भस्मीभूतस्य देह, कुतो पुनर्जन्मः? (विजय तरवडे)

विजय तरवडे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

शी  र्षकासाठी चार्वाकाची ओळ मुद्दामच वापरली आहे. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लेखकांनी जणू स्वतःला या ओळीचा अर्थ बजावून सांगितला होता. एकदा आपण मेलो की या देहाची राख होणार आहे आणि पुनर्जन्माची कोणतीही खात्री नाही, तेव्हा दर्जेदार अथवा अजरामर साहित्यनिर्मितीची उठाठेव करण्यापेक्षा जे लिहून आजची रोजी-रोटी आणि थोडी चैन करण्यापुरते पैसे मिळतील ते लिहिण्यात त्यांनी हयात वेचली.

शी  र्षकासाठी चार्वाकाची ओळ मुद्दामच वापरली आहे. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लेखकांनी जणू स्वतःला या ओळीचा अर्थ बजावून सांगितला होता. एकदा आपण मेलो की या देहाची राख होणार आहे आणि पुनर्जन्माची कोणतीही खात्री नाही, तेव्हा दर्जेदार अथवा अजरामर साहित्यनिर्मितीची उठाठेव करण्यापेक्षा जे लिहून आजची रोजी-रोटी आणि थोडी चैन करण्यापुरते पैसे मिळतील ते लिहिण्यात त्यांनी हयात वेचली.

‘रम्यकथा प्रकाशन’साठी भयकथा, रहस्यकथा, प्रणयकथा आणि कधी कधी या तिन्ही रसांचा एकत्र परिपोष करणाऱ्या कथा लिहिणारे सदानंद भिडे हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं. आपल्या खोलीच्या खिडकीशी त्यांची मेज-खुर्ची असे. विस्कटलेले तांबूस केस आणि झरझर लिहिणारी त्यांची आकृती रस्त्यावरून सहज दिसे. विस्कटलेल्या केसांमुळं ते एखाद्या कामगार संघटनेच्या संतप्त नेत्यासारखे दिसत! लिहिताना मधून मधून पु. ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेबां’प्रमाणे करंगळी आणि अनामिकेच्या बेचक्‍यात धरून सिगारेटचा झुरका ते घेत. मानधन वेळेवर मिळालं की हुकमी मजकूर लिहून देत. त्यांनी अक्षरशः शेकडो कादंबऱ्या लिहिल्या. ‘अरेबियन नाईट्‌स’च्या धर्तीवर त्यांनी स्वतःच्या कल्पनेनं ‘इंडियन नाईट्‌स’ या शीर्षकानं दहा खंड होतील एवढं लेखन करून ठेवलं होतं; पण प्रकाशकांना ते पसंत पडलं नाही आणि अप्रकाशितच राहिलं. भिडे यांची आणखी एक गंमत म्हणजे, त्यांच्या बहुतांश नायिकांचे कपडे लाल रंगाचे असत. 

* * *

चंद्रकांत काकोडकरांनी एकूण किती कादंबऱ्या लिहिल्या ते सांगणं कठीण आहे.‘ पेरी मेसन कथां’ची त्यांनी ‘राजाराम राजे कथां’मध्ये रूपांतरं केली. शरच्चंद्र चट्टोपाध्यायांच्या शैलीशी साधर्म्य असलेल्या कौटुंबिक कादंबऱ्या आणि असंख्य प्रणयकथा त्यांनी लिहिल्या. स्वतःच्या नावाचा ‘काकोडकर’ दिवाळी अंक चालवला. त्यात स्वतःच्या एकदम चार-पाच कादंबऱ्या ते प्रसिद्ध करत. अंकाच्या छपाईपूर्वी त्यांना वितरक आगाऊ रक्कम देत. अंकाच्या हजारो प्रती अशा आगाऊ रक्कम घेऊन विकल्या जात. त्यांच्या ‘श्‍यामा’ कादंबरीला खटल्यामुळं प्रसिद्धी लाभली आणि ‘नीलांबरी’वर राजेश खन्ना-मुमताजचा ‘दो रास्ते’ चित्रपट निघाला. त्यांचं बाकीचं लेखन कुणाच्या स्मरणात आहे, याची कल्पना नाही. 

