Video : पुरुष असलो म्हणून काय झालं? आमचं मन असतंच ना!

men.jpg
men.jpg

लग्न झाल्यानंतर जसे महिलांना अनेक घडामोडींचा सामना करावा लागतो, तसेच पुरुषांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा ‘कायदा हा महिलांच्या बाजूनेच असतो’ या समजुतीने पुरुष शांत राहतात. परंतु, याचे रुपांतर न्यायालयीन खटल्यात झाले की याचे गांभीर्य लक्षात येते. पण याबाबत कायदा काय सांगतो? पुरुषांची बाजू मांडली जाते का? आपल्या तक्रारी कशा मांडायच्या? याबाबत आयोजित केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये अनेक प्रश्‍नांचा उलगडा केला. तिथे ज्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली नाहीत, अशा प्रश्‍नांना डॉ. प्रतिभा घोरपडे यांनी इथे उत्तरे दिली आहेत. 

 मी विवाहित पुरुष असून, माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. विवाहानंतर सहा महिन्यांतच पत्नीला मुंबई हाय कोर्टातील नोकरी मिळाली. तीन वर्षानंतर विवाहितेला बदली करून मिळते, असे सांगून तिने मुंबईतील नोकरी स्वीकारण्याची परवानगी घेतली. मात्र अद्यापही तिची बदली झालेली नाही. मुळात तिला ही बदली करूनच घ्यायची नाही, असे मला वाटते. कारण तिला सासरकडच्या कोणत्याही जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत. मी बदलीविषयी बोलताच ती ४९८ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते. त्यातून माझ्या कुटुंबाला काही त्रास होईल का? 
-
पाच वर्षांच्या कार्यकाळात आपण किती दिवस एकत्र राहिलात? बदली न होण्यात पत्नीचा काही दोष आहे का? याची पहिल्यांदा पडताळणी करा. कारण यामध्ये तिचा दोष नसेल आणि तिच्या नोकरीच्या बदलीचीच समस्या असल्यास तुम्हाला तिला जबाबदार धरता येणार नाही. तुम्ही तुमच्या पत्नीला नोकरी सोडून परत बोलवू शकत नाही. तिच्यावर तुम्ही तशी जबरदस्ती केल्यास ती तुमच्यावर केस करू शकते. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पत्नीला नांदायला येण्याकरिता नोटीस पाठवू शकता. तुमची पत्नी सासरकडची कोणतीही जबाबदारी घेत नाही, हे कारण होऊ शकत नाही. कारण तीदेखील नोकरी करते. त्यामुळे तुम्ही दोघांनी समोरासमोर बसून समस्येवर तोडगा काढा. दोघांनाही थोडी-थोडी तडजोड करावी लागेल. 

 माझ्या लग्नाला बारा वर्षे झालीत. मला दहा वर्षांची मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून पत्नी माहेरीच राहते. आम्ही अजून विभक्त झालेलो नाही. माझ्या पत्नीला अवाजवी खर्च करण्याची सवय होती, याचा माझ्यावर खूप आर्थिक ताण यायचा. तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी येत नसतानाही मी स्वतः ॲडजस्ट करून स्वयंपाक वगैरे करायचो. तिला ते शिकण्यातही काडीमात्र रस नव्हता. फक्त शो ऑफचे जगणे तिला आवडायचे. यावरून आमच्यात खटके उडायचे. शेवटी ती माहेरी निघून गेली. पण ती घटस्फोट देण्यास तयार नाही. मी नोटीस पाठवल्यास पोटगी द्यावी लागेल, या भीतीने मलाही नोटीस पाठवता येत नाही. या नात्यातून मुक्त होण्यासाठी मी काय करावे? 
- तुम्हाला या नात्यामधून मुक्त होण्यासाठी हिंदू विवाह कायदा कलम १३(१)(आयबी) अन्वये ‘माझ्या पत्नीने माझा (पतीचा) त्याग केला’ या धर्तीवर तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकता. सदर अर्जामध्ये तुमची पत्नी कमावत नसल्यास तिला पोटगी द्यावी लागणार आहे. तुमची पत्नी कोणतेही संयुक्तिक कारण न देता तुम्हाला सोडून गेली असल्यास तुम्हाला घटस्फोट मिळू शकेल. तुमची मुलगी पत्नीबरोबर राहत असल्यास तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण व पालनपोषणाचा संपूर्ण खर्च द्यावा लागेल. तुमची मुलगी तुमच्याबरोबर असेल व तुम्हीच तिचे पालनपोषण करीत असाल तर तुमची मुलगी तुमच्यावर अवलंबून आहे, या कारणास्तव तुम्हाला तुमच्या पत्नीला देण्यात येणाऱ्या पोटगीमध्ये थोडी सवलत मिळेल. 

 मी एका खासगी कंपनीत कामाला आहे. माझी पत्नीदेखील नोकरी करते. मात्र तिचे वर्तन पाहून मला असे वाटते की, माझी मालमत्ता आणि पैसा पाहूनच तिने लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच तिने माझ्या आई-वडिलांशी भांडणे करून त्यांना माझ्यापासून दूर केले. मीदेखील सतत वाद नको, या विचारातून काहीही बोललो नाही. मात्र त्यानंतरही ती माझ्याशी विचित्र वागू लागली. सतत छोट्या छोट्या कारणावरून ती माझ्याशी भांडणे करते. काही वेळा अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करते. गेल्या वर्षभरात आमच्यात कोणताच सुसंवाद राहिलेला नाही. आता तर ती अचानकपणे घटस्फोट मागत आहे, नाहीतर तुझी प्रॉपर्टी माझ्या नावे कर, असे म्हणते. यातून कसा मार्ग काढावा. 
- तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत राहायचे आहे का घटस्फोट घ्यायचा आहे, हे आधी निश्‍चित करा. पत्नी कमावती असल्याने पोटगी मागू शकत नाही. तिचा पगार तुमच्यापेक्षा फार कमी असल्यास आणि तिच्या पगारातून तिचे भागत नसल्यासच तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. तुमची पत्नी व तुम्ही ‘मॅरेज कॉन्सिलिंग’ करून घ्यावे. तुम्हाला ती तुमची मालमत्ता नावावर करून मागत आहे. तिला नेमकी कसली भीती आहे. तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असल्यास संमतीने घ्यावा. पत्नीला राहायला दुसरे घर नसल्यास ती स्वतःच्या राहण्याकरिता घर किंवा घराचे भाडे मागू शकते. संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर मागण्याचा तिला अधिकार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com