
मैदा, तेल, साखर आणि मीठ हे चार जिन्नस एकत्रित करून विशिष्ट तापमानाला तापलेल्या भट्टीत आत डकवलेला पांढरा फटफटीत पिठाचा गोळा भाजून बाहेर येतो तेव्हा त्याचे सोने झालेले असते. दुरून कुठूनही आणि डोळे बंद असतानाही मनाचा आणि पोटाचा ताबा घेणारा त्याचा दरवळ आपले अस्तित्त्व सिद्ध करतो. वरून सोन्याप्रमाणे चकाकणारा, खरपूस पापुद्र्याचा, आतून मुलायम, दोन हातांनी फाडल्यानंतर नजरेस पडणारी त्याची जाळीदार रचना आणि त्याचा एक तुकडा पोटात गेल्यावर मिळणारे समाधान या सर्व गोष्टी दररोज जमवून आणणं ही सोपी गोष्ट नाही. बेकरीचे पदार्थ रंगरूप आणि चवीने आकृष्ट करतात; परंतु वर्षानुवर्षे त्याची भट्टी जमवून आणणं, चव जिभेवर रेंगाळत ठेवणं आणि त्या जागेशी अनेकांचा ऋणानुबंध तयार होणं यासाठी समर्पण लागते. अलिबागची ‘मयूर बेकरी’ याचे उत्तम उदाहरण आहे.