विनोद ते ‘थ्रिलर’चा ‘ओटीटी’ प्रवास

‘पर्मनंट रूममेट्स’मध्ये निधीसिंग आणि सुमित व्यास. सुरवातीच्या वेब सिरीज तरुणाईमध्ये लोकप्रिय झाल्या ते त्यातल्या विनोदामुळे.
‘पर्मनंट रूममेट्स’मध्ये निधीसिंग आणि सुमित व्यास. सुरवातीच्या वेब सिरीज तरुणाईमध्ये लोकप्रिय झाल्या ते त्यातल्या विनोदामुळे.
Updated on

चौकटबद्ध टीव्ही मालिकांच्या पलीकडेही काही मनोरंजन असू शकतं हे दाखवून दिलं ते ‘वेब सिरीज’ या माध्यमानं. साहजिकच टीव्ही माध्यमाला वैतागलेली तरुणाई त्याकडे सहजच वळली. तरुणांना आवडेल अशा मालिका टीव्हीवर नव्हत्या असं नाही, मात्र त्यातलं तरुणाईचं चित्रण खुद्द तरुणाईलाच रिलेट करता येणारं नव्हतं. फक्त तरुणांसाठीच्या वाहिन्यांपासून ‘एम टीव्ही’पर्यंत अनेक प्रयोग झाले असले, तरी तरुणांना काही ते माध्यम ‘अपील’ करत नव्हतं. त्याच वेळी टीव्ही स्मार्ट होत चालले होते. नेट आणि टीव्ही यांचं एकत्रीकरण हळूहळू रुढ होत होतं आणि मुख्य म्हणजे मोबाईलही अधिकाधिक स्मार्ट, मोठे आणि ‘वन स्टॉप सोल्युशन’ बनत चालले होते. याच सगळ्या स्थित्यंतराच्या काळात वेळी ‘वेब सिरीज’ नावाचा प्रकार भारतात मूळ धरायला लागला. 

भारतातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ‘वेब सिरीज’ माध्यमानं सुरुवातीला आधार घेतला होता कॉमेडीचा. ‘द व्हायरल फिव्हर’ म्हणजे ‘टीव्हीएफ’च्या ‘पर्मनंट रूममेट्स’नं तरुणाईला जास्त आकर्षित केलं. एरवी टीव्हीवर न येणारा, तरुणांना थेट रिलेट करता येईल असा विनोद, बिनधास्तपणा आणि वाह्यातपणा यामुळे ही सिरीज तरुणांना आवडली. मग ‘बँग बाजा बारात’ आली, ‘मॅन्स वर्ल्ड’ आली, ‘पिचर्स’ आली, ‘बेक्ड’, ‘ट्रिपलिंग’ आली. या सगळ्यात विनोदच केंद्रस्थानी होता. पुढे ‘टीव्हीएफ’च्या जोडीला ‘वाय फिल्म्स’, ‘एआयबी’सारख्या कंपन्याही आल्या आणि वेब सिरीज आणि विनोद हे प्रमाण घट्ट होत गेलं. तरुणांना हसायला आवडतं आणि शेअर करायला आवडतं. सुरवातीच्या काळातल्या कॉमेडी वेब सिरीजनी त्यांना हे सगळं परफेक्ट उपलब्ध करून दिलं.

मात्र, ‘वेब सिरीज’ ते ‘ओटीटी’ या प्रवासात अनेक स्थित्यंतरं घडली. सुरवातीच्या वेब सिरीज बहुतांश युट्यूबवर बघायला लागायच्या, मात्र ओटीटीमुळे त्यांना एकेका प्लॅटफॉर्मचं अधिष्ठान मिळालं. डेटा स्वस्त होत गेल्यामुळे आणि त्याच वेळी त्याचा स्पीड वाढल्यामुळे डाउनलोडिंगपेक्षा स्ट्रीमिंगचा ट्रेंड वाढला. ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राइम’, ‘हॉटस्टार’सारख्या कंपन्या आल्यावर तर ‘वेब सिरीज’ नावाच्या तुलनेनं कमी खर्चात तयार केल्या जाणाऱ्या, फारशी माहीत नसलेली नावं असलेल्या कलाकारांच्या माध्यमाला ‘ग्रॅंजर’ दिलं.

