अनोखे ऑटम कलर्स (जयप्रकाश प्रधान)

जयप्रकाश प्रधान
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ऑटम कलरची खरी मजा पूर्वेकडच्या उत्तर कॅनडात आणि अमेरिकेतल्या न्यू इंग्लडच्या प्रामुख्यानं उत्तर भागातल्या ग्रामीण प्रदेशात दृष्टीस पडते. निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहण्यासाठी साऱ्या जगातले निसर्गप्रेमी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्याxत इथं गर्दी करतात. घनदाट झाडांमधून बहरलेली रंगसंगती मनाला, डोळ्यांना विलक्षण आल्हाद देते. या अनोख्या ‘ऑटम कलर्स’विषयी. 

ऑटम कलर्स व फॉल सीझन (झाडांच्या पानांची पानगळ) यांचं सौंदर्य कॅनडाच्या व्हिक्‍टोरिया आणि व्हॅंकुअर या दोन शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी पाहिलं होतं; पण ऑटम कलरची खरी मजा पूर्वेकडच्या उत्तर कॅनडात आणि अमेरिकेतल्या न्यू इंग्लडच्या प्रामुख्यानं उत्तर भागातल्या ग्रामीण प्रदेशात दृष्टीस पडते, असं सांगण्यात आलं. निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहण्यासाठी साऱ्या जगातले निसर्गप्रेमी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात इथं गर्दी करतात. 

या दृष्टीनं पत्नीनं अगदी निराळ्या सहली आयोजित केल्या. कॅनडात न्युब्रुन्सिक, नोव्हास्कोशिया व प्रिन्स एडवर्ड आयलॅंड आणि न्यू इंग्लडमधील मेन, न्यू हॅंपशायर, व्हरमाँट व मॅसेच्युसेट्‌स इथलं जास्तीत जास्त कंट्रीसाइड भटकण्याची कल्पना तिनं आखली. हा संपूर्ण भाग ऑटम कलर व फॉल फॉलिएजसाठी जगात प्रसिद्ध मानला जातो. आम्ही सप्टेंबर मध्यापासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत त्या भागात फिरायचं ठरवलं. त्यामुळं ऑटम कलर्स व फॉल सीझनची मजा तीन भागांत अनुभवता आली. ऑटम कलर्सची सुरवात, बहर आणि पानगळ. या साडेसहा हजार किलोमीटरच्या भटकंतीत घनदाट झाडांमधून बहरलेली ही रंगसंगती अक्षरशः चित्रात रेखाटल्यासारखी वाटली.

ऑटम कलर्स म्हणजे काय?
सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात जेव्हा सीझन सुरू होतो, तेव्हा काही झाडांच्या हिरव्या पानांचा रंग पूर्णतः बदलून तो नारिंगी, पिवळा, शेंदरी, किरमिजी होतो. मात्र, ज्या झाडांची पानं सपाट (फ्लॅट) आहेत, त्यांचेच रंग बदलतात. उदा. मेपल्स, बर्च, ख्रिसमस वगैरेसारख्या झाडांच्या पानाचे रंग मात्र तसेच राहतात. कमालीची थंडी असलेल्या प्रदेशांतच हा चमत्कार दिसून येतो. पानांमध्ये क्‍लोरोफिल नावाचं द्रव्य असतं. त्यामुळंच ही झाडं हिरवीगार दिसतात; पण ऑक्‍टोबरमध्ये तिथं सूर्याची प्रखरता कमी होते. सूर्यप्रकाश नसल्यानं क्‍लोरोफिलचं प्रमाण घटतं आणि त्या झाडांचे मूळ रंग दिसू लागतात. हा मूळ रंग फार देखणा आणि आकर्षक असतो आणि तो दिसतोही अतिशय सुंदर. सर्वसाधारण सप्टेंबरअखेर आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा रंगपालट सुरू होतो. हळूहळू रंग दाट होतो. शेकडो मैलांची हिरवीगार जंगलं पिवळी, नारिंगी, केशरी, किरमीजी दिसू लागतात. अगदी उंचावरून हे दृश्‍य फार अप्रतिम दिसतं. काही ठिकाणी सपाट मैदानांवर छोटीछोटी घरं दिसतात. झाडांच्या उधळलेल्या रंगांच्या पार्श्‍वभूमीवर ही घरं, परिसर मोहक न वाटला तरच नवल.मात्र, हा सारा खेळ जेमतेम आठ-दहा दिवसांचा असतो. हळूहळू रंगलेली ही पानं झडू लागतात. झाडांच्या परिसरात त्यांचा सडा पडतो. त्यालाच ‘फॉल फॉलिएज’ अर्थात पानगळ म्हणतात. रंगीबेरंगी पानांचा हा सडाही डोळ्यांना मोहवतो. मग मात्र ही झाडं पूर्णतः सुकतात. त्यांच्या फांद्यांच्या केवळ काड्या दिसू लागतात. त्यानंतर पाच-सहा महिने साम्राज्य असतं ते बर्फाचं. पांढराशुभ्र बर्फ या फांद्यावर आणि आजूबाजूला पडलेला दिसतो. एप्रिल-मे महिन्यात वसंत ऋतूत झाडांना पुन्हा पालवी फुटू लागते. निसर्गाचं हे चक्र वर्षानुवर्षं, शतकानुशतकं सुरू आहे.

