भागवतांचा देशीवाद! (सदानंद मोरे)

सदानंद मोरे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

रामदेवरायाच्या कारकिर्दीतल्या इतर घडामोडींचा उल्लेख करून भागवत सांगतात, ‘या सर्वांहूनही एक विशेष ध्यानात राहण्यासारखी गोष्ट रामदेवरायाच्या कारकिर्दीत घडून आली, ती ही की, ज्ञानेश्‍वरांनी देशी भाषेत ओवीबद्ध ज्ञानेश्‍वरी रचून भागवती धर्माचा जीर्णोद्धार केला.’ ज्ञानेश्‍वरांच्या योगदानाचं वर्णन करताना भागवत पुढं लिहितात, ‘हा जो भागवती धर्माचा जीर्णोद्धार झाला, त्याच्या पलीकडे आता पुनः त्या धर्माचा जीर्णोद्धार शक्‍य दिसत नाही; ही त्या धर्माच्या जीर्णोद्धाराची पराकाष्ठा झाली आहे.’
 

अलीकडच्या काळात साहित्य आणि संस्कृती यांचं वैचारिक मंथन झालं व त्यातून पुढं आलेल्या सिद्धान्तांपैकी एक महत्त्वाचा सिद्धान्त म्हणजे देशीवाद. आपल्याकडं या देशीवादाचं ‘उद्‌घाटन’ करण्याचं श्रेय भालचंद्र नेमाडे यांना दिलं जातं. राजारामशास्त्री भागवत यांच्या विचारांमध्येही देशीवादाची बीजं आहेत. अर्थात भागवत एकूणच दुर्लक्षित राहिलेले असल्यामुळं ते नेमाडे यांच्यापर्यंतही नीट पोचले असण्याची तशी शक्‍यता कमीच! मात्र, भागवतांच्या लेखनात देशीवादाला पूरक अशा अनेक जागा अजूनही सापडू शकतात व तो धागा अधिक बळकट करता येईल. असो.

खऱ्या देशीवादाचं वैशिष्ट्य म्हणजे तो वैश्विकतेचा विरोधक नसून, वैश्विकतेला पूरकच असतो. भागवतांचा देशीपणा हा जातिभेदासारख्या संकुचित विचारांना तीव्र विरोध करतो. मराठ्यांच्या संकीर्णतेवर भर देतो.

अशा प्रकारचा देशीपणा जर आणखी कुणात आढळून येत असेल तर तो विचारवंत म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. अर्थात प्रस्तुत स्थळी आपल्याला शिंदे यांच्यावरची चर्चा अभिप्रेत नाही.

भाषा हा देशीवादाचा पाया असला पाहिजे. स्वभाषेतून स्वधर्माकडं सहज जाता येतं. यातूनच व्यापक संस्कृती सिद्ध होते. तिला राजकीय सत्तेची जोड मिळाली तर ते ‘युनिट’ पूर्ण होतं.

भागवतांचं बहुतेक लेखन हे महाराष्ट्राचं स्वलक्षणपण किंवा स्वायत्तता सिद्ध करण्यात खर्च झालेलं आहे. त्यांच्यावर आर्यवंश, संस्कृत भाषा यांचं दडपण जसं मुदलातच नाही, तसा त्यांच्यात महाराष्ट्र वा मराठी यांच्याविषयीचा कोणता न्यूनगंडही नाही. ‘गरीब बिचाऱ्या मराठीला पदरात घ्या,’ अशी त्यांची पडखाऊ भूमिका नाही. ‘वेदान्ताचं रत्न मराठीच्या चिंधीत बांधून देतो...सबब, त्या रत्नासाठी का होईना, या चिंधीचा स्वीकार करा,’ अशी भूमिका काही पंडितांनी घेतली होती. तसा हा मामला नाही. इथं मराठीचं नाणं खणखणीत वाजणारं आहे.

भागवतांनी भाषा आणि धर्म यांच्यामधला जो संबंध स्पष्ट केला आहे, तो महंमद पैगंबरांच्या विचाराशी मिळता-जुळता आहे!

