#MokaleVha : सुखी संसाराचे मॅन्युअल

डॉ. विद्याधर बापट, मानस तज्ज्ञ/ताणतणाव तज्ज्ञ 
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

आशुतोष आणि सायलीच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होते. वातावरण खूप आनंदाचं, उत्साहाचं होतं. स्टेजवरून शुभेच्छा ऐकू येत होत्या. मी समोरच बसलो होतो. चारमहिन्यापूर्वीचं दृष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. दोघंही माझ्याकडे आले होते. दोघंही आयटीमध्ये इंजिनिअर होते. छान नोकरी होती. ‘सर, आम्ही लग्न करतोय.

आशुतोष आणि सायलीच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होते. वातावरण खूप आनंदाचं, उत्साहाचं होतं. स्टेजवरून शुभेच्छा ऐकू येत होत्या. मी समोरच बसलो होतो. चारमहिन्यापूर्वीचं दृष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. दोघंही माझ्याकडे आले होते. दोघंही आयटीमध्ये इंजिनिअर होते. छान नोकरी होती. ‘सर, आम्ही लग्न करतोय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसा प्रेमविवाहच. तशी काही समस्या नाही. पण पुढे काही समस्या येऊ नयेत म्हणून मार्गदर्शन हवंय. ‘मी हसलो. म्हणालो ‘मी आधी तुमचं अभिनंदन करतो. अशासाठी की आपण एकमेकांना खरोखरच अनुरूप आहोत का, यासाठी तुम्ही लग्नापूर्वीच मार्गदर्शन घेताय. त्यामुळे पुढे उद्‌भवू शकणाऱ्या अनेक प्रश्नांची कारणं आणि उत्तरं समजू शकतील. कसं आहे की आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याच्याबरोबर ती कशी चालते, कुठली काळजी घ्यावी हे सगळं सांगणारी एक पुस्तिका (manual ) येते. नातं जोडताना ते कसं टिकेल, कसं बहरेल, त्यासाठी काय करावं हे सांगणारी कुठलीही पुस्तिका नसते. जोडीदाराला समजून घेत घेतंच संसार सुखी होऊ शकतो. पण त्यासाठी काही निश्‍चित अशा टिप्स आहेत. तुम्हाला त्या सांगतो. 

आपला जोडीदार सर्वार्थाने परिपूर्ण असलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे तो अट्टहास नसावा. तसा कुणीच सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. प्रत्येकाची भावनिक वीण, मनाची धाटणी वेगवेगळी असते. ती ओळखणं, मान्य करणं आणि त्यानुसार जमवून घेण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. नंतर सूर जसे जमत जातील तशी समोरची व्यक्ती आणि आपणसुद्धा बदलत जातो. समोरची व्यक्ती एकदम बदलू शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा याची जाणीव ठेवावी.

जोडीदाराकडून आपण किती सुख घेतोय यापेक्षा त्याला किती सुख देतोय हा विचार सर्वांत महत्त्वाचा. हे सगळं साधण्यासाठी आपण आतून स्वस्थ असणं महत्त्वाचं. ते तसं नसेल तर त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा जोडीदाराला समजून घेणं ही गोष्ट अशक्‍य होऊन बसते. 

सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शारीरिक सुख देण्या-घेण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता, जोडीदाराला योग्य तो आदर आणि सन्मान देणं, त्याच्या भावनांची कदर करणं, योग्य आर्थिक नियोजन, काळानुसार पुरुष श्रेष्ठत्वाच्या कल्पना बदलणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर, त्याला किंवा तिला व्यावसायिक मित्र किंवा मैत्रिणी असणारच हे मान्य करणं (विशिष्ट मर्यादेपर्यंत मैत्री), एकमेकांना वेळ देणं, जोडीदाराचा उत्कर्ष होण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, याबाबतीत अहंकार आडवा न येऊ देणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जोडीदारावर पूर्ण विश्वास असणं.

इगो किंवा अहंकार हा वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त करू शकतो. आयुष्यातल्या किंवा संसारातल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये दोघांनीही सहभागी होणं महत्त्वाचं, त्याचबरोबर प्रत्येकवेळी माझाच निर्णय बरोबर तो मी लादणार हे चुकीचं आहे.

दोघांमध्ये शांतपणे चर्चा व्हाव्यात. दुसऱ्याची बाजू ऐकून घायची तयारी हवी. मत मांडण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. आक्रस्ताळेपणा, चढलेला आवाज संवाद घडू देत नाही. फक्त कटुता निर्माण होते. 

सध्याच्या काळात दोघंही पतिपत्नी कमावत असतात. जर पत्नीचा पगार जास्त असेल तर तो भांडणाचा मुद्दा बनू नये. कारण यामागे केवळ अहंकार दुखावला जाणे हेच कारण असते. अर्थात पत्नीचीही वागण्याची पद्धत समजूतदारपणाची हवी. दोघांत निर्माण झालेले प्रेम असे मुद्दे निर्माणच होऊ देत नाहीत.

सध्याच्या काळात ऑफिसमधील कामाचे प्रेशर वाढलेले असते. टार्गेट्‌स पूर्ण करायची असतात. तसेच इतर वाहतुकीसारखे प्रश्न असतात. घरी आल्यावर थकून जायला होतं. अशावेळी स्वस्थता हवी असते, हे दोघांनीही समजून घ्यायला हवे.

हे सगळं समजून घेतल्यावर भांडणं होणारच नाहीत असं नाही, पण पुरेसं प्रेम, विश्वास याचा पाया असेल तर समेट लवकर होईल. नात्यात कायमची कटुता निर्माण होणार नाही.

आता महत्त्वाचे म्हणजे दोघांची शारीरिक तपासणी आणि दोन्ही व्यक्तिमत्त्व एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत हा मुद्दा? लग्नापूर्वी दोघांनीही रक्त व इतर शारीरिक तपासणी करून घेणे व कुठलाही निष्कर्ष एकमेकांपासून न लपविणे अतिशय महत्त्वाचे आहे. लग्नापूर्वी अनेकदा भेटणे व जोडीदाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे. आपल्या कल्पना व अपेक्षा मोकळेपणाने सांगणे अत्यावश्‍यक. लग्नापूर्वी सर्वच बाबतीत तज्ञांशी बोलणे महत्त्वाचे आहे. काही व्यक्तिमत्त्वे एकमेकांना पूरक नसू शकतात. काय काळजी घ्यावी किंवा कुठल्या सुधारणा करणे शक्‍य आहे हे तज्ञच सांगू शकतात.

लग्न करताना बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षाही, ती व्यक्ती समजूतदार, आनंदी आणि शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टीने जबाबदार आहे की नाही हे महत्त्वाचे. तिच्या ‘दिसण्या’पेक्षा ‘असणे‘ महत्त्वाचे ठरते.

सायली व आशुतोष लक्ष देऊन ऐकत होते. पुढच्या काही दिवसांत त्यांनी सर्व चाचण्या करून घेतल्या. 

आमची सेशन्स झाली. त्यानंतर थोड्याच दिवसांत लग्नाचे निमंत्रण आणि चेहेऱ्यावर खूप सारा आनंद घेऊन दोघं आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manual of happiness life