
गोष्ट एका हास्यनगरीची
‘यावेळी काही तरी एकदम वेगळं करू या,’ अशी कोणत्याही चॅनेलमध्ये चर्चा झाल्यानंतरही शक्यतो बदल न होणारा एक फॉर्म्युला. दोन जणांची जोडी.
‘यावेळी काही तरी एकदम वेगळं करू या,’ अशी कोणत्याही चॅनेलमध्ये चर्चा झाल्यानंतरही शक्यतो बदल न होणारा एक फॉर्म्युला. दोन जणांची जोडी. त्यात भाजीवाली आणि पोलिस यांच्यापासून चोर आणि भिकारी यांच्यापर्यंतचा कोणताही संवाद, शक्यतो शारीरिक हालचालींचं प्रमाण जास्त, एक देखणी सूत्रसंचालक, समोर सतत हसणारे दोन परीक्षक. बास! झालीच मग ‘हास्यजत्रा’ सुरू. कुणी ‘बुलेट ट्रेन’ म्हणेल, कुणी ‘एक्स्प्रेस’ म्हणेल, कुणी ‘हास्यसम्राट’ म्हणेल; पण या प्रकारचा शो विशेषतः प्रादेशिक चॅनेल्सवर नक्की असतो.
छोट्या पडद्यावरच्या कार्यक्रमांच्या फॉरमॅटमध्ये बदल होत असतात. कधी विनोदी मालिकांना ‘फॅमिली ड्रामा’ची जोड देण्याची टूम निघते, कधी गुन्हेगारीविषयक कार्यक्रम वाढतात, कधी ऐतिहासिक व्यक्तिरेखांबद्दल प्रेम वाढतं; पण विशिष्ट चौकट असलेले कॉमेडी शो मात्र लागतातच. खरं तर मालिका सोडून इतर प्रकारचे विनोदी शोज तयार करण्याच्या अनेक शक्यता छोट्या पडद्यानं पूर्वी आजमावून बघितल्या आहेत. चित्रपटांवर आधारित शोंपासून ‘मूव्हर्स अँड शेकर्स’सारख्या शोंपर्यंत आणि ‘उ चा पती’सारख्या छोटे प्रसंग असलेल्या मालिकांपासून, ‘इक्के पे इक्का’पर्यंत विनोदी म्युझिक काऊंट डाऊन शोंपर्यंत अनेक प्रयोग झाले असताना या माध्यमानं ते ‘डिस्कार्ड’ का करत आणले आहेत हा अभ्यासाचाच विषय आहे. मात्र, असं असताना विशिष्ट प्रकारचे कॉमेडी शोज हे सध्याचं चलनी नाणं आहे हे महत्त्वाचं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हे शोज गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्येच जास्त वाढले. सुरवातीला ते खरोखर स्पर्धेच्या स्वरूपात असायचे, नंतर हळूहळू ती स्पर्धा लुटूपुटूची व्हायला लागली. हळूहळू स्पर्धा मागं पडली आणि सादरीकरणच महत्त्वाचं ठरलं. हिंदीकडून हळूहळू हे लोण प्रादेशिक चॅनेल्सकडेही जायला लागलं आणि मग एकेक इंप्रोवायजेशन्सही व्हायला लागली. स्टेजच्या शेजारी असलेल्या बँडमध्ये सुंदर मुलगी आली, परीक्षकांची संख्या बहुतेक दोनवर फिक्स झाली. हळूहळू लाइव्ह बँड बाजूला जाऊन नुसतंच रेकॉर्डेड म्युझिक वाजायला लागलं; पण थोड्या फार फरकानं असे कॉमेडी शोज बहुतेक चॅनेल्सवर दिसतच आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या शोंमधून खरंच किती हसू येतं हा प्रश्न एका वर्गाला जितका येतो, तितकाच त्या शोंमधून प्रचंड हसू येणारा, निरागस प्रेक्षकही आहे हेही खरं. या शोंमधून ब्रँड्स कधी तयार झाले हे त्यांनाही कळलं नाही; पण झाले. त्यांच्या विनोदाच्या, टायमिंगच्या विशिष्ट शैली प्रेक्षकांना पाठ झाल्या. टीव्हीच्या प्रेक्षकाला ‘रिपीटेशन’ आवडतं. या रिपीटेशनमधून हे ब्रँड्सच हळूहळू या कॉमेडी शोंचं ‘इंधन’ बनले. हे ब्रँड्स कोणतीही संहिता स्वतःच्या साच्यात बसवत गेले आणि त्यांच्या निष्ठावंत प्रेक्षकवर्गानं या शोंना बूस्ट दिला.