निसर्गरम्य ‘कॅबोट ट्रेल’ 
कॅनडाच्या आयलॅंडमध्ये आम्ही शिरलो, तेव्हा ऑटम कलरची नुकतीच सुरुवात होत होती. गर्द हिरव्या झाडीत शेंदरी, पिवळा, किरमिजी रंग डोकावू लागला होता. हे दृश्‍यही हवंहवंसं होतं. तिथला ‘कॅबोट ट्रेल’ हा जगातला एक अत्यंत सुंदर सिनिक ड्राइव्ह समजला जातो. या १२८ किलोमीटर लांबीच्या ट्रेलचा जवळजवळ एक तृतीयांश भाग हा ९५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या केप ब्रेटन नॅशनल पार्कमध्येच येतो. या नागमोडी वळणाच्या मार्गावरून ड्राइव्ह घेताना, आजूबाजूचं सौंदर्य डोळ्यांत किती साठवू असं होऊन जातं. एका बाजूला विविध रंग असणारी झाडी आणि दुसऱ्या बाजूला अथांग अटलांटिक महासागर, पुढं आलेले अगदी सरळ डोंगरांचे सुळके आणि त्यामधूनच जाणारा चढ-उताराचांचा मार्ग.....ही सारी वाट कधीच संपू नये असं वाटत राहतं. 

नोव्हास्कोशिया म्हणजे घनदाट झाडी; पण प्रिन्स एडवर्ड आयलॅंडचं सौंदर्य अगदी निराळं आहे. जेमतेम सव्वा लाख लोकवस्तीच्या या बेटाची राजधानी शार्लेट टाऊन इथला बहुतेक सारा परिसर म्हणजे कंट्रीसाइड. तांबडी माती आणि मऊ वाळूचे बीचेस हे इथलं वैशिष्ट्य. मैलोन्‌मैल लांब तांबड्या मातीची जमीन दिसते. त्यावर मधूनच रंगीत झाडांचं जंगल. ल्युपिन्स ही कणसासारखी; पण रंगतदार फुलं या बेटाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. त्यामुळंच जगातल्या रसिक पर्यटकांची इथं मोठी गर्दी उसळते. ब्रिटनच्या प्रिन्स विल्यम या राजपुत्रानं लग्न झाल्यानंतर याच बेटावर मधुचंद्र साजरा केला होता. कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता, तो आपल्या पत्नीसह इथल्या किनाऱ्यावर बिनधास्त भटकताना स्थानिक नागरिकांना रोज भेटत असे आणि येथील रहिवासीही हात हालवून त्याचं स्वागत करत असत. 

