भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला,
अधुरी एक कहाणी
नर-नारीमधलं प्रेम जगात फुलतच असतं. कधी बालपणापासून, कधी पौगंडावस्थेत प्रवेशताना, कधी तारुण्यात, तर कधी प्रौढावस्थेत. मनात इतर कोणतेही हेतू न बाळगता निरपेक्षपणानं जमलेलं प्रेम सामान्यत: यशस्वी होतंसुद्धा. क्वचित् काही वेळा असफलही होतं. हिंदी सिनेमानं अशा असफल प्रेमकहाण्यांचं उदात्तीकरण करून मागील काही पिढ्यांना भारावून टाकलं होतं.