अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय... (सुयोग कुंडलकर)

सुयोग कुंडलकर
रविवार, 28 जानेवारी 2018

परंपरेत भर घालता येण्याची ताकद आपल्यात कदाचित नसेलही; परंतु आपल्यापर्यंत पोचलेली संगीतपरंपरा जपण्याची बुद्धी आपल्याला मिळावी, या परंपरेला धक्का लागणार नाही, याची काळजी आपल्याकडून घेतली जावी, अशी प्रार्थना स्वरमंचावर जाण्यापूर्वी मी प्रत्येक वेळी करत असतो.

माझ्या घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण नव्हतं. माझ्यामधली शास्त्रीय संगीताची - हार्मोनिअमची - आवड ओळखून माझ्या आई-वडिलांनी मला वयाच्या सहाव्या वर्षी रंजना गोडसे यांच्या ‘गोडसे वाद्यवादन विद्यालया’त दाखल केलं. स्वतःला आवड नसतानाही मला शास्त्रीय संगीत (हार्मोनिअम, कंठसंगीत) शिकण्यासाठी, व्यासंग करण्यासाठी प्रेरणा देणारे आई-वडील (अर्चना आणि सुभाष कुंडलकर) मला लाभले, हे माझं सद्भाग्य.

गोडसेबाईंचं माझ्यावर विशेष प्रेम होतं. त्यांनी मला अतिशय मनापासून पहिले धडे दिले. वेगवेगळे राग, बंदिशी, गती शिकवल्या आणि एका टप्प्यावर मोठ्या मनानं त्यांनी आई-बाबांना सांगितलं ः ‘‘याला आता एका परफॉर्मर गुरूंकडं पुढच्या शिक्षणासाठी पाठवा.’’ गोडसेबाईंसारखा असा गुरू विरळा. यादरम्यान आई-बाबांनी मला नऊशे-हजार रुपयांची हार्मोनिअम ‘मेहेंदळें’कडून घेऊन दिली. खरंतर तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीत ही गोष्ट सहज शक्‍य नव्हती; पण आई-बाबांनी वाद्य घेताना, शालेय-सांगीतिक अभ्यासासाठी पुस्तकं-कॅसेट्‌स घेताना हे कधीच जाणवू दिलं नाही. मला आणि माझ्या थोरल्या भावाला (सचिन कुंडलकर) भरपूर पुस्तकं त्यांनी घेऊन दिली. चांगलं वाचण्याचे आणि ऐकण्याचे संस्कार आमच्यावर करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अनेक कार्यक्रम ऐकत असताना एका टप्प्यावर विख्यात हार्मोनिअमवादक-संगीततज्ज्ञ डॉ. अरविंद थत्ते यांची हार्मोनिअम ऐकण्याचा योग आला आणि ‘शिकायचं तर यांच्याकडंच’ अशी खूणगाठ मनाशी बांधली. काही काळ पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी १९९७ मध्ये डॉ. थत्ते मला गुरू म्हणून लाभले, हा माझ्या भाग्ययोग.

अरविंददादांनी माझ्यावर पुत्रवत्‌ प्रेम केलं. केवळ आणि केवळ सांगीतिक अपेक्षा ठेवून त्यांनी शिकवलं. संगीताकडं पूर्वग्रहविरहित स्वच्छ-व्यापक दृष्टीनं पाहण्याची शिकवण त्यांनी दिली. हार्मोनिअमवादनाची विद्या तर दिलीच; पण त्याचबरोबर कंठसंगीत आणि वाद्यसंगीताविषयीच्या अनेक जाणिवाही जागृत केल्या. संगीत शिकत असताना आणि नंतर व्यावसायिक कलाकार म्हणून वावरताना प्रत्येक टप्प्यावर ते माझ्या पाठीशी आहेत. मी त्यांचा कायमच ऋणी आहे. त्यांच्यामुळंच डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या नागपूर इथल्या मैफलीनं माझी ‘व्यावसायिक हार्मोनिअमवादक कलाकार’ म्हणून सुरवात झाली. त्यानंतर चार पिढ्यांमधल्या अनेक कलाकारांसमवेत साथसंगत करण्याचं भाग्य लाभलं. त्यांत गंगूबाई हनगल, पद्मावती शाळीग्राम, बाळासाहेब पूँछवाले, गिरिजादेवी, संगमेश्‍वर गुरव, बबनराव हळदणकर, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर या बुजुर्गांबरोबर साथसंगत करू शकलो. याशिवाय उल्हास कशाळकर,  राजन-साजन मिश्रा, व्यंकटेशकुमार, विजय सरदेशमुख, मुकुल शिवपुत्र, तसंच आरती अंकलीकर, देवकी पंडित, उस्ताद राशिद खाँ, कैवल्यकुमार गुरव, रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, कलापिनी कोमकली, संजीव अभ्यंकर आदी कलाकारांबरोबरही देशात-परदेशांत अनेक नामवंत संगीतसभांमध्ये साथसंगतीची संधी मला मिळाली. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याबरोबर अनेक मैफलींत साथसंगत करण्याचीही सुसंधी मला लाभली. किशोरीताईंना सन २००० पासून ते त्यांच्या दिल्ली इथल्या अखेरच्या मैफलीपर्यंत (ता. २६ मार्च २०१७) सातत्यानं १७ वर्षं मी साथ केली. त्यांनी मला साथसंगतकार म्हणून स्वीकारलं, हे माझं परमभाग्य. किशोरीताई रागसंगीताकडं सूक्ष्म दृष्टीनं कसं पाहतात, स्वराला किती जपतात हे त्यांच्या सहवासामुळं मला जवळून अनुभवायला मिळालं. अनेक रागरूपांचं विस्तृत आणि परिणामकारक वातावरण अनुभवता आलं. तोच यमन, तोच भूप, तोच तोडी, तोच भैरव, तोच पूरिया धनाश्री किशोरीताईंच्या गळ्यातून किती वेगळा विचार मांडतो, हे पाहून (चांगल्या अर्थानं) बेचैनी येत असे...येते आणि येत राहील. मला अजून काय काय गाठायचं आहे, याची जाणीव किशोरीताईंच्या आणि अरविंददादांच्या मैफली ऐकल्यानंतर मला होते.