गोठलेल्या पाण्यातला मोठा पूल
कान्फिडरेशन ब्रिज हे इथलं आणखी एक आश्‍चर्य. प्रिन्स एडवर्ड बेट हे १८७३मध्ये कॅनडात सामील झालं. त्यासाठी सरकारला एक अट घालण्यात आली होती. हिवाळ्यात इथं उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घटतं आणि सगळा भाग बर्फानं गोठून जातो. मात्र, त्या काळातही या बेटाचा अन्य जगाबरोबरचा संबंध कायम राहिला पाहिजे, अशी ही अट होती. त्यामुळं १९७७मध्ये १२.९ किलोमीटर लांबीचा हा पूल इथं बांधण्यात आला. गोठलेल्या पाण्यातला जगातला सर्वांत लांब पूल म्हणून तो ओळखला जातो. हिवाळ्यात या पुलाचा पाया संपूर्णपणे गोठलेल्या बर्फात असतो; पण तरीही पुढची शंभर वर्षं त्याला काहीही धोका नाही, अशी लेखी हमी देण्यात आली आहे.
उत्तर कॅनडात जवळजवळ चार हजार किलोमीटरचा प्रवास करून आम्ही उत्तर अमेरिकेतल्या मेन प्रोव्हिन्समधल्या बार हार्बर या समुद्रकिनाऱ्यावरच्या सुंदर गावात प्रवेश केला. अमेरिकेतल्या अतिश्रीमंत लोकांची मॅन्शन्स (आलिशान बंगले) इथं आहेत. इथला अकाडिया नॅशनल पार्क हा अमेरिकेतला सर्वांत जास्त गर्दी खेचणारा दुसऱ्या क्रमांकाचा पार्क म्हणून ओळखला जातो. (पहिला क्रमांक यलोस्टोनचा लागतो.) अधिकृत आकडेवारीप्रमाणं, दरवर्षी वीस लाखांपेक्षाही अधिक पर्यटक या पार्कला भेट देतात. काही बाबतीत मात्र हा पार्क पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या कॅडिलॅक पर्वताच्या सर्वोच्च शिखरांवरून अमेरिकेतला पहिला सूर्योदय तुम्ही पाहू शकता. पूर्व मिसिसिपीमध्ये स्थापन झालेला हा पहिला नॅशनल पार्क आणि केवळ खाजगी व्यक्तींनी दान केलेल्या जमिनीतून उभा राहिलेला पन्नास हजार एकरांचा हा पहिलाच पार्क ठरला आहे. या पार्कमध्ये आणि बार हार्बर गावात चांगली आठ-दहा दिवसांची मनसोक्त भटकंती केली. त्यामुळं ऑटम कलर्स, फॉल फॉलिएज आणि या पार्कची खास वैशिष्ट्यं मस्त पाहता आली. 

या पार्कमध्ये भटकण्यासाठी नानाविध मार्ग आहेत. पार्कच्या किनाऱ्याकिनाऱ्यानं सायकलवरून फिरायचं असेल, तर ४५ मैलांचा ट्रक आहे. गिर्यारोहकांना इथं फार मोठी पर्वणीच मिळते. या पार्कमध्ये एकशेवीस मैलांपेक्षाही अधिक लांबवर गिर्यारोहण ट्रॅक उपलब्ध आहे. धाडसी गिर्यारोहक इथल्या काही सरळ सुळक्‍यांवरती चढताना दिसतात. मोटारीनं अगर बसनंही पार्कमध्ये फिरता येतं; पण खास पूर्वीच्या घोडागाडीमधूनही तुम्ही फेरफटका मारू शकता. जॉन रॉकफेलर (ज्युनिअर) यानं चुरा केलेल्या दगडांचा ४५ मैलांचा खास रस्ता त्यासाठी तयार केला आहे. या रस्त्यावरून घोडागाडीतून जाताना विशेष मजा तर वाटतेच; पण आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचं जे दर्शन घडतं ते फारच अप्रतिम म्हणावं लागेल. 

भटकंतीची मजा
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑटम कलर्सची सुरवात होते. झाडांच्या पानांचे रंग बदलू लागतात. सर्व परिसर अक्षरशः रंगीबेरंगी होऊन जातो. त्याचवेळेस काही झाडांची पान गळायला लागतात. केशरी, पिवळा, किरमिजी रंगांच्या पानांचा सडा कमालीची मोहक दिसतो. या घनदाट झाडीतून छोट्या, छोट्या पायवाटांनी भटकण्यासाठी साऱ्या जगातून पर्यटकांची इथं गर्दी असते. आम्ही तीन-चार दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीनही वेळेस या भटकंतीची मजा लुटत होतो. आपापल्या मोटारींनी किंवा विशेषतः कॅरव्हॅननी (अमेरिकन शब्द आर.व्ही.) या पार्कची सहल करणाऱ्यांची संख्याही भरपूर असते. त्यामुळं स्वतःच्या सायकलीही बरोबर आणता येतात. (अर्थात इथंही भाड्यानं सायकली मिळतात) कॅरव्हॅनसाठी संपूर्ण पार्कमध्ये पाचशे कॅंपसाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथं मुक्काम करण्याचा अनुभव काही निराळाच असतो. म्हणजे पार्कमध्ये दिवसभर भटकायचं व रात्रीच्या निवासासाठी या कॅंपसाइटवर यायचं.

पार्कची सफर म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिनाच आहे. इथं काय नाही? सुमारे १६५ प्रकारची झाडं इथं आहेत, तर १५०पेक्षाही अधिक जातीचे पक्षी या पार्कमध्ये पाहायला मिळतात. समुद्रातल्या नानाविध प्राण्यांची संख्या अशीच अगणित आहे. तीस ते सत्तर फूट लांबीचे व्हेल मासे सहज दृष्टीस पडतात. एक जागा पर्यटकांना खिळवून ठेवते, ती म्हणजे ‘थंडर होल.’ अंटार्टिकच्या किनाऱ्यावरच एक भली मोठी गुहा तयार झाली आहे. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी त्या गुहेत जोरात शिरतं आणि त्याच वेगानं मागं येतं. त्यामुळं गुहेच्या तोंडाशी त्याचा उंच फवारा उडतो. कधीकधी हा फवारा चाळीस फुटांपर्यंत उंच जातो आणि त्याचा जोरदार आवाज येतो. निसर्गाचा हा चमत्कार पर्यटकांना बराच वेळ खिळवून ठेवतो. १९४०मध्ये या पार्कवर फार मोठं संकट आलं होतं. ते म्हणजे भीषण आगीचं. माऊंट डेहनर्ट बेटावर १७ हजार एकराच्या क्षेत्रात भयंकर आग लागली आणि दहा दिवस ती भडकत होती. अकाडिया पार्कमधील दहा हजार एकरांना त्याची झळ पोचली. बार बार्हरमधील साठ मॅन्शन्स आगीच्या भक्षस्थानी पडलं. त्या काळात २.३ कोटी डॉलर्सची मालमत्ता बेचिराख झाली; पण या आपत्तीवरही योजनाबद्ध नियोजनानं मात करण्यात आली. त्या नुकसानीची पुसटशी आठवणही आज शिल्लक नाही.

निसर्गाचं सुंदर रूप
अकाडिया नॅशनल पार्कमधून आम्ही नॉर्थ कॉनवेमध्ये आलो आणि बघतो तर सारं दृश्‍यच बदललं होतं. ऑटम कलर्सचा खरा डौल आता तिथं अनुभवता येत होता. व्हाईट माऊंटनच्या परिसरातल्या शेकडो मैलांच्या जंगलांचं रंगरूपच पालटलं होतं. जवळच्याच एका डोंगरावर गोंडोलातून गेलो. डोंगर माथ्यावरच ऑटम कलर्स आणि फॉल सीझनच अगदी नयनरम्य रूप डोळे भरून पाहता आलं. मधूनमधून छोटीमोठी पाण्याची तळी, काही ठिकाणी चिमुकली घरं आणि त्यांना रंगीत घनदाट झाडीचा विळखा! निसर्गाचं विध्वंसक रूप आपण अनेकवेळा अनुभवतो; पण तोच निसर्ग इतक सुंदर रूप धारण करू शकतो, यावर विश्‍वासच बसत नाही.

न्यू कॉजवे आणि न्यू इंग्लडमधला सर्वांत ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हरमाँट प्रदेशात आम्ही प्रवेश केला. अगदी छोटी, छोटी गावं, दूर दूर अंतरावरची फार्म हाऊसेस आणि ऑटम कलर्सचे रंग उधळणारी घनदाट झाडी यांमुळं हा सारा परिसर कमालीचा खुलून दिसतो. या भागाचं आणखी एक आकर्षण म्हणजे नद्या, नाले यांच्यावरच्या लाकडाचे ‘कव्हर्ड ब्रिजेस.’ नदी, ओढे यांचं पात्र ओलांडणारे रस्ते हे लाकडाचे असतात आणि लाकडाच्याच कमानींनी ते संपूर्ण रस्ते झाकण्यात येतात. या भागात हिवाळ्यात भरपूर हिमवृष्टी होते आणि सारे रस्ते बर्फमय होऊन जातात. या पुलावरच्या लाकडाच्या कमानींमुळं बर्फ रस्त्यावर पडतं आणि साचत नाही. त्यामुळं वाहतुकीला अडथळा येत नाही. अमेरिकेतल्या अन्य कोणत्याही राज्यापेक्षा व्हरमाँट इथं सर्वांत जास्त म्हणजे १०९ कव्हर्ड ब्रिजेस आहेत. त्याच्या मधल्या रस्त्यावरून वाहनांची जा-ये सुरू असते आणि बाजूलाच पादचाऱ्यांसाठीही छोटा लाकडाचा मार्ग असतो. रंगीबेरंगी झाडांच्या पार्श्‍वभूमीवर हे कव्हर्ड ब्रिजेस त्या ग्रामीण सौंदर्यात भरच टाकतात. 

व्हरमाँट प्रदेशात आता फॉल फेस्टिव्हल सुरू झाला होता. फॉल सीझनच्या निमित्तानं सर्वत्र मोठा उत्सवच साजरा केला जातो. ठिकठिकाणी लहान मोठ्या आकाराच्या तांबड्या व अन्य रंगांच्या भोपळ्यांची सजावट केली जाते. या भोपळ्यांना प्रचंड मागणी असते. हे भोपळे घराबाहेर ठेवले म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नायनाट होतो, नजर लागत नाही असा समज आहे. जास्तीत जास्त वजनाचा भोपळा पिकवण्याच्या स्पर्धा फॉल सीझनमध्ये होतात. आतापर्यंत १६५० पौंडांच्या वजनाचा भोपळा हा सर्वांत मोठा ठरला आहे. 

भोपळ्यांचं प्रदर्शन
एका ठिकाणी भोपळ्यांचं प्रदर्शन होतं. त्याला मुद्दाम भेट दिली. इथंही ७० पौंडापासून तीन-चार पौंडापर्यंतच्या वजनाचे भोपळे आढळले. मोठे भोपळे जनावरांना खायला घालतात; पण वजनदार भोपळ्यांचं पीक कसं काढलं जातं याचं गुपित राखण्यात यें. लहान भोपळे विविध पदार्थ बनवण्यासाठी फारच उपयुक्त असतात. केक, स्क्वॅश आदीसाठी त्याचा मोठा उपयोग होतो. भोपळ्याचं बी साधारणतः मे महिन्यात लावण्यात येतं आणि तीन-चार महिन्यांत म्हणजे सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये त्याचं पीक तयार होतं.

ऑटम कलर्स आणि फॉल सीझनवर बदलत्या जागतिक हवामानाचा परिणामही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं स्थानिक नागरिकांशी बोलताना समजून आलं. वेळोवेळी येणारी वादळं, पाऊस यांमुळं अनेक ठिकाणी झाडांची पानं रंगण्याआधीच झडतात, तर कडक उन्हामुळं रंग पक्के होण्यासही विलंब होत होता. ऑटम कलर्सचे आणि फॉल सीझनची पूर्वीची मजा आता खूप कमी होत आहे, अशी व्यथा अनेकांनी बोलून दाखविली.

(छायाचित्र : जयंती प्रधान)

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Tourism autumn colours Jayprakash Pradhan