#MokaleVha : घटस्फोट घेण्यास पतीचा नकार

Problem
Problem

घटस्फोट घेण्यास पतीचा नकार
मी ३५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मी एका नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करते. माझा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला आहे. माझे पतीसुद्धा आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. सध्या मी पुण्यात तर पती बंगळूरमध्ये नोकरी करत आहेत. माझे सासर हैदराबादला आहे. लग्नानंतर आमचे थोडेच दिवस व्यवस्थित गेले. त्यानंतर छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद होत गेले. आता तर आमच्या दोघांमध्ये काहीही संवाद नाही. दोघांमध्ये काहीही प्रेम, आकर्षण राहिले नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही दोघे एकत्र येऊन संसार करू असे मला वाटत नाही. त्यांना संमतीने घटस्फोट घेण्याविषयी सुचवले असता, ते नकार देतात. त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी ते नाही म्हणतात. परंतु मला तर त्यांच्यासोबत राहायचेच नाही. आम्हाला मूल नाही. 

तुम्ही दोघेही उच्चशिक्षित आहात. चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत आहात. तुमची आजची जी परिस्थिती आहे, ती बहुतांशी सध्या आयटीमध्ये कार्यरत असणाऱ्यांची आहे. दोघे वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरी करत असतात. नोकरीचे तास, तेथील जबाबदाऱ्या, टिकून राहण्यासाठी चाललेली जीवघेणी स्पर्धा यामध्ये सध्या तरुण पिढीची खूप तारांबळ उडते, त्यामुळे जोडीदाराला खूप वेळ देणे, सुसंवाद साधणे या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. नोकरीमध्ये मानसिकरीत्या ही पिढी खूप थकून जाते. नातेसंबंध टिकवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी त्यांच्यामध्ये क्षमता टिकून राहत नाही. अशा वेळी दोघांनीही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करून नोकरी, कुटुंब यामध्ये वेळेची विभागणी होणे गरजेचे आहे. आता तुम्ही पुढाकार घ्या. स्वतः वेळ काढून पतीबरोबर संवाद साधा. संवाद वाढला, सहवास वाढला तरच प्रेम, आकर्षण निर्माण होईल. प्रयत्न करा. गरज पडली तर दोघेही विवाह समुपदेशकांची मदत घ्या. तुमच्या दोघांमध्ये विवाह मोडण्याइतके काही गंभीर घडलेले नाही. फक्त संवादाचा अभाव, गैरसमज आणि एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा हीच कारणे प्रथमदर्शनी दिसत आहेत. मला त्याच्या सोबत राहायचे नाही ही नकारात्मक भावना मनातून काढून टाका. एकदा संधी दोऊन बघा. आयुष्यभराचे समाधान तुमच्याकडे असेल.

नवरा मारहाण करतो
मी २८ वर्षांची स्त्री आहे. दोन वर्षांपूर्वी माझा विवाह झाला आहे. लग्न ठरवून झाले आहे. त्यावेळी दोन्ही घरच्या लोकांनी एकमेकांसोबत चर्चा करून निर्णय घेतला. मुलगा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो, त्याला कोणतेही व्यसन नाही असे मला सांगण्यात आले. म्हणून मी सर्वांवर विश्‍वास ठेवून लग्नास होकार दिला. लग्नानंतर काही दिवसांमध्येच माझा नवरा खूप दारू पीत असल्याचे लक्षात आले. रात्री-अपरात्री येऊन मला शिवीगाळ, बेदम मारहाण करणे सुरू झाले. प्रथम सासरी घरच्यांना सांगितले तर कोणीही गंभीरता दाखवली नाही. माहेरी सांगितले तर सर्वजण मलाच सांभाळून घेण्याचा सल्ला देतात. मला शिवीगाळ, मारहाण सहन होत नाही. आयुष्य संपवावे असे वाटते. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमचे पती तुम्हाला शिवीगाळ, मारहाण करू शकत नाहीत. शिवीगाळ, मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचप्रमाणे दोन्ही घरच्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करणे आणि तुम्हालाच सांभाळून घे असे म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे.

