ये कहाँ आ गए हम...

विवाहित पुरुष किंवा विवाहित स्त्री आपला अधिकृत जोडीदार सोडून इतर कुणाच्या प्रेमात का पडतात? कसे पडतात? शारीरिक आणि मानसिक आकर्षणातून निर्माण होणारे संबंध एकदा जुळू लागल्यानंतर ते तोडणं सोपं नसतं.
rekha and amitabh bachchan
rekha and amitabh bachchansakal
Updated on

ये कहाँ आ गए हम

यूँ ही साथ साथ चलते

विवाहबाह्य संबंध हा जसा कौटुंबिक तसाच सामाजिक विषय. सामाजिकदृष्ट्या तर निषेधार्हसुद्धा.

विवाहित पुरुष किंवा विवाहित स्त्री आपला अधिकृत जोडीदार सोडून इतर कुणाच्या प्रेमात का पडतात? कसे पडतात? शारीरिक आणि मानसिक आकर्षणातून निर्माण होणारे संबंध एकदा जुळू लागल्यानंतर ते तोडणं सोपं नसतं. ‘त्या’ दोघांनीही भौगोलिक जवळीक टाळण्याचा प्रयत्न केला तरी मनानं ते एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाहीत. मनाची सतत घालमेल होत राहते. त्यातून पुन्हा शारीरिक जवळिकीची ऊर्मी येत राहते.

आपलं सुखात चाललेलं कुटुंब अशानं विस्कळित होईल हे कळत असूनही प्रत्यक्षात वळत मात्र नाही. स्त्री आणि पुरुष दोघंही दोन्ही बाजूंनी विवाहित असतील तर दोन्ही बाजूंची कुटुंबं विस्कळित होतात. त्या दोघांची बंडखोरी वर उफाळून येते तेव्हा या समस्या अधिकच गंभीर होतात. अशा वेळी त्यांनी विवेक बाळगून भावनेला आवर घालत समाजाचे नीतिनियम आचरणात आणणं यात शहाणपण आहे; जेणेकरून संसार उद्ध्वस्त होणार नाहीत.

आपल्या जिवलग वैमानिक मित्राची होऊ घातलेली पत्नी शोभा हिला दिवस गेले आहेत अशी वार्ता अमितला समजते. याच महिन्यात शोभा आणि वैमानिक यांचा विवाह होणार होता. दरम्यान, वैमानिक युद्धात मृत्युमुखी पडतो. शोभा कुमारीमाता होणार असल्यानं आता तिच्याशी यापुढं कुणी विवाह करणं शक्य नाही असं तिच्या आईनं सांगताच अमित भावनावश होतो. त्याच्यातलं मित्रप्रेम जागृत होऊन मित्राच्या भावी पत्नीला आधार देण्यासाठी तो शोभाशी विवाह करतो.

दोघांचा संसार आता सुखानं सुरू होतो...अचानक एक दिवस अमितला चाँदनी भेटते. चाँदनी ही त्याची विवाहपूर्व प्रेयसी आहे. खरं तर तिचाही डॉ. आनंदशी विवाह होऊन सुखानं संसार सुरू आहे. मात्र, एक-दोन वेळा भेटल्यानंतर त्यांच्यातले पूर्वीचं प्रेम मनात उचंबळून येऊ लागतं आणि त्यांच्या प्रेमसंबंधांचा सिलसिला सुरू होतो. त्याच्या मनात एकसारखे तिचेच विचार नर्तन करू लागतात.

मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बातें करते है

तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती

तुम इस बात पे हैराँ होती, तुम उस बात पे कितनी हँसती

तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता

मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बातें करते है

एकांतात मीच माझ्या मनाशी बोलत असतो असं तो म्हणतो तेव्हा तीसुद्धा त्याला हेच सांगत असते की, प्रेमाची वाटचाल करता करता आपण कुठवर तरी दूर दूरपर्यंत चालत आलो आहोत. तुझ्या बाहुपाशांची आताशा सवय होऊ लागली आहे. माझं अंगप्रत्यंग, माझं मन अगदी विरघळून जातं त्या बाहुपाशात.

