पैलू व्यक्तिमत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meenal Thipse writes Aspects of personality

मनुष्यस्वभावाच्या विविध छटा एकाच घरात पाहायला मिळतात. कुणी रागीट, कुणी हळवा, कुणी बोलघेवडा, कुणी जिद्दी, कुणी अबोल! हळूहळू एकाच घरात वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं आकारास येत असतात.

पैलू व्यक्तिमत्त्वाचे

घर म्हणजे चार भिंती नव्हेत! घर म्हणजे मायेचं छप्पर, त्यातली माणसं, नातीगोती! आणि या माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावांची सांगड घालणारं एक सूत्र. मनुष्यस्वभावाच्या विविध छटा एकाच घरात पाहायला मिळतात. कुणी रागीट, कुणी हळवा, कुणी बोलघेवडा, कुणी जिद्दी, कुणी अबोल! हळूहळू एकाच घरात वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं आकारास येत असतात.

एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. लहान असताना आपलं विश्व फक्त घर, शाळा आणि काही मित्र-मैत्रिणी एवढंच मर्यादित असतं. मात्र, पुढे कॉलेज, नोकरी-व्यवसायात अनेक लोकांची भर पडते. भलेबुरे अनुभव येतात आणि वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जाताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खरे पैलू पडत असतात. अशा वयातच माणसं खऱ्या अर्थानं जगणं शिकतात. अशा वेळेस तुम्हाला व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय माहीत असेल, तर त्याचा भविष्यात खूप फायदा होतो.

प्रसन्न व्यक्तिमत्त्व हे नैसर्गिक देणगीबरोबरच प्रयत्न, प्रबोध आणि संस्कार यांचा परिपाक असतो. यासाठी मग स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, काळा-गोरा, जाती, वर्ण यांच्या मर्यादा धूसर होतात. व्यक्ती पाहिल्यावर प्रसन्न वाटते. हसल्यावर आनंद होतो आणि वागण्यातला सच्चेपणा उठून दिसतो.

पु. ल. देशपांडे, शंतनूराव किर्लोस्कर, गजाननराव पेंढारकर अशी काही व्यक्तिमत्त्वं जगतात तेव्हा समाजाचा दीपस्तंभ असतात आणि गेल्यावर ध्रुवाचे अढळ स्थान प्राप्त करून जातात. यांच्यात समान धागे पाहायचे असतील, तर सकारात्मक दृष्टिकोन, स्वतःची दुःखे, त्रास मागे टाकून भविष्य बनवण्याकडे कल, सर्जनशीलता, वर्तमानात जगणं आणि येणारं प्रत्येक आव्हान पेलण्यास तयार असणं. कामात नियोजन असतं, त्यामुळे गडबडीत असले तरी विचारांचा गोंधळ नसतो. कारण शेवटी नशीब म्हणजे तरी काय?... तयारी आणि संधी यांचं लग्नच ना?

मग व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय ?...व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे माणूस व्यक्त कसा होतो आणि त्याची आयुष्यातील तत्त्वं काय याची गोळाबेरीज. माणूस स्वभावानुसार व्यक्त होतो, कलेतून व्यक्त होतो, परिस्थितीनुसार व्यक्त होतो, गाठीशी असलेल्या अनुभवानुसार व्यक्त होतो आणि त्याची आयुष्यातील मूल्यं काय, त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय या सगळ्या गोष्टींतून साकार होत असतं एक व्यक्तिमत्त्व.

काही कानमंत्र

 • इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. आजच्या डिजिटल जगात आपण दुसऱ्याला देऊ शकणारी उत्तम भेट म्हणजे त्याला वेळ देणं आणि त्याचं लक्षपूर्वक ऐकणं. आपण लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हा मिळणारा प्रतिसादही मुद्देसूद आणि विषयाला धरून असतो.

 • इतरांशी बोलताना हसून आणि नम्रपणे बोला. अतिशय अवघड विषयही हसून आणि नम्रपणे बोलून सोडवता येतात.

 • वाचन करा. नवनवीन विषय कळतात आणि वाचनानं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.

 • इतरांच्या यशाचं कौतुक करायची सवय हवी.

 • पेहरावाबाबत सतर्क राहा. छाप पाडण्यासाठी त्याचा फायदा नक्कीच होतो.

 • सकारात्मक आणि व्यापक विचार करता यायला हवा. प्रत्येक काळोख्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर आशेचा किरण घेऊन सकाळ होते.

 • संयम राखा आणि शांत राहा. माणूस जितका संयमी आणि शांत, तितकाच तो जास्त प्रभावी असतो.

 • काळजीपूर्वक बोला. इतरांशी जोडलं जाण्यासाठी संवाद हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. नम्रपणे आणि काळजीपूर्वक बोलणं हा इतरांशी मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे.

 • नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, सहानुभूती, समस्या निराकरण गुण, सर्जनशीलता, ताणतणावाचं नियोजन ही सर्व कौशल्यं व्यक्तिमत्त्वात भर घालतात.

 • एखादी गोष्ट सातत्यानं आणि नेटकी करण्याचा सतत प्रयत्न हवा.

 • आत्मविश्वास हवा. छत्री पावसाला थांबवू शकत नाही; पण पावसात थांबण्याचं धारिष्ट्य नक्कीच देते, तसंच आत्मविश्वास म्हणजे यश नव्हे; पण ते यश मिळवण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची प्रेरणा आत्मविश्वास नक्कीच देतो.

 • एकदा आपली पाळंमुळं कुठं रुजली आहेत हे कळलं, की कुठल्याही आकाशात आपल्या पंखांची ताकद आजमवायची भीती उरत नाही, कारण त्या जमिनीशी आपली नाळ जोडलेली असते.

- मीनल ठिपसे

Web Title: Meenal Thipse Writes Aspects Of Personality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top