काश्‍मिरातील मार्तंड सूर्य मंदिर

या वेळच्या काश्मीर भेटीत एक नक्की ठरवलं होतं. नेहमीची, प्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहण्यात वेळ घालवायचा नाही.
martand surya mandir in kashmir
martand surya mandir in kashmirsakal

या वेळच्या काश्मीर भेटीत एक नक्की ठरवलं होतं. नेहमीची, प्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहण्यात वेळ घालवायचा नाही. किशनगंगा नदीच्या खोऱ्यातील गुरेझ व्हॅलीकडं जाण्यापूर्वी माझ्याकडं श्रीनगरमध्ये घालवण्यासाठी फक्त एकच दिवस होता. त्या एका दिवसात मला श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या दोन प्राचीन हिंदू मंदिरांना भेट द्यायची होती. ही मंदिरे अतिशय प्राचीन तर आहेतच; पण आज घडीला त्यांची अवस्था जवळपास खंडहर झालेली आहे. तरीही ती पाहण्याची मनस्वी इच्छा होती.

आम्हाला एअरपोर्टवर घेण्यासाठी जहान नावाचा, एक देखणा काश्मिरी तरुण आला होता. अतिशय शांत, अदबीनं बोलणारा जहान पुढील चारपाच दिवस आमच्यासोबत असणार होता. त्याच सकाळी, ही मंदिरं पाहण्यासाठी बाहेर पडलो. श्रीनगरपासून साधारणपणे ऐंशी किलोमीटर अंतरावर, अनंतनाग जिल्ह्यामध्ये हे मार्तंड सूर्य मंदिर आहे. तत्पूर्वी वाटेत असणारं अवंती स्वामी मंदिर पाहून पुढं जायचं असा काहीसा कार्यक्रम ठरला होता.

श्रीनगरपासून केवळ सत्तावीस किलोमीटर अंतरावर असणारं, अवंती स्वामी नावानं ओळखलं जाणारं विष्णू मंदिर पाहण्यासाठी आम्ही शहराच्या बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरून आमचा प्रवास सुरू झाला. श्रीनगर ते कन्याकुमारी म्हणजेच आसेतू हिमाचल असा धावणारा हा महामार्ग त्या क्षणी अतिशय आपलासा वाटला.

एकतर आपलं असलेलं काश्मीर आता खऱ्या अर्थानं आपलसं वाटत होतंच. त्यात देशाच्या दुसऱ्या टोकाला थेट घेऊन जाणार्‍या रस्त्यावर आपण आहोत ही भावना उगाचच मनाला कावरंबावरं करीत होती. वाटेत पँपोरनंतर रस्त्याच्या कडेला असणारी केशराची शेतं नजरेला पडली. लेठीपोरा गावातील काही शेतामध्ये अद्यापही एखाद दुसरं जांभळ्या रंगाचं जमिनीलगत फुललेलं फूल दिसत होतं. केशराची जांभळ्या रंगाची ती चिमुकली फुलं पाहून न राहवून कार थांबवून मी खाली उतरले.

केशराचा सिझन संपत आलेला होता. एखाददुसरं फुल इथं तिथं फुलल्याचे दिसत होतं. केशराचं पीक फक्त तीन महिन्यांत येते. जुलैच्या पहिल्या पावसानंतर पेरणी होते आणि ऑक्टोबरपर्यंत फुलं तयार होऊन केशर गोळा केलं जातं. फुलांपासूनही सरबत वगैरे तयार केलं जातं असं जहाननं सांगितलं. अख्ख्या काश्मीरमध्ये फक्त पँपोरच्या आसपासच्या काही भागातच केशर पिकवलं जातं, इतरत्र नाही. निसर्गाचे पण काय नियम असतील कुणास ठाऊक...!

अवंती स्वामी मंदिराचं भव्य आवार पाहून मी चकित होऊन गेले. चारही बाजूंनी भव्य दगडी बंदिस्त आवार असलेलं हे मंदिर पूर्णतया भग्न अवस्थेत होतं. ते अवशेष पाहून काश्मीरमधील मंदिर स्थापत्यशैलीचा आणि दगडातील बांधकामाचा अंदाज आपल्याला येत होता. परंतु, एका अत्यंत सुंदर मंदिराचे पडझड झालेले भग्नावशेष पाहून मनाला क्लेष तर झालेच पण कोरीव कामाचा उत्कट कलाविष्कार अशा तऱ्हेनं मातीत विखुरलेल्या अवस्थेत पडलेला पाहून अतिशय दु:खही झालं.