भागवत लिहितात ः ‘जी घरातली भाषा असते, त्याच भाषेत प्रत्येकाचा धर्म असला पाहिजे. धर्माच्या आणि घराच्या भाषेत थोडे अंतर असल्यास चालेल; पण जर धर्माची भाषा वेगळी पडली, तर धर्माची मुख्य तत्त्वे माणसाच्या मनावर ठसण्यास आणि ठसवण्यास विशेष सायास पडतात. कोणताही एक धर्म सगळ्याच मानवी सृष्टीसाठी समजता येत नाही. कारण, सगळ्या मानवी सृष्टीची भाषा आजपर्यंत कधीही एक नव्हती. कोणत्याही धर्मसंस्थापकाची जी जन्मभाषा असते, ती बोलणाऱ्यांच्या उन्नतीसाठी त्या त्या धर्मसंस्थापकाचा जन्म झालेला समजावा. जसा ख्रिस्ताचा जन्म मूळच्या यहुद्यांसाठी होता, जसा महंमदाचा जन्म मूळच्या अरबांसाठी होता.’

महंमद पैगंबरांच्या म्हणण्याप्रमाणे, ईश्‍वर अत्यंत दयाळू आहे, त्याला सगळ्यांचाच उद्धार करायचा असतो. त्यासाठीच तो खऱ्या धर्माचं स्वरूप निरूपण करणाऱ्या आपल्या प्रेषितास पृथ्वीवर पाठवतो; पण मानवांच्या भाषा अनेक असल्यामुळं तो तीही भाषा बोलणाऱ्या समूहासाठी - कौमसाठी- त्या त्या भाषेतून ईश्‍वरी संदेश व्यक्त करणारे प्रेषित अर्थात संदेष्टे पाठवतो. स्वतः महंमद हे अरबी भाषा बोलणाऱ्या समूहासाठी ईश्‍वरानं पाठवलेले प्रेषित होते. येशू ख्रिस्त हे यहुद्यांसाठी अवतरलेले व हिब्रू भाषा बोलणारे पूर्वप्रेषित असल्याचे महंमद मान्य करतात व त्यांच्याविषयी आदरभावही व्यक्त करतात.

याच प्रकारच्या सूत्राला धरून भागवत हिंदुस्थानच्या धर्मेतिहासाकडं वळतात. ते म्हणतात, ‘बुद्धाचा किंवा जिनाचा जन्म प्राकृत भाषा बोलणाऱ्यांसाठी होता. बौद्ध आणि जिन हे हतवीर्य झाल्यानंतर काही काळानं कानडी, मराठी व तेलंगी या तीन भाषा अर्वाचीन काळचं स्वरूप धारण करू लागलेल्या दिसतात. ही भाषाक्रांती झपाट्यानं होत चालल्याने बौद्धांच्या आणि जैनांच्या शास्त्रांच्या भाषा मृत होऊन दुर्बोध झाल्या आणि ती ती देशी भाषा बोलणारांचा जमाव वाढत चालला. संस्कृत भाषा तर कुमारिलाने उद्धार केला तेव्हा मृतच होती.’

अशा प्रकारे, भागवत म्हणतात, ‘देशी भाषा बोलणारांचा जमाव जमत चालल्यापासून नवीन मन्वंतरास प्रारंभ झाला आणि शालिवाहनाच्या ११ व्या शतकात दक्षिण दिशेची हवा पालटत पालटत इतकी पालटली, की अखेरीस जशी मराठी मंडळात तशी कानडी मंडळात एक आणि तेलंगी मंडळात एक मिळून तीन स्वतंत्र गाद्या स्थापन होण्याचा रंग दिसू लागला.’

यासंदर्भात भागवतांनी न सांगितलेली गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात (आणि कदाचित ‘कर्णाटका’तही) ही भाषाक्रांती होईपावतो शालिवाहनी प्राकृत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकवून ठेवण्याचं श्रेय जैनधर्मीय ग्रंथकारांस जातं. शालिवाहन वंशाच्या सत्तेच्या समाप्तीनंतरच्या महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृतचा राजाश्रय सुटला व संस्कृत भाषेचं वर्चस्व प्रस्थापित झालं. अशा परिस्थितीत जैनधर्मीयांनी संस्कृतला विरोध करत स्थानिक म्हणजे महाराष्ट्री लोकभाषेचा अंगीकार करून ती जिवंत ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली; पण भागवत सांगतात तशी भाषाक्रांती होऊन नवीन मराठी उदयास आली, तेव्हा ती आत्मसात करून तिच्यात ग्रंथरचना करण्यात जैनधर्मीय मागं पडलं असावेत.