ये कहाँ आ गये हम, यूँ ही साथ साथ चलते

तेरी बाहों में है जानम, मेरे जिस्म-ओ-जाँ पिघलते

हा वाऱ्याचा झोत आहे की तुझ्या शरीराचा सुगंध? हा चंद्र आहे की तुझ्या हातातलं कांकण? भवतालच्या निसर्गाच्या सौंदर्याशी तो सतत तिच्या सौंदर्याची तुलना करत असतो. साहजिकच, ती जवळ नसतानाही सतत तिचं अस्तित्व त्याला जाणवत असतं. ती आसपास नाहीये हे वास्तव मान्य करायला तो तयार नाही.

ये रात है, या तुम्हारी ज़ुल्फ़ें खुली हुई है

है चाँदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई है

ये चाँद है या तुम्हारा कंगन

सितारे है या तुम्हारा आँचल

हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू

ये पत्तियों की है सरसराहट

कि तुम ने चुप के से कुछ कहा है

ये सोचता हूँ मैं कब से गुमसुम

कि जब की मुझ को भी ये खबर है

कि तुम नहीं हो, कहीं नहीं हो

मगर ये दिल है कि कह रहा है

तुम यहीं हो, यहीं कहीं हो

तिच्या मनातसुद्धा असंच काही सुरू आहे.

तू जर काया असशील तर मी तुझी छाया आहे. अर्थात्, तू जिथं नसशील तिथं मीपण असणार नाही. आपण ज्या रस्त्यावरून निघालो आहोत तिथं नियतीनं आपली भेट घडणारच होती. एकमेकांच्या प्रेमसागरात आकंठ बुडालेल्या त्या दोघांच्या भौतिक संवेदना, जाणिवा नाहीशा होऊन उरलं आहे प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम.

मेरी साँस साँस महके, कोई भीना भीना चंदन

तेरा प्यार चाँदनी है, मेरा दिल है जैसे आँगन

हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते

ये कहाँ आ गये हम...

...आता मात्र विरह असह्य होऊन त्याच्या आणि तिच्याही मनातली बंडखोरी उफाळून वर यायला लागते. इतर कुणाशी बोलू शकत नाही अशी ही अवस्था. अशी मानसिक घुसमट घेऊन जगणं कुठवर सहन

करायचं? का सहन करायचं? आता असंच वाटतंय की, आपल्या दोघांमधली ही भिंत बेधडकपणे पाडून,समाजाची बंधनं झुगारून देऊन लोकांना एकदाचं सांगून टाकावं. होय! आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही प्रेमिक आहोत. आम्ही प्रेमिक आहोत.

मजबूरी-ए-हालात...इधर भी है, उधर भी

तनहाई की इक रात...इधर भी है, उधर भी

कहने को बहुत कुछ है, मगर किस से कहे हम?

कब तक यूँ ही खामोश रहे, और सहे हम?

दिल कहता है, दुनिया की हर इक रस्म उठा दे

दीवार जो हम दोनो में है, आज गिरा दे

क्यूँ दिल में सुलगते रहे, लोगों को बता दें

हाँ, हम को मुहब्बत है, मुहब्बत है, मुहब्बत...

अब दिल में यही बात...इधर भी है, उधर भी

गीतकार जावेद अख्तर यांनी प्रेमी युगुलाच्या भावना, त्याची घुसमट आणि बंडखोरीचा उन्मेष या लहानशा काव्यात अतिशय ताकदीनं लिहिला आहे. विशेषत: शेवटच्या कडव्यातला शब्द न् शब्द बंडखोरी अधिकच वजनदार करतो. संवादलेखन सोडून त्यांनी लिहिलेलं हे पहिलंवहिलं सिनेगीत. ‘ये कहाँ ऽऽ आ गये हम ऽऽ‘ अशी विलक्षण तान घेत लता मंगेशकर यांनी केलेली गाण्याची सुरुवात फार आकर्षक आहे.

‘तेरी बाहों में है जानम मेरे जिस्म-ओ-जाँ पिघलते’ या पंक्तीत त्यांनी केलेल्या शब्दोच्चारांमळे खरोखरीच नायिकेच्या मनातली विव्हलता स्पष्टपणे जाणवते.

