तयारी 'शेवटा'ची अन्‌ थराराचीही! (मंदार कुलकर्णी)

mandar kulkarni
mandar kulkarni

"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं', "ते पुन्हा येतील का' असे किती तरी प्रश्न गेलं वर्षभर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता ता. 26 एप्रिलला मिळणार आहेत. "ऍव्हेंजर्स एंड गेम' हा प्रचंड चर्चेचा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट जगभरात बॉक्‍स ऑफिसेस पालथी घालणार यात काही वादच नाही; पण अनेक नवनवीन प्रथाही तो पाडणार आहे. या चित्रपटाच्या "युफोरिया'वर एक नजर.

क्रूरकर्मा थॅनसनं अखेर करायचं ते केलंच. व्हिजनला मारून त्याच्या डोक्‍यातून माइंड स्टोन काढून घेतल्यानंतर त्याच्याकडं अपरिमित शक्ती आली आहे. त्यामुळंच त्यांच्याकडचं "इन्फिनिटी गॉंटलेट' त्यानं अतिशय निष्ठूरपणे ऍक्‍टिवेट केलंय. "अर्धी लोकसंख्या मारली की उरलेली अर्धी चांगल्या पद्धतीनं जगू शकते,' असं जगावेगळं तत्त्वज्ञान त्यानं खरं केलंच अखेर! तो स्वतः वकांडामधून दुसऱ्या एका ग्रहावर गेलाय. त्याच्या एका "जीवघेण्या' कृतीमुळं एकेक सुपरहिरो अक्षरशः अनंतात विलीन होतायत. ग्रूट, पीटर क्विल, पीटर पार्कर, डॉक्‍टर स्ट्रेंज, मॅंतिस, ब्लॅक पॅंथर असे एकेक जण दिसेनासे होत आहेत. वकांडामधल्या आधीच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुपरहिरो क्षणार्धात नाहीसे होणं हा सगळ्यांनाच धक्का आहे. जिवंत राहिलेले धक्‍क्‍यातून सावरलेले नाहीत. एक कमालीची शांतता सगळीकडं पसरली आहे. थॅनस दुसऱ्या एका ग्रहावरून सूर्योदय बघतोय आणि त्याच वेळी बाकीच्या सुपरहिरोंच्या मनामध्ये मात्र राग, द्वेष, दुःख अशा भावनांचे आवेग सुरू आहेत. त्यांचं आणि जगाचं पुढं काय होणार माहीत नाही; पण परिस्थितीनं वेगळं वळण घेतलंय हे त्यांना कळून चुकलंय. सगळ्यांच्या चेहऱ्यांवरचं सावट स्पष्ट दिसतंय...