श्रीराम देवस्थळी, सुहास दातार, तसंच काही काळ ललिता खाडिलकर यांच्याकडून कंठसंगीताचं शिक्षण मला मिळालं. बाळासाहेब पूछॅंवाले, वसंतराव राजूरकर, मोहनराव कर्वे अशा विद्यावान गुरुजनांचा खूप सहवास मिळाला. त्यांच्याकडून अनेक बंदिशी शिकायला मिळाल्या. प्रत्येक कार्यक्रम ऐकल्यानंतर नवीन बंदिशी टिपून ठेवायची माझी सवय. प्रसंगी त्या बंदिशी प्रत्यक्ष त्या त्या कलाकाराकडून समजून घेऊन त्यांची नीट नोंद करून ठेवण्याची माझी वृत्ती बनत गेली. अनेक बुजुर्गांची ध्वनिमुद्रणं-मैफली ऐकताना ‘बंदिश’ म्हणजे काय, बंदिश मांडणं म्हणजे काय याची जाणीव होऊ लागली. या सगळ्या संस्कारांमधून, परंपरेचा पूर्ण आदर करून, अभ्यास करून स्वतः बंदिश बांधण्याची माझी वृत्ती बनत गेली. बंदिशीद्वारे अभिव्यक्त होण्याचा वेगळा आनंद मिळाला. स्वतःची बंदिश मांडताना रागरूपं, शब्द, लय-ताल, स्वर पुन्हा नव्यानं जाणवू लागले. त्यातून नवीन शिक्षण सुरू झालं. यातल्या काही बंदिशींचा ‘रागचित्र’ हा संग्रह प्रकाशित झाला. त्याला डॉ. प्रभा अत्रे यांची प्रस्तावना लाभली.

बंदिशरचना किंवा संगीतरचना करताना लहानपणापासून असलेल्या वाचनाच्या संस्कारांचा खूप फायदा झाला. अनेक संतांचे अभंग, वेगवेगळ्या कवींच्या उत्तमोत्तम कविता, जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, गो. नी. दांडेकर, पु, ल, देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, सुनीता देशपांडे यांचं साहित्य, सूरदास, तुलसीदास, मीराबाई यांच्या पद्यरचना हे सगळं वाचताना कळत-नकळत उत्तम शब्द-साहित्यसंस्कार माझ्यावर होत गेले. उत्तमोत्तम नाटकं-चित्रपट पाहायला मिळाले.

या टप्प्यावर पुन्हा थोडं मागं जाऊन एक आठवण ‘शेअर’ करावीशी वाटते. आमच्या घरात कलेचं वातावरण जरी नसलं तरी आई-बाबांनी माझा थोरला भाऊ सचिन याला आणि मला खूप प्रोत्साहन दिलं. एका टप्प्यावर सचिननं सांगितलं, की तो नाटक-सिनेमा यांत करिअर करणार...नंतर मी सांगितलं, की मला हार्मोनिअमवादनात करिअर करायचं आहे. हे सांगताना स्वतः मी आणि अर्थातच आई-बाबाही साशंक होते. हार्मोनिअम वाजवून अर्थार्जन कसं होणार, याची कल्पना त्यांना येत नव्हती आणि मलाही या करिअरबाबत तशी पुसटशीच जाणीव होती. मात्र, चर्चेअंती ते मला म्हणाले ः ‘‘तू या क्षेत्रात करिअर कर. काहीही होवो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.’’ त्यांच्या या शब्दांनी मला बळ आलं. मी माझ्या ठरवलेल्या रागसंगीताच्या क्षेत्रात काही वाटचाल करू शकलो. या आतापर्यंतच्या छोट्या प्रवासात अनेकांच्या सदिच्छा, आशीर्वाद मला मिळाले. माझे अनेक मित्र, हितचिंतक, सहकलाकार, मला ज्या ज्या कलाकारांनी साथसंगतीची संधी दिली ते सर्व गायक कलाकार, मला उत्तमोत्तम हार्मोनिअम बनवून देणारे कारागीर, रसिक-श्रोते या सगळ्यांचा मी ऋणी आहे.

मी विशेष उल्लेख करीन तो माझी गायिका-पत्नी आरती हिचा. ती स्वतः किराणा घराण्याची उत्तम गायिका आहे. माझी समीक्षकही आहे. एक सुरेल सांगीतिक जोडीदार म्हणून माझ्या करिअरमध्ये तिचा महत्त्वाचा सहभाग आहे.

साथसंगतीबरोबरच अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे हार्मोनिअमवादनाची संधी मला मिळाली. पुणे, मुंबई, बडोदा, दिल्ली, बंगळूर, गोवा, बनारस, इंदूर, तसंच सिंगापूर, बॉस्टन (अमेरिका) आदी ठिकाणी मी कार्यक्रम सादर केले. अरविंददादांनी शिकवत असतानाच काही सांगीतिक तत्त्वं माझ्या मनात रुजवली. त्या तत्त्वांचं प्रामाणिकपणे पालन करून साथसंगत आणि स्वतंत्र वादन करता यावं हा माझा प्रयत्न असतो.

परंपरेत भर घालता येण्याची ताकद आपल्यात कदाचित नसेलही; परंतु आपल्यापर्यंत पोचलेली ही संगीतपरंपरा जपण्याची बुद्धी आपल्याला मिळावी, या परंपरेला धक्का लागणार नाही, याची काळजी आपल्याकडून घेतली जावी, अशी प्रार्थना स्वरमंचावर जाण्यापूर्वी मी प्रत्येक वेळी करत असतो. आई-बाबा आणि गुरुजनांच्या आशीर्वादामुळंच प्रख्यात अशा ‘सवाई गंधर्व-भीमसेन संगीत महोत्सवा’त मला आदरणीय अप्पासाहेब जळगावकर यांच्या हस्ते ‘रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर सातत्यानं १५ वर्षांहून अधिक काळ त्या स्वरमंचावरून साथसंगतीची संधी मिळाली. त्यानंतर संगीत नाटक अकादमीतर्फे ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ मिळाला. हा युवा पुरस्कार मिळणारा मी पहिला हार्मोनिअमवादक होतो, हे माझं भाग्य. ‘रंजना गोडसे स्मृती पुरस्कार,’ ‘बापूराव अष्टेकर स्मृती पुरस्कार,’ ‘पंडित गोविंदराव टेंबे संगतकार पुरस्कार,’ ‘पंडित बंडूभैया चौगुले स्मृती पुरस्कार’ या पुरस्कारांबरोबरच किशोरीताईंच्या हस्ते मला ‘गानसरस्वती संगतकार पुरस्कार’ही मिळाला. ही माझ्या आयुष्यातली संस्मरणीय घटना.

‘बरसत घन आयो’, ‘गानप्रभा’, ‘बंदिश’, ‘रागचित्र’, ‘सुमिरन’ अशा संकल्पनाधिष्ठित कार्यक्रमांची निर्मिती या संगीतप्रवासात मला करता आली. मी संगीतबद्ध केलेली आरती ठाकूर-कुंडलकर आणि आनंद भाटे यांनी गायलेली ‘हरिवंदना’ ही सीडी प्रकाशित झाली. संगीतकार या भूमिकेतला तो माझा पहिला प्रयत्न होता. त्याला ज्येष्ठ गायकांची दाद मिळाली.

गुरुकृपेशिवाय हे शक्‍य झालं नसतं. आत्ताशी ही सुरवात आहे...अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे...किशोरीताईंसारख्या कलाकार जेव्हा शेवटपर्यंत म्हणत होत्या - ‘मला अजून खूप काही दिसतंय. खूप काही करायचं आहे,’ तेव्हा माझ्यासारख्या छोट्या विद्यार्थ्याला दडपून जायला व्हायचं, अजूनही होतं; पण अशा बुजुर्गांचा सहवास मिळाल्यामुळंच सतत अभ्यास करण्याचीही जाणीव जागती राहते आणि त्यातून ऊर्जा मिळत राहते. अधिकाधिक अभ्यास करून विद्यावान होण्यासाठी गुरुजनांनी, रसिकांनी मला आशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती...

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news Saptarang Indian Classical Music Suyog Kundalkar