भाषा आणि धर्म यांच्या संबंधात विवेचन करताना भागवत प्रथम यादवकाळातल्या मुकुंदराज यांच्या ‘विवेकसिंधु’चा उल्लेख करतात. ते म्हणतात त्यानुसार, ‘बल्लाळाचा मुलगा जयंतपाल गादीवर असताना मुकुंदराज नावाच्या ब्राह्मणाने औपनिषदिक धर्म राजाच्या नीट लक्षात यावा म्हणून ‘विवेकसिंधु’ नावाचे एक छोटे ओवीबद्ध प्रकरण मराठीत रचिले.’

या ठिकाणी भागवतांना ‘औषनिषदिक’ या शब्दानं वैदिक परंपरेतल्या ज्ञानाचा, अर्थात ब्रह्मज्ञानाचा, मार्ग अभिप्रेत आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, वैदिक धर्मात आणखीही एक मार्ग आहे, तो म्हणजे कर्माचा. पहिला ज्ञानमार्ग हा पंडितांचा अथवा ज्ञानी मंडळींचा असून, दुसरा कर्ममार्ग कर्मठांचा होय. पहिल्यास ‘निवृत्ती’ व दुसऱ्यास ‘प्रवृत्ती’ असं म्हणण्याची प्रथा आहे. (त्यातल्या प्रवृत्तीमार्गाला व्यापक कर्मयोगाचं स्वरूप द्यायचं कार्य लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथातून केलं).

भागवत सांगतात, ‘मराठी मुलुखाची हवा एकंदरीत कर्मठास किंवा ब्रह्मज्ञान्यास सांगण्यासारखी मानवत नाही. कर्मठांचा किंवा ब्रह्मज्ञान्यांचा मराठी मंडळात कुणी द्वेष करतात असे समजू नये. ज्याप्रमाणे इतर धर्मांच्यास मराठी मंडळात स्थान मिळाले आहे, त्याप्रमाणे या दोन वैदिक धर्मांसही मिळाले आहे; पण मराठ्यांचा एकंदरीत ओढा जास्त कर्मठपणाकडे नाही, तसा ब्रह्मज्ञानाकडेही नाही. कर्मठांच्या हाडी शूद्रांचा आणि देशी भाषेचा तिरस्कार हे दोन अतीच खिळलेले असतात. त्यामुळे त्यांच्या संप्रदायाकडे त्यांच्याखेरीज दुसऱ्या कोणाचे लक्ष वळत नाही, यात नवल नाही.’

पुढं भागवत असंही सांगतात, ‘मराठी लोकांचा ब्राह्मज्ञानाकडे कल नाही. त्याचे मुख्य कारण असे दिसते, की आंगी चळवळीचे वारे विशेष भरले असल्यामुळे त्यांस स्वस्थ बसणे आवडत नाही आणि त्यामुळे ब्रह्मज्ञानाच्या शुष्क गोष्टी सांगत बसणे हे त्यांस एक प्रकारच्या नामर्दपणाचे लक्षण भासते. म्हणून मुकुंदराजाने प्रयत्न केला तरी तो रुचून राजा जरी ब्रह्मज्ञानी झाला असला तरी मुकुंदराजाचा प्रयत्न एकंदरीत मंडळात सांगण्यासारखा झाला नाही.’

या पार्श्‍वभूमीवर ज्ञानेश्‍वरांच्या व त्यांच्या भागवतधर्माचा उदय झाल्याचे भागवत स्पष्ट करतात. मधल्या काळातल्या राजकीय घडामोडींचंही त्यांना आगत्य आहे. भागवत म्हणतात, ‘जयंतपालाच्या पश्‍चात गादी देवगिरी मुक्कामी गेली आणि लौकरच मराठी लोक खाली कानडी लोकांस आणि पूर्वेस तेलंगी लोकांस दाबीत चालले. शालिवाहन बारावे शतकाचे अखेरीस रामदेवराय नावाचा राजा झाला. त्याच्या कारकीर्दीत मराठी राज्याची हद्द खाली तुंगभद्रा नदीवर गेली होती.’

रामदेवरायाच्या कारकीर्दीतल्या इतर घडामोडींचा उल्लेख करून भागवत सांगतात, ‘या सर्वांहूनही एक विशेष ध्यानात राहण्यासारखी गोष्ट रामदेवरायाचे कारकीर्दीत घडून आली, ती ही की ज्ञानेश्‍वरांनी देशी भाषेत ओवीबद्ध ज्ञानेश्‍वरी रचून भागवती धर्माचा जीर्णोद्धार केला.’

