

Mani Kaul Dhrupad Documentary
esakal
प्रभा जोशी
मणी कौल यांचं नाव भारतीय समांतर चित्रपटांच्या प्रवाहामध्ये आदराने घेतलं जातं. वेळ आणि अवकाश याचा प्रयोगशील उपयोग आणि प्रभावी दृश्य रुपकं वापरत मणी कौल विषय-आशयाचा एक पट मांडतात. ‘ध्रुपद’ या लघुपटात त्यांची ही वैशिष्ट्ये अगदी ठळकपणे दिसतात.
ध्रुपद हा प्राचीन; परंतु आजही प्रवाही असलेला भारतीय शास्त्रीय संगीताचा एक पुरातन आविष्कार आहे. ध्रुपद गायन-वादनाची ही परंपरा आज क्षीण झाली आहे, असं वाटलं तरी त्यातील सत्व आणि अभिजातता अद्याप टिकून राहिली आहे. भारतीय संस्कृती आणि इथलं तत्त्वज्ञान याचा सगळा गाभा आशयातील सखोलता आणि विषयाच्या सूक्ष्मतेमध्ये आहे. ‘ध्रुपद’ गायन-वादनातून तेच शोधण्याचा, साकार करण्याचा प्रयत्न होतो.
भारतीय शास्त्रीय संगीत विचाराचं मूळ सामवेद गायनापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित होत नवोन्मेषी रूप धारण करत पुढे आलं. ध्रुपद गायन आणि वादन हा त्यातला एक मध्यवर्ती आणि महत्त्वाचा टप्पा होता आणि आजही तो मूळ रूपात परंपरेशी नातं सांगत टिकून आहे. या ऐतिहासिक गायन शैलीवर आधारित ‘ध्रुपद’ हा लघुपट फिल्म्स डिव्हिजनसाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणी कौल यांनी १९८२ मध्ये बनवला.