'बोलका' स्वातंत्र्यदिन (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुलामुलांनी मिळून ठरवलेली आयडिया अन्वयनं सांगताच सगळी मोठी माणसं भुवया उंचावून विचार करू लागली आणि ‘पण ही सर्व मंडळी येणार कशी?’ असा प्रश्‍न त्यांनी मुलांना विचारला. त्यावर ‘कशी म्हणजे? चालत चालत येणार आणि चालत चालतच जाणार,’ या पार्थच्या उत्तरावर मोठी माणसं तोंड बंद करूनच हसली!
 

आजचा मुक्काम पार्थच्या घरी होता. नेहा, वेदांगी, अन्वय, शंतनू आणि पालवी अगदी वेळेवर हजर झाले होते. पार्थच्या आईला मदतीसाठी नेहाची आई तर आली होतीच; पण शंतनूचे बाबासुद्धा आले होते. शंतनूचे बाबा किचनमधली लहानसहान कामं करण्यात कुशल तर होतेच; पण व्हेज बिर्याणी, अंडा करी असले पदार्थ करण्यातही निपुण होते. अशा वेळी शंतनू तर बाबांना ‘किचनकिंग’च म्हणायचा!

थोडासा खाऊ खाऊन झाल्यावर मुलं गोल बसली. आज मुलांना काहीतरी सांगायचं होतं. काहीतरी विचारायचं होतं.

वेदांगी म्हणाली : ‘‘या स्वातंत्र्यदिनी आम्हाला शाळेत काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तेही सगळ्यांना मिळून करायचं आहे.’’

आई म्हणाली : ‘‘म...करा...’’

आईला थांबवत नेहा म्हणाली : ‘‘अगं तसं नव्हे. म्हणजे काय करायचं तेच आम्हाला माहीत नाहीए...’’

‘‘मला माहित्यै...मला माहित्यै...’’ उड्या मारत पार्थ म्हणाला.

‘‘सांग बरं’’

‘‘स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करायचं... ‘जन गण मन’ म्हणायचं आणि सगळ्या मुलांना भरपूर खाऊ द्यायचा. हो किनई?’’

‘‘अरे पार्थू, हे तर करायचंच आहे. वेगळं काय करायचं? असं आम्ही विचारतोय.’’

‘‘पण मला सांगा, तुम्हाला काहीतरी वेगळं असं का करायचं आहे?’’ असं आईनं विचारताच सगळी मुलं एकमेकांकडं पाहू लागली. आपापसात हळू आवाजात खुसफुसू लागली.

मग अन्वय म्हणाला : ‘‘या वर्षी ध्वजवंदन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे कलेक्‍टर आमच्या शाळेत येणार आहेत आणि हे कलेक्‍टरसाहेब आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. साहेबांना भेटायला गावातली खूप माणसं आणि आमचे पालकही येणार आहेत. अशा वेळी आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवावं असं आम्हाला वाटतं...’’

‘‘म्हणजे मग कलेक्‍टरसाहेब आम्हाला आणि आमच्या शाळेला शाबासकी देतील.’’

‘‘अं...चांगली कल्पना आहे.’’

किचनमधून हात पुसत शंतनूचे बाबा आले. बाबा म्हणाले : ‘‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट मला माझ्या वडिलांनी सांगितली होती. ते स्वातंत्र्यसैनिक होते. ते तरुणपणीच दोन वेळा तुरुंगात गेले होते. १९४२ मध्ये देशात ‘चले जाव’ आंदोलन सुरू झालं. लोकं रस्त्यावर उतरून सत्याग्रह करू लागले. अहिंसेच्या मार्गानं आंदोलनं करू लागले. अशा वेळी पोलीस लाठीमार करत आणि सत्याग्रहींना, आंदोलकांना तुरुंगात नेत. याच काळातली ही गोष्ट आहे. रस्त्यावर ब्रिटिशांच्या विरोधात सत्याग्रह सुरू होता. अनेक तरुण मुलं-मुली त्यात सहभागी होती. अचानक त्यांना पोलिसांचा वेढा पडला. तुफान लाठीमार सुरू झाला; पण कुणीही जागेवरून हललंसुद्धा नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हसतच लाठ्या झेलल्या. सत्याग्रही घायाळ झाले होते. जखमी झाले होते. जे बचावले होते, ते इतरांना मदत करत होते. पोलिस थकले. पोलिसांनी सत्याग्रहींची धरपकड सुरू केली. लाठी खाऊनही हातात तिरंगा घेऊन उभ्या असलेल्या एका बाईंना पोलिसांनी पकडलं. इतरांनाही गाडीत कोंबलं. त्या बाईंच्या अंगावर दागिने होते. पोलिसांची गाडी भरली. आता ते सगळ्यांना जेलमध्ये घेऊन जाणार इतक्‍यात त्या बाईंनी गाडीसमोर जमलेल्या गर्दीतल्या एका माणसाला बोलावलं. आपल्या अंगावरचे दागिने, बांगड्या काढून त्या माणसाच्या हातात दिल्या आणि त्या माणसाला आपला पत्ता सांगितला. त्या माणसानं मान डोलावत सांगितलं,‘मी नेऊन देईन.’