..."ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातलं हे शेवटचं दृश्‍य. या चित्रपटानं जगभरात आधीचे वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम मोडून टाकलेच; पण त्याच्या या शेवटानं मार्व्हलच्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना मात्र विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं', "ते पुन्हा येतील का' असे किती तरी प्रश्न गेलं वर्षभर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. "कटप्पाने बाहुबलीको क्‍यों मारा' हा प्रश्न "बाहुबली-2'च्या उत्तुंग यशासाठी कारणीभूत होता, तसंच "थॅनस का क्‍या होगा' आणि "आधे ऍव्हेंजर्स वापस आयेंगे क्‍या' या प्रश्नांनी सोशल मीडियावरच्या वॉल्स खणखणतायत. "इन्फिनिटी वॉर'नं काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याची उत्तरं मिळवण्यासाठी चाहते जंग जंग पछाडतायत.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता ता. 26 एप्रिलला मिळणार आहेत. "ऍव्हेंजर्स एंड गेम' हा प्रचंड चर्चेचा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट जगभरात बॉक्‍स ऑफिसेस पालथी घालणार यात काही वादच नाही; पण अनेक नवनवीन प्रथाही तो पाडणार आहे. खरं तर जगभरातली तरुणाई नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं घरकोंबडी बनलेली असताना आणि मनोरंजनाचा आस्वाद मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा घरच्या टीव्हीवर घ्यायला लागली असताना, मनोरंजनाचा हा धमाका त्यांना अक्षरशः घरांतून ओढून बाहेर काढणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता इतकी आहे, की त्याच्या तिकिटांच्या ऍडव्हान्स विक्रीतूनच कित्येक चित्रपट निघू शकतील इतकी कमाई आत्ताच झाली आहे. काही वेबसाइट्‌सवर तर तासांत सगळी तिकिटं संपून गेली. ई-बेसारख्या वेबसाइट्‌सवर तिकिटं मिळालेले चाहते त्या तिकिटांची फेरविक्री करत आहेत आणि त्यांच्या किंमती पाच ते सहा हजार रुपयांच्या घरांत आहेत. "एंडगेम'चे चार अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांना मिळालेले व्ह्यूज, शेअर्स आणि इतर गोष्टी तज्ज्ञांना अचंबित करून टाकणाऱ्या आहेत.
यानिमित्तानं या "एंड गेम'ला इतका प्रतिसाद का मिळतोय हे बघितलं पाहिजे. एक तर आपल्या प्रत्येकाला अद्भुताच्या जगात जायला आवडतं. तुमच्या नेहमीच्या प्रतलाबाहेर जाऊन तुम्हाला काही क्षणांपुरतं निराळ्या प्रतलावर नेणारं मनोरंजन नेहमीच उच्च प्रतीचं असतं. भारतात "बाहुबली'सारखा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरतो त्याचं कारण "काही काळापुरती वेगळ्या प्रतलावर जाण्याची प्रत्येकाची ही आस' हेच आहे. हॉलिवूडमध्ये स्पायडरमॅनपासून सुपरमॅनपर्यंत अनेक सुपरहिरो सर्वसामान्य प्रेक्षकांना असेच वेगळ्या, अद्भुुताच्या दुनियेत नेतात. भारतात अशा चित्रपटांचं प्रमाण नसण्याचं एक म्हणजे तांत्रिक क्षमता तुलनेनं कमी आणि प्रचंड खर्च या गोष्टी आहेत. शाहरुख खानपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेकांनी अशा प्रकारचे प्रयोग करून बघितले आहेत; पण यशस्वी फक्त हृतिक रोशन झाला आणि अर्थातच रजनीकांत. हॉलिवूडचे चित्रपट जगभरात व्यवसाय करतात आणि तिथून रिकव्हरी करतात. भारतीय चित्रपटांना ते शक्‍य नसतं हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात भारतीय प्रेक्षक मग स्वतःची ही अद्भुताची आवड हॉलिवूडच्या चित्रपटांतून भागवतात. दुसरं असंही आहे, की असे चित्रपट भारतात एका विशिष्ट वर्गात चर्चेचं वादळ निर्माण करतात आणि मग पिअर प्रेशरमधूनही तमुक चित्रपट बघितला पाहिजे, अमुक पुस्तक वाचलं पाहिजे असं मुलांना वाटायला लागतं आणि अशा कलाकृतींना मोठा प्रतिसाद मिळतो. "ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर'सारखे चित्रपट शहरांत, मल्टिप्लेक्‍समध्ये जास्त व्यवसाय करतात, हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. या मुलांना खरंच, आतून आवडतंय की नाही माहीत नाही; पण ते आवडण्यासाठी बाहेरून मोठं "प्रेशर' आहे, हेही तितकंच खरं. हे मित्र-मैत्रिणींचं प्रेशर आहे, भव्यतेच्या माऱ्याचं प्रेशर आहे, जाहिरातींच्या माऱ्याचं प्रेशर आहे, यातही काही वाद नाही. कारणं काहीही असू देत; पण त्यामुळं या सगळ्या आवडींचा, प्रेशरचा कळसाध्याय आता या चित्रपटाच्या निमित्तानं "एंड' गाठणार आहे हे महत्त्वाचं.

