esakal | विनोदाचा ‘रुपेरी’ प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

varun dhawan

गोष्ट एका हास्यनगरीची
‘कुली नंबर वन’मध्ये वरुण धवन तुफान बॅटिंग करतोय. ‘‘सेक्रेटरी, ‘एटीएम’का फोन है!... एटीएम याने अंबानी, ट्रम्प, मोदी,’’ असं सांगतोय. गुलाबी पॅंट घालण्यापासून उड्या मारण्यापर्यंत विनोदाच्या सगळ्या शक्यता आजमावतोय. या चित्रपटाविषयी तुमचं मत काहीही असो; पण मेनस्ट्रीममधला आणि ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेला नायक फुल टू कॉमेडी करतोय हे आपल्याला आता वेगळं वाटत नाही हे तरी खरं ना?

विनोदाचा ‘रुपेरी’ प्रवास

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

‘कुली नंबर वन’मध्ये वरुण धवन तुफान बॅटिंग करतोय. ‘‘सेक्रेटरी, ‘एटीएम’का फोन है!... एटीएम याने अंबानी, ट्रम्प, मोदी,’’ असं सांगतोय. गुलाबी पॅंट घालण्यापासून उड्या मारण्यापर्यंत विनोदाच्या सगळ्या शक्यता आजमावतोय. या चित्रपटाविषयी तुमचं मत काहीही असो; पण मेनस्ट्रीममधला आणि ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेला नायक फुल टू कॉमेडी करतोय हे आपल्याला आता वेगळं वाटत नाही हे तरी खरं ना? शाहरुख खानपासून अगदी टायगर श्रॉफपर्यंत (शक्य तेवढी) सगळ्यांना कॉमेडी करताना आपण पाहतो आणि आपल्याला ते वेगळं वाटत नाही...

पण पूर्वीच्या काळातले नायक असे विनोदी चित्रपट करताना, कॉमेडी सीन्स करताना आपल्याला दिसायचे का? म्हणजे बघा हं, कुंदनलाल सैगल धमाल विनोदी प्रसंग साकार करतायत, राजेश खन्ना यांचे एकामागोमाग एक विनोदी चित्रपट येत आहेत, किंवा राज कपूर विनोदांची आतषबाजी करतायत वगैरे आपण रुपेरी पडद्यावर बघितलंय का? काही सन्मान्य अपवाद अर्थात आहेतच; पण तरीही विनोद करण्याची प्रतिमा पूर्वीच्या काळातल्या नायकांनी स्वतःला लावून घेतलेली नाही. फार कशाला, सध्याचं विनोदी चित्रपटांचं प्रमाण आणि नव्वदीपूर्वीचं विनोदी चित्रपटांचं प्रमाण हेही खूप व्यस्त दिसेल. कशामुळे असेल हे? आज आपण पडद्यावर विनोद जितक्या सहजपणे बघतो, तितक्या सहजपणे तेव्हा प्रेक्षक बघू शकत नव्हते का? नायकांना विनोदाचं वावडं होतं का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

...थोडं विश्लेषण करत गेलो, तर असं लक्षात येईल, की बॉलिवूडमधला विनोदाचा प्रवास, त्याचं वाढतं प्रमाण आणि सार्वत्रीकरण हे बदलत्या भारतीय मानसिकतेशीही समांतर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सगळं समाजमनच अस्वस्थ होतं, त्याचं थेट प्रतिबिंब पडद्यावर उमटत नसलं, तरी एक प्रकारचा ताण पडद्यावरही होताच. नंतरच्या काळात सामाजिक सुधारणा जास्त महत्त्वाच्या होत्या. त्यांचं मात्र थेट प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर दिसलं आणि त्यामुळे हलकंफुलकं मनोरंजन हा विषय अजेंड्यावर नव्हताच. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हळूहळू समाजमन सैलावत गेलं, सगळ्या कला चहूबाजूंनी बहरत गेल्या; पण तरीही नायकाला मात्र विनोद तितका आपलासा करावा वाटत नव्हता. प्रतिमेचे कैदी बनल्यानं कलाकारांना ते शक्य नव्हतं ही गोष्ट जितकी खरी, तितकीच लेखक-दिग्दर्शक गंभीर वकुबाच्या कलाकृतींनाच जास्त पसंती द्यायचे ही गोष्टही खरी.  

