धरतरी पालथा

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील भिल्ल समाजात ‘हलमा’ नावाची परंपरा आहे. कोणी अडचणीत असेल, तर बाकीचे त्याच्या मदतीला निरपेक्ष भावनेने येतात. त्याप्रमाणे ‘धरती का हलमा’ सुरू केला.
worker
workersakal
Summary

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील भिल्ल समाजात ‘हलमा’ नावाची परंपरा आहे. कोणी अडचणीत असेल, तर बाकीचे त्याच्या मदतीला निरपेक्ष भावनेने येतात. त्याप्रमाणे ‘धरती का हलमा’ सुरू केला.

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील भिल्ल समाजात ‘हलमा’ नावाची परंपरा आहे. कोणी अडचणीत असेल, तर बाकीचे त्याच्या मदतीला निरपेक्ष भावनेने येतात. त्याप्रमाणे ‘धरती का हलमा’ सुरू केला. धरती आज अडचणीत आहे, तिला मदत करू या, या भावनेने गेल्या चौदा वर्षांत अनेक गावांच्या पाणलोटाची कामे केली. तसेच या भागात दहा-बारा शेतकरी एकत्र येतात आणि आलथून-पालथून एकेकाचे शेत नांगरून देतात. ‘पालथा’ असं या पद्धतीचं नाव. वयमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले, आपण ‘धरतरी पालथा’ करायला हवा. त्र्यंबक तालुक्यातल्या सादडपाना गावात नुकताच हा पालथा पार पडला.

धरतरी म्हणजे धरित्री, धरती, वसुंधरा. वसलेल्यांना धारण करते ती वसुंधरा. जिच्यातून नवे उगवून येते ती उर्वरा. जी नांगरली आहे ती सीता. जिच्यावर हल (नांगर) चाललेला नाही ती अ-हल्या. तिला निर्जिवत्वातून मुक्त करतो त्यालाच आम्ही देवत्व देतो! सकाळी अंथरुणातून धरतीवर पाय ठेवण्याआधी ‘विष्णुपत्नीं नमस्तुभ्यम् पादस्पर्शम् क्षमस्व मे’ असे म्हणून तिची क्षमा मागणारी संस्कृती आणि काम्बड नाचात ‘अठ नाचू काय तठ नाचू, ही धरतरी माझी मायु रं, तिला पाय कसा मी लावू रं’, असे म्हणणारी संस्कृती यात आम्हाला काहीच अमंगळ भेदाभेद दिसत नाही. धरतीवर अफाट पाणी असताना गांडुळांनी माती वर आणली, वराहाने आणली, आणखी कोणकोणत्या प्राण्यांनी मदत केली याच्या कथा देशभर सर्वत्र आहेत. देशातील लाखो चहावालेसुद्धा सकाळचा पहिला चहा आणि एक पेलाभर पाणी धरतीला अर्पण करतात. नवी वास्तू बांधताना आपण ग्राऊंड ब्रेकिंग करत नाही, भूमिपूजन करतो. या आणि अशा हजारो गोष्टींतून एक भाव स्पष्ट दिसतो- धरती आपली आई आहे!

या धरतीपुत्र संस्कृतीवर गेली दीड-दोन शतके एक मानसिक-बौद्धिक आक्रमण चालू आहे. इंग्रज गेले तरी आपण काही संकल्पना आणि रचनांची जोखडे घेऊनच जगतो आहोत. त्या जोखडाची मानेला इतकी सवय झाली आहे, की डोके बैलासारखे चालते आहे हे जाणवतही नाही. ‘नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ (नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट) हा आताचा चलनी शब्द आहे. जल-जंगल-जमीन यांना संसाधने मानणे आणि त्यांचे व्यवस्थापन आपण करू शकतो असे मानणे, या दोन्ही वल्गना यात अंतर्भूत आहेत. हे आपल्या संस्कृतीच्या विपरीत आहे. माणसाला देवाने पृथ्वी उपभोगायला दिली असे कोणत्याही भारतीय ग्रंथाने शिकवले नाही. धरती किंवा प्रकृतीला माता मानण्यात दोन पैलू आहेत.