आजोबासुद्धा त्याच गाडीत होते. आजोबांनी त्यांना विचारलं : ‘‘तुम्ही ज्याच्याकडं तुमचे दागिने दिले आहेत, त्याला तुम्ही ओळखता का?’’

त्या म्हणाल्या : ‘‘नाही.’’

आता गाडीतले सत्याग्रही आणि पोलिससुद्धा त्यांच्याकडं अचंबित होऊन पाहू लागले.

क्षणाचाही विलंब न करता त्या म्हणाल्या :‘‘त्यानं तर खादीचे कपडे घातले होते...आता आणखी कुठली ओळख हवी? गांधीजी म्हणाले आहेत, ‘खादी हे निव्वळ वस्त्रच नाही तर तो एक विचार आहे.’ मी त्या माणसाला ओळखत नाही; पण त्या माणसाचा विचार मी ओळखला. मी काही चूक केली का?’’

या त्यांच्या प्रश्नावर कुणीच काही बोललं नाही; पण त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच मनोमन समजलं होतं. त्या माणसानं ते दागिने योग्य ठिकाणी नेऊन दिले, हे वेगळं सांगायला नकोच. त्या बाईंचं नाव अवंतिकाबाई गोखले. त्यानंतर माझ्या वडिलांनी आयुष्यभर फक्त खादीच वापरून ‘त्या प्रश्ना’चं उत्तर आपल्या आचरणातून दिलं होतं.’’ शंतनूच्या बाबांनी आवंढा गिळला आणि ते थांबले.

नेहाची आई म्हणाली : ‘‘माझ्याकडंही अशीच एक गोष्ट आहे; पण थोडी वेगळी...’’

‘‘सांग ना, सांग ना’’ सगळ्यांनी एकच कालवा केला.

‘‘माझ्या आईला मॅट्रिकच्या परीक्षेत चांगले मार्क पडले. आता कॉलेजात जायचं म्हणजे चांगली नवीन साडी तर हवीच.’’

‘‘ॲ.. कॉलेजात का कुणी साड्या नेसतं?’’ असं पार्थनं म्हणताच सगळेच खुसफुसले.

नेहाची आई त्याला समजावत म्हणाली : ‘‘अरे, ही खूप जुनी गोष्ट आहे. त्या वेळी मुली कॉलेजात जाताना साड्याच नेसत.’’

‘‘अगं, गोष्ट सांग ना...’’

नेहाची आई सांगू लागली : ‘‘हं. आईनं ‘चांगले मार्क पडले आहेत. नवीन मोठ्या कॉलेजला जायचं आहे,’ असा हट्ट करून इंग्लिश लव्हेंडर साडी घेतली. मऊ मऊ आणि चमकदार रंगाची इंग्लिश लव्हेंडर साडी. कॉलेज सुरू व्हायला आठ दिवस अवकाश होता. आईची जोरदार तयारी सुरू होती आणि त्याच काळात परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन सुरू झालं. रस्तोरस्ती परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटू लागल्या. लोक भारतीय सुती कपडे, खादीचे कपडे वापरू लागले. यामुळं इंग्लंडमधल्या गिरण्या बंद पडू लागल्या. आमच्या घराजवळच परदेशी कापडाची होळी पेटली होती. आजोबांनी त्यांचा परदेशी कापडाचा नवीन कोट होळीत टाकला. आजीनं तिच्या दोन साड्याही टाकल्या. आजी-आजोबांना वाटत होतं, की आईनंही तसंच करावं; पण इतक्‍या हौसेनं घेतलेली साडी ‘होळीत टाक’ असं म्हटल्यावर तिला राग आला तर...ती चिडली तर? हे तिला कसं सांगावं हे त्यांना कळत नव्हतं. आजोबा तर फारच बेचैन झाले होते.