अर्थात हलकेफुलकेपणा नव्हता का? होता. नक्कीच होता; पण त्याचं आऊटसोर्सिंग झालं होतं. मधल्या काळात गंभीर प्रकृतीच्या चित्रपटांना किंचित हलकेफुलकेपणा देण्यासाठी एक खास ‘कॉमेडी स्लॉट’ तयार केला जायचा. त्यासाठी खास कॉमेडियन असायचे. मेहमूद, मनोरमा, टुणटुण, मुक्री, जॉनी वॉकर असे कलाकार हा कॉमेडी स्लॉट भरून काढायचे. तेवढा विनोद सगळ्यांना पुरेसा वाटायचा. नायकांनी रडवणं, प्रोत्साहित करणं, सामाजिक भान जागवणं वगैरे काम करायचं आणि या कलाकारांनी अक्षरशः चार घटका हसवायचं हे ठरलेलं समीकरण होतं. 

हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी हलक्याफुलक्या मनोरंजनाचा प्रवाह आणला, तशी अमोल  पालेकर यांच्यासारख्या कलाकारांनीही हसरी किनार दिली. त्यावेळी मध्यमवर्गाचाही उदय होत होता. हा मध्यमवर्ग लिबरल होता, मोकळाढाकळा होता. त्याचंही प्रतिबिंब पडद्यावर उमटलं. त्याच वेळी अमिताभ बच्चन यांच्यासारखे बहुपैलू कलाकार आले-ज्यांच्यात रडवणं, खिळवण्याबरोबरच हसवण्याचीही कुवत होती. त्यातूनही समीकरणं बदलायला लागली. मात्र, खऱ्या अर्थानं विनोद पडद्यावर सर्वव्यापी झाला तो नव्वदीनंतर. खुलं आर्थिक धोरण आल्यानंतर भारतच अंतर्बाह्य बदलला, तसाच पडदाही बदलला. गोविंदा, चंकी पांडे, अक्षयकुमारसारखे कलाकार आणि डेव्हिड धवन, पहलाज निहलानी यांच्यासारखे दिग्दर्शक यांनी विनोदाचा प्रवाह आणला. कुणी थिल्लरपणा म्हणेल, कुणी हलकेफुलकेपणा म्हणेल; 

पण नव्वदीनंतर रुपेरी पडदा जास्त सैलावला. त्याच वेळी प्रेक्षकही ‘डिमांडिंग’ झाला. त्याचा खिसा टम्म फुगत होता आणि प्रबोधनापेक्षा मनोरंजनाला प्राधान्य होतं. त्यामुळे मग ‘फक्त कॉमेडी स्लॉट’ ते ‘संपूर्ण कॉमेडी चित्रपट’ असाही प्रवास अगदी सुविहीतपणे झाला. अभिनेत्यांचे साचेही बदलू लागले. दिलीपकुमार म्हणजे ‘ट्रॅजेडी किंग’, अमिताभ बच्चन म्हणजे ‘अँग्री यंग मॅन’ असे साचेही मोडीत निघाले. मेनस्ट्रीम नायकही पडद्यावर विनोदांचा आस्वाद घेऊ लागले, लोकांना हसवायला लागले. 

मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर तर विषयांची खूपच क्रांती झाली.  विनोदविहीन चित्रपट ते संपूर्ण विनोदी चित्रपट हा प्रवास रंजक आहे तो असा. अर्थात विनोदी चित्रपट करणाऱ्यांना ती प्रतिमा उपयोगी पडते, की बाधक ठरते हा प्रश्नही विचारावा लागेलच... पण ते पुन्हा केव्हा तरी.

Edited By - Prashant Patil

loading image