पहाडी प्रज्ञावंत डॉ. भाऊ लोखंडे

डॉ. यशवंत मनोहर
Tuesday, 22 September 2020

डॉ. भाऊ लोखंडे यांचा मृत्यू ही अत्यंत आकस्मिक अशीच घटना आहे. या घटनेने त्यांच्या सर्वच चाहत्यांना दु:खीही केले आहे आणि अंतर्मुखही केले आहे.

भाऊ लोखंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक देदीप्यमान नायक होते. बाबासाहेब आंबेडकर हे एका अपूर्व क्रांतीचे महानायकच होते. या महानायकाच्या आंदोलनापोटी जे अनेक नायक जन्माला आले त्यातले एक तेजस्वी नायक म्हणजे भाऊ लोखंडे ! या नायकाने जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा कोरून ठेवली आहे. अशी माणसे त्यांच्या देहाचा अस्त झाला की त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या साहित्याचा देह धारण करतात. हे एका घरातून दुस-या घरात राहायला जाणेच असते. हा अनोखा गृहप्रवेशच असतो म्हणून अशा माणसांच्या मृत्यूला नवा जन्मही म्हटले जाते.

बौद्ध साहित्याचे प्रकांड पंडित
बौद्ध साहित्य हा त्यांच्या खास चिंतनाचा विषय होता. या साहित्याने त्यांना एक बाणेदार जगणे बहाल केले होते आणि बाबासाहेबांच्या साहित्यानेही त्यांना एक ज्वलंतता दिली होती. त्यामुळे त्यांना अत्यंत जागृत आणि समाजाच्या सुखदुःखांसंबंधी उत्कट संवेदनशील असे व्यत्तिमत्त्व प्राप्त झाले होते. त्यांच्याकडे दुर्मीळ असे ज्ञानवेत्तेपण होते. गेली पन्नास-साठ वर्षे त्यांनी आंबेडकर समाजाचे बौद्धिक नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या विचारविश्वात त्यांचा एक दबदबा होता. निष्ठावंत आंबेडकरवादी म्हणून त्यांच्याबद्दल सर्वत्र अपार आदर होता.

वक्तृत्वाचा धबधबा
भाऊ लोखंडेंची हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांवर सारखीच हुकमत होती. संपूर्ण सभाच ते लीलया मुठीत घेत असत. त्यांच्या वक्तृत्वात शेरोशायरीचे तारांगण झगमगत असे. त्यांच्या बेधडक वक्तृत्वाने दोन-तीन पिढ्यांना तरी बौद्धिक मेजवानी दिलेली आहे. देशभर आणि थायलंड, नेपाळ अशाही ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. भाऊ लोखंडेचे भाषण वक्तृत्वाचा समारंभच असे.

नेतृत्वाचा चढता आलेख
रिपब्लिकन विद्यार्थी चळवळीचे, राजकीय चळवळीचे,धम्माचे, साहित्याचे आणि समाजाचे नेतृत्व हा त्यांच्या नेतृत्वाचा चढता आलेख कोणालाही अभिमान वाटावा असाच आहे. अमोघ वाणीचा वक्ता, राजकारणपटू , प्रज्ञावंत साहित्यिक, बौद्ध साहित्याचे तैलबुद्धी संशोधक, बौद्धांचे अभ्यासू मार्गदर्शक, निधड्या छातीचे हजरजबाबी विचारवंत, निकायचे यशस्वी संपादक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. हे सर्वच वैभव त्यांनी अपार कष्ट करूनच मिळवले होते. त्यांच्या आयुष्यातही न मावणारे भाऊ लोखंडे हे सेल्फमेड कर्तृत्व होते.

प्रज्ञावंत गंभीर साहित्यिक
प्रामुख्याने भाऊ लोखंडेंनी गंभीर वैचारिक लेखनच केले. त्यात आशियातील बुद्धधर्म , उदान, अश्वघोषांच्या वज्रसुचीचे भाषांतर, अश्वघोषांच्याच बुद्धचरितचे भाषांतर आणि बुद्धपुरुष ओशो असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.' मराठी साहित्यावर बौद्धधर्माचा प्रभाव' हा त्यांचा पीएच. डी.चा बहुचर्चित प्रबंध आहे. निकाय या वाड्.मयीन नियतकालिकाचे संपादन त्यांनी अनेक वर्षे केले. निकायमधून त्यांनी त्याकाळात काही जबरदस्त कविताही लिहिल्या आहेत .विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही ते सन्मानिले गेले आहेत.

महत्त्वाच्या पुरस्काराचे मानकरी
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा दलितमित्र पुरस्कार त्यांना मिळाला. डॉ. आंबेडकर समता पुरस्कारही त्यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. एका जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांच्या कार्याचे मोल अधोरेखित केले आहे.

त्यांची पहिली भेट
१९६९ मध्ये मी नागपूर महाविद्यालयात रुजू झालो तेव्हा त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली. पुढे आम्ही नागपूर विद्यापीठात गेलो.भाऊ लोखंडेंनी पाली विभागाचे प्रमुख, स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख, बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषविली.

एकत्र कार्य
आंबेडकर थॉटचा अभ्यासक्रम तयार करताना महाभदन्त डॉ. आनंद कौसल्यायन यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केले. १९७६ या वर्षी नागपुरातील पीडब्ल्यूएस महाविद्यालयात झालेल्या ऐतिहासिक महासंमेलनातही आम्ही सोबत काम केले. सीएए. एनपीआर,एनआरसी या महाआंदोलनातही आम्ही एकत्र आलो. असे खूपदा आम्ही एकत्र काम काम केले.

शेवटची भेट
पाचसात महिन्यापूर्वी मी डॉ. नितीन राऊत यांचेकडे गेलो होतो. भाऊ लोखंडे यांचे मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे कळले. मी भाऊ लोखंडेंकडे गेलो. तब्येतीची विचारपूस केली. त्यांना उत्तम आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांची तब्येत अत्यंत चांगली होती. आणि आकस्मिकपणे आज आंबेडकर समाजाच्या विराट वास्तूचा एक भक्कम आधारस्तंभ त्यांच्या मृत्यूने निखळला आहे. भाऊ लोखंडे या बहुआयामी प्रज्ञावंताला आदरपूर्वक आसवांजली !!!
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mile stone of Ambedkari movement