इफ्फी : मोहमयी दुनियेची वारी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतो आणि अनेकांच्या ओठावर महोत्सवाची चर्चा असते. उठता-बसता, जागेपणी आणि झोपेतही फक्त चित्रपट असतो.
IFFI
IFFIsakal

- मनस्विनी प्रभुणे-नायक, saptrang@esakal.com

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतो आणि अनेकांच्या ओठावर महोत्सवाची चर्चा असते. उठता-बसता, जागेपणी आणि झोपेतही फक्त चित्रपट असतो. एक प्रकारची 'झिंग' या वातावरणात नक्कीच असते. सलग आठ दिवस चित्रपट बघणं म्हणजे स्वतःला विसरून एका वेगळ्या भासमान जगात जगणं. या काळात दुसरा कुठला विचारही डोक्यात येत नाही.

इफ्फीच्या काळात हे असंच घडतं. आजूबाजूला काय घडतंय हे विसरून पडद्यावर दिसणाऱ्या भासमान प्रतिमांमध्ये काहीतरी शोधण्याची धडपड असते. कधी काही हाती लागतं तर कधी निराशा होते. तरी देखील चित्रपट महोत्सवाची मोहिनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत असते. तमाम चित्रपट रसिकांना, जे दरवर्षी न चुकता ‘इफ्फी’ला हजर राहतात, त्यांना देखील या वर्षीच्या इफ्फीची प्रचंड उत्सुकता आहे.

या वर्षी कोणते चित्रपट दाखवले जातील? ‘कंट्री फोकस’ विभागात कोणत्या देशाचं दर्शन घडेल? ‘वर्ल्ड कॉम्पिटिशन’मध्ये कोणत्या चित्रपटांची निवड झाली असेल? ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागात कोणत्या अभिनेता -अभिनेत्री असतील, ज्यांचे निवडले गेलेले उत्तम चित्रपट यात बघायला मिळतील? चित्रपट रसिकांच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत आणि इफ्फीच्या वेबसाइटवर पडणाऱ्या अपडेट्समुळे अशा चर्चांना छान चालनाच मिळालीय.

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागातील चित्रपट न चुकवण्यासारखे असतात. जागतिक पातळीवरील उत्तम चित्रपट स्पर्धेसाठी निवडले जातात. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत १५ चित्रपटांचा समावेश असून यात बारा आंतरराष्ट्रीय आणि तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. पोलंड, इस्रायल, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, बल्गेरिया, कॅनडा, इंडोनेशिया, बोस्निया, अफगाणिस्तान, चीन आदी देशांमधील चित्रपट बघायला मिळणार आहेत.

पोलिश दिग्दर्शक माल्गोरझाटा स्झुमोव्स्का आणि मिचल एंगलर्ट यांचा ‘ट्रान्सजेंडर’ विषयाभोवती गुंफलेल्या कथेवर आधारित ‘वुमन ऑफ’, मायन रिप्प या इस्रायली दिग्दर्शिकेनं दिग्दर्शित केलेला तिचा पहिलाच चित्रपट ‘द अदर विडो’, फ्रेंच दिग्दर्शक अरनॉड डेस पॅलिरेसचा ‘पीरियड थ्रिलर’ प्रकारात मोडणारा ‘पार्टी ऑफ फूल्स’ हा चित्रपट, 'मेझर्स ऑफ मेन' हा लार्स क्रोम यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात, जर्मन सरकारने १८०० च्या उत्तरार्धात आणि १९०० च्या दशकाच्या सुरवातीस इम्पिरियल जर्मन सैन्यानं केलेल्या अत्याचार आणि नरसंहार यावर भाष्य केलंय, ‘लुबो’ हा स्विस प्रदेशातील येनिश भटक्या जमातीतील रोजच्या जगण्यातील संघर्षाचं चित्रण करणाऱ्या चित्रपटाचा समावेश असून यात १९३९ मधलं वातावरण चित्रित करण्यात आलंय.

‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ या विभागात एकूण १०३ चित्रपटांचा समावेश आहे. जगभरातील चित्रपटांमधील सौंदर्यशास्त्र आणि कथांमधील जपली जाणारी विविधता शोधण्याचं काम या विभागानं केलं आहे.

मोठा प्रतिसाद मिळणारे ‘मास्टर्स क्लास’

गेल्या काही वर्षांमध्ये मास्टर क्लासला खूप मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. मास्टर क्लासची तिकिटं मिळणं खूप अवघड बनलं आहे. देशभरातून येणारे चित्रपट विषयाचे विद्यार्थी, अभ्यासक या मास्टर क्लासला उपस्थिती लावतात. इथं चित्रपट दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ यांच्याशी थेट संवाद साधायला मिळतो, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात.

प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांसह वीसहून अधिक ‘मास्टर क्लासेस’ या वर्षी आयोजित करण्यात आले आहेत आणि सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे नुकत्याच नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘कला अकादमी’मध्ये मास्टर क्लासेस होणार आहेत.

यात प्रसिद्ध अभिनेता मायकेल डग्लस, ब्रेंडन गॅल्विन, ब्रिलेंट मेंडोझा, सनी देओल, राणी मुखर्जी, विद्या बालन, जॉन गोल्डवॉटर, विजय सेतुपती, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी, के के मेनन, करण जोहर, मधुर भांडारकर, मनोज बाजपेयी, बोनी कपूर, अल्लू अरविंद, थिओडोर ग्लक, गुलशन ग्रोव्हर यांच्याशी संवाद साधायला मिळणार आहे.

या वर्षीच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेत्या चित्रपटांना इफ्फीमधील ‘कॅलिडोस्कोप’ मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. या विभागाला जागतिक चित्रपटांचा आरसा असं देखील म्हणता येईल. कान, व्हेनिस, साओ पाउलो, रॉटरडॅम, सांता बार्बरा, स्टॉकहोम, बुसान इत्यादी महोत्सवांतील पुरस्कारप्राप्त १९ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

उद्‍घाटनाच्या चित्रपटाचा मान यंदा दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट यांच्या ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाला मिळाला आहे. प्रख्यात आंतरराष्ट्रीय कलाकार एरिन मॉरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोसे अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फौरे आदी कलाकार या चित्रपटात असून स्टुअर्ट गॅट हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ब्रिटिश चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्या चित्रपटकथा सामाजिक विषयांवर प्रभाव टाकतात. गुंतागुंतीच्या प्रतिमा हे त्यांच्या चित्रपटांचं वेगळेपण मानलं जातं.

‘मिड-फेस्ट’ चित्रपट विभागात फ्रान्सच्या नुरी ब्लीज सिलान या तुर्की दिग्दर्शकाचा ‘अबाउट ड्राय ग्रासेस’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. नुरी यांच्या ‘विंटर स्लीप’ (२०१४) या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात पाल्मे डी’ओर हा मानाचा पुरस्कार जिंकला होता, शिवाय त्यांच्या सहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली होती.

नुरी यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून अस्तित्ववाद, एकसंधता आणि मानवी अनुभव यांचं दर्शन घडतं. त्यांच्या इफ्फीमधील ‘अबाउट ड्राय ग्रासेस’ या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. समारोपाचा चित्रपट आहे रॉबर्ट कोलोड्नी दिग्दर्शित ‘द फेदरवेट’. या चित्रपटानं महोत्सवाचा समारोप होईल.

डग्लस यांना ‘सत्यजित रे’ जीवनगौरव

इफ्फीमधील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. जागतिक चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मायकल डग्लस यांना देण्यात येणार आहे. दोन ऑस्कर, पाच गोल्डन ग्लोब, एक प्राइमटाइम एमी आणि गोल्डन ग्लोब सेसिल बी. डिमिल पुरस्कार यांसारखे अनेक मानांकित पुरस्कार मिळवणारे मायकेल डग्लस हे हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आहेत.

सध्याच्या जागतिक चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तींपैकी ते एक आहेत. हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते स्वतः इफ्फीमध्ये उपस्थित राहणार आहेत. मायकल डग्लस हे देखील या महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहेत.