हे भव्य मंदिर राजा अवंतीवर्मन यानं नवव्या शतकात (८५३-८५५ इ.स.) बांधलं होतं. ‘उत्पाला’ राजवंशाची स्थापना या राजानंच केली होती. ‘विश्वसर’ या नावाच्या शहराजवळ त्यानं ‘अवंतीपूर’ नावाचं राजधानीचं शहर वसवले. त्याच्या राज्यकाळात उत्पाला राज्याची अतिशय भरभराट झाली होती असं मानलं जातं.

आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक हिंदू मंदिरांची निर्मिती केली होती. त्या काळात काश्मीर प्रामुख्यानं हिंदू धर्मीयांचं, तसेच शैव पंथीयांचं महत्त्वाचं केंद्र होतं. लोकांमध्ये हिंदू धर्माबद्दल आस्था होती. संस्कृत भाषेचं माहेरघर असणाऱ्या काश्मीरमध्ये अनेक विद्वान पंडित होते, ज्यांच्याद्वारे विविध संस्कृत वाङ्मयाची निर्मिती होत होती.

हिंदू धर्माचं तसंच हिंदू धर्मग्रंथांचं महत्त्व लोकांना माहीत होते. अवंती स्वामीचं हे मंदिर विष्णूदेवासाठी निर्माण केलं होतं. परंतु आता पूर्णपणे खंडहर झालेल्या या मंदिरात कुठल्याही देवतेची मूर्ती आता अस्तित्वात नाही. काही शिल्पपट पाहायला मिळतात, परंतु त्यांची अतिशय झीज झालेली आहे. त्यामुळं बहुतेक शिल्पपटांची, तसेच शिल्पमूर्तींची ओळख करणंही अतिशय अवघड आहे.

आम्ही तेथे असलेल्या एकुलत्या एका गाइडला माहिती सांगण्यासाठी ठरवलं. पण त्या तरुणाला फारशी माहिती नाही हे माझ्या लगेचच लक्षात आले. कारण मी स्वत: गेली अनेक वर्षं पर्यटन खात्याची गाइड म्हणून काम करते आहे... ना त्याला हिंदू धर्माची व्यवस्थित माहिती होती ना हिंदू देवीदेवतांची... पण मंदिराबद्दलची अतिशय जुजबी आणि इकडची तिकडची माहिती सांगून त्यानं माझ्याकडून ठरलेली फी वसूल केली. असो,

एका आयताकार, स्तंभाधारित तटबंदीनं बंदिस्त अशा विशाल प्रांगणामध्ये संपूर्ण मंदिराचे भग्नावशेष इथं-तिथं विखुरल्याचे पाहायला मिळते. काळा बॅसॉल्ट पाषाणाच्या अतिशय मोठमोठ्या शिळांच्या साहाय्याने बांधलेले स्तंभ गतकाळातील वैभवाच्या खाणाखुणा दर्शवत मूकपणे उभे आहेत. मंदिराच्या तटबंदीला पश्चिमेकडं भव्य प्रवेशद्वार आहे. प्रचंड आकाराचे स्तंभ उंंच जोत्यावर उभे आहेत.

आपल्याला पायर्‍या चढूनच वर जावं लागते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस भिंतींवर बरेच कोरीव काम केल्याचे दिसून येते. काही शिल्पपटातून अजूनही बारीक कलाकुसर आणि आणि यक्षप्रतिमांचं अंकन ओळखता येतं. भिंतीवर काही ठिकाणी देवकोष्ठ असून त्यातील देवतांच्या मूर्ती मात्र ओळखण्याच्या पलीकडे छिन्न झालेल्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वाराची भव्यता पाहिल्यानंतर आपल्याला त्या काळातील काश्मिरी मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा अंदाज येतो.