हिंदीत ‘कॉमेडी सर्कस’सारख्या शोंमधून कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, अली असगर, भारतीसिंग असे ब्रँड्स तयार झाले, त्याच वेळी मराठीत वैभव मांगले, नीलेश साबळे, भाऊ कदम, विशाखा टिकले, प्राजक्ता हनमघर, समीर चौघुले, अंशुमन विचारे असे किती तरी ब्रँड्स तयार झाले. पूर्वी लोकप्रियता मिळालेल्या विनोदी कलाकारांपेक्षा हे अतिशय वेगळे, नवीन चेहरे आहेत आणि त्यांनी कष्टानं स्वतःची विनोदवृत्ती जगाला दाखवून दिली आहे.
या शोंमधून नवीन कलाकार अनेकदा त्यांच्या प्रादेशिक बोली, लहेजा हेही घेऊन येतात, त्यामुळे मजा येते. हिंदी कॉमेडी शोंमध्ये एकमेकांचा अपमान करण्यासारखी शैली जास्त असताना मराठीत प्रसंगनिष्ठ, शाब्दिक विनोद जास्त दिसतात. मात्र, मराठीत शारीरिक हालचाली, ओरडून बोलणं हे जास्त दिसतं हेही नोंदवायला पाहिजे. अशा शोंचे परीक्षक आणि त्यांचं खदाखदा हसणं हा स्वतंत्र विषय असला, तरी अर्चना पुरणसिंग, नवज्योतसिंग सिद्दू असे चक्क ‘कॉमेडी शोंचे परीक्षक’ हाही एक ब्रँड तयार झाला ही गोष्ट गंमतीची.
कॉमेडी शोंमुळे कलाकारांचा ब्रँड तयार होतो आणि त्यांना मोठ्या पुरस्कार सोहळ्यांपासून स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सगळीकडे मोठी मागणी येते, मोठी मानधनं मिळतात ही गोष्ट जितकी खरी, तितकीच ब्रँड तयार झाला, की विनोदाचा साचा तयार होतो, ‘लाफ्टर’चं दडपण वाढतं आणि विनोदाची घसरण व्हायला लागते ही गोष्टही खरी. या शोंचे खरे स्टार असलेले लेखक बहुतांश वेळा अंधारात राहतात आणि कलाकारांना जास्त मान्यता मिळते. अनेकदा कलाकारांचे ब्रँड इतके मोठे होतात, की त्यांना नंतर ठरवूनसुद्धा स्वतःचा साचा मोडता येत नाही आणि इतर प्रकारांत जम बसवता येत नाही.
हे शो चॅनेल्ससाठी ‘विन-विन सिच्युएशन’ असते. कलाकारांची फ्लेक्झिबिलिटी असते, लेखक बदलण्याची सोय असते आणि इतर किती तरी अॅडजस्टमेंट्सची संधी असते. त्यामुळेच चॅनेल्सना ते आवडत असावेत. कसोटी क्रिकेटपेक्षा ट्वेंटी-२०ला हल्ली जास्त प्रतिसाद मिळतो. विनोदी मालिका म्हणजे कसोटी असली, तर हे शो म्हणजे ट्वेंटी-२० आहे एवढं सांगितलं तरी पुरे. एके काळी फक्त युवा महोत्सवांत वाव असणारी ‘स्किट्स’ या शोंमुळे सध्या तुफान फॉर्मात आहेत. या शोंच्या ‘ट्रेन्स’, ‘एक्स्प्रेस’ सुसाट सुटल्या आहेत. त्यात बसायचं की नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचं इतकंच!
Edited By - Prashant Patil