आई आणि तिच्या इतर मित्र-मैत्रिणी तर लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून परदेशी कपडे घेऊन ते होळीत टाकत होते. हे पाहून तर आजी-आजोबा आणखीच अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं, जर हिच्या मित्र-मैत्रिणींना कळलं, की हिच्याच खणात एक इंग्लिश साडी आहे, तर काय अनर्थ होईल?

इतक्‍यात तो मुलांचा घोळका आईच्या घराजवळ आला. त्या क्षणी आजोबांना वाटलं, ‘देऊन टाकावी ती इंग्लिश लव्हेंडर साडी’ होळीत टाकण्यासाठी...तोच आईची मैत्रीण आजोबांना म्हणाली : ‘काका...या होळीची सुरवात घडी न मोडलेल्या इंग्लिश लव्हेंडर साडीनंच झालीय बरं का. त्यामुळंच तर आम्ही सगळे प्रेरित झालो आणि केली सुरवात.’ हे ऐकताच आजी-आजोबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही गोष्ट मी खूप वेळा आईकडून ऐकली आहे.’’

या दोन गोष्टी ऐकून सगळेच भारावून गेले.

शंतनूचे बाबा म्हणाले : ‘‘आता मी तयार केलेल्या स्पेशल डिशचा ब्रेक घेऊ आणि मग पुढचा प्लॅन ठरवू.’’

चमचमीत, चविष्ट, चुरचुरीत, चटकदार चावायला मिळाल्यावर सगळेच खूशम्‌खूश झाले. मग पुन्हा गप्पागप्पी सुरू झाली.

‘‘या इतरांना माहीत नसलेल्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या पाहिजेत.’’

‘‘पण कुणी सांगितल्या पाहिजेत?’’

‘‘म्हणजे..? आपणच सांगितल्या पाहिजेत; पण त्यासाठी एखादी वेगळी भन्नाट आयडिया शोधली पाहिजे.’’

पालवी म्हणाली : ‘‘आयडिया शोधण्यासाठी आम्ही पाच मिनिटं शांत बसतो. नंतर पाच मिनिटं एकमेकांशी बोलतो. पाहू या काही मिळतं का?’’ घरात एकदम शांतता पसरली. मुलं विचार करू लागली.  

पाच मिनिटांनी मुलांची आपापसात कुजबूज, खुसफूस आणि ठुसठूस सुरू झाली.

‘‘आम्ही सगळ्यांनी मिळून एक नवीन आयडिया शोधली आहे. या स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाच्या वेळी झाशीची राणी, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, गांधीजी, आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, विनोबा भावे, भगतसिंग, नेहरू, लालबहादूर शास्त्री, कॅप्टन लक्ष्मी, ठाकूरदास बंग, अवंतिकाबाई गोखले, नेहाची आजी हे सगळे स्वातंत्र्यसैनिक हजर राहून जमलेल्या लोकांना स्वातंत्र्यलढ्यातल्या काही वेगळ्या आठवणी सांगतील. कशी आहे आमची आयडिया?’’ अन्वयनं असं म्हणताच सगळी मोठी माणसं भुवया उंचावून विचार करू लागली.

‘‘पण ही सर्व मंडळी येणार कशी?’’

‘‘कशी म्हणजे? चालत चालत येणार आणि चालत चालतच जाणार,’’ या पार्थच्या बोलण्यावर मोठी माणसं तोंड बंद करूनच हसली.