"एंडगेम'बद्दल प्रचंड उत्सुकता आहे त्याचं एक कारण असंही आहे, की इथं बदल्याची भावना आहे. थॅनसच्या कृत्याबद्दल त्याचा बदला घेतला पाहिजे, असं प्रेक्षकांना वाटतं आहे. "बाहुबली 2'च्या वेळी जशी भावना होती, तसाच हा साधारण प्रकार आहे. दुसरं असंही आहे की जगभरातच सध्या एक प्रकारची युद्धजन्य स्थिती आहे. कुणाला स्वतःच्या अध्यक्षांत थॅनस दिसतोय, कुणाला ग्रूटच्या मृत्यूमध्ये पर्यावरणाची हानी दिसतेय. डॉक्‍टर स्ट्रेंजनं टोनी स्टार्कसाठी दिलेलं बलिदान कुणासाठी प्रेरणादायी आहे, तर सुपरहिरोंच्या उठावामध्ये कुणाला जनतेच्या बंडाची ठिणगी दिसते आहे. थोडक्‍यात, एकीकडं हा मनोरंजनाचा धमाका असताना अनेक प्रेक्षक त्यातून प्रतीकंही शोधतायत. "चांगल्याचा वाइटावर विजय' ही भावना भल्याभल्यांना एकत्र आणते. त्यासंदर्भानंही "इन्फिनिटी वॉर'चा शेवट "एंड गेम'बद्दलच्या उत्सुकतेसाठी कारणीभूत ठरतो आहे. कॉंप्युटर ग्राफिक्‍सपासून पार्श्‍वसंगीतापर्यंत आणि लोकेशन्सपासून कथाविषयापर्यंत सगळ्या गोष्टींतली भव्यता तर अनेकांना आकर्षित करतेच आहे.
"एंड गेम'च्या ट्रेलरनीसुद्धा उत्सुकतेमध्ये भर घालायचं काम केलं आहे. या ट्रेलरमधल्या अक्षरशः सूक्ष्म गोष्टींचंसुद्धा विश्‍लेषण करून चित्रपटाबाबत तर्क लढवणं हा त्याच्या चाहत्यांचा आवडता उद्योग आहे. सुपरहिरोंच्या टीमनं पांढरे सूट्‌स का घातले, कॅप्टन मार्व्हलनं जास्त मेकअप का केला, अँट मॅनची भूमिका महत्त्वाची का असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून "हिंट' घेऊन तर्कवितर्क केले जात आहेत. मात्र, इतकं सगळं असूनही, या चित्रपटाच्या कथेबाबत जगभरात उत्सुकता असतानाही त्या सगळ्या टीमनं पाळलेली गुप्तता हा भाग फार महत्त्वाचा आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या गोष्टी प्रत्यक्ष चित्रपटात असतीलच असंही नाही असंही दिग्दर्शकांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. त्यांनी प्रचंड फुटेज तयार करून ठेवलं आहे आणि त्यातलं त्यांनी या ट्रेलरसाठी वापरलं आहे. मात्र, ते प्रत्यक्ष चित्रपटाचा भाग असेल की नाही याचं उत्तर त्यांनी संदिग्ध ठेवलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळंच "एंडगेम'बाबत सगळे जण उड्या टाकत आहेत. भारतात तर या चित्रपटाच्या आधी आणि नंतर बराच काळ कोणता महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळं ही सगळी मंडळी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहेत. थॅनसविरुद्ध सगळे जण एकवटले आहेत; पण थॅनसची ताकदही प्रचंड वाढली आहे मंडळी! त्यामुळं हा सगळा संघर्ष विलक्षण गुंतागुंतीचा आणि रोचकही असणार आहे. चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. प्रत्यक्ष चित्रपट बघितल्याशिवाय उत्सुकता शमणार नाही. आयर्नमॅन, कॅप्टन मार्व्हल, थॉर, कॅप्टर अमेरिका सगळे थॅनसची वृत्ती संपवायला निघाले आहेत. हा संघर्ष रंजक, रोचक, थरारक असणार आहे यात काही वाद नाही. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन'वरच्या वेब सिरीजपासून टीव्हीवरच्या मालिकांपर्यंत सगळं थोडा वेळ ठेवा बाजूला आणि चला हा थरार अनुभवायला!

"ऍव्हेंजर्स' आणि भारत
"ऍव्हेंजर्स' चित्रपटांची मालिका म्हणजे हॉलिवूडीश मसालापटांची मालिका असली, तरी त्यांचं भारताशीसुद्धा कनेक्‍शन आहे बरं का! "ऍव्हेंजर्स ः एज ऑफ अल्ट्रॉन' या चित्रपटातलं अल्ट्रॉन्स एकत्र येऊन मोठा अल्ट्रॉन तयार करतात, ते दृश्‍य चक्क रजनीकांतच्या "रोबो' ("एंथीरन') चित्रपटावरून प्रेरित होतं. "एंड गेम'चे दिग्दर्शक जो रुसो नुकतेच भारतात येऊन गेले, तेव्हा त्यांनी हे कबूल केलं. या चित्रपटाशी भारताचं कनेक्‍शन फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. "इन्फिनिटी वॉर'मध्ये थॉर प्रवेश करतो, तेव्हा प्रेक्षक चित्कारत असल्याचा भारतातला एक व्हिडिओ रुसो यांच्या टीमकडं आहे म्हणे. "एंड गेम'चं शूटिंग करताना कंटाळा आला, की ही टीम अनेक वेळा हा व्हिडिओ बघायची, असं रुसो यांनी सांगितलं. "एंड गेम'चं प्रमोशन करण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमाननं "अँथम' म्हणजे थोडक्‍यात वातावरणगीत तयार केलं. हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. एका चित्रपटासाठी अशा प्रकारचं "अँथम' आणि तेही एका हॉलिवूडपटासाठी हे विशेषच. दुर्दैवानं हा जो काही "अँथम' नावाचा प्रकार आहे तो अतिशय सुमार आहे. रहमान आणि ऍव्हेंजर्स या दोन्हीचे चाहते त्यामुळं निराश झाले आहेत. त्याच्यावरून सोशल मीडियावर एक विनोदसुद्धा खूप प्रसिद्ध झाला आहे. तो धमाल आहे. हा विनोद म्हणजे ः "थॅनसला मारण्यासाठी एकच उपाय आहे...तो म्हणजे ए. आर रहमाननं तयार केलेली अँथम त्याला ऐकवणं!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com