अजरामर ‘माया’

‘माया’ वाघिणीच्या नशिबी पिल्लांचे भाग्य फारसे आले नाही. मात्र, तिच्या बेधडक स्वभावामुळे ती पर्यटकांत चांगलीच लोकप्रिय होती.
Maya Tiger
Maya Tigersakal

- संजय करकरे

‘माया’ वाघिणीच्या नशिबी पिल्लांचे भाग्य फारसे आले नाही. मात्र, तिच्या बेधडक स्वभावामुळे ती पर्यटकांत चांगलीच लोकप्रिय होती. ‘माया’ची ॲक्शन, तिची शिकार आणि तिचे अनोखे वागणे कौतुकाचे ठरले. ‘माया’च्या आयुष्यातील काही घटना मात्र तिला काळ्या यादीत टाकणाऱ्या ठरल्या. अचानक एके दिवशी ती बेपत्ता झाली. व्याघ्र प्रकल्पाने तिच्यासाठी मोठी शोधमोहीम राबवली; पण काहीच निष्पन्न झाले नाही. तिचे अस्तित्व पृथ्वीतलावरून पुसले गेले. एक वाघीण अजरामर कशी होऊ शकते हे जणू तिने दाखवून दिले.

हजारो वन्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘माया’ वाघीण पिल्लांच्या बाबतीत कशी कमनशिबी ठरली हे आपण गेल्या भागात समजून घेतले. ‘माया’च्या नशिबी पिल्लांचे भाग्य फारसे आले नसले तरी तिला तिच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे जी कीर्ती, प्रसिद्धी मिळाली ती चकित करणारीच आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्राला भेट देणारा प्रत्येक पर्यटक तिच्या क्षेत्रात येतच असे. साहजिकच ती सातत्याने प्रसिद्धीच्या झोतातच राहिली. जी प्रसिद्धी देशातील मोजक्या वाघांना मिळते, त्याच्यात ‘माया’चा खूपच वरचा क्रमांक होता.

मला आठवते, गेल्या वर्षी २३ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही व्याघ्र प्रकल्पाच्या बसमधून जंगल भ्रमंती करीत होतो. तेव्हा ताडोबा तलावाच्या काठावर ‘माया’ बसल्याचे आम्हाला तिथे लागलेल्या जिप्सींच्या गर्दीवरून लक्षात आले. ती पाण्याच्या कडेला बसली होती. तलावाच्या काठावरून पांढरपवनीकडे जाणारा हा रस्ता दोन्ही बाजूंनी उंच असून खोलगट भाग असल्याने साहजिकच जिप्सी हळुवारपणे न्यावी लागते.

वाघिणीच्या दर्शनाने मोठी रांग तिथे लागली होती. गाडीतील मुलेही वाघिणीच्या बातमीने उत्साही होती. आमच्या गाडीचा चालक संदीप पाटील याने जिप्सीवाल्यांना सूचना देत, मिनीबस बऱ्यापैकी पुढे नेली. या वेळी डाव्या बाजूला पाण्याच्या काठाला बसलेली ‘माया’ वाघीण आम्हा सर्वांना दिसली. तिची पाठ आमच्याकडे होती. तिचे लक्ष समोरच्या बाजूला होते.

साधारण दहा-बारा मिनिटांनी ही महाराणी बाहेर आली आणि हळुवारपणे समोरच्या बाजूला चालू लागली. या वेळी पलीकडच्या जांभळाच्या झाडातून दोन सांबर पाणी प्यायला तलावाजवळ येत होते. पाण्याच्या काठावर पडलेल्या झाडांमुळे आणि जांभळाच्या झाडांची गर्दी झाल्याने साहजिकच त्यांना ‘माया’ नक्कीच दिसली नसणार. तिचा संपूर्ण भावच बदलून गेला.

शिकारीच्या तयारीत ती जमिनीलगत दबून हळूहळू झाडांचा आडोसा घेत, सांबरांच्या दिशेने सरकू लागली. त्या वेळी रस्त्यावर साधारण चाळीसहून अधिक जिप्सी होत्या. आता पुढे काय थरार बघायला मिळणार या विचाराने सर्व जण स्तब्ध झाले होते. अनेकांचे कॅमेरे ‘माया’ आणि सांबराकडे रोखले गेले होते. दोन्ही सांबर हळूहळू चालत, शेपट्या वर करून दबकत पाण्याजवळ गेले.

ते पाण्याला तोंड लावत असतानाच ‘माया’ त्या अडगळीच्या जागेतून सुसाट त्यांच्यावर धावून गेली. समोर असणाऱ्या झाडांमुळे आम्हाला आमच्या जागेवरून कळले नाही; पण हे लक्षात आले की सांबरांनी जोरदार अलार्म कॉल केला आणि ती समोरच्या बाजूला पाण्याच्या काठाने स्वतःचा बचाव करून पळून गेली.

शिकार हुकली; परंतु साधारण पंधरा-वीस मिनिटांत जे काही चित्तथरारक त्या ठिकाणी घडले ते तिथे असणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात, हृदयात आणि कॅमेऱ्यातही बंदिस्त झाले. त्यानंतर ‘माया’ तलावाच्या काठाने चालू लागल्यावर सर्व गाड्या तिच्या समांतर जाऊ लागल्या. अचानक तिच्या मनात काय विचार आला, तिलाच ठाऊक. तिने तेथून माघार घेतली आणि पुन्हा ती वळून आमच्या गाडीच्या दिशेने यायला लागली.

या वेळी तिला रस्त्याच्या उजव्या बाजूला जायचे होते. ती एका जिप्सीच्या मधून जाण्याचा प्रयत्न करणार होती; पण गाड्यांची इतकी गर्दी होती की तिला वाटच मिळेना. या वेळेस मी फोटो काढायचे बंद करून तिचा व्हिडीओ घेण्यात मग्न होतो. ‘माया’ने एका जिप्सीच्या मागच्या बाजूला तोंड लावून चक्क वास घेतला आणि ती पुन्हा मागे सरकली. तिची आणि माझी ती शेवटची भेट ठरली.

‘माया’ वाघिणीबाबत हेच घडत राहिले. झोपलेली, पाण्यात निवांत बसलेली अथवा कंटाळवाणी व  निरुत्साहाने फिरणारी ‘माया’ फार कमी बघायला मिळाली. सतत तिची ॲक्शन, तिची रिॲक्शन, तिच्या हालचाली, तिची शिकार आणि तिचे अनोखे वागणे कायमच कौतुकाचे अन् आगळावेगळा अनुभव देणारे ठरले. या सर्व प्रकारामुळेच पर्यटन क्षेत्रात अधिराज्य गाजवणारी ही वाघीण सातासमुद्रापार न पोहोचली तर आश्चर्यच.

राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात कायम चित्रीकरण करणाऱ्या नल्ला मुथू यांना ‘माया’ वाघिणीने भुरळ घातली. या सुप्रसिद्ध फिल्ममेकरने चार वर्षांपूर्वी आपला मोर्चा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या वाघिणीकडे वळवला. आपल्याला ‘माया’ वाघिणीवर फिल्म का करावीशी वाटली हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना गेल्या आठवड्यात फोन केला.

नल्ला यांना गेल्या चार वर्षांत अनेक वेळा मी जिप्सीतून या वाघिणीच्या मार्गावर फिरताना बघितले होते. अनेक वेळा आम्ही जंगलात थांबून चर्चाही केली होती. ते म्हणाले, ‘‘मी काही वर्षांपूर्वी या वाघिणीबद्दल ऐकले होते. मग या बिनधास्त आणि पर्यटकांना सहजतेने दर्शन देणाऱ्या वाघिणीवर फिल्म करावी, या उद्देशाने मी साधारण चार वर्षांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलो.

विशेष परवानगी घेऊन मी हजारो तास या वाघिणीच्या मागावर, तिचे चित्रीकरण करत फिरलो. उन्हातानात दिवसभर; तर कधी कधी तिचे काही  आठवडे दर्शन न घेताही या जंगलात दिवस घालवले. गेल्या चार वर्षांत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक दुःखद आणि सुखद प्रसंगांत मी उपस्थित होतो. साधारण ९० मिनिटांचे तीन ते चार भाग होतील इतके खणखणीत फुटेज माझ्याजवळ आहे.

तिच्या शेवटच्या तीन पिल्लांचा जन्म आणि एका आईने त्यांना अन्य नर वाघापासून वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न माझ्या फिल्मचा विषय आहे. या सर्व अवघड परिस्थितीत तिने स्वतःला कशा पद्धतीने वाचवले हे मला टिपता आले. आता चित्रीकरण झाले आहे. उर्वरित सोपस्कार पार पडल्यानंतर बघू कधी रिलीज होईल?’