वेदांगी म्हणाली : ‘‘आमचा प्लॅन ऐका. यासाठी आम्ही आमच्या मित्र-मैत्रिणींची मदत तर घेणारच आहोत; पण त्याचबरोबर आमचे शिक्षक, वाचनालय, इंटरनेट आणि गावातल्या काही लोकांचीही मदत घेणार आहोत...’’

आई म्हणाली :‘‘अगं, पण तुमचा प्लॅन काय, ते तर सांग...’’

नेहा म्हणाली : ‘‘आम्ही १५ जण मिळून वरील एकेका स्वातंत्र्यसैनिकाची माहिती गोळा करणार. माहिती गोळा करत असताना, स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असलेली; पण शक्‍यतो इतरांना माहीत नसलेली, तरीही महत्त्वाची असलेली गोष्ट, घटना आम्ही शोधणार. ती गोष्ट सत्य आहे, याची शिक्षकांकडून खात्री करून घेणार. ती गोष्ट सांगण्याची प्रॅक्‍टिसही करणार...’’

आता वेदांगी सांगू लागली : ‘‘आम्ही सगळे त्या दिवशी खादीचे कपडे घालणार आणि ‘आम्ही कोण आहोत’ याची चिठ्ठी छातीवर लावणार. म्हणजे मी छातीवर ‘अवंतिका गोखले’ अशी चिठ्ठी लावणार. ध्वजवंदनाच्या वेळी आम्ही सगळे कलेक्‍टरसाहेबांच्या बाजूला उभे राहणार. कलेक्‍टर आमची म्हणजे ‘आमच्या छातीवर नाव असणाऱ्या’ स्वातंत्र्यसैनिकांची सगळ्यांना थोडक्‍यात ओळख करून देतील. ध्वजवंदनानंतर आम्ही सगळेजण लोकांमध्ये मिसळू.’’ 

‘‘मग जमलेले लोक आमच्याशी बोलतील. आम्हाला प्रश्न विचारतील. तेव्हा आम्ही त्यांना स्वातंत्र्यलढ्यातल्या शौर्यकथा सांगू. त्यांची माहिती सांगू. त्यांच्या आयुष्यातल्या काही वेगळ्या; पण प्रेरक घटना सांगू आणि ज्यांना आणखी माहिती हवी असेल अशांसाठी वाचनालयातली पुस्तकं शाळेच्या व्हरांड्यात मांडून ठेवू...’’ अन्वय बोलायचा थांबला आणि टाळ्या वाजवत बाबा म्हणाले :‘‘वा...व्वा! हा तर ‘स्वातंत्र्याचा बोलका इतिहास’ झाला! फारच छान आयडिया आहे ही.’’

‘‘मग कधीपासून करणार सुरवात तुमच्या ‘बोलक्‍या’ इतिहासाला?’’

मुलं हसतच म्हणाली : ‘‘अहो असं काय करताय? सुरवात तर झालीच आहे...आता फक्त नियोजन करायचं आहे आणि ते आमचं आम्ही करूच.’’

मोठी माणसं आपापसात गप्पा मारत असताना ही मुलं काही न खाता-पिता कधी पसार झाली ते त्यांना कळलंच नाही. 

तेव्हा पार्थची आई म्हणाली : ‘‘हं. याचाच अर्थ, आता मुलं खऱ्या अर्थानं कामाला लागली. फारच छान!’’

पालकांसाठी गृहपाठ :

  • इतिहास हा इतिहास म्हणून न सांगता जर तो गोष्टीतून सांगितला तर तो मुलांना अधिक आवडतो.
  • ‘या इतिहाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात?’ असा प्रश्न कधीही मुलांना विचारू नका. 
  • आणि एवढंच नव्हे तर, ‘प्रत्येक सांगितलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टीतून मुलांनी लगेचच काहीतरी शिकलंच पाहिजे’ असा ‘टिंब टिंब’ हट्टही करू नका.
  • गोष्ट ऐकल्यानंतर त्यातून त्यांच्या सोईनं शिकण्याचा अवसर मुलांना द्या.
  • ‘मुलांना शिकण्याची सक्ती करू नका, तर त्यांना शिकण्याचं स्वातंत्र्य द्या’ ही चिनी म्हण मात्र नेहमीच लक्षात ठेवा!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe