ये किसने गीत छेडा... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मेंडोलिन या वाद्यानं अनेक हिंदी-मराठी गाण्यांमधलं माधुर्य आणखी खुलवलं. ‘ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा’, ‘दो लफ्जों की है, दिल की कहानी’, ‘तुम बिन जाऊ कहां’, ‘फुलले रे क्षण माझे’ अशा वेगवेगळ्या गाण्यांमध्ये या वाद्याचा नेमका वापर करण्यात आला आहे. या वाद्याशी संबंधित रोचक माहिती.  
 

‘पुकारता चला हूं मैं’ हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, महंमद रफी यांनी गायलेलं गाणं गिटारनं सुरू झालं, की ओ. पी. नय्यर यांच्या संगीतावर आपण ताल धरतो. गिटार, मेंडोलिन आणि त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर वाजतं, पुन्हा मेंडोलिन वाजल्यावर महंमद रफी गायला सुरवात करतात. ही वाद्यं अशी वेगवेगळी ओळखत गेलं, की एकाच गाण्यांतली अनेक स्ट्रिंग वाद्यं ऐकण्याचा कान तयार होतो. ‘ये रातें ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा’ या शैलेंद्र यांनी लिहिलेल्या गीताचे संगीतकार आहेत रवी. ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटातल्या या गाण्याला स्वरसाज आहे किशोरकुमार आणि आशा भोसले यांचा. या गाण्याच्या अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं. हे मेंडोलिन वाजवलं आहे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यातले लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी. या मेंडोलिन या वाद्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी १९८९पासून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत मेंडोलिन वाजवणारे कलाकार प्रदीप्तो सेनगुप्ता यांच्याशी संपर्क साधला. मेंडोलिनबद्दल माहिती घेण्याची इच्छा प्रकट केल्यावर त्यांनी भरभरून माहिती सांगितली.  
***

प्रदीप्तो सेनगुप्ता यांनी स्ट्रिंग वाद्यांचे प्रकार समजावून सांगितले. पहिला प्रकार म्हणजे प्लकिंग करून वाजवणं. प्लकरनं तारा छेडून वाजवली जाणारी वाद्यं म्हणजे ल्यूट फॅमिलीमधली मेंडोलिन, गिटार, टेनर बेंजो, मेंडोला, सतार वगैरे. दुसरा प्रकार म्हणजे ‘बो’नं घर्षण करून वाजवली जाणारी वाद्यं म्हणजे व्हायोलिन, व्हायोला, चेलो वगैरे. आघात करून वाजवली जाणारी वाद्यं तिसऱ्या प्रकारात आहेत ती म्हणजे संतूर, पियानो आदी. प्लकिंग करून वाजवल्या जाणाऱ्या मेंडोलिनचे प्रकार आहेत ः मेंडोला, मेंडोलिन, मेंडोचेलो, मेंडोबास. ऑक्‍टेव्ह मेंडोलिन हा मेंडोलिनचा आणखी एक प्रकार, त्याला ‘आयरिश बुझुकी’ असंही नाव आहे.  

*** 

‘दो लफ्जों की है, दिल की कहानी’ हे ‘ग्रेट गॅंबलर’मधलं गाणं इटलीमधल्या व्हेनिस शहरात चित्रित झालं आहे. व्हेनिस शहरात बोटमन मेंडोलिन वाजवतात. याचाच विचार करून संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी इटालियन शब्दांनी गाण्याला सुरवात केली आहे. बोट चालवणारा गात असतो - ‘आ मोरे मियो...’ नायक अमिताभ नायिका झिनतला विचारतो - ‘ये क्‍या गा रहा है?’ शरदकुमार यांनी गायलेल्या इटालियन बोलानंतर आशा भोसलेंचा आवाज झिनत अमानच्या तोंडी ऐकू येतो - ‘अपने प्यार को याद कर रहा है और कह रहा है के...’ मग आशाताई गातात- ‘दो लफ्जो की है...’  गाणं गिटार आणि मेंडोलिन यांच्या वादनानं सुरू होतं. लक्षपूर्वक ऐकलं, तर गिटार आणि मेंडोलिनच्या आवाजात फरक आहे. या गाण्यात दोन्ही वाद्यं वेगवेगळी ऐकू येतात; पण दोन्हींचा एकत्र परिणाम लक्षवेधी आहे. मेंडोलिन हे वाद्य इटालियन आहे, त्यामुळं या गाण्यात त्याचा वापर चपखल असल्याचं जाणवतं. प्रदीप्तो यांना या गाण्यातल्या वादनाबद्दल विचारलं. त्यांनी सांगितलं, की हे सहा ते सात जणांचं टीमवर्क आहे. चार मेंडोलिन, एक आयरिश बुझुकी आणि दोन गिटार या सर्व वादनाचा एकत्रित परिणाम म्हणजे हे गाणं. या गाण्यात रवी सुंदरम, शैलू सुंदरम, किशोर देसाई यांच्यासारख्या एकाहून एक सरस मेंडोलिनवादकांचा सहभाग आहे. 

***

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटामध्ये नायक शाहरुख खानच्या हातात मेंडोलिन दिसतं. प्रदीप्तो यांनी या चित्रपटातल्या ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘मेहंदी लगा के रखना’ अशा सर्व गाण्यांत मेंडोलिन वाजवलं आहे. १९८८मध्ये प्रदीप्तो मुंबईला आले आणि स्टुडियो वादकांसह त्यांनी वादनास सुरवात केली. सॅक्‍सोफोनवादक मनोहारीसिंह यांनी त्यांची ओळख राहुलदेव बर्मन यांच्याबरोबर करून दिली आणि नंतर ते पंचमदा यांच्या टीममध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकारांच्या गाण्यांत मेंडोलिन वाजवलं आहे. त्यातली काही नावं म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन, जतिन-ललित, आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, राम-लक्ष्मण, इलयाराजा, सलीम-सुलेमान, अजय-अतुल. ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘खिलाडी’, ‘अग्निपथ’, ‘मैने प्यार किया’ हे त्यातले काही चित्रपट. यशवंत देव, श्रीधर फडके, अशोक पत्की, नंदू होनप अशा मराठी संगीतकारांच्या गाण्यांमध्येही प्रदीप्तो यांचं मेंडोलिन ऐकायला मिळतं. त्यांनीच मला मेंडोलिन वाजवण्याचे प्रकार समजावून सांगितले.  

***

‘स्ट्रोक सेक्‍शन’, ‘सोलोवादन’, ‘ग्रुपवादनातली हार्मनी’ आणि ‘ड्युअल’ अशा प्रकारांतलं मेंडोलिनवादन आपल्याला गाण्यांत ऐकायला मिळतं. ‘दो लफ्जों की है...’ या गाण्यात चार वादकांनी ग्रुप मेंडोलिन वाजवलं, त्यांचा उल्लेख वर केलाच आहे. सर्व वाद्यांचा मिळून परिणाम ऐकायला येतो, त्याला ‘हार्मनी’ म्हणतात. या गाण्यात ‘स्ट्रोक’ पद्धतीचंही मेंडोलिन ऐकायला मिळतं. ‘ये है रेशमी जुल्फो का अंधेरा’ या गाण्यात वाजतं ते ‘ड्युअल मेंडोलिन’ आहे. ‘ड्युअल मेंडोलिन’ या प्रकारात एका मेंडोलिनवर मूळ नोट्‌स वाजतात आणि दुसऱ्या मेंडोलिनवर प्रामुख्यानं ऐकू येणारी ट्यून वाजते. सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले-महंमद रफी यांनी साभिनय गायलेलं ‘अच्छा जी मै हारी, चलो मान जाओ ना’ हे गाणं केरसी लॉर्ड यांनी वाजवलेल्या ॲकॉर्डियननं सुरू होतं. ‘छोटेसे कुसूर पे ऐसे हो खफा’ या प्रश्नाला ‘रुठे तो हुजूर थे मेरी क्‍या खता’ असं उत्तर दिल्यानंतर हलकेच मेंडोलिन वाजतं. दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी देव आनंद आणि मधुबाला यांना आगा-मुक्री-जानकीदास हे तिघं बघतात, तेव्हा ड्युअल मेंडोलिन वाजतं. यातलं एक मेंडोलिन मनोहारीसिंह यांनी वाजवलं आहे. मनोहारीसिंह सुरवातीला मेंडोलिन वाजवत होते. मुंबईला येण्यापूर्वी कोलकात्यामध्ये बऱ्याच बंगाली गाण्यांत त्यांनी मेंडोलिन वाजवलं आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी सॅक्‍सोफोन हे वाद्य वाजवलं.   राहुलदेव बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं आणि किशोरकुमार यांनी ‘यॉडलिंग’सह गायलेलं ‘तुम बिन जाऊ कहां’ हे गाणं मेंडोलिननं सुरू होतं. या गाण्यात दोन मेंडोलिन वाजतात. एक मेंडोलिन मनोहारीसिंह यांनी वाजवलं आहे, तर दुसरं किशोर देसाई यांनी. लक्षपूर्वक ऐकलं, तर किशोरकुमार गातो त्यावेळेस एक मेंडोलिन वाजतं. भारतभूषण यांनी मेंडोलिन वाजवण्याचा अभिनय करताना ताल, लय, वाद्याची रचना याचा अजिबात विचार केलेला नाही. त्यामुळं हे गाणं बघण्यापेक्षा ऐकण्यात जास्त मजा आहे. या गाण्यात ॲकॉर्डियन, गिटारचा वापरही ऐकण्यासारखा आहे. ‘रिमझिम के ये प्यारे प्यारे...’ या गाण्याचे संगीतकार आहेत सलील चौधरी. हार्मनीचं उत्तम उदाहरण असलेल्या या गाण्यात दोन मेंडोलिनचा वापर करण्यात आला आहे. त्यापैकी एक लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी वाजवलं आहे.