अवंती स्वामी मंदिर पंचायतन असून मुख्य मंदिराचे अवशेष प्रांगणाच्या मध्यभागी पाहायला मिळतात. प्रांगणाच्या चारही कोपर्‍यात लहान आकाराच्या मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. या मंदिरामध्ये कोणत्या देवता होत्या याचा अंदाज करता येत नाही... कारण फक्त पाया आणि काही भिंती एवढेच अवशेष शिल्लक उरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या समोरील भग्न स्तंभाच्या तळाकडील भागावर काही शिल्पपट पाहायला मिळतात.

त्या ठिकाणी बहुदा कामदेव, राजा अवंतीवर्मन, राणी अशा काही प्रतिमांचे अंकन केल्याचे पाहायला मिळाले. पंधराव्या शतकात आलेल्या मुस्लिम शासकांनी काश्मीरमधील बहुतांशी हिंदू मंदिरांचा विनाश केला. त्यामुळेच या सुंदर मंदिरांचे भग्नावशेष पाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे, हे सत्य नाकारता येत नाही.

राजा अवंतीवर्मन हा कश्यप समाजातील असल्यामुळेच काश्मीरला काश्मीर हे नाव मिळाले असं मानले जाते. अवंतीपोरा मधील अवंती स्वामी मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही मार्तंड सूर्य मंदिर पाहण्यासाठी निघालो. हे मंदिर अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे. काही वेळातच राष्ट्रीय महामार्ग सोडून अनंतनागकडे जाणारा रस्ता घेतला.

काश्मीर खोर्‍यातील हे मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनागपासून नऊ किलोमीटर अंतरावर, मट्टन गावातील एक उंच टेकडीवरील प्रशस्त पठारावर बांधण्यात आले होते... या जागेपासून संपूर्ण काश्मीर खोर्‍याचं विहंगम दृश्य नजरेला पडतं...! आज जरी हे सूर्य मंदिर पूर्णपणे खंडहर अवस्थेत आहे तरी त्याचे भग्नावशेष पाहिल्यानंतर या मंदिराच्या भव्यतेची सहज कल्पना करता येते. विशेष म्हणजे मंदिराचा आराखडा आणि स्थापत्यशैली अवंती स्वामी मंदिरासारखीच आहे. त्यावरून आपल्याला काश्मीर येथील मंदिरांच्या वास्तुशैलीची कल्पना करता येते.

मुख्य मंदिराच्या सभोवती दगडात बांधलेली भक्कम तटबंदी आहे. उंच स्तंभांवर आधारित या तटबंदीमध्ये जवळजवळ चौर्‍याऐंशी देवकोष्ठ आहेत. आता या कोष्ठांमध्ये कुठल्याही देवतेची मूर्ती नसली, तरी कधी काळी या सर्व लहान मंदिरांमध्ये विविध देवदेवतांची पूजा होत असावी असं वाटतं. विस्तीर्ण प्रांगणाच्या मध्यभागी मुख्य सूर्य मंदिर असून त्याची लांबी दोनशे वीस फूट तर रुंदी एकशे बेचाळीस फूट आहे. मार्तंड सूर्य मंदिर इसवी सनाच्या आठव्या शतकात, कर्कोटा राज्यकर्त्यांच्या शासनकाळात, तृतीय राजा ललितादित्य मुक्तपिदा यांनी बांधलं होतं, अशी मान्यता आहे.

काहींच्या मते मंदिराचं निर्माणकार्य चौथ्या किंवा पाचव्या शतकात राजे रणादित्य यांच्या काळात सुरू झाले होते. मात्र पंधराव्या शतकात काश्मीर खोर्‍यात राज्य करणारा मुस्लिम शासक सुलतान सिकंदर शाह मीर यानं या मंदिराची तोडफोड केली. मार्तंड मंदिराची सध्याची दयनीय अवस्था होण्यासाठी काश्मीर खोर्‍यात झालेले भूकंपही कारणीभूत आहेत, असेेही म्हटले जाते.

पण मंदिरांचा विध्वंस करण्याचे श्रेय तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांकडं जातं ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही. काळाच्या ओघात मार्तंड मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. पण पुरातत्त्व खात्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे पुनर्निर्माणाचे कार्य करून सद्यःस्थितीतील मंदिर उभे केलेले आहे.

