#MokaleVha : सोबतीचा हात आहे...

डॉ. अल्पना वैद्य
Sunday, 13 September 2020

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताणतणाव, एकटेपणा, डिप्रेशन, चिंता यांसारख्या मानसिक समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचा सामना करण्याकरिता ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि ‘कर्वे सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू झालेल्या ‘‘सकाळ’सोबत बोलूया’ या सामाजिक उपक्रमात समुपदेशक म्हणून काम करताना वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या वेगवेगळ्या मानसिक समस्या जाणून घेता आल्या,

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताणतणाव, एकटेपणा, डिप्रेशन, चिंता यांसारख्या मानसिक समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचा सामना करण्याकरिता ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि ‘कर्वे सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू झालेल्या ‘‘सकाळ’सोबत बोलूया’ या सामाजिक उपक्रमात समुपदेशक म्हणून काम करताना वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या वेगवेगळ्या मानसिक समस्या जाणून घेता आल्या, त्यावर उपाययोजना सांगता आल्या. अठरा वर्षांच्या युवकांपासून ते चौऱ्याहत्तर वर्षांच्या आजीचे फोन (टेली कौन्सिलिंग) आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तरुणांमध्ये प्रामुख्याने लॉकडाउनमुळे नोकरी गमावली वा खूप प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नाही, मी खूप शिकले आहे; पण माझा नवरा नोकरी करत नाही आणि मलाही नोकरी करू देत नाही, मी एवढी शिकले; पण काही उपयोग नाही, मुले लहान आहेत, मला माझे अस्तित्व हवे आहे. माझे नवऱ्याशी पटत नाही, घटस्फोट हवा आहे... तर काही विवाहित तरुणांच्या समस्या अशा होत्या, की माझी बायको माझ्याबरोबर नांदत नाही. तिचे दुसऱ्याबरोबर संबंध आहेत.

वृद्धांमध्ये एकटेपणा, आर्थिक चणचण, प्रकृती स्वास्थ्य अशा समस्या होत्या. यापैकी एका त्र्याहत्तर वर्षांच्या वृद्ध आजोबांची समस्या ऐकून मन द्रवले. आर्थिक परिस्थिती बेताची. केअरटेकरची नोकरी करत होते. आता नोकरी नाही. पेन्शन नाही. ते म्हणाले, ‘मॅडम, नोकरी मागतो; पण कोणी नोकरी देत नाही. काहीतरी मदत मिळेल का? भाड्याच्या घरात राहतो. ‘सकाळ’ वर्तमानपत्र वाचले आणि फोन केला. माझ्याकडे फोनसाठी बॅलन्स नव्हता. शेजाऱ्यांकडून उसने पैसे घेऊन फोन केला. काही आर्थिक मदत मिळेल का?

काही मदत मिळेल, या आशेने फोन केला आहे.’ माझ्या भावनांना आवर घालून आणि त्यांना कुठेही जाणवून न देता मी त्यांची समस्या ऐकून घेतली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शेवटी आजोबा म्हणाले, ताई तुम्ही आमची समस्या जाणून घेतली. माझे ऐकून घेतले. माझे मन हलके झाले. आजच्या युगात कोण कोणाचे ऐकून घेतो? कोणाला एवढा वेळ आहे? मनावरचा ताण हलका झाला. परमेश्वर तुमचे कल्याण करो! आशीर्वाद देऊ शकतो; कारण माझ्याकडे काहीच नाही. आजोबांच्या या वाक्‍यावर मला जे समाधान मिळाले ते वर्णनातीत नव्हते. दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केल्याने मिळते ते समाधान ‘‘सकाळ’सोबत बोलूया’ या उपक्रमामुळे मिळाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha article dr alpana vaidya