ओटीटी फ्लॅटफॉर्मचा बोलबाला

करोना काळात ‘ओटीटी’ फ्लॅटफॉर्मने आपली मुळं घट्ट केली. प्रेक्षकांच्या पाठिंबा आणि पसंतीमुळे ओटीटी फ्लॅटफॉर्म हा मनोरंजनासाठी एक भक्कम पर्याय म्हणून प्रस्थापित झाला आहे. इफ्फीमध्ये या वर्षीपासून ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील चित्रपट - वेब मालिका यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून १० भाषांमधील एकूण ३२ प्रवेशिका आल्या असून यातील विजेत्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

गेल्या वर्षी देखील ओटीटी फ्लॅटफॉर्म वरील वेब मालिकांमधील कलाकारांनी इफ्फीला हजेरी लावली होती. प्रेक्षकांनी या सर्वांना अक्षरशः वेड्यासारखा प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद बघूनच ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या पुरस्कारांना यंदाच्या इफ्फीमध्ये स्थान दिलं असावं.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जे चित्रपट दाखवले जातात, ते आपण एरवी थिएटरमध्ये जाऊन बघतो तसे मसालापट नसतात. या चित्रपटांचे ‘कूळ आणि मूळ’ हे काही वेगळंच असतं. त्यामुळे पहिल्या इफ्फीला स्थानिक लोकांनी गर्दी केली पण चित्रपट बघून अनेकांनी नाकं मुरडली. भारतीय प्रेक्षकांचं एक मोठं त्रांगडं असतं. एखाद्या पंगतीला जेवायला बसल्यावर जसं ठरलेल्या क्रमाने एकेक करून पदार्थ ताटात येतात आणि एखाद्या गोड पदार्थाने जेवणाचा समारोप होतो तसाच त्यांना चित्रपट देखील हवा असतो.

त्यात रोमान्स हवा, गाणी हवीत, खलनायक हवा, प्रेमाचा त्रिकोण असेल तर अधिक चांगलं, हीरो - हीरोईन सुंदर-आकर्षक दिसणारे हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचे चित्रपटाचं शेवट हा सुखान्त हवा. चित्रपटाच्या त्यांच्या ठरलेल्या चौकटीला थोडं जरी हलवलं तर हा प्रेक्षकवर्ग नाराज होतो. भारतीय चित्रपट प्रेक्षकांची जडणघडण अशीच आहे. त्यामुळे अठरा वर्षांपूर्वी गोव्यात झालेल्या पहिल्या इफ्फीला चित्रपट बघून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासारख्या होत्या.

जागतिक चित्रपट या सगळ्या निकषांवर अगदी वेगळे आहेत. कोणताही मसाला नसलेला, जळजळीत वास्तव दाखवणारा असतो. भारतीय प्रेक्षकांना असे चित्रपट बघण्याची सवय नव्हती. इफ्फीमुळे इथल्या प्रेक्षकांना चित्रपटांप्रती आपली दृष्टी बदलण्याची संधी मिळते. चित्रपटाच्या कॅनव्हासवर जगाच्या नकाशावरही न दिसणाऱ्या देशांच्या प्रतिमा उमटल्या आणि या पाहताना सिनेमा असाही असतो! अशा काही विस्मयजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.

चित्रपट रसिक स्वतःच्या खर्चानं फक्त चित्रपट बघण्यासाठी गोव्यात येतात हे बघून अनेकांना आश्चर्य वाटलं. चित्रपट हा विषय गांभीर्याने घेणारे, त्यावर अभ्यास करणारे आजूबाजूला दिसू लागले. काही जण कॅटलॉग घेऊन त्याचं वाचन करून चित्रपटांची निवड करताना दिसू लागले तर चित्रपट बघून बाहेर पडल्यावर त्यावर तावातावाने होणारी चर्चा कानावर पडू लागली. या सगळ्या गोष्टी गोव्यासाठी नव्या होत्या. गेल्या अठरा वर्षांत गोव्यात होणाऱ्या इफ्फीने प्रेक्षक घडवण्याचं मोठं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com