esakal | #MokaleVha : अपत्य असलेल्या महिलेसोबत पुनर्विवाह करावा का?
sakal

बोलून बातमी शोधा

Smita-Joshi

मी ४० वर्षांचा घटस्फोटित आहे. घटस्फोट होऊन एक वर्ष झाले. मला प्रथम विवाहापासून कोणतेही अपत्य नाही. मी पुनर्विवाहाचा विचार करीत असून, माझ्यासाठी दोन स्थळे आली आहेत. त्यातील एक मुलगी विनापत्य आहे. परंतु, ती मला फारशी आवडलेली नाही. मला जी मुलगी आवडली आहे तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. माझ्या आई-वडिलांचे मत आहे की, शक्‍यतो मूल नाही अशाच मुलीशी लग्न कर.

#MokaleVha : अपत्य असलेल्या महिलेसोबत पुनर्विवाह करावा का?

sakal_logo
By
स्मिता प्रकाश जोशी

अपत्य असलेल्या महिलेसोबत पुनर्विवाह करावा का?
मी ४० वर्षांचा घटस्फोटित आहे. घटस्फोट होऊन एक वर्ष झाले. मला प्रथम विवाहापासून कोणतेही अपत्य नाही. मी पुनर्विवाहाचा विचार करीत असून, माझ्यासाठी दोन स्थळे आली आहेत. त्यातील एक मुलगी विनापत्य आहे. परंतु, ती मला फारशी आवडलेली नाही. मला जी मुलगी आवडली आहे तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. माझ्या आई-वडिलांचे मत आहे की, शक्‍यतो मूल नाही अशाच मुलीशी लग्न कर. परंतु, मला अपत्य असलेली मुलगी आवडली आहे. मी तिच्याशी लग्न केले, तर तिच्या मुलामुळे मला काही अडचणी येतील का? त्या मुलाने ‘बाप’ म्हणून माझा स्वीकार केला नाही, तर काय होईल? मी बाप म्हणून माझे नाव त्याला लावू शकेन का? कृपया मार्गदर्शन करा. 

पुनर्विवाह करताना प्रॅक्टिकल व्हावे लागते. तुमच्या आई-वडिलांना काही अडचणी दिसत असल्यामुळेच ते अपत्य नसलेल्या मुलीशी लग्न कर, असे म्हणतात. तथापि, तुम्हाला स्वतःला काय वाटते, याचा विचार करा. पुनर्विवाह करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या स्थळाचा तुम्ही विचार करीत आहात तिचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे का? हे स्वतः कागदपत्रे बघून घ्या. मुलाचा ताबा कोर्टाने तिच्याकडे दिला आहे का? मुलाच्या ताब्याबाबत काही वाद नाहीत ना? मुलाची आर्थिक जबाबदारी कोणावर आहे? या सर्व गोष्टी योग्य असतील आणि न्यायालयातर्फे मुलाचा ताबा आईकडे आलेला असेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तिच्याकडेच असेल, तर आपल्याला पुढील विचार करता येईल. मग यापुढे मुलाच्या संपूर्ण जबाबदारीसह तुम्ही तिचा स्वीकार करण्यास तयार आहात का? याचा विचार करा. जर तशी तयारी असेल, तरीही मुलाला त्याचा बाप म्हणून तुमचे नाव लावता येणार नाही. जन्मदात्या बापाने मुलावरचे सर्व अधिकार सोडून मुलाला दत्तक देण्याची संमती दिली, तर कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्याला तुमचे नाव ‘बाप’ म्हणून लावता येईल.

मुलगा ‘बाप’ म्हणून तुमचा स्वीकार करेल किंवा नाही, हे त्याच्या आईलाच सांगता येईल. त्याला त्याच्या जन्मदात्या बापाचा लळा असेल, तो त्याला भेटत असेल; तर ही गोष्ट अवघड आहे. परंतु, ‘बाप’ म्हणून स्वीकारले नाही, तरीही तुम्ही त्याचे पालक होऊ शकता. फक्त या सगळ्याचा स्वीकार करण्याची तुमची मनापासून तयारी हवी. आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या याचा स्वेच्छेने स्वीकार करीत असाल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त यासाठी पुनर्विवाहाबाबतचे विवाहपूर्व समुपदेशन करून घ्या. 

मैत्रिणीच्या नादी लागून पत्नीकडे दुर्लक्ष
माझ्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली. आमच्या दोघांमध्ये मतभेद झाल्याने पत्नी मागील एक वर्षापासून माहेरी आहे. चूक माझ्याकडूनच झाली आहे. मी एका मैत्रिणीच्या नादी लागून माझ्या पत्नीकडे दुर्लक्ष केले होते. तिने मला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेव्हा मी ऐकले नाही. माझी चूक आता मला कळली आहे. तरीही, ती माझ्याकडे पुन्हा नांदायला येण्यास तयार नाही. मी यापुढे अशा प्रकारची चूक कधीही करणार नाही, हे तिला कसे समजावून सांगू?

क्षणिक आकर्षणासाठी तरुण पिढीकडून बऱ्याच वेळा चुका घडतात. मागचा-पुढचा विचार न करता कसलीही जबाबदारी न घेता केवळ एक मजा... कॅज्युअल रिलेशन, असे म्हणून विवाहबाह्य मैत्री केली जाते. पण, नंतर मनस्ताप आणि वेदना सहन कराव्याच लागतात. लग्नाच्या नात्यात विश्‍वास महत्त्वाचा असतो. पती आपल्याकडे दुर्लक्ष करून मैत्रिणीला वेळ देतो, तिच्यासोबत मजा मारतो, हे कोणत्याही पत्नीला सहन होणारच नाही. आता तुम्ही कितीही क्षमायाचना केली, तरी ती तुमच्याकडे येण्यास तयार नाही. तरीही, तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल, तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला खरेच पश्‍चात्ताप होत असेल आणि यापुढे पत्नीसोबत एकनिष्ठ राहण्याची तयारी असेल, तर तिच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तिचे आई-वडील, जवळचे मित्र-मैत्रिणी यांच्या सहकार्याने तिच्या मनातील राग आणि द्वेष घालविण्याचा प्रयत्न करा. समुपदेशकांची मदत घ्या. तिला विचार करायला वेळ द्या. तुमच्या वागण्यातील सुधारणा पाहून ती निश्‍चित तुमच्याकडे परत येईल. फक्त घाई करून तिच्यावर पुन्हा येण्याची बळजबरी करू नका. काही वेळेस शांत राहण्यानेही प्रश्‍न सुटतात. 

साखरपुडा झाल्यावर ‘तो’ चौकशी करतोय...
माझा नुकताच साखरपुडा झाला आहे. परंतु, मला खूपच दडपण आले आहे. मी बारावीमध्ये असताना माझी एका मुलाशी ओळख झाली. आमची चांगली मैत्री होती. नंतर तो शिक्षणासाठी परदेशात गेला. तिथून आल्यानंतर आम्ही लग्न करणार होतो. परंतु, अवघ्या सहा महिन्यांत त्याने मला ब्लॉक केले. त्याने तिकडेच स्थायिक होण्याचे ठरविले. मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. परंतु, नंतर माझे शिक्षण, माझे करिअर यामध्ये मी गुंतून गेले. गेली चार वर्षे त्याने माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही. परंतु, आता माझा साखरपुडा झाल्यानंतर मी फेसबुकवर फोटो टाकले. तेव्हा त्याने माझ्याबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. माझा हा भूतकाळ मी माझ्या नवऱ्याला सांगितला नाही. आता मला त्या मित्राशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही. परंतु, हे सर्व माझ्या होणाऱ्या नवऱ्याला समजले तर काय होईल? हे ऐकल्यावर त्याने लग्न मोडले तर? किंवा लग्नानंतर समजले तर मला त्रास होईल का?

आपला भूतकाळ आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर परिणाम करणार नसेल, तर त्या भूतकाळाची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. मागील चार वर्षांपासून त्या मित्राचे आणि तुझे कोणतेही संपर्क नाहीत. तुझी त्याच्याशी आता कोणतीही भावनिक गुंतवणूक राहिलेली नाही. त्यामुळे वर्तमानकाळातील तुझ्या आनंदावर याचा परिणाम होऊ देऊ नकोस. त्या मित्राने कितीही चौकशी केली, तरी त्याला आता कोणताही रिप्लाय देऊ नकोस. तुझ्यावर दडपण येत असेल, तर तुझ्या होणाऱ्या जोडीदाराला योग्य वेळी योग्य प्रमाणात तुमच्या कॉलेजच्या मैत्रीबद्दल सांगून टाक. त्यामुळे नंतर समजले, तर ही मनातील भीती निघून जाईल. फक्त कोणत्या वेळी किती माहिती सांगायची आणि कशा प्रकारे सांगायची, हे कौशल्य तुला आत्मसात करावे लागेल. कोणतेही दडपण न घेता अगदी कॅज्युअली तू त्याला सांगितलेस तर त्याला काहीच वाटणार नाही. स्वतःचे काही चुकले आहे, या आविर्भावात तू त्याला सांगू लागलीस, तर मात्र अडचणी निर्माण होतील. दडपण घेऊ नकोस, मोकळेपणाने राहा. तुझ्या आयुष्यातील या फुलपाखरी दिवसांचा आनंद घे.

loading image