#MokaleVha समस्यांवर बोलू काही

Smita-Joshi
Smita-Joshi

मी इंजिनिअर असून नोकरी करते. एका ठिकाणी माझी पