३७६ लोकसंख्येचं काकडदरा कसं झालं पाणीदार?

३७६ लोकसंख्येचं काकडदरा कसं झालं पाणीदार?

अभिनेता आमिर खानच्या पाणी फांऊडेशनने सुरू केलेली वॅाटर कप स्पर्धा राज्यात गावोगावी झाली. वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावाने यंदाच्या सत्यमेव जयते वॅाटर कपवर आपलं नाव कोरलं. ३७६ लोकसंख्या असलेल्या काकडदरावासियांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उदाहरण ठेवलं आहे की मुठभर लोक एकत्र आली तर आपल्या कामातून जगभर आपलं नाव करू शकतात.

काकडदरा गावात १९८७ सालापासून पाणलोटाची कामं सुरू झाली आहेत मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही कामं बंद पडली. त्यामुळे जेव्हा पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा काकडदरा गावाने त्यात भाग घेण्याचा निश्चय केला होता.  एप्रिल-मे च्या ४६-४७ डिग्री तापमानातही येथील ग्रामस्थांनी काम थांबवलं नाही. चटका देणाऱ्या उन्हात तापलेले गोटे गोळा करताना हात भाजत होते, अशावेळी ग्रामस्थांनी हाताला चिंध्या बांधून काम केले.  येथील बहुसंख्य महिलांनी कधी शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही परंतु कोणत्याही पाणलोट उपचारांविषयी त्या अचूक माहिती देतात.

मुख्याध्यापक विकास वातकर 
गावामध्ये पाचवीपर्यंत शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक विकास वातकर हे नऊ वर्षांपूर्वी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यादिवसापासुन आजपर्यंत अनेक वेळा त्यांच्या बदलीचे आदेश आले पण ना गावाने सरांना जाऊ दिलं ना सरांनी गावाला सोडलं. “गावातलं प्रत्येक जण इतकं प्रेमळ आहे की, मला हे माझं कुटूंबच वाटतं. आणि कुटूंबाला सोडून कुठे जाणार?” असे वातकर म्हणतात. त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्यापासुन स्पर्धा संपेपर्यंत गावाची साथ दिली. कधी शिक्षणातून तर कधी कष्टातून गावाला पुढे नेलं. सकाळी ७ ते २ आणि परत ४ ते ७ अशा कामांच्या वेळात सगळे दिवस वातकर गावकऱ्यांच्या बरोबरीने उभे राहिले. कुठलाही निर्णय घेतांना त्यांच्या शब्द हा गावासाठी मोलाचा असतो.

इंजिनिअर कुणाल परदेशी
मुळचा मराठवाड्यातला इंजिनिअर असलेला कुणाल परदेशी! स्वतःचं शिक्षण आणि गावांमधील समस्या यांची सांगड कुठे घालता येईल या शोधात असलेला कुणाल काकडदरा गावात आला. स्पर्धेचा शेवटचा १ महिना तिथे राहून, त्यांच्यापैकी एक होऊन कुणालने गावाला मदत केली. आपला अनुभव सांगतांना कुणाल म्हणतो, “ते सगळेच दिवस अविस्मरणीय आणि विलक्षण होते. न थकता, न थांबता ४५ दिवस सगळ्यांनी काम केलं. इतकी साधी माणसं, इतकी सरळ माणसं काकडदरात आहेत की त्यांच्याकडे बघून माणूसकी काय असतं ते कळलं. बक्षिसासाठी काम नाही केलं. पण विश्वास होता, पाणी आलं म्हणजे बक्षीस पण येईल.”

उत्तम प्रतीचे एल.बी.एस.
काकडदरा गावात असे अनेक पुरुष आणि महिला आहेत जे उत्तम एल.बी.एस. बांधण्यात पटाईत आहेत. या बायकांच्या हातून तयार झालेले ९० एल.बी.एस. बघून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचे परीक्षक पोपटराव पवार म्हणाले, “महाराष्ट्रात इतक्या उत्तम प्रतीचे एल.बी.एस. मी याआधी पाहिले नाही.” हीच काकडदरावासियांच्या कामाची पावती होती. बक्षीस म्हणून ट्राफी अन् पन्नास लाखांचा धनादेश या गावाला देण्यात आला.
(सैाजन्य - पाणी फांउंडेशन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com