esakal | बेघर आणि मनोरुग्ण असलेल्या विष्णूला मिळाले नवजीवन; कुटुंबीयांशी भेट; 'सकाळ सोशल फाउंडेशन'चं यश 
sakal

बोलून बातमी शोधा

या भागात " यशोधन ट्रस्ट " कडून एका मनोरुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत कसे पोहोचविले याविषयी माहिती देण्यात येत आहे.

या भागात " यशोधन ट्रस्ट " कडून एका मनोरुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत कसे पोहोचविले याविषयी माहिती देण्यात येत आहे.

बेघर आणि मनोरुग्ण असलेल्या विष्णूला मिळाले नवजीवन; कुटुंबीयांशी भेट; 'सकाळ सोशल फाउंडेशन'चं यश 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

"सकाळ सोशल फाउंडेशन" च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी " सोशल फॉर अक्शन " हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी "सोशल फॉर अक्शन" क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाईल. यातील मागील रविवारी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात आपण अनाथ व मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या "यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेबद्दल आपण माहिती घेतली आहे. या भागात " यशोधन ट्रस्ट " कडून एका मनोरुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत कसे पोहोचविले याविषयी माहिती देण्यात येत आहे.

"यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेद्वारे समाजाने नाकारलेल्या अनाथ ,बेघर, वयोवृद्ध व मनोरुग्णांसाठी हक्काचा निवारा उपलब्ध करून , त्यांच्यावर गरजे प्रमाणे व आवश्यक ते औषोधोपचार केले जातात. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरती संस्थेचे हे काम सुरु आहे. मनोरुग्णांवर योग्य उपचार केले तर, ते नक्कीच सर्वसामान्य जीवन जगू शकतात. आणि आपल्या कुटुंबीयांसमवेत राहू शकतात. अशाच एका बेघर मनोरुग्णाला बारा वर्षानंतर " यशोधन ट्रस्ट " कडून त्याचे घर व कुटुंबीय मिळवुन दिले आहेत.

मनोरुग्णांवर झाला अन्याय 

पारगाव खंडाळा सातारा- पुणे- मुंबई हायवे लगत तालुक्याचे ठिकाण आहे. या परिसरात हायवेलगत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने , मनोरुग्ण लोक अन्नाच्या शोधात व आशेने हॉटेल परिसरात व हायवेलगत घुटमळतात. ही बाब त्या परिसरातील एका व्यक्तीने हेरली. हा व्यक्ती अशा हायवे परिसरातील मनोरुग्णांना त्याच्या गाडीत घालून घरी घेऊन जात असे आणि एका रूम मध्ये त्यांना कोंडून ठेवत असे , त्यांना दोन - दोन दिवस जेवायला न देऊन त्यांना मारहाण करत असे , काही दिवसांनी अशा मनोरुग्णांना तो भंगाराच्या दुकानात किंवा बांधकाम साईटवर बिगारी कामासाठी रोजंदारीवर ठेवत असे, आणि मनोरुग्णांच्या कामाचे पैसे स्वतः उकळत होता.

संध्याकाळी सुट्टी झाली की , परत त्यांना घरी घेऊन येत असे , आणि रात्री एका ताटली मध्ये भात आणि शिजवलेली डाळ हे जेवण देत होता. दिवसभर काबाड - कष्ट केल्याने थकून गेलेल्या त्या मनोरुग्णांना पोटभर जेवण मिळत नव्हते शिवाय त्यांना ना अंथरायला ना अंगावरती घ्यायला , कुठेतरी पुठ्यावरती अंग टाकयचे आणि सकाळी पुन्हा त्याच मरणयातना मनोरुग्णांना भोगाव्या लागत असे , जर काम नाही केले तर अमानवी मारहाण होत होती. वरील प्रकार अनेक वर्ष सुरु होता. 

यशोधन ट्रस्ट देवासारखे आले धावून 

ऐके दिवशी यशोधन ट्रस्ट च्या कार्यकर्त्याला एका हॉटेलच्या बांधकामावर एक बिगारी दिसला तो मनोरुग्ण वाटला म्हणून संस्थेच्या कार्यकर्त्याने त्याची विचारपूस केली तेंव्हा त्या बिगारी मनोरुग्णाने त्याला जसे सांगता येईल त्या पद्धतीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. यशोधन ट्रस्ट चे कार्यकर्ते त्या मनोरुग्णाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले आणि रीतसर तक्रार दाखल केली. त्याच दिवशी पोलीसांनी त्या व्यक्तीच्या घरी छापा मारून चार मनोरुग्णांची सुटका केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चारही मनोरुग्णांना यशोधन ट्रस्ट संस्थेच्या गाडीत बसवून यशोधन ट्रस्ट संचालित गजानंत निवारा केंद्रात दाखल केले.

निवारा केंद्रात रात्री सर्वांनी अंघोळ केली , तो पर्यंत रात्रीचे आठ वाजले होते, जेवणाची वेळ झाली होती, सर्वजन कँन्टीन मध्ये आले, त्यांच्या ताटात चपाती, भाजी , वरण भात वाढले गेले, जेवण बघुन मात्र त्या सर्वांच्या डोळ्यांमधून पाणी ओघळत होते. बऱ्याच दिवसांनी चौघे पोटभर जेवले होते. त्या चार मनोरुग्णांवर मनोविकार तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरु केले सहा दिवसानंतर त्यांना थोडी - थोडी माहिती सांगता येऊ लागली. 

