Marathi articles in Sakal Saptarang by Asha Gadgil
Marathi articles in Sakal Saptarang by Asha Gadgil

ढाल-तलवार (आशा गाडगीळ)

‘‘हो... पण आमचा धैर्य तुला माहीत आहे ना, किती उपद्‌व्यापी आहे ते. सासूबाई टीव्ही पाहत होत्या. तो हळूच पाय न वाजवता त्यांच्यापाशी गेला आणि ती तलवार त्यानं त्यांच्या पोटात खुपसली! त्या अश्‍शा चिडल्या म्हणून सांगू... ‘आधी ती ढाल-तलवार परत कर’ म्हणून मला तीन-तीनदा बजावलं.’’

‘‘रिया, आज माझ्या लाइफमधली सर्वांत वाईट गोष्ट घडली...’’ सात वर्षांच्या राजचे हे शब्द जवळच्या संगणकावर काम करणारे त्यांचे बाबा सुयश याच्या कानावर पडताच त्याच्या पायातलं त्राणच गेलं. सात वर्षांचा राज त्याच्याहून दीड वर्षानं मोठ्या असणाऱ्या रियाला सांगत होता. कामात लक्ष असल्याचं भासवत सुयशनं त्यांच्या संवादाकडं कान लावले. पुढं काय ऐकायला मिळतंय, याची तो वाट पाहू लागला.

‘‘राज, काय झालं?’’ रियानं विचारलं.

‘‘अगं, आज मीनामावशी आली होती... धैर्यला घेऊन. तर आईनं माझी ढाल-तलवार धैर्यला देऊन टाकली. मला खूप रडायला येत होतं.’’

हे ऐकून सुयशचा जीव भांड्यात पडला. राजच्या स्पष्टीकरणाच्या आधी नको नको ते प्रसंग आणि विचार सुयशच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. अर्थात, ते प्रसंग मोठ्यांच्या चष्म्यातून पाहिले जाणारे आणि आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन कल्पिलेले होते. लहानगा राज त्याच्या आवडत्या खेळण्यापासून दुरावला गेल्यामुळे एवढा दुःखी झाला असेल, याची त्याला कल्पना करणंही अशक्‍य होतं.

‘‘अरे, मग तू आईला त्याच वेळी सांगायचं होतंस ना... मला माझी ढाल-तलवार पाहिजे, धैर्यला देऊ नकोस म्हणून.’’

‘‘छे गं, आई कुठली ऐकायला! आणि ते बॅड मॅनर्सही झाले असते.’’

‘‘हो... पण ढाल-तलवारीचा विषय निघाला तरी कसा? ती तर कपाटात आहे.’’

‘‘अगं, मीनामावशी म्हणाली, ‘लवकर निघायला हवं. डोंबिवलीला जायचं म्हणजे चार वाजताची तरी ट्रेन पकडायला हवी. आलेच आहे इकडं तर खेळण्यांच्या दुकानात जाऊन ढाल-तलवार विकत घेते. धैर्यनं पंधरा दिवस ढाल-तलवारचा धोशा लावलाय नुसता...’ ’’

‘‘मग?’’

‘‘मग काय; आई तिला म्हणाली, ‘अगं, राजची लहानपणी आणलेली ढाल-तलवार कपाटात तशीच पडून आहे. आता राज मोठा झालाय. धैर्य, तुला चालेल का राजची जुनी ढाल-तलवार?’ मग काय, धैर्य हट्टच धरून बसला आणि गेला घेऊन.’’

‘‘जाऊ दे. कधी कधी आई अशीच बोअर वागते. हे बघ, भाऊबिजेला माझ्या पैशांतून तुला ढाल-तलवार आणून देईन.’’