ज्ञानेश्‍वरांच्या योगदानाचं वर्णन करताना भागवत पुढं लिहितात, ‘हा जो भागवती धर्माचा जीर्णोद्धार झाला, त्याच्या पलीकडे आता पुनः त्या धर्माचा जीर्णोद्धार शक्‍य दिसत नाही; ही त्या धर्माच्या जीर्णोद्धाराची पराकाष्ठा झाली आहे.’

ही गोष्ट ज्ञानेश्‍वरांनी नेमकी कशी साधली, याचंही स्पष्टीकरण भागवत करतात. ते म्हणतात, ‘‘भगवद्गीतेचे खरे मर्म मराठी मंडळास कळावे, म्हणून साक्षात विष्णूने ज्ञानेश्‍वरावतार धारण केला, अशी परंपरा आहे.’

भागवतांचं पुढील विधान फारच महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, ‘सगळा आंगरस ज्ञानेश्‍वरांनी देशी भाषेत पिळून घेतल्यामुळे भगवद्गीता आता रस काढून घेतलेल्या अलत्याच्या मोलाची झाली आहे.’

संत नामदेवांनी ज्ञानेश्‍वरांच्या संदर्भात केलेल्या विधानाचाच हा वेगळ्या संदर्भातला प्रतिध्वनी आहे. नामदेव हे ज्ञानेश्‍वरीच्या संदर्भात म्हणतात, ‘काढोनिया गुह्य वेद केले फोल.’

आता असंच विधान भागवत खुद्द भगवद्गीता व ज्ञानेश्‍वरी यांच्या संदर्भात करतात. इथं गीतेचा अनादर करण्याची मुळीच प्रवृत्ती नाही, तर ‘ज्ञानेश्‍वरांनी संस्कृत गीतेमधलं सगळं ज्ञान मराठी भाषेत आणल्यामुळं आता गीता अनावश्‍यक झाली आहे, ती वाचायचं कारण उरलं नाही,’ असं भागवतांना अभिप्रेत आहे. बुद्ध आणि जीन (महावीर) व ज्ञानेश्‍वर यांच्यामधला अनुबंधही भागवत स्पष्ट करतात. भागवत म्हणतात, ‘बुद्ध व जिन या दोहोंनीही पूर्वी जागत्याच देशी भाषेचा आदर केला होता; पण हे दोघेही मूळ खांब क्षत्रियांच्या कुळात जन्मलेले होते, ब्राह्मणांच्या कुळात जन्मलेले नव्हते. जीर्णोद्धारास जागत्या भाषेचा आदर करून ज्ञानेश्‍वरांनी एक प्रकारे बुद्धाने आणि जिनाने दाखविलेली वाट स्वीकारली.’

बुद्ध, महावीर आणि ज्ञानेश्‍वर यांच्यामधलं हे साम्य दाखवून झाल्यावर भागवत त्यांच्यातल्या भेदाकडं वळतात.

भागवत म्हणतात, ‘याप्रमाणे वरील दोन धर्मांच्या संस्थापकांची वाट जरी पहिल्याने एक पडली, तरी अखेरच्या दिशा उघड निराळ्या होत्या. कारण, बुद्ध व जिन यांनी आपल्या गलबताचे सुकाणू शून्याच्या दिशेने फिरवले असून, ज्ञानेश्‍वरांच्या गलबताचे सुकाणू भक्तांस मरणोत्तर आपणामध्ये सर्वांशी सामील करून घेणाऱ्या परमकारुणिक देवाकडे फिरले होते.’

ज्ञानेश्‍वरांचं वैशिष्ट्य व कामगिरी यांचं वर्णन भागवतांनी नेमकेपणानं केलं आहे.

भागवत म्हणतात, ‘‘कुळ ब्राह्मणाचे, सहा शास्त्रे हातचा मळ झालेला, योगाचा अभ्यास केलेला, असा तीन प्रकारचा विशिष्टपणा अंगी जडलेला असताही केवळ भक्तीने नामांकित झालेल्या नामदेवाच्या पाया स्वतःच पडून ज्ञानेश्‍वरांनी मराठी ब्राह्मणांस अत्युत्तम उदाहरण घालून दिले आणि हेच धोरण ठरून जातीची मातब्बरी मुळीच न मानणाऱ्या पंढरपूरच्या संप्रदायाची स्थापना केली...’

