#MokaleVha : अबोला सोडा... नाती जोडा

Relation
Relation

नात्यातील संवाद संपला की विसंवाद आपसूकच वाढत जातो. नातं कोणतंही असो... पती, पत्नी, सासू, सुना, मुले, पालक, सहकारी, मित्र इत्यादी कोणत्याही नात्यामध्ये भावनिक बंध निर्माण झालेले असतात. काही भावनिक गरजाही असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत की कोणत्याही नात्यात भांडण, अबोला, रुसवे-फुगवे या गोष्टी त्या सोबत येतातच. ‘पिंडे पिंडे मर्तिभिनः’ असे म्हटले जाते, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात. दृष्टिकोन वेगळे असतात. जेव्हा काही गोष्टींमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात तेव्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो... गैरसमजामुळे संवाद बंद झाल्याने हा दुरावा अधिकच वाढत जातो. 

जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी आपण अबोला धरतो. तेव्हा त्या व्यक्तीला त्रास होईल असे आपण वर्तन करतो आहे असे आपल्याला वाटत असते. परंतु त्याचा खरा त्रास आपण स्वतःलाच करून घेत असतो. ज्या व्यक्तीशी आपण बोलायचे नाही असे ठरवतो. त्याच व्यक्तीचा विचार आपण मनातल्या मनात अधिक करीत असतो. त्यामुळे मनाची घुसमट होत राहते. कित्येक कुटुंबामध्ये वाद झाले की भावंड एकमेकांशी बोलणे बंद करतात. एकाच घरात राहून सासू-सुना एकमेकांशी बोलत नाहीत. नणंदा भावजया एकमेकांशी बोलत नाहीत आणि अनेक कुटुंबात थोडेसे वाद झाले तरी पती-पत्नीही एकमेकांशी बोलत नाहीत. अनेक वर्षे एकाच घरात राहून एकमेकांशी बोलत नाहीत असेही पती-पत्नी आहेत. 

नात्यामध्ये अबोला धरल्यामुळे नात्यातील ताण वाढतातच. पण त्यापेक्षाही मनावरील ताण अधिक वाढतात. एखाद्या पती-पत्नीमध्ये कोणत्याही एखाद्या शुल्लक कारणावरून वाद झाले आणि त्यांच्यात अबोला निर्माण झाला, तर त्या दिवसांमध्ये घडलेला प्रसंग ते पुन्हा पुन्हा मनात आठवत राहतात. त्यातून बाहेर येणेही त्यांना अवघड वाटते. कौटुंबिक न्यायालयात वाद टोकाला जाऊन नातं तोडण्यापर्यंत आलेली जोडपी मी पाहात असते. त्यांची मनःस्थिती दयनीय असते. मनातील राग धुमसत असतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. मनात दाबून ठेवलेल्या रागाची धुम्मस आणि जिव्हारी बसलेल्या घावाची कळ सोसत स्वतःची घुसमट या व्यक्ती करून घेत असतात. उलटून वार करण्याची संधी सतत शोधत राहतात. 

डोक्‍यात दुसरे विचार येत नाहीत. अक्षरशः अनेक दिवस आणि अनेक रात्री त्याच त्याच विचारात दोघेही घालवत असतात. सूड आणि द्वेषाची भावना वाढतच जाते. एक संशोधन करण्यात आले होते. मतभेद निर्माण झाल्यानंतर एकमेकांशी भांडणारी जोडपी आणि एकमेकांशी अबोला धरणारी जोडपी यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ज्या जोडप्यांमध्ये भांडणं होतात ती जोडपी भांडण न करता अबोला धरणाऱ्या जोडप्यांपेक्षा अधिक खूष होती. एकमेकांशी संवाद थांबल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजार अबोला धरलेल्या जोडप्यांमध्ये अधिक दिसून आले. भांडणाला घाबरून एकमेकांशी बोलणच बंद केल्याने एकमेकांपासून महत्त्वपूर्ण गोष्टी लपविणे, एकमेकांवर अविश्‍वास दाखवणे इत्यादी गोष्टी सुरू होतात आणि नात्यातील अंतर वाढवतात. 

कोणत्याही नात्यामध्ये भावनिक तोल सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. दोन व्यक्तींमध्ये मतभेद अपरिहार्य असतात. पण रागाचा बहर ओसरल्यानंतर एकमेकांशी शांतपणे बोलायला हवं. कोण कुठे चुकले हे शोधायला हवं. विनाकारण गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करायला हवेत. मनात गोष्टी दाबून ठेवल्यामुळे भावनांचा कोंडमारा होतो. एकलकोंड वाटायला लागतं. व्यक्ती कुढत राहते. म्हणूनच मनातील गोष्टी बोलून मोकळं होता आलं पाहिजे. 

सध्या आपण बघतो आहे की ताणतणाव वाढल्याने वयाच्या तिशीतच ब्लडप्रेशर, डायबिटिस असे आजार मागे लागलेले आहेत. मनमोकळं बोलणं, व्यक्त होणं कमीच झाले आहे. ‘मला तुझे विचार का पटले नाहीत?’ याची चर्चा करण्यापेक्षा ब्लॉक करून टाका... अबोला धरा यांच्यापासून दूर व्हा. याच गोष्टी केल्या जातात. 

नवीन वर्षांमध्ये आपण नवीन काही ठरवूया. मनातील गोष्टी मनातच न ठेवता मोकळं होऊ या. कोणाचे विचार पटतील... न पटतील, पण त्यांच्याही विचारांचा आदर करू. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीलाच संक्रांतीचा सण येतो. झाल्या गेल्या गोष्टी सोडून देऊ आणि पुन्हा नव्याने नाती जोडण्यासाठी एक संधी हा सण देत असतो. म्हणूनच संक्रांतीच्या शुभेच्छा देताना म्हटले जाते,
गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या.
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या.
अबोला सोडा, 
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com