

Master Dinanath Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
मास्टर दीनानाथ यांच्या कंपनीचा लिलाव झाला, त्यानंतर त्यांचे सहकारी, काही कलाकार, नातेवाईक त्यांना सोडून गेले. त्यांच्या भावाला त्याचवेळी नोकरी लागली, त्याने त्यांना वेगळाच पर्याय दिला, पण मास्टर दीनानाथ यांनी तो तत्काळ नाकारला, तो पर्याय नाकारण्याची कारणेही सांगितली. त्या वेळी त्यांनी लता बालसरस्वती असल्याचा निर्वाळा दिला. हे सारे माईंनी या मुलांना सांगितले. ते हृदयनाथ सांगत आहेत या भागात...
विजयाबाईंना ती परिस्थिती सहन होत
नव्हती. त्यांचे अश्रू थांबतच नव्हते.
‘‘अरे ! मी कितीतरी दिवसांनी आज
आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
आणि नेमके त्याच वेळी तुम्ही रडता?’’
मालकांचा लहान भाऊ कमलनाथ खोलीत
येत ओरडला. मालकांसारखाच सुंदर,
पण उंच, गोरापान, शिडशिडीत अंगाचा,
काळी पॅंट आणि पांढरा शर्ट.
मालकांपेक्षा अगदी वेगळा, सगळ्या वर्तनावर
आंग्ल पद्धतीची छाप पडलेला.
‘‘अरे कमा ! ये किती दिवसांनी आलास तू?
आम्ही रडत नव्हतो. काहींचे चेहरे हसताना,
रडके दिसतात, इतकेच. पण तू नाराज होऊ
नकोस. दुःखात मला हसण्याची वाईट सवय आहे.
आईना आज फिर रिश्वत लेता पकडा गया
दिलमे दर्द था और चेहरा हसता पकडा गया
(आरसा लाच घेताना आज पुन्हा एकदा
पकडला गेला.
हृदय दुःखाने भरले होते. चेहऱ्यावरील
हास्य मात्र पकडले गेले.)
अरे, ही विजया उद्या बडोद्याला जाणार,
आपणा सर्वांना सोडून जाणार म्हणून दुःखी
आहे. ते जाऊ दे! तू आनंदाची काय बातमी
आणली आहेस? लवकर सांग, कारण
कालपासून मी फक्त दुःखाच्या, कर्जाच्या,
मला एकटं सोडून जाण्याच्या, बातम्या
ऐकतोय.’’
‘‘दीना ! कॉलेज परीक्षेत मी पास झालो.
आणि काय आश्चर्य बघ. मला मुंबईला
नोकरी मिळाली आणि राहायला जागाही
मिळाली. हे सर्व तुझ्या आशीर्वादाने झाले.
नाहीतर, गोव्यात मंदिराचा आवारा साफ करीत,
श्रीमंगेश मंदिरात नगारा पिटत मी बसलो असतो,
गोव्यातून आणून मुंबईला तू मला
शिकायला ठेवले, म्हणून हे सारे घडले.’’