एक तर आई आपल्यापेक्षा मोठी आहे, ही जाणीव आणि दुसरे म्हणजे तिनेच आपल्याला हे जीवन दिले आहे ही कृतज्ञता श्रद्धेत आणि धरतीविषयीच्या या नम्रतेत जी अफाट शक्ती आहे, तिचा कालानुरूप विनियोग मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातल्या शिवगंगा अभियानाने केला. डोंगर शिवरूप आहे आणि त्यावरून वाहणाऱ्या गंगेला बांध घालणारे भगीरथ गावोगावी निर्माण करण्याचा संकल्प या अभियानाने केला. स्थानिक भिल्ल समाजात ‘हलमा’ नावाची एक परंपरा आहे. कोणी अडचणीत असेल, तर बाकीचे त्याच्या मदतीला निरपेक्ष भावनेने येतात. शिवगंगा अभियानाने ‘धरती का हलमा’ सुरू केला. धरती आज अडचणीत आहे, तिला मदत करू या. गेल्या चौदा वर्षांत अनेक गावांचे पाणलोट यातून सुधारले. मोठी तळी, मातीचे बंधारे बांधले गेले.

अशा एका ‘हलमा’मध्ये सहभागी व्हायला ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते गेले होते. धरतीची भक्ती तर आपल्याही गावांमध्ये आहे आणि आपल्याकडेही एकमेकांच्या मदतीला जाण्याची रीत आहे. ‘पालथा’ असं या पद्धतीचं नाव. दहा-बारा शेतकरी एकत्र येतात आणि आलथून-पालथून एकेकाचे शेत नांगरून देतात. त्यांनी पालथा धरला असं म्हणतात. ‘वयम्’च्या कार्यकर्त्यांनी ठरवले, आपण ‘धरतरी पालथा’ करायला हवा. गावागावात ही कल्पना मांडली. त्र्यंबक तालुक्यातल्या सादडपाना गावाच्या ग्रामसभेने ठरवले, आम्ही पहिला ‘धरतरी पालथा’ करू. गेल्या शुक्रवारी हा पालथा पार पडला.

वयम् चळवळीतले जव्हार, विक्रमगड, त्र्यंबक अशा सर्व तालुक्यांतल्या अनेक गावांमधून लोक स्वतः टिकाव-फावडी घेऊन आले. सादडपान्याच्या युवकांनी गावाच्या सामूहिक वनक्षेत्रातली एक जागा ठरवून ठेवली होती. तिथे आदल्या दिवशी आखणीही केली होती. उतारावरून वाहून जाणारे पाणी आणि माती अडवण्यासाठी काही समपातळी चर खोदून झाले. नवे दगडी बांध घालून झाले. सादडपाना गावाला दोन वर्षे रखडलेला सामूहिक वनहक्क गेल्याच महिन्यात प्राप्त झाला. त्यातही दीडशेपैकी ७४ हेक्टरचाच हक्क हातात आला, तरीही त्यात जंगल वाढवण्यासाठी या गावाने आपला आराखडा तयार करायला घेतला आहे. त्यात वनविभागाने, सरकारने मदत करावी, अशी लोकांची अपेक्षा आहेच, पण त्यासाठी हातावर हात ठेवून बसणे, हा ना गावाचा स्वभाव आहे, ना चळवळीचा! आपले घर बांधताना अडचण आली, की आपण भाऊबंदांना, गावकऱ्यांना मदतीला बोलावतोच ना, तसेच जंगलासाठी करू. पालथ्याची हाक देऊ. जितकी लोकं येतील तितकी येतील.

सादडपाना ग्रामसभेने या कार्यक्रमासाठी वर्गणीतून मांडव उभारला होता. इतर गावांतून आलेल्या सर्वांसाठी जेवण आणि बुंदी रांधली होती. इतर गावांमधल्या लोकांनी आपल्या जंगलात घाम गाळला, यानेच लोकांना गहिवरून आले होते. समारोपाच्या कार्यक्रमात गावकरी इतर सर्व गावांच्या लोकांना म्हणाले, ‘भावांनो, हा पालथा आहे. म्हणजे असा की जेव्हा तुम्ही पालथा धराल, तेव्हा आम्ही मदतीला येणारच अन् तुम्ही जेवढी लोकं आलात त्यापेक्षा सव्वापट आम्ही येऊ. पालथा परतफेडीची रीतच तशी आहे आपली!’

(लेखक वयम् चळवळीचे संस्थापक विश्वस्त आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com