#MokaleVha : ‘नकार कसा स्वीकारावा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

नकार, मग तो प्रेमात मिळालेला असो वा मैत्रीत वा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेला असो. कुठलाही नकार माणसाला खजील करून टाकतो. आपल्या आयुष्यात त्याचा छोटासा ओरखडा पडतो. काहींसाठी हा नकार म्हणजे जीवनमरणाचा प्रश्‍नच होऊन बसतो. अशांसाठी ‘मोकळे व्हा’ पुरवणीअंतर्गत ‘नकार कसा स्वीकारावा’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन आयोजित केले होते. तिथे आलेल्या काही प्रश्‍नांना ॲड. हिमांशू नगरकर यांनी इथे उत्तरे दिली आहेत.

सर, मी २८ वर्षांचा तरुण आहे. मी एका मुलीसोबत ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. मी चांगला कामाला लागलो. तीही कामाला लागली. कामाला लागल्यानंतर मी तिला लग्न करायचा विचार बोलून दाखवला. ती तयार होत नव्हती. तिला मोठा भाऊ होता; पण तो काम करत नसल्याने तिच्यावर घरातली जबाबदारी होती. त्यामुळे ती नकार देत होती. मी तिच्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला तयार होतो. तिलाही मी, तू तुझा पगार तुझ्या घरच्यांना दिला तरी चालेल, असे सांगितले होते. पण ती तयारच झाली नाही. ती ब्रेकअप करून कायमची निघून गेली. मी गेली ४ वर्षे तिच्या प्रतीक्षेत आहे. पण, ती आता परत येण्याची काहीही चिन्हे नाहीत. तिचेही लग्न झालेले नाही. मला हा नकार ४ वर्षांनंतरही पचवता येत नाहीये.
उत्तर -
 या ठिकाणी त्या मुलीचे दुर्भाग्य आहे, असे म्हणावे लागेल. आयुष्यात सर्व गोष्टी मिळवणे, हे शक्य नाही. परंतु, त्यासाठी तुम्ही आवश्‍यक तेवढे प्रयत्न केले आहेत. तरीही ती मुलगी परत येत नसल्यास तुम्ही तुमचे पुढचे मार्ग निवडणे गरजेचे आहे. त्या मुलीला दिलेल्या कमिटमेंटची एनर्जी तुम्ही प्रोफेशनल ठिकाणी लावलीत तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. एक शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही त्या मुलीला प्रत्यक्ष जाऊन भेटा. पण, तुमच्या मनाची पूर्ण तयारी असायला हवी. तिला सर्व काही सांगा. तरीही ती लग्न करण्यास तयार नसल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे सरकणे गरजेचे आहे. 

मी २० वर्षांची तरुणी आहे. आमच्या ग्रुपमधल्या एका मुलाशी खूप चांगली मैत्री होती. त्याला त्या मैत्रीतून काहीतरी गैरसमज निर्माण झाला आणि अचानक त्याने मला लग्न कधी करायचे विचारले. मी सुन्नच झाले. मी त्याला माझा नकार कळवला. सगळीकडून ब्लॉक केले. पण तो म्हणतोय, तू मला स्वीकारले नाहीस तर मी या जगाचा निरोप घेईल. मी आता खूप हतबल झालेय. मला काय करावे तेच सुचत नाहीये. मला त्याला नकारच द्यायचा आहे; पण कसा कळवावा हे कळत नाहीये.
उत्तर -
 नकार हा कधीही थेटच असला पाहिजे. कुठल्याही सजावट पद्धतीने दिलेला नकार हा त्याची क्षमता कमी करू शकतो. हा मुलगा तुमच्यावर अशा प्रकारे दबाव आणत असेल तर त्याला नकार न देता त्याच्या आई-वडिलांकडे किंवा कुटुंबीयांसमोर किंवा ज्या व्यक्तीचे तो ऐकू शकेल अशा व्यक्तीकडे सांगावा. त्यांच्याकडे आपली बाजू मांडावी. २० ते २४ या वयात नक्की प्रेम आहे की आकर्षण आहे, यामध्ये गोंधळ उडू शकतो. या वयात करिअरवर जास्त फोकस द्यायला हवा. तुम्हाला  रिलेशनशिपमध्ये सध्या पडायचे नाही, ही गोष्ट चांगली आहे. फक्त नकार सांगायचा मार्ग बदला.

नमस्कार, मी ३६ वर्षांचा पुरुष आहे. माझ्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झालीयत. दोन मुलेही आहेत. पत्नीही खूप काळजी घेते. पण सध्या माझ्या ऑफिसमध्ये असलेल्या तरुणीवर माझा जीव जडला आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तिने ऑफिसला सुटी टाकल्यास मलाही करमत नाही व मीही सुटी घेऊन निघून येतो. ती ३० वर्षांची आहे आमचे ट्युनिंग छान जमते. मी तिला रिलेशनशिपबाबतही विचारले. पण तिने नकार दिला. ती म्हणतेय, मी हवी असल्यास लग्न मोडावे लागेल. मला लग्न मोडणे अशक्य आहे, पण त्या मुलीचा नकारही असह्य होतोय.
उत्तर -
 काही वेळा ताप्तुरता आनंद मिळवण्यासाठी आपण एखादी गोष्ट करत असतो. आपण पुढचा विचार करत नाही. आपल्याला दोन मुले आहेत, पत्नी आहे. असे कुटुंब असताना तिसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी अडकल्याने तुम्हाला पुढे जाऊन पश्चात्ताप होण्याची शक्यता जास्त आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तीन उपाय आहेत. पहिले म्हणजे आपले मन कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये गुंतवा. दुसरे म्हणजे तामसी अन्न न खाता सात्त्विक अन्न खा. आयुर्वेदात लिहिले आहे की खूप तामसी अन्न आपण खाल्ले की अशा गोष्टीतून बाहेर पडणे कठीण होते. तिसरे म्हणजे आपले आवडते छंद जोपासा. यामुळे तुमचे मन स्थिर राहून या गोष्टीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha How to accept denial