***

दोन्ही मुलं या विषयावर चर्चा करता करता झोपी गेली. सुयश राजच्या दुःखानं हळवा झाला. ‘आम्ही मुलांना समजून घेतो, असं आपण पालक समजत असतो; पण ते समजून घेणं असतं आपल्या दृष्टीनं! त्यांच्या भावविश्‍वात जाऊन आपण त्यांना समजून घेत नाही कधी...’ त्याला खंत जाणवली. त्यानं मुलांच्या अंगावरचं पांघरूण सारखं केलं, खोलीतला विजेचा दिवा बंद केला आणि मुलांच्या खोलीतून तो बाहेर आला. मुलांचा हा संवाद वनिताला लगेच सांगावा, असं त्याला वाटलं; पण तो थांबला! मुलांच्या बाबतीत वनिता फारच भावनाशील आहे, हे साऱ्यांनाच माहीत होतं. तिला जर राजचं दुःख आत्ताच समजलं, तर ती सकाळ होण्याचीही वाट पाहणार नाही. रात्री दहा वाजता खेळण्यांचं दुकान शोधेल आणि ढाल-तलवार आणेल. त्यापेक्षा आई आणि वनिता यांच्या कानावर उद्या चहाच्या वेळी ही गोष्ट घालू या, असा विचार सुयशनं केला.

***

न्याहरीच्या वेळी टेबलभोवती बसलेले असताना सुयशनं मुलांचा संवाद दोघींना सांगितला. वनिताला अतिशय वाईट वाटलं आणि ती रडायचीच बाकी राहिली. आजीलाही नातवाचं दुःख समजलं आहे, असं तिच्या चेहऱ्यावरून सुयशला वाटलं. वनिताला फारच अपराधी वाटायला लागलं. राजच्या भावविश्‍वाला आपण एक ठोसा लगावला आहे, असं तिला वाटू लागलं! अपराधीपणाचं ओझं घेऊनच ती ऑफिसला गेली आणि नंतर दिवसभर त्याच ओझ्याखाली ती वावरली. 

दुपारी काम आवरायला नेहमीप्रमाणे शकू आली होती. आजी नेहमीप्रमाणे एकट्याच होत्या. आजी शकूला म्हणाल्या ः ‘‘शकू, मी जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येते.’’

शकू आजींकडं आश्‍चर्यानं पाहत म्हणाली ः ‘‘आता, या दुपारचं? आणि तुम्हाला चालवेल का? कुठं पडलाबिडलात तर? बाई माझ्यावरच रागावतील. जे काही आणायचं असेल ते मी देते आणून.’’

‘‘एवढी काही लगेच पडणारबिडणार नाही मी. अगदी जवळच जाऊन येते. लिफ्ट आहे म्हणजे जिन्याच्या पायऱ्यांचाही प्रश्‍न नाही. कमरेला पट्टा आहेच. काठी बरोबर घेते. अगदी सावकाश जाईन आणि सावकाश येईन बघ. बरोबर मोबाइलही घेते. गरज पडलीच तर तुला फोन करीन.’’

‘‘माझा नंबर सेव्ह केलेला आहे का तुमच्या मोबाइलमध्ये?’’

‘‘म्हणजे काय? महत्त्वाच्या माणसांचा नंबर सेव्ह केलेला असायलाच हवा.’’

हुशार आजींनी शकूला खूश केलं! शेवटी कोपऱ्यापर्यंत जायची परवानगी शकूनं आजींना उदारमनानं दिली.

‘‘दहा-पंधरा मिनिटांत या बरं का! माझ्या जिवाला घोर नको,’’ शकूनं पुन्हा एकदा आजींना बजावलं. आजी लढवय्या स्त्रीसारख्या बाहेर पडल्या. कमरेला पट्टा, हातात काठी, डोक्‍यावर टोपी आणि पायात बूट! सावकाशपणे कोपऱ्यावरच्या खेळण्यांच्या दुकानात पोचल्या. दुकानदार आश्‍चर्यानं म्हणाला ः ‘‘काय आजी? आज तुम्ही...!’’

‘‘हो बाबा...अरे, तुझ्याकडं ढाल-तलवार आहे का?’’

‘‘हो. आहे की...माझ्याकडं कुठला खेळ नाही असं नाहीच...’’

‘‘अरे विश्राम, त्या ढाल-तलवारी काढ पाहू...’’ दुकानदार नोकराला म्हणाला.  

जणू काही काउंटरवर आता ढाल-तलवारींचा पाऊस पडणार आहे, अशा थाटात त्यानं नोकराला फर्मावलं; पण काउंटरवर आले ते केवळ तीनच नग. त्यातूनच निवड करायचं होती. लाल-पिवळा रंग असलेली आणि आधीच्या ढाल-तलवारीशी थोडंफार साम्य असलेली ढाल-तलवार आजींनी खरेदी केली. शिवाय, नातीसाठीही काही सटरफटर घेतलं.आजी वेळेत घरी पोचल्या. शकूनं सुटकेचा निःश्‍वास सोडला. आजी कोचावर बसल्या. त्यांना तर खूप पराक्रमच केल्यासारखं वाटत होतं.

