विनोदानं मोडलेला ‘टॅबू’

विनोदानं मोडलेला ‘टॅबू’

डोक्यावर केस नसलेला, किंवा लैंगिक समस्या असलेला, किंवा उतारवयात गर्भवती झालेल्या आईचा मोठा मुलगा असलेला, किंवा समलैंगिकतेकडे वळलेला असा नायक रुपेरी पडद्यावरचा नायक होऊ शकतो असं वीस वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं तर लोकांनी ते अक्षरशः ‘हसण्यावारी’ नेलं असतं ही गोष्ट खरी ना? नायक ‘सर्वगुणसंपन्न’ हवा असा नियम असताना चक्क ‘न्यून’ असलेल्या नायकानंही संपूर्ण चित्रपट खावा ही गोष्ट न पटणारीच. हिंदी चित्रपटांचा इतिहास बघता सामाजिक विषयांवर रग्गड चित्रपट असले, तरी टकलापासून लैंगिकतेपर्यंतचे विषय हिंदी चित्रपटांसाठी ‘टॅबू’च होते की नाही?... ती कोंडी कुणी सोडवली माहीत आहे?...विनोदी चित्रपटांनी!!!

येस्स. विनोदाच्या वेष्टनातून अगदी गंभीर गोष्टीवरही प्रकाश टाकता येऊ शकतो, हे गेल्या पाच वर्षांतल्या वेगवेगळ्या चित्रपटांनी दाखवून दिलंय आणि पडद्यावरचा विनोद किती प्रगल्भ होऊ शकतो हेही त्यांनी दाखवून दिलंय. प्रसंगनिष्ठ विनोद खरं तर अनेक चित्रपटांत असले, तरी अक्षरशः ‘कठीण प्रसंग ओढवणं’ प्रकारातले प्रसंग निवडण्याचं धाडस चित्रपटांनी दाखवलं आणि त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या.  

मंडळी, विनोद हे दुधारी अस्त्र आहे. ते कधीही कुणावरही उलटू शकतं. दोन उदाहरणं सांगता येतील त्यासाठी. विनोदाचा अतिरेक मराठी चित्रपटांमध्ये एके काळी इतका झाला, की चित्रपटांना अक्षरशः ‘चंबूगबाळे’ आवरावे लागले आणि नंतर खूप काळांनी त्यांना ‘श्वास’ घेता आला. दुसरीकडे हिंदी चित्रपटांमध्ये विनोद वाह्यात झाल्यावर ‘क्या कूल है हम’ आणि ‘मस्ती’ची सुरवातीची धमाल हळूहळू अश्लीलतेकडे इतकी झुकली आणि ‘सेक्स कॉमेडी’ किळसपणाकडे वळली, की प्रेक्षकांनी नंतर त्यांना प्रतिसाद देणंच सोडलं. 

खरं तर अशी उदाहरणं असताना ‘टॅबू’ असलेल्या विषयांवरचे खुसखुशीत चित्रपट एकामागोमाग एक येत असताना ते अस्तंगत होण्याचीही भीती होतीच की! मात्र, इथं खरा ‘कॅच’ आहे. प्रगल्भ चित्रकर्मींनी आणि कलाकारांनी इतकी मर्यादा सांभाळली, की एक नवाच ‘जॉनर’ तयार झाला. त्याला खरं तर अजूनही कुणाला विशिष्ट शब्दांत बांधायला जमलेलं नाहीये; पण हा ‘जॉनर’ म्हणजे खऱ्या अर्थानं विनोदाचा उत्तम पातळीपर्यंत किती वापर करता येऊ शकतो याचा नमुना होता, आहे. 

खरं तर हृषिकेश मुखर्जी किंवा बासू चटर्जी यांच्या चित्रपटांना त्यावेळी उदय झालेल्या मध्यमवर्गानं प्रतिसाद देऊन गंभीर हिंदी चित्रपटांना हसरी किनार द्यायला मदत केली, तशाच प्रकारे ‘मल्टिप्लेक्स मेंटॅलिटी’च्या नवउच्चमध्यमवर्गानं या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांना अधिक बळ दिलं ही गोष्टही खरी. आयुष्मान खुराना अभिनित ‘विकी डोनर’ या चित्रपटानं विनोदाचा हा वेगळा प्रकार जास्त लोकप्रिय केला असं नक्की म्हणता येईल. ‘स्पर्म डोनेशन’ असा विषय असताना तो वाह्यात होण्याची शंभर टक्के संधी होती. मात्र, इथंही एक वेगळी गोष्ट होती. या चित्रपटाची लेखिका आहे जुही चतुर्वेदी. तिनं या विषयाला खुसखुशीत करतानाच त्याचं हसं होऊ नये हीही काळजी घेतली आणि ती खूप मोठी गोष्ट ठरली. या चित्रपटानं अनेक गोष्टी साध्य केल्या. त्यानं विनोदाचं एक नवं रूप दाखवलं, सामाजिक विषयांची अशी हाताळणी होऊ शकते हे दाखवलं आणि अशा विषयांना सहकुटुंब बघण्यातही काही ‘टॅबू’ नाही हे दाखवलं. हिंदी चित्रपटांच्या नायकानं सतत ‘माचो इमेज’ जपायची, त्यानं नृत्यापासून तिरपांगड्या ॲक्शन्सपर्यंत सगळं करायचं वगैरेच्या चौकटीही त्यानं मोडून काढल्या. आणि हो, ‘विकी डोनर’नं आयुष्मान खुराना नावाचे ‘नव-अमोल पालेकर’ही दिले. 

‘विकी डोनर’नंतर अशा प्रकारचे किती तरी चित्रपट आले. शीघ्रपतन या विषयावरचा ‘शुभमंगल सावधान’, बद्धकोष्ठता हाही विषय असलेला ‘पिकू’, उतारवयातल्या मातृत्वावरचा ‘बधाई हो’, स्त्री आवाजाचा वापर करणाऱ्या नायकाचा ‘ड्रीमगर्ल’, व्हियाग्रासारख्या विषयावरचा ‘मेड इन चायना’ अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. 

हिंदी चित्रपटांत कधीही न आलेले विषय या चित्रपटांनी पडद्यावर आणले आणि त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. फार कशाला, या चित्रपटांना इतका प्रतिसाद मिळायला लागला, की डोक्यावर केस कमी असलेल्या नायकाचे प्रश्न मांडणारे आणि जवळपास सारखीच कथा असलेले ‘बाला’ आणि ‘उजडा चमन’ असे दोन चित्रपट साधारण एकाच वेळी आले आणि दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. 

एके काळी विनोदाचं प्रमाण फार कमी असलेल्या किंवा फक्त कॉमेडी स्लॉट्स असलेल्या हिंदी चित्रपटांनी नंतर विनोदी रूप घेणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ‘सेक्स कॉमेडी’ किंवा ‘ॲडल्ट कॉमेडी’च्या दिशेनं सुटलेल्या विनोदी चित्रपटांनी दिशा बदलून सामाजिक विषयांची हाताळणी करणाऱ्या खुसखुशीत चित्रपटांपर्यंत येणं ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. ‘उजडा चमन’ आणि ‘बाला’ हे चित्रपट म्हणजे अक्षरशः ‘केस स्टडी’ आहेत ते या अर्थानं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com