नल्ला यांची प्रत्येक फिल्म ही डॉक्युमेंटरी राहत नाही. प्राण्यांच्या, वाघांच्या भावभावना टिपणारी आणि माणसांना जोडणारी ती फिल्म बनते. साहजिकच ‘माया’च्या बाबतीत गेल्या काही वर्षांत जो काही संघर्ष आला, जे काही कठीण प्रसंग आले ते निश्चितच त्यांच्या फिल्ममधून प्रतिबिंबित होणार याबाबत दुमत नाही.

‘माया’च्या आयुष्याच्या पटलावरील काही घटना तिला काळ्या यादीत टाकणाऱ्या ठरल्या. २०२१च्या नोव्हेंबरमध्ये कोलाराजवळ जंगलात घडलेला महिला वनरक्षकाचा मृत्यू, ताडोबा तलावाच्या जवळ फायर लाईनवर ‘मटकासूर’ वाघासोबत असताना वनमजुराचा मृत्यू तसेच बामनगाव व कोलाराच्या दरम्यान गवत कापण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या मृत्यूमध्ये या वाघिणीचा सहभाग राहिला.

महिला वनरक्षकाच्या मृत्यूनंतर तर काही काळासाठी हा सर्व परिसर पर्यटकांसाठीही बंद करण्यात आला. या सर्व घटना अपघाताने घडल्या असल्या तरीही इतकी शांत आणि संयमी वागणारी ही वाघीण या घटनांमध्ये कशी गुंतली, हा प्रश्न मला कायम पडतो.

‘माया’ने आपल्या पाचव्या बाळंतपणातील एकमेव पिल्लू जगवण्यासाठी खूप धडपड केली. बरेच काळ ती ताडोबा तलावाच्या मागच्या बाजूला अथवा ताडोबा येथील मानवी वस्तीच्या जवळपासच राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मात्र, हे अतिशय अल्लड पिल्लूही नर वाघाकडून मारले गेले.

साधारण पावसाळ्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र बंद झाल्यानंतर पर्यटकांचे फिरणेही थांबते. साहजिकच या जंगलातील वाघांचा फारसा पत्ता बाहेरच्या जगाला कळत नाही. या काळात जंगलही हिरवे आणि दाट असल्याने आडवाटेने फिरणेही अवघड होऊन जाते. याच सुमारास ‘माया’ वाघीण बेपत्ता झाल्याचे बोलले जाते.

ऑक्टोबरमध्ये पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्यानंतर ‘माया’ वाघिणीचा ठावठिकाणा कळत नव्हता. साहजिकच हळूहळू ही सुप्रसिद्ध वाघीण दिसत नसल्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून आल्या. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाने एक मोठी मोहीम राबवून तिचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला; पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

‘माया’ बेपत्ता झाल्यानंतर तिच्या क्षेत्रात तिच्याच वयाची असणारी ‘छोटी तारा’ तसेच त्याच्याहून अनेक वर्षांनी लहान असणारी ‘रोमा’ वाघीण शिरल्याचे लक्षात आले. निसर्ग कोणासाठी थांबत नाही याची प्रचिती या प्राण्यांच्या वावरातून आपल्याला सहजतेने लक्षात येऊ शकेल. ‘माया’ उतारवयाकडे झुकली होती. वयाची तेरा वर्षे तिने पूर्ण केलेली होती. तिचा एक डोळा अंधुक झाल्याचेही अनेकांच्या लक्षात आले होते.

या उतारवयात या सुप्रसिद्ध वाघिणीशी कोण जाऊन भिडले की तिला आपल्या आयुष्यातूनच उठून जावे लागले, हे पडलेले कोडे अजून तरी उलगडलेले नाही. ‘माया’ बेपत्ता झाली, ती या पृथ्वीतलावरून पुसली गेली, ती नाही हे आजही अनेक गाईड व पर्यटक बोलून दाखवतात. ‘माया’च्या क्षेत्रात गेल्यानंतर आज तिच्या अनेक गोष्टींना अन् तिच्या वागण्याला गाईडकडून उजाळा दिला जातो. प्रसिद्ध झालेल्या वाघांच्या नशिबी हे सारे येते.

एक वाघीण अजरामर कशी होऊ शकते, हे जणू ‘माया’ने दाखवूनच दिले आहे!

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com