***

वनिता दिवसभर नॉर्मल वागत होती; पण अपराधीपणाचं ओझं दूर सारल्याशिवाय तिला मोकळं वाटणार नव्हतं. ऑफिसमधून थोडीशी सूट घेऊन ती खेळण्याच्या मोठ्या दुकानात गेली. दुकानदाराकडं फक्त एकच मागणी ः ‘ढाल-तलवार आहे का?’ दुकानदारानं ढाल-तलवारींचा ढीग समोर उभा केला. वनितानं चांदीची वाटावी अशी तलवार निवडली. तिला धार आहे असा भास होई. ढालीवर सिंहाचा मुखवटा होता. राज नक्कीच खूश होईल, हे तिनं मनोमनी जाणलं... आणि तिच्या पर्समध्ये ढाल-तलवार उतरली!

सुयश हा तर राजचा ‘इच्छामणी’च! कुठल्या तरी कथेत त्यानं इच्छामण्याविषयी ऐकलं होतं. इच्छा पूर्ण करणारा तो इच्छामणी. राज तेव्हापासून सुयशला ‘इच्छामणी’ असंच म्हणत असे. सुयशनं तर अगदी मॉडर्न ढाल-तलवार खरेदी केली. बाजारात नुकतीच आलेली. त्या तलवारीचं टोक कशावरही टेकलं की दिवा लागणारी आणि ‘हर हर महादेव’चा घोष करणारी. बाबांच्या बॅगमध्ये ढाल-तलवारीचं पुडकं जाऊन बसलं.

***

रविवारी, म्हणजे दुसऱ्या दिवशी मुलांना ढाल-तलवार दाखवायची, असं तिघांनीही मनाशी स्वतंत्रपणे ठरवलं. राजपेक्षा ते तिघं आता ढाल-तलवारीत जास्त गुंतले होते. रविवारी सकाळी न्याहारीनंतर आजींनी राजला तिच्या खोलीत बोलावलं.

‘‘काय गं आजी?’’

‘‘ही बघ, मी तुला गंमत आणलीय.’’

आजींनी ढाल-तलवारीचं पुडकं राजच्या हातात दिलं. राजनं उत्सुकतेनं पुडकं उघडलं. लाल-पिवळ्या रंगाची लाकडी ढाल-तलवार त्याला दिसली.आजी राजकडं एकटक पाहत होत्या. त्यांना वाटलं होतं, ‘ढाल-तलवार पाहून राज खूप खूश होईल... ‘आजीऽऽ आजी’ म्हणत गळ्याभोवती मिठी मारेल, पण छे ऽ. तसं काहीच झालं नाही. दिवाळीत मोठ्या फटाक्‍यांची वात पेटवावी, धडाम्‌धुम्‌ होईल म्हणून कानावर हात ठेवून, डोळे विस्फारून त्या आवाजाची अपेक्षा करावी; पण फटाक्‍यानं नुसतं फुस्सऽऽ व्हावं तसंच आजींचं झालं. ते ढाल-तलवारीचं पुडकं आजींच्या पलंगावर तसंच ठेवून राज खोलीबाहेर पडला. तेवढ्यात वनितानं राजला हाक मारली. सुयशही त्याच खोलीत होता. 

‘‘काय गं आई?’’ 

‘‘अरे बघ, तुझ्यासाठी गंमत आणली आहे मी.’’ 

राजनं पुडकं उघडलं. पुडक्‍यात ढाल-तलवार होती. ती चांदीसारखी चकाकत होती; पण तरीही राज त्या ढाल-तलवारीच्या प्रेमात पडला नाही. आईच्या हातात ढाल-तलवारीचं पुडकं देत तो म्हणाला ः ‘‘अगं, आजीनंही माझ्यासाठी ढाल-तलवार आणलीय.’’ 