साध्या साध्या गोष्टींमध्ये सांभाळून घे म्हणणे वेगळे; परंतु इथे ते चुकीचे ठरेल. सुरुवातीला मारहाणीकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन पतीचे धाडस वाढेल आणि रागाच्या भरात त्याला वेगळे वळण लागू शकते, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. येथून पुढे मारहाण झाली तर ताबडतोब पोलिसांची मदत घ्या, म्हणजे त्याला दहशत बसेल. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या. घरच्या लोकांनाही समुपदेशन केले जाते. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दोन्ही घरच्या लोकांची भूमिका.

दोन्हीकडील मंडळींनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. घरामध्ये आपल्या सुनेला, मुलीला मारहाण होत आहे. अशावेळी तिलाच सांभाळून घे म्हणणे किंवा या प्रकाराकडे डोळेझाकपणा करणे हे त्या मुलाच्या व्यसनाला, स्वभावाला खतपाणी घालण्यासारखे आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे. त्यांनाही समुपदेशनाची गरज आहे. एवढे सर्व करूनही पतीमध्ये सुधारणा झाली नाही, तर कायदा सर्वस्वी तुमच्या बाजूने आहे. वरील कारणामुळे तुम्ही पतीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकता.

पत्नी उद्धट आणि हेकेखोर
मी ४० वर्षांचा विवाहित पुरुष आहे. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. मला आठ वर्षांची एक मुलगी आहे. मी खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत आहे. पत्नीदेखील खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. माझी पत्नी अत्यंत हेकेखोर, हट्टी स्वभावाची आहे. सतत माहेरी जाते. मुलीची काळजी घेत नाही. घरात सर्वांना उलट बोलते. माझ्या वयस्कर आईला घरातील सर्व कामे करावी लागतात. स्वतःच्या पगारातील एक रुपयादेखील खर्च करत नाही. मुलीला मारहाण करणे अशा गोष्टी करत राहते. तिला समजावण्याचा प्रयत्न केला, की सर्वांच्या अंगावर धावून जाते. याबाबत दोनदा पोलिस तक्रार केली तर पोलिस घरगुती भांडणे आहेत म्हणून सांगून घरी पाठवून देतात. परंतु हिच्या या रोजच्या वागण्याचा मला खूप त्रास होतो. आर्थिक भारही संपूर्णपणे माझ्यावर पडतो. मला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे. 

तुमची पत्नी हेकेखोर आहे, भांडखोर आहे हे आपले म्हणणे आहे. ती अशी का वागते? किंवा तिचा असा स्वभाव का बनला? याबाबत तुम्ही खोलवर जाऊन विचार करणे आवश्‍यक आहे. कधी कधी असा स्वभाव बनणे याला काही कारणे असू शकतात. लहानपणी झालेले चुकीचे संगोपन, एखादी घटना किंवा कधी कधी आरोग्यविषयक कारण असू शकते. प्रथमतः या सर्व गोष्टी तपासून बघा. तिला कामाच्या ठिकाणी काही ताण आहे का, हेही बघणे गरजेचे आहे. तुम्ही सकारात्मकरीत्या याचा अभ्यास केला तर नक्कीच पत्नी अशी का वागते, याचे उत्तर मिळेल. दुसरे म्हणजे तुम्ही तिला समुपदेशकांकडे घेऊन जा, तेसुद्धा योग्य मार्गदर्शन पत्नीला, तुम्हाला करतील. तिच्या स्वभावामध्ये बदल होण्यासाठी उपाय सुचवतील. आर्थिक बाबींचीसुद्धा चर्चा समुपदेशक करतील. तुम्हीदेखील तुमचा आर्थिक ताळेबंद तिच्यासमोर मांडा. तुमच्या अडचणी समजून सांगा. पती-पत्नीमध्ये सुसंवाद, पारदर्शकता असणे गरजेचे आहे. केवळ ती अशी वागते, असे करते हे म्हणणे योग्य नाही. त्यामध्ये का हा शब्द टाकला तर समस्या सुटण्यास मदत होते. घटस्फोट हा शब्द सहजपणे उच्चारण्यास सोपा आहे; परंतु त्याचे परिणाम हे सर्व कुटुंबाला भोगावे लागतात. त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यावर होतो, आर्थिक बाजूवर होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पिढीवर होतो. मुलीच्या भवितव्याचा, तिच्या संगोपनाचा विचार करा. आजपासून पत्नीच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com