यटनासाठीचे आकर्षण ठरतात. ग्रीस मधील रोमन साम्राज्याचे अवशेष, तुर्कस्तानमधील ऑट्टोमन साम्राज्याचा वारसा सांगणारी स्मारकं, कंबोडिया मधील अंकोरवाटचा जगातील सर्वांत मोठा मंदिर समूह, इंडोनेशियामधील बोरोबुदुर हे जगातील सर्वांत मोठे बुद्धिस्ट स्मारक आणि बाली मधील हिंदू मंदिरे, व्हॅटिकन सिटी मधील मायकेल अँजेलो आणि बर्निनी यांनी उभारलेल्या वास्तुशिल्पे, इस्रायल मधील जेरुसलेम शहर आणि बेथलेहॅम, पेरू मधील माचू पीचू, क्रोएशियामधील डूब्रोव्हनिक् हे प्रसिद्ध मध्ययुगीन शहर ही काही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणता येतील.

rajagad fort
rajagad fortsakal

आपल्या देशात असलेल्या ४० जागतिक वारसा स्थळांपैकी बत्तीस वारसा स्थळे ही सांस्कृतिक, सात वारसा स्थळे ही नैसर्गिक तर एक वारसा स्थळ कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान हे मिश्र वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे. कोणतेही वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होऊन जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणे का गरजेचे आहे, तर या यादीत समाविष्ट झाल्याने जागतिक नकाशावर ही स्मारके अथवा स्थळे येतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावले आपसूक या स्थळांकडे वळतात.

या वारसा स्थळांचे जतन संवर्धन आणि विकास आणखी चांगल्या पद्धतीने कसा काय करता येईल यासाठी स्थानिक सरकार आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पुढाकार घेतात. पर्यटकांचा मोठा ओढा या ठिकाणी वाढल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळते आणि त्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होते, परदेशी चलन जमा होते. भारतातील याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे गोल्डन ट्रँगल.

भारतातील तसेच परदेशातून आलेले पर्यटक जयपूर,आग्रा, दिल्ली या तीन शहरातील जागतिक वारसा स्थळांना भेटी देतात आणि भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या इतकी मोठी आहे की त्यातून होणारी वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. या वारसा स्थळांमध्ये दिल्लीमधील प्रसिद्ध लाल किल्ला, कुतुब मिनार, हुमायून चे स्मारक आग्र्यामधील ताजमहाल, जयपूर मधील जंतर मंतर ,आमेरचा किल्ला यांचा समावेश होतो. तसेच जयपूर शहरसुद्धा नुकतेच जागतिक वारसा घोषित झाले आहे.

परदेशी पर्यटकांचं देशांमध्ये एक टुरिझम सर्किट निर्माण झालं. केरळ पासून सुरुवात होऊन पुढे गोवा मग राजस्थान दिल्ली आग्रा वाराणसी आणि शेवटी हिमालय अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे परदेशी पर्यटक भारत भ्रमण करतात. राजस्थान सरकारने गेली दोन दशके आपली वारसा स्थळे जागतिक नकाशावर आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्याचेच यश म्हणून परदेशी पर्यटकांचा सर्वांत जास्त ओढा राजस्थानकडे असतो.

Lohagad Fort
Lohagad Fortsakal

उदयपूर,जयपुर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर ही शहरे तर प्रसिद्ध आहेतच त्यासोबत गग्रोन, सवाई माधोपुर किल्ला, जैसलमेरचा किल्ला, चितोडगड, कुंभलगड आणि आमेर हे किल्ले सुद्धा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहेत. अगदी हीच गोष्ट कर्नाटकातील हम्पी बद्दल सुद्धा सांगता येईल हम्पीला जागतिक वारसा म्हणून घोषित केल्यानंतर तेथे मोठा बदल घडला आणि जगभरातील पर्यटकांची पावले हम्पीकडे वळाली.

जवळपास चारशे गडकिल्ले असणाऱ्या महाराष्ट्राला किल्ल्यांचे संग्रहालय अशी उपमा दिली जाते. परंतु मोगल राजपूत यांच्या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील ब्रिटिश वास्तु वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असताना केवळ सरकारी अनास्थेमुळे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, मराठ्यांच्या मोगलांविरुद्धच्या स्वातंत्रलढ्याचा वारसा सांगणारे देदीप्यमान इतिहास असलेले महाराष्ट्रातील किल्ले अजूनही जागतिक नकाशावर नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट होती. परंतु गेल्या दोन वर्षात राज्य पुरातत्त्व खाते, दुर्गसंवर्धन संस्था यांच्या पुढाकारातून शासनाने महाराष्ट्रातील किल्ले सुद्धा युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत येण्यासाठी कंबर कसली आहे.

एखाद्या वास्तूच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज (जागतिक वारसा) नामांकना साठी साधारण प्रक्रिया अशी असते.

1) ज्या वास्तू अथवा किल्ल्यासाठी नामांकन द्यायचे आहे त्याचे जागतिक वारसामूल्य (आऊटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू)निश्चित करून तसे पटवून दयावे लागते. त्यानंतर तो किल्ला प्रार्थमिक यादीत (टेंटेटिव्ह लिस्ट) मध्ये समाविष्ट करावा लागतो.

2) अंतिम नामांकनासाठी निवड झाल्यावर किल्ल्याची माहिती , संवर्धन अहवाल, माहितीसंच (डॉसियर) आणि साईट मॅनेजमेंट प्लॅन सांस्कृतिक मंत्रालय, केंद्र सरकार कडे पाठवावा लागतो

3) केंद्रातून हिरवा कंदील मिळताच भारतातर्फे किल्ल्याचे नामांकन वर्ल्ड हेरिटेज सेंटर (युनेस्को), पॅरिस येथे मूल्यमापन आणि मंजुरी साठी पाठवले जाते

4) यानंतर युनेस्को ची ICOMOS ( International Council of Monuments and Sites) ही सल्लागार समिती भारतात येऊन त्या किल्ल्याला भेट देते व किल्ल्याचे मूल्यांकन करून अहवाल बनवते.

5) ICOMOS ने दिलेल्या अहवालावरून आणि केंद्र सरकारने पाठवलेल्या कागदपत्र आणि माहितीसंचाच्या (डॉसियर ) आधारावर युनेस्को त्या किल्ल्याची निवड करते आणि किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज चा म्हणजेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त होतो.

जागतिक वारसा नामांकनासाठीची ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून या प्रक्रियेचा पहिला टप्पा आपण पार केला आहे म्हणजेच युनेस्कोच्या प्राथमिक यादीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये राजधानी रायगड,साल्हेर-मुल्हेर, शिवनेरी, लोहगड, राजगड-तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि दक्षिणेतील जिंजी हे किल्ले आहेत. ‘मराठ्यांची लष्करी दुर्गस्थापत्य शृंखला’ (Serial Nomination of Maratha Military Architecture in Maharashtra) या थीमवर आधारित या गडकिल्ल्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये घाट पठारावरील किल्ले, सह्याद्री घाट माथ्यावरील किल्ले व सागरी किल्ले यांचा प्रामुख्याने समावेश केला गेलेला आहे.

दुर्गस्थापत्यासोबतच या भागात झालेल्या सांस्कृतिक,ऐतिहासिक घडामोडी व त्यांचा भूराजकीय परिणाम याचे सुद्धा वैशिष्ट्य लक्षात घेतले आहे. महाराष्ट्रातल्या चारशे किल्ल्यांपैकी सद्यस्थितीला केवळ एकशे वीस किल्ले हे संरक्षित स्मारक आहेत तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके किल्ले सुस्थितीत आहेत. ५० पेक्षा जास्त किल्ले हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कदाचित पुढच्या पिढ्यांना तिथे एकेकाळी किल्ले होते असेच सांगावे लागेल.

सरकारच्या प्रयत्नांना यश येऊन जर महाराष्ट्रातील किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले तर ही एक मोठी घटना ठरणार आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि या गडकिल्ल्यांची महती सातासमुद्रापार पोचणार आहे.

यातून गडकिल्ल्यांच्या देखभाली सोबतच आजूबाजूच्या परिसराचा विकास होणे इतर संबंधित स्मारकांचे जतन आणि संवर्धन होणे याला मदत होणार आहे. ज्याप्रमाणे इजिप्त पिरॅमिड साठी ओळखला जातो, चीन ग्रेट वॉल साठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे भारत सुद्धा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांसाठी ओळखला जावा.

(लेखक जगभर भटकंती करणारे असून साहसी पर्यटनाला पसंती देतात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com