मंदिराच्या प्रांगणाचं मुख्य प्रवेशद्वार तटबंदीच्या पश्चिम भिंतीमध्ये असून त्याचा आकार भव्य आहे. विशेष म्हणजे मुख्य सूर्य मंदिराचे प्रवेशद्वार आणि तटबंदीतील प्रवेशद्वार दोन्ही पश्चिम दिशेस, एकाच सरळ रेषेत असून, आकारही एकसारखा आहे. प्रचंड आकाराचे स्तंभ आणि उंच कमान यामुळे पडझड झालेली असूनही मंदिराची भव्यता डोळ्यात भरते. मंदिर बांधण्यासाठी वापरलेले दगड किंवा चिरे आकाराने मोठे आहेत.

एकूणच, काश्मिरी शैलीमध्ये बांधलेल्या या मंदिराची भव्यता उठून दिसते. शिवाय काश्मिरी मंदिर वास्तुशैलीवर गांधार, गुप्ता तसेच चिनी स्थापत्य शैलीचा प्रभाव असल्याचे ठळकपणे जाणवते. मंदिरातील कमानींची रचना वेगळ्या पद्धतीची असल्याचे जाणवते. काही ठिकाणी कोरीव कामाचे जीर्णशिर्ण झालेले शिल्पपट पाहायला मिळतात; पण त्यांची ओळख पटणे अशक्य आहे.

तटबंदीमध्ये असलेल्या लहान आकाराच्या मंदिरांमध्ये कुठली देवता होती यांचा अंदाजही करता येत नाही. सूर्य मंदिराच्या आजूबाजूला काही लहान मंदिरांची जोती (पाया) किंवा स्तंभाचे भग्नावशेष विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून येते. स्तंभ शीर्ष असणारे आमलक पद्धतीचे गोल कोरीव दगड, काही ठिकाणी स्तंभांच्या पायाकडे असणारे चौकोनी आकाराचे कोरीव दगड इतस्तत: पडलेले पाहून मनस्वी दु:ख होते.

प्रत्यक्ष मंदिराच्या भिंतीवरही बर्‍यापैकी कोरीव काम केलं असावं. परंतु आता मात्र ते अजिबात ओळखू येत नाही. मुख्य म्हणजे तीन ते चार महिने मंदिरावर बर्फाची चादर आच्छादलेली असल्याकारणानं कोरीव काम झिजून गेलं आहे. काही ठिकाणी लहान लहान देवकोष्ठांमधून मूर्ती कोरल्याचे लक्षात येतं. त्यापैकी एक विष्णू आणि दुसरी शिवप्रतिमा असावी असे वाटते. काही देवकोष्ठांमध्ये स्त्री प्रतिमा आहेत; परंतु त्यांची ओळख ठरवता येत नाही.

शिल्पाकृतींच्या कोरीव कामात रेखीवपणाचा अभाव तीव्रतेने जाणवतो. देवकोष्ठांची रचना द्रविड शैलीपेक्षा खूप वेगळी आहे. मंदिराची भव्यता पाहिल्यानंतर; हे मंदिर त्याच्या पूर्ण रूपात उभं असताना कसे दिसत असेल याची मनोमन कल्पना करताना मन बैचेन होऊन गेले. मंदिराच्या सभोवती अतिशय सुंदर बगिचा आहे.

त्यात फुललेल्या गुलाब फुलांना पाहूनही मन अगदी सैरभैर होऊन गेलं होतं. काश्मीर भेटीदरम्यान तेथील निसर्ग सौंदर्य पाहण्याचा आनंद अवर्णनीय असतोच. पण ही दोन्ही मंदिरं पाहिल्यानंतर खंडहर असूनही सुंदर आणि भव्य काहीतरी पाहिल्याचं समाधान मिळतं हे नक्कीच.

(लेखिका ह्या देश-विदेशात भ्रमंती करत असतात, विशेष स्वरूपाच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारी काही पुस्तकं तसंच अजिंठा इथल्या लेणींवरील त्यांचं संशोधनात्मक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com