लता मंगेशकर यांच्या जोडीला अमिताभ बच्चन यांचा स्वत:चाच आवाज घेण्याची संगीतकार शिव-हरी (संतूरवादक शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया) यांची कल्पना मस्त. गद्य स्वरूपातले संवाद फेकावेत ते अमिताभनंच! त्याची ही कला, त्याचा धारदार आवाज यांचा खुबीनं वापर करत त्यानं हे गद्यवजा गीत गायिलं आहे.

गाणं सुरू होताना संतूरचे हलकेसे सूर येतात. पाठोपाठ अमिताभचा स्वर येतो : ‘मैं और मेरी तनहाई अक्सर ये बाते करते है...’ त्याच्या स्वगतानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात गाणं सुरू होतं. वेगळ्याच धाटणीची चाल संगीतकार शिव-हरी यांनी दिली आहे आणि ती अतिशय मनोवेधक आहे. हे वेगळ्या वाटेवरचं संगीत आहे.

मध्यम वयातल्या रेखाचं सौंदर्य खरोखर वाखाणण्याजोगं आहे. तिनं अभिनयसद्धा चांगला केला आहे. आणि अमिताभ बच्चन! काय लिहावं त्याच्या अभिनयाविषयी? एरवी, अँग्री यंग मॅन असलेल्या या अभिनेत्यानं गाण्यातले प्रणयप्रसंग ज्या हळुवारपणे आणि नजाकतीनं अभिनित केले आहेत ते फार उच्च दर्जाचे आहेत. एकाकी मनःस्थिती, प्रेयसीच्या स्मृतीनं मनात येणारा हळवेपणा आणि अखेर मनातला उद्वेग असे हे अभिनयाचे पैलू अतिशय चमकदार आहेत.

त्याचा पेहरावपण प्रत्येक भावनेला साजेल असा बदलता आहे. दोघांनीही हळुवारपणे सादर केलेल्या प्रणयप्रसंगांना दाद द्यावीशी वाटते. ‘दीवार जो हम दोनों में है, गिरा दे’ या पंक्तीच्या वेळी एका बाजूला पत्नी जया बच्चन दिसते, तर दुसऱ्या बाजूला प्रेयसी रेखा दिसते आणि मधोमध प्रेयसीकडे पाहणारा अमिताभ. दिग्दर्शकीय कौशल्याचा हा उत्कृष्ट नमुना. गाण्याचं चित्रीकरण कमालीचं नेत्रसुखद आहे.

त्यांचं बहरणारं प्रेम दर्शवताना दिग्दर्शक यश चोपडा यांनी बहरलेल्या ट्युलिपच्या फुलांची पार्श्वभूमी निवडली आहे. लाल-गुलाबी-पिवळ्या-निळ्या अशा विविधरंगी ट्युलिपचे ताटवे, उंच वृक्ष आणि वातावरणात थंडीतली धुंदी हे सगळं नेत्राकर्षक आहे. ॲमस्टरडॅमच्या कोकेनहाफ गार्डनमधल्या वातावरणाचा जणू प्रत्यक्ष ‘फील’ गाणं बघताना प्रेक्षक घेतो.

सन १९८१ च्या ‘सिलसिला’ चित्रपटातल्या या गाण्यात यश चोपडा यांनी चारही अंगांनी असे रंग भरले आहेत की शब्दरचना, संगीत, अभिनय आणि विशेष म्हणजे ट्युलिप गार्डनचं अतीव सुंदर चित्रीकरण या प्रत्येकावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

‘मुसाफिर हूँ यारों...’ या गेल्या आठवड्यातल्या लेखाच्या (ता. १९ मे २०२४) अखेरीस ‘शबनम’ या सिनेमाविषयीचा मजकूर असून, ‘त्या सिनेमात दिलीपकुमार याची नायिका कानन कौशल होती,’ असा उल्लेख त्यात आहे. तिथं ‘कानन कौशल’ऐवजी ‘कामिनी कौशल’ असं हवं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.