त्या चार मनोरुग्णांपैकी एकाचे पालघर जिल्ह्यात घर असल्याचे समजले , त्याला त्याचा पुर्ण पत्ता सांगता येत नव्हता. "माझं नाव विष्णू आहे मी , मनोरचा आहे माझ्या घराकडं जाताना मस्तान फाटा लागतो. " एवढेच त्याला सांगता येत होते.

वरील माहितीच्या आधारे शोध सुरु झाला. पालघर जिल्ह्यात मनोर तालुका आहे , ही माहिती घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पहाटे पाच वाजता विष्णूला घेऊन यशोधन ट्रस्टचे रवी बोडके निघाले, पालघरला जायचं आहे पण विष्णूचे घर सापडेल का नाही याची मात्र खात्री नव्हती. रवी बोडके यांचे एक मित्र डॉ .रविद्र मराठे विरारला राहतात रवी बोडके यांनी त्यांना फोन केला व सर्व हकीकत सांगितली आणि जाताना त्यांना भेटायचं ठरवलं , विरार फाटा येथे आल्यानंतर डॉ. रविंद्र मराठे यांनी सांगितले की , मनोर तालुका आहे आणि मस्तान फाटा बरोबर ऐंशी कि.मी वर आहे. त्यांनी अमर भोई या तेथील सामाजिक कार्यकर्त्याचा नंबर दिला. दोन तासांच्या प्रवासानंतर मस्तान फाट्यावरती पोहोचल्यानंतर विष्णूला ती जागा ओळखीची वाटली पण अजुन त्याला गावाचे नाव सांगता येत नव्हते.

तो पर्यंत सामाजिक कार्यकर्ते अमर भोई पोहोचले त्यांनी विष्णूचा फोटो पोलीस पाटील ग्रुप वर पाठवला. पंधरा मिनिटांनी दोन रिप्लाय आले एका गावचे पोलीस पाटील बोलत होते , "साहेब याला पाहिल्यासारखे वाटते, पण असाच एक पोरगा होता , आमच्या गावी बारा वर्षापुर्वी त्याने घर सोडलंय त्याच्या बायकोने पण तो आता मेला असेल अशी समजूत करून घेतली आहे, पण तुम्ही या आपण पाहू " मस्तान फाट्या पासुन विष्णूच्या गावाच्या दिशेने रवी बोडके निघाले आठ कि. मी अंतरावर ते गाव होते , तोपर्यंत पोलीस पाटील यांना फोन केला, पाटील म्हणाले , "या सभा सुरु आहे ती संपली की, आपण भेटू " 

...आणि घडला चमत्कार 

गावात पंचायती मध्ये आल्यानंतर पाटलांना विचारले याला ओळखताय का ? पाटलांनी डोक्याला हाथ लावला अरे देवा हा तर विष्णू हा तर बारा वर्षांपूर्वीच मेला होता तुम्हाला कुठे सापडला. तोपर्यंत एका पोरानं सगळ्या गावत केलं की , मेलेला विष्णू जिंवत होऊन आला आहे. त्याला पाहण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं पंचायती मध्ये.

पाटील आणि रवी बोडके विष्णूच्या घराच्या दिशेने चालू लागले , विष्णू शांतच होता. घरी पोहोचलो तर दारात पंधरा वर्षांची एक मुलगी आणि आणि तेरा वर्षांचा एक मुलगा होता. रवी बोडके यांनी घरात डोकावले तर , त्यांना दिसले की , विष्णूचा फोटो भिंतीला लावून फोटोला चंदनाचा हार घातला होता. त्याच्या मुलीने विष्णूच्या फोटोकडे पाहिलं आणि विष्णूकडे पाहिलं तर , "आयो बापूस आला " म्हणून ओरडली , विष्णूच्या डोळ्यात पाणी आलं , मुलीला आणि मुलाला घट्ट मिठी मारत विष्णू रडू लागला. बायको तर नवरा बारा वर्षांनी घरी आल्याचे पाहून ती पुरती बावरुन गेली होती.

विष्णूच्या मुलीला विचारलं ओळखलं का याला , तर तिने मान हलवत सांगितले की , " मी तीन वर्षांची होते तवा माझा बापूस हरवला होता, आईनं तर बापूस मेला म्हणूनच सोडून दिलं होतं आणि आई जर वर्षी बापूसच्या नावानं श्राद्ध घालायची, आता बापूस परत कधीच दिणार नाही असच वाटलं होतं " विष्णूला परत बारा वर्षांनी त्याचे घर व कुटुंबीय मिळवून देताना खूप आंनद झाला आणि खूप समाधान वाटतं होतं की , इतक्या प्रयत्नांनी विष्णूला त्याचे घर मिळाले , बापाच्या प्रेमाला पोरक्या झालेल्या मुलांना परत वडील मिळाले. विष्णू सध्या त्याच्या कुटुंबांसोबत अगदी सुखानं राहत आहे. एका बेघर मनोरुग्णाला घर मिळवून दिलं आणि यापुढे ही यशोधन ट्रस्ट हे काम करतच राहणार आहे...

गरज आहे तुमच्या मदतीची !

"यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यातही अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी -भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क – ८६०५०१७३६६
mailto:support@socialforaction.com

loading image