चंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल; भारतीय वंशाचे राजा चारी उत्सुक

मंजूषा कुलकर्णी
रविवार, 19 जानेवारी 2020

वडिलांचा आदर्श
राजा चारी (वय ४१) हे भारतीय वंशाचे तिसरे अमेरिकन अंतराळवीर असतील. चारी हे अमेरिकेच्या हवाईदलात कर्नल आहेत. खगोलशास्त्रीय अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. त्यांचे वडील श्रीनिवास चारी हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी १९७० मध्ये हैदराबादहून अमेरिकेला आले होते. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडविण्याचे त्यांचे ध्येय होते. अमेरिकेतील मुलीशी विवाहबद्ध झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. राजा चारी यांची जन्मभूमी व कर्णभूमी अमेरिका आहे. ‘‘माझे वडील शिक्षणाचे महत्त्व चांगलेच जाणून होते. त्यामुळे त्यांनी मला तसेच घडविले. त्यांचा आदर्श घेतच मी आजवरची वाटचाल केली आहे,’’ असे राजा चारी यांनी ‘नासा’च्या पदवीदान समारंभात सांगितले.

चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले अन्‌ अमेरिकेने ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास घडविला. या घटनेचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षी साजरा झाला. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर उतरविण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिला अंतराळवीर प्रथमच चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली असून, गेल्या आठवड्यात ‘नासा’चे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ११ अंतराळवीरांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यात भारतीय वंशाचा राजा जॉन वुरपुत्तुर चारी, कोरियन वंशाचा लेफ्टनंट जॉनी किम आणि इराणी वंशाची जस्मिन मोघबेली या तीन भावी अंतराळवीरांचा समावेश होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वप्नाकडे झेप
जस्मिन मोघबेली (वय ३६) यांचे आईवडील १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराणमधून बाहेर पडले. त्यांचा जन्म जर्मनीतील असला तरी अमेरिका कर्मभूमी आहे. मोघबेली यांनी अवकाशात जाण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. इयत्ता सहावीत असताना त्याचे निश्‍चयात रूपांतर झाले. त्या वेळी शालेय उपक्रमात त्यांनी तत्कालीन सोव्हिएत युनियनची १९६३ मधील पहिली महिला अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेश्‍कोव्हा हिच्यावर एक प्रकल्प केला. १५ वर्षांची असतानाच त्यांनीा अलाबामातील ‘ॲडव्हान्स स्पेस ॲकॅडमी’चे शिबिर पूर्ण केले. पुढे अमेरिकेतील ‘एमआयटी’तून अवकाश अभियांत्रिकीची पदवी घेतली. तेथे शिकत असतानाच अमेरिकेत २६/११ची घटना घडली. त्या दहशतवादी हल्ल्यानंतर मूळच्या इराणी नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पण तरीही त्यांनी अमेरिकेतील नौदलाची शाखा असलेल्या ‘मरिन्स’ दलात प्रवेश घेतला. ‘कोब्रा’ हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहिमांमध्ये भाग घेतला. तेथे घडलेल्या एका प्रसंगावरून त्यांना ‘जॉज’ हे टोपणनाव मिळाले. अशा या ‘जॉज’चे अवकाशात जाण्याचे स्वप्न आता अगदी दाराशी येऊन ठेपले आहे. 

स्वतःला सिद्ध केले
अमेरिकेच्या नौदलात लेफ्टनंट पदावर असलेला जॉनी किम (वय ३५) हे कोरियन वंशाचे दुसरे अंतराळवीर ठरणार आहेत. दहशतवादाशी सामना करण्यासाठी अमेरिकच्या विशेष ‘नेव्ह सील’दलातही त्यांनी केले आहे. एवढेच नाही तर ते वैद्यकीय पदवीधारकही आहे. आता चंद्रावर जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. किमच्या आईवडिलांनी १९८०मध्ये दक्षिण कोरियातून अमेरिकेत स्थलांतर केले. कॅलिफोर्नियात त्यांचे दारूचे दुकान होते. किम शाळेत अत्यंत हुशार होते. तरी लाजाळू, अबोल, आणि स्वतःवर विश्‍वास नसलेला मुलगा असे त्यांची ओळख होती. मात्र १६ व्या वर्षी ‘नेव्ही सील’मध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी एकट्याने घेतला आणि तेव्हाच त्यांना स्वतःची ओळख झाली. हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manjusha kulkarni writes blog about human mission on moon