esakal | नव्या प्रकाराची ‘रेसिपी’
sakal

बोलून बातमी शोधा

Serial

नव्या प्रकाराची ‘रेसिपी’

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

‘भाभीजी घर पे है’ या मालिकेची तयारी तिचे दिग्दर्शक शशांक बाली आणि लेखक मनोज संतोषी करत होते, तेव्हाची गोष्ट. त्यांनी असं ठरवलं, की आपण असं काही तरी करू की जे विनोदी मालिकांमध्ये आधी कुणी केलं नसेल. त्यांनी खरं तर ‘श्रीमान श्रीमती’ या दूरदर्शनच्याच जुन्या मालिकेचा मसाला घेतला; पण त्याला तडका दिला तो अतरंगी व्यक्तिरेखांचा. तुम्ही बघितलं असेल, तर या मालिकेत कुठलीही व्यक्तिरेखा सरळ, साधी नाही. म्हणजे मुख्य चार व्यक्तिरेखा तर धमाल आहेतच; पण इतर व्यक्तिरेखांवर त्यांनी मेहनत घेतली. अम्माजी खिडकीत बसून बोलतात तेव्हा दर वेळी त्यांच्या हातातलं काही तरी पडतं, विभूती ऊर्फ भरभूतीचा मित्र प्रेम चौधरी दुनियेतली कोणतीही गोष्ट पैदा करून देऊ शकतो, ‘पगलैट’ सक्सेना यांना जितके शॉक किंवा श्रीमुखात दिल्या जातात तेव्हा ते ‘आय लाइक इट’ म्हणतात. या सगळ्या अर्कचित्रांचा पट बाली आणि संतोषी यांनी मांडला आणि त्यातून एक ‘युनिक’ असं रसायन तयार झालं. त्यामुळे सिटकॉमच्या क्षेत्रात सगळ्या दृष्टीनं चौफेर कामगिरी करणारी मालिका तयार झाली.

स्वयंपाक तर सगळ्याच घरांमध्ये होत असतो; पण नेहमीच्या पदार्थाला जेव्हा वेगळी कोणती तरी फोडणी दिली जाते, किंवा काही वेळा चुकून विचित्र कॉंबिनेशन होतात, तेव्हा तयार होणारा पदार्थ हा ‘युनिक’ असू शकतो. विनोदाचं तेच आहे.

चौकटबद्ध विनोद काय कुणीही तयार करू शकतं; पण काही वेळा ती भेदण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तयार होणारा पदार्थ खमंग असतो. अनेकदा ‘सटल ह्युमर’, ‘ब्लॅक ह्युमर’, तिरकसपणावर आधारित, प्रसंगांवर आधारित, किंवा अर्कचित्रांसारख्या पात्रांवर आधारित विनोद विलक्षण मजा देऊन जातो. अर्थात या गोष्टी ठरवून केल्या तर मजा अर्थातच नाही येणार; पण एक विचित्रपणा आणि त्यातही असलेला उत्स्फूर्तपणा अशा गोष्टी एकत्र आल्या तर अतिशय वेगळी रेसिपी तयार होते.

‘येस बॉस’सारख्या मालिकेत एकच सिच्युएशन; पण तिच्याशी संबंधित अनेक शक्यतांचा विचार केला गेला. ‘टॉम अँड जेरी’ या मालिकेत असतो तसाच. त्यातून अतिशय जबरदस्त आणि दीर्घकाळ लोकप्रिय राहणारी मालिका तयार झाली. ‘ऑफिस ऑफिस’ मालिकेत तोचतोचपणातूनसुद्धा गंमत आणता येऊ शकते हे दाखवलं आणि आज ‘एफआयआर’पासून ‘जिजाजी छत पे है’पर्यंत किती तरी मालिकांनी तीच ‘री’ ओढल्याचं दिसतं. शफाअत खान यांनी ‘शोभायात्रा’सारख्या नाटकात भेदक भाष्य करणाऱ्या विनोदाची नवी जातकुळी दाखवली. विवेक बेळे यांच्या ‘माकडाच्या हाती शँपेन’सारख्या नाटकातून एका वेगळ्या प्रकारच्या विनोदाला लोकप्रियताही मिळाली आणि त्यांच्या पुढच्या नाटकांनी तो पुढं नेला. देवेंद्र पेम यांना ‘ऑल द बेस्ट’ सारख्या नाटकात वेगवान हालचालींवर आधारित विनोदाचा एक नवा प्रकार दिसला. बासू चटर्जी यांना अतिशय ‘सटल’ विनोदाची रेसिपी गवसली, तर जुही चतुर्वेदीला ‘विकी डोनर’सारख्या चित्रपटातून सूचकतेमध्येही विनोदाच्या शक्यता दडलेल्या असू शकतात हे जाणवलं. फार कशाला, इंद्रकुमार यांना ‘मस्ती’ चित्रपटामध्येही खरं एक वेगळा विनोद सापडलाच होता; पण पुढे तो घसरला ही गोष्ट दुसरी. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधल्या विनोदाचा प्रकारही ‘युनिक’ होता आणि नंतर भल्याभल्यांना त्याची ‘कॉपी’ करता आली नाही हेही खरं.

वेगळ्या प्रकारच्या विनोदाची किती तरी उदाहरणं सांगता येतील. वेगळंच करायचं आहे असं ठरवून केलेले अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकं फसलेलीही आहेत हा भाग अलाहिदा; पण सांगायचा मुद्दा असा, की ठरलेले जॉनर सोडून सापडलेल्या विनोदाची एक निराळीच गंमत असते. म्हणजे अंतिम लक्ष्य हसवायचंच असलं, तरी ते कशा प्रकारे आणि त्यातून साध्य काय करायचं याचे मार्ग वेगळे असू शकतात. ही वेगळ्या विनोदाची रेसिपी सापडणं हे खरं तर प्रतिभेचं लक्षण-कारण त्यात निरीक्षणांपासून निर्मितीच्या क्षमतेपर्यंत किती तरी गोष्टी असतात आणि उस्फूर्तपणाचा भाग तर खूपच असतो. त्यामुळेच अनेकदा एखाद्या नाटकात, मालिकेत, चित्रपटात वेगळ्या प्रकारचा विनोद सापडला, तरी प्रत्येक कलाकृतीत तो पुढं नेता येत नाही असंही दिसतं. कारण मुळात जर तो प्रकारच ‘युनिक’ असेल, तर मग त्याची ‘कॉपी’ पुढच्या वेळी झाली तर त्याचा ‘युनिकनेस’ जाणारच. मात्र, नवीन रेसिपीचा आनंद त्या कर्त्यांना आणि त्याचबरोबर आस्वादकांनाही असतो. अनेकदा वाटतं (आणि असतंही तसंच), की फारच ‘कॉपी-पेस्ट’चा ट्रेंड चाललाय बुवा; पण मध्येच अशी वेगळ्या रेसिपीची डिश समोर येते, की पोट न भरलं तरच नवल!