वनिता अगदी निःशब्द झाली. त्या ढालीमागं आपला चेहरा लपवावा असं तिला वाटलं. सुयश त्याच खोलीत असल्यामुळं आईची ढाल-तलवार राजनं नाकारली आहे हे त्याला कळलं. ‘हर हर महादेव’ असा घोष करणारी आपण आणलेली तलवार पाहून राज त्याची ती लहानपणीची ढाल-तलवार निश्‍चितच विसरून जाईल, याबद्दल सुयशला पूर्ण खात्री होती.

‘‘राज, तुझी ढाल-तलवार धैर्यला दिली म्हणून तुला वाईट वाटतंय ना? अरे, ती तुझ्या लहानपणीची. आता तू मोठा झालास. मी आणलेली ढाल-तलवार एकदम स्पेशल आहे,’’ असं म्हणत सुयशनं ‘हर हर महादेव’ असा घोष करणारी ढाल-तलवार प्रात्यक्षिकासह राजला दाखवली. बालसुलभ उत्सुकतेनं तलवार पाहत असतानाच राजच्या मित्राची साद आली ः ‘राज, खाली खेळायला ये लवकर.’ त्या ढाल-तलवारीपेक्षा मित्राची हाक प्रभावी ठरली. बाबांनी आणलेली, नवीन तंत्रज्ञानानं नटलेली ढाल-तलवार टेबलवरच राहिली. घरातल्या त्या तिन्ही ढाल-तलवारी आणि आई-बाबा व आजी असे सगळेच पराजित वाटत होते. अर्ध्याएक तासानंतर दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला गेला. दारात मीनामावशी उभी होती.

‘‘अगं तू? आत्ता?’’

‘‘हो, अगं आमच्या अनयाला एक स्थळ आलंय. इथं जवळच आहे. त्यांच्याकडं पत्रिका द्यायला आले होते. म्हटलं थोडसं पुढं येऊन राजची ढाल-तलवार परत करावी.’’

‘‘अगं, परत कशाला केलीस? धैर्यला ती कायमचीच दिली आहे.’’

‘‘हो...पण आमचा धैर्य तुला माहीत आहे ना? किती उपद्‌व्यापी आहे ते. सासूबाई टीव्ही पाहत होत्या. तो हळूच पाय न वाजवता त्यांच्यापाशी गेला आणि ती तलवार त्यानं त्यांच्या पोटात खुपसली! त्या अश्‍शा चिडल्या म्हणून सांगू... ‘आधी ती ढाल-तलवार परत कर’ म्हणून मला तीन-तीनदा बजावलं.’’

***

अशा प्रकारे राजची हीही ढाल-तलवार घरी परतली! सुयशनं ती ढाल-तलवार उचलली आणि म्हणाला ः ‘‘राजला याविषयी काही सांगू नका.’’

राज खेळून घरी आला. त्यानं हात-पाय धुतले. आता तरी आपण आणलेल्या ढाल-तलवारींकडं तो प्रेमानं पाहील असं तिघांनाही वाटत होतं; पण राजनं तिघांचीही निराशा केली. तिघंही राजचं दुःख ओळखू शकले नव्हते. संध्याकाळच्या वेळी सुयशनं राज-रिया यांना बोलावलं. पाठोपाठ आजी-आईही आल्या.

सर्वांच्या समोर सुयशनं राजच्या जुन्या ढाल-तलवारीचं पुडकं उघडलं आणि राजला त्याची ढाल-तलवार दाखवली. राज अक्षरशः वेडा झाला. आपले बाबा आपला ‘इच्छामणी’ आहेत, हे त्याला पुन्हा एकदा पटलं. ‘बाबा, बाबा’ करत सुयशचे तो मुके घेऊ लागला. ती ढाल-तलवार घेऊन ‘ढिश्‍युम ढिश्‍युम’ करू लागला. तिन्ही मोठी माणसं राजच्या आनंदाकडं विस्फारलेल्या नजरेनं सुरवातीला बघत होती; पण मनावर कोरलेली ती लाकूडतोड्याची गोष्ट त्यांना थोड्याच वेळात आठवली... ‘सोन्या-चांदीची कुऱ्हाड नको, मला माझी जुनीच लाकडाची कुऱ्हाड हवी...’

आपल्या घरात एक निर्मोही लहान लाकूडतोड्या आहे, हे लक्षात येऊन तिघांचेही डोळे पाणावले...एकाच वेळी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com