
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘मो’ ही मालिका बाह्य रूपानं हलकीफुलकी नि विनोदी वाटते; पण तिच्या कथनात निर्वासितत्त्व, वंशिक भेदभाव, युद्धाच्या जखमा आणि ओळख शोधण्याच्या अस्वस्थ धडपडीसारखे गंभीर प्रवाह खोलवर रुजलेले आहेत. अमेरिकी-पॅलेस्टाइन असलेला विनोदी कलाकार मोहम्मद आमीरच्या अर्ध-आत्मचरित्रात्मक अनुभवांवर आधारित ही कथा त्याच्याच कुटुंबाच्या विस्थापनाचा मागोवा घेते. १९९०च्या दशकात कुवेतमधील पर्शियन गल्फ युद्धानंतर पळ काढून, सौदी अरेबियातील अल्पकाळाच्या मुक्कामानंतर अखेरीस ह्यूस्टन, टेक्सासमध्ये स्थायिक होण्याचा प्रवास पूर्ण झाल्यानंतरचे त्यांचे समकालीन जीवन समोर उलगडते. या पार्श्वभूमीवर नायक मोचं (खुद्द मोहम्मद आमीर) आयुष्य केवळ नोकरी, उपजीविका किंवा नातेसंबंध सांभाळण्याच्या नेहमीच्या लयीत न चालता सततच्या कायदेशीर अनिश्चिततेने झाकोळलेलं आहे.