‘ओटीटी’नं दिलेल्या ‘ग्रॅंजर’नं आणि डेटा स्थित्यंतरानंच खरं तर या माध्यमाला विनोद ते थ्रिलर असा प्रवास करायला भाग पाडलं. वेब सिरीजमध्ये असलेलं कॉमेडीचं प्रमाण झपाट्यानं कमी झालं आणि क्राइम, थ्रिलर आणि सेक्स यांनी या नवीन प्रकारच्या वेब सिरीजना वेढून टाकलं. 

एक तर बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यासाठी त्यांना जास्त गरज होती ती म्हणजे प्रेक्षकांनी जास्तीत जास्त काळ या सिरीज बघण्याची. स्पष्ट सांगायचं तर प्रेक्षकांची झोप उडवण्याची! नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हॅस्टिंग्ज यांनी ‘झोप हा आमचा सर्वांत मोठा स्पर्धक आहे,’ असं म्हटलं होतं ते आठवा. सिरीजच्या एका भागानंतर लगेच दुसरा भाग, मग तिसरा भाग; एक सिरीज बघितली की दुसरी, मग तिसरी... असं प्रेक्षकांनी ‘हूक अप’ व्हायचं असेल, तर कंटेंट अशा प्रकारचा हवा होता, ज्यातून प्रेक्षक गुंतत जातील. वेब सिरीज सुरवातीला आल्या, तेव्हा तिथं इतकी प्रचंड गुंतवणूक नव्हती आणि प्रेक्षकांनी प्रचंड वेळ गुंतून बसणं अपेक्षित नव्हतं. तिथं फक्त नव्या प्रकारचा नेटसॅव्ही प्रेक्षक आकर्षित करणं एवढंच अपेक्षित होतं. त्यामुळे तरुणाईला ‘अपील’ होणारी कॉमेडी तिथं परफेक्ट होती. 

मात्र, ओटीटीला कॉर्पोरेट परिमाण मिळाल्यानंतर प्रेक्षक खूप काळ गुंतून राहणं गरजेचं व्हायला लागलं आणि त्यासाठी क्राइमवर आधारित थ्रिलरसारखं दुसरं योग्य रसायन नव्हतं. एक गुन्हा घडला, की त्याचा तपास, मग तिसरा गुन्हा, त्याचा अपराधी अशा प्रकारची मालिका असली, खूप ट्विस्ट्स असले, धक्के असले, की प्रेक्षक त्यात बरोब्बर गुंतून राहणार होतेच. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, की भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर बड्या कॉर्पोरेट कंपन्या आल्यानंतर त्यांनी कॉमेडीऐवजी थ्रिलरला जास्त महत्त्व दिलं. विनोदात तुम्हाला रिलीफ मिळतो. इथं रिलीफ देणं अपेक्षित नव्हतं, तर उलट तुमचा श्वास वारंवार रोखला जाणं, पुढं काय होणार याची प्रचंड उत्कंठा लागणं अपेक्षित होतं. विनोदांवर आधारित मालिका तुम्ही एका एपिसोडनंतर लगेच दुसरा, मग तिसरा अशी कधीच बघू शकत नाही. त्यामुळेच ‘ओटीटी’मध्ये तुलनेनं विनोद मागं पडल्याचं दिसतं.

‘लिट्स थिंग्ज’, ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘ये मेरी फॅमिली’ अशा काही वेब सिरीज आल्या असल्या, तरी जास्त प्रमाण हे ‘डेल्ली क्राइम’, ‘ब्रीद’, ‘मिर्झापूर’, ‘सॅक्रेड गेम्स’ यांचंच आहे. ओटीटीवरचं हे ‘थ्रिलरी’करण हा वेगळाच विषय असला, तरी एके काळी विनोदाचं वर्चस्व असलेल्या या माध्यमातलं विनोदी कंटेंटचं कमी होत जाणारं प्रमाण हे मात्र विचार करायला भाग पाडणारं आहेच. ओटीटीवरच्या कंटेंटमध्ये अजूनही बरेच बदल होत जाणार आहेत. कारण अजूनही इथं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं हे प्रेक्षक यायचे आहेत. अजूनही ओटीटीचा प्रेक्षकवर्ग विशिष्ट वयोमर्यादेत आहे. तो विस्तारत जाईल, तसा कंटेंटही बदलत जाईल. न जाणो, कदाचित पुन्हा एकदा त्यात विनोदाचा शिडकावा होईलही. मात्र, तूर्त तरी ओटीटीच्या ‘थ्रिलरी’करणानं विनोदाचा घास बराचसा काढून घेतलाय एवढं मात्र नक्की!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com