* * *

‘रम्यकथा प्रकाशन’नं त्या काळात बाबूराव अर्नाळकरांखेरीज ह. ना. आपटे, नाथमाधव, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य अतिशय स्वस्तात सामान्य वाचकांपर्यंत पोचवलं. वि. वा. हडप यांच्या ‘कादंबरीमय पेशवाई’ या मालिकेतल्या कादंबऱ्यादेखील प्रकाशित केल्या. हडप यांच्या या पुस्तकांची मुखपृष्ठं श्रीकृष्ण हवालदार यांनी केली होती. शिवाजी शंकर कार्लेकर (सर्कसवाले) यांची सर्कसवर लेखमाला आणि पुस्तक ‘रम्यकथा’नं प्रकाशित केलं. त्याची दुसरी आवृत्ती व्हाईट प्रिंटमध्ये प्रकाशित झाली तेव्हा तिला अनेक पुरस्कार लाभले. प्रताधिकार कायद्याचा (कॉपीराइट ॲक्‍ट) बडगा ठाऊक नसलेल्या त्या निरागस काळात लेखकांमध्ये टारझन अतिशय लोकप्रिय होता. टारझनची हजार-दीड हजार पानांची गोष्ट अनेकांनी लिहिली आणि प्रकाशित केली. दत्ता जी. कुलकर्णी, ग. रा. टिकेकर, कृष्णाकुमारी शेरतुकडे, रतनलाल डी. शहा ही त्यांतली आठवणारी काही नावं. ‘टारझन’खेरीज ‘जादूचा दिवा’, ‘सिंदबादच्या सफरी’, ‘हातिमताई’ आणि ‘गुलबकावली’ यांच्या गोष्टी अनेक हौशी-प्रथितयश लेखकांनी लिहिल्या आणि प्रकाशित केल्या.

या सगळ्या पुस्तकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आटोक्‍यातल्या होत्या. पुस्तकं रस्त्यावर, एसटी स्थानकांवर, जत्रेत उपलब्ध असत. छपाई न्यूजप्रिंटवर केलेली असे. रंगीत मुखपृष्ठ पांढऱ्या पातळ मॅपलिथोसारख्या कागदावर छापलेलं असे. ही चित्रं काढणाऱ्या चित्रकारांची (त्यांच्या सह्यांमुळं) आठवणारी नावं ः केरकर, प्रभानाथ, रांदेरिया, श्रीनिवास वैद्य, श्रीकृष्ण हवालदार. 

* * *

उच्चपदस्थ अधिकारी असलेले एक लेखक त्या काळी ‘रम्यकथा’च्या वासू मेहेंदळ्यांसाठी दरमहा कादंबरी लिहीत. मानधन ठरलेलं होतं. एकदा कचेरीच्या कामासाठी डेक्कन क्वीननं मुंबईला जाताना त्यांची दुसऱ्या प्रकाशकांशी ओळख झाली. त्या प्रकाशकांनी अधिक मानधन देऊ केलं. लेखकानं निष्ठा बदलून पुढच्या दोन कादंबऱ्या नवीन प्रकाशकांना दिल्या. त्यांची अक्षरजुळणी सुरू झाली. कर्मधर्मसंयोगानं त्या वेळी पुण्यात अक्षरजुळणी करणारे सर्व कामगार एकाच भावकीतले होते. त्यामुळं आपल्या लेखकानं ‘बेवफाई’ केल्याची बातमी मेहेंदळ्यांना लगेच समजली. ते गप्प राहिले. नवीन प्रकाशकांनी दोन्ही पुस्तकांची छपाई पूर्ण करून वितरणाची तयारी केली. त्याच्या चोवीस तास आधी मेहेंदळ्यांनी या संबंधित लेखकाच्या आपल्या गोदामात असलेल्या पुस्तकांच्या हजारो प्रती बाहेर काढल्या. नव्या पुस्तकांची छापील किंमत प्रत्येकी एक रुपया होती. 

‘रम्यकथा’नं काढलेल्या त्या लेखकाच्या पुस्तकांवर मेहेंदळ्यांनी पन्नास पैसे किंमत टाकून ते गठ्ठे बाजारात आणले. परिणामी, नवीन पुस्तकं ‘पडली.’ लेखक पुन्हा आपल्या मूळ प्रकाशकांकडं परतले!

‘टारझन’, ‘सिंदबाद’, ‘जादूचा दिवा’ वगैरे गोष्टी लहान मुलांसाठी ठीक आहेत; पण ‘गुलबकावली’ची गोष्ट तर थोडी चमत्कारिकच आहे. तिची बालवाङ्‌मयात ज्यानं नोंद केली त्याला वंदन! अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी ही गोष्ट लिहिली/प्रकाशित केली आहे. प्रत्येक आवृत्तीत मनसोक्त बदल केले आहेत. कथेचा नायक ताज-उल्‌-मुल्क जिच्या प्रेमात पडतो ती गुलबकावली इंद्राच्या दरबारातली अप्सरा आहे. तिच्या नात्यातल्या वर्तुळातल्या स्त्रियांची नावं विविध धर्मांतली आहेत. विविधतेत एकता किंवा सर्वधर्मसमभावाचा अजाणता झालेला हा पहिला प्रयत्न असावा!

हे सगळं लेखन तसं सुमार-साधं असलं तरी त्या काळात त्यानं अनेकांना भाबडा आनंद दिला. सामान्य वाचकांना वाचनसंस्कृतीच्या पहिल्या पायरीपर्यंत आणलं. आता हे सगळं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. 

‘कुतो पुनर्जन्मः?’ असं विचारताना आवंढा दाटून येतो.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi feature story by Vijay Tarawade