***

‘ड्युअल मेंडोलिन’ ऐकल्यानंतर सोलो मेंडोलिनचं कोणतं गाणं ऐकायचं? ‘फुलले रे क्षण माझे’ हे श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या सुरेल गायनानं सजलेलं, ‘ऋतू हिरवा’ या अल्बममधलं गाणं. या गाण्यात प्रदीप्तो यांनी सोलो मेंडोलिन वाजवलं आहे. या गाण्यात सनई, बासरी, तबला, सतार ही वाद्यं ऐकू येतात; पण मेंडोलिनवादनानं या गाण्याचं सौंदर्य खुललं आहे. हे गाणं संपतंही सोलो मेंडोलिनवादनानं. अनिल पेंडसे यांनी नुकताच पुण्यामध्ये मेंडोलिन महोत्सव आयोजित केला होता. प्रदीप्तो यांनी दीड दिवसाच्या या महोत्सवामध्ये मेंडोलिनवादनाचं प्रशिक्षण दिलं. फक्त मेंडोलिनसाठीच आयोजित केलेला असा हा पहिलाच महोत्सव. त्यात वादक, रसिक सहभागी झाले होते. इटली, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन (लंडन) इथं मेंडोलिन शिकण्यासाठी संस्था आहेत, भारतात अशी कोणतीही संस्था नाही. अशी संस्था झाल्यास प्रदीप्तो यांच्यासारखे वादक शिकवायला तयार आहेत आणि शिकायला आपल्यासारखे रसिक.   
***
सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘ये किसने गीत छेडा’ हे गाणं गायलं आहे सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांनी. बासरी, संतूर, गिटार ही वाद्यं, सुमन कल्याणपूर यांचं ‘हमिंग’ यांनी हे गाणं सुरू होतं आणि यानंतर प्रामुख्यानं वाजतं ते मेंडोलिन. या वाद्याची खुमारी अशा गाण्यात जाणवते आणि आपण अजाणतेपणे गातो ‘दिल मेरा नाचे थिरक थिरक.’ अंतऱ्याला गिटार, चायनीज ब्लॉक, सॅक्‍सोफोन आणि मेंडोलिन वाजतं. ‘मतवाला, गया बहेक बहेक’ असे पॉझेस गाण्यातली नजाकत वाढवतात. आपणा सर्वांना परिचित असलेल्या एका मराठी गाण्यात तालवाद्याबरोबर मेंडोलिन हे एकच वाद्य वाजतं. ‘ये किसने गीत छेडा’ या गाण्यातल्या मेंडोलिनसारखंच. मेंडोलिननं सजलेल्या अशाच आणखी काही हिंदी-मराठी गाण्यांबद्दल आणि वादकांबद्दल पुढील लेखात.

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Suhas Kirloskar