अशा प्रकारे भागवतांनी महाराष्ट्राचा भाषिक-धार्मिक-सामाजिक-राजकीय इतिहास संक्षिप्तपणे सांगून टाकला. त्याचा एक टप्पा ज्ञानेश्‍वरांजवळ संपतो व दुसरा टप्पा ज्ञानेश्‍वरांपासूनच सुरू होतो. ज्ञानेश्‍वरांनंतर लगेचच उत्तरेकडून परकीय आक्रमण आलं आणि महाराष्ट्राची राजकीय सत्ता संपुष्टात आली; पण या राजकीय सत्तेच्या अभावाला पेलून तोंड देऊ शकेल, अशी धार्मिक व सामाजिक सत्ता ज्ञानेश्‍वर आणि त्यांचा संप्रदाय यामुळं निर्माण झाली, असं भागवतांना सुचवायचं आहे. नवी राजकीय सत्ता ही धर्मापासून अलिप्त नसून, धर्मप्रचारक होती, हे वेगळं सांगायची गरज नाही.

भागवतांविषयीचं जे विवेचन वर करण्यात आलं आहे, तो त्यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ या गाजलेल्या लेखाचा उत्तरार्ध आहे.

याच काळात न्या. महादेव गोविंद रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची मीमांसा करणार होते. या मीमांसेत त्यांनी महाराष्ट्रधर्म या संकल्पनेचा कसा उपयोग करून घेतला, हे आपण जाणतोच. ‘मराठ्यांचा राष्ट्रीय धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म व हा धर्म म्हणजेच भागवतधर्म’ अशी भागवतांची मीमांसा होती. ती न्यायमूर्तींना पटली होतीच; इतकंच नव्हे तर, संतांच्या या भागवतधर्माचं महत्त्व ओळखून रानडेप्रभृती प्रार्थनासमाजाच्या अनुयायांनी ‘प्रार्थनासमाज म्हणजे नवभागवतधर्मच होय,’ अशी भूमिका घेतली, हे लक्षात घ्यायला हवं.

ज्ञानेश्‍वरांसंबंधी भागवतांच्या काही महत्त्वाच्या निरीक्षणांची नोंद घ्यायला हवी. त्यातून त्यांनी केलेला ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग यांच्यातला भेदही स्पष्ट होतो. वैदिक कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांच्यापेक्षा हा मार्ग वेगळा असल्याचं अगोदरच सांगितलेलं आहे.

भागवत म्हणतात, ‘ज्ञानेश्‍वरांचे हाड कर्मठ ब्रह्मज्ञान्याचे, योग्याचे किंवा शुष्क तार्किकाचे नव्हते, तर निष्काम भक्ताचे होते. ब्रह्मज्ञान्याचा प्राण ब्रह्मांडी गेला, म्हणजे ब्रह्मज्ञानी दगडासारखा निचेष्ट पडला; पण निष्काम भक्ताचा प्राण ब्रह्मांडी गेला म्हणजे अपरिच्छिन्न परमात्म्याच्या जोराच्या योगाने या परिच्छिन्न जीवात्म्यास कापरे सुटते आणि स्वतःच्याच वाणीवर स्वतःचा अंमल चालेनासा होऊन परमात्म्याचे गुणानुवाद तोंडावाटे झटाझट बाहेर पडू लागतात, असा जो अठराव्या अध्यायाच्या आरंभी उपोद्‌घात केला आहे, त्यावरून ज्ञानेश्‍वरांचे हाड शुद्ध भक्ताचे ठरते, ब्रह्मज्ञान्याचे किंवा योग्याचे उघड ठरत नाही. ज्ञानेश्‍वरांचा जन्म केवळ परार्थ दिसतो. जंगलात फळे, मुळे भक्षण करून किंवा अंगास राख फासून केवळ स्वतःसाठी मुक्ती मिळवावी किंवा एखाद्या मठिकेत ब्रह्मांडी प्राण नेऊन स्वतःचा अर्थ तितका साधून घ्यावा, असला कोतेपणा ज्ञानेश्‍वरांमध्ये नव्हता.’

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Sadanand More