आई-वडिलांच्या धमकीमुळे करतेय लग्न 

- डॉ. सुचेता कदम. 
रविवार, 1 सप्टेंबर 2019

मी ३१ वर्षांची तरुणी असून, माझ्या पालकांनी माझ्या मनाविरुद्ध पसंत नसलेल्या मुलाशी लग्न ठरवले आहे. माझे ज्या मुलावर प्रेम आहे तो भेटण्यास आला. लग्नाची मागणी घातली. परंतु पालकांनी त्याला नाकारले. मी माझ्या पद्धतीने सर्व प्रकारे प्रयत्न केले, परंतु माझे प्रेम असलेला मुलगा जातीतील नाही, या कारणाने ते तयार नाहीत.

मी ३१ वर्षांची तरुणी असून, माझ्या पालकांनी माझ्या मनाविरुद्ध पसंत नसलेल्या मुलाशी लग्न ठरवले आहे. माझे ज्या मुलावर प्रेम आहे तो भेटण्यास आला. लग्नाची मागणी घातली. परंतु पालकांनी त्याला नाकारले. मी माझ्या पद्धतीने सर्व प्रकारे प्रयत्न केले, परंतु माझे प्रेम असलेला मुलगा जातीतील नाही, या कारणाने ते तयार नाहीत. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले नाही तर, आत्महत्या करू अशी धमकी दिल्यामुळे मी साखरपुडा केला. पुढील दोन महिन्यांत माझे लग्न होईल. परंतु या मुलासोबत असताना मी खूप अस्वस्थ होते. तसेच मला आनंदही वाटत नाही. मला असह्य वाटत असून, काय करावे हे सुचत नाही. या परिस्थितीतून कसे बाहेर पडावे मार्ग सुचवा. 
- अस्वस्थता, असह्यता या नकारात्मक भावना आहेत. तसेच आनंद ही सकारात्मक भावना आहे. आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या भावना इतर व्यक्ती, परिस्थितीमुळे प्रभावित होत असल्या तरी, त्या निर्माण होण्याचे मूळ हे आपल्या शरीरात असते व त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. मानसशास्त्रामध्ये आय.क्‍यू. म्हणजे बुद्ध्यांकाऐवजी ई.क्‍यू. इमोशनल कोशंट म्हणजे भावनांकाला महत्त्व दिले जाते. कारण जीवनातील चढ-उतारांना तोंड देण्यासाठी इमोशनल कोशंट हा बुद्ध्यांकापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो. यालाच विवेकी शहाणपणही म्हटले जाते. वयाच्या ३१ व्या वर्षी लग्नाचा निर्णय घेताना तुमच्या आई-वडिलांची स्वीकृती जरी महत्त्वाची असली तरी, तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारा निर्णय स्वतःच्या जबाबदारीनेच घेणे आवश्‍यक आहे. तुम्ही भावनिक प्रभावाखाली चुकीचा निर्णय किंवा तुम्हाला न पेलवणारा निर्णय घेतलात, तर तुमच्या जोडीदारालाही त्याचे बरे-वाईट, कोणतेही परिणाम भोगावे लागतील. आई-वडिलांनी आत्महत्येची धमकी देणे हेदेखील तुमच्या व पालकांमधील नात्यातील तणाव, गैरसमज दर्शवितो. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय न घेता स्वतःसाठी वेळ घेणे अधिक संयुक्तिक ठरेल. पालकांचे गैरसमज, ताण प्रथम दूर करण्याचा प्रयत्न करा. तज्ज्ञ मध्यस्थांची मदतही घेऊ शकता. पसंत नसलेल्या मुलाला स्वीकारू शकला नाहीत, तर त्यांचीही फसवणूक केल्यासारखे होईल, हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रथम प्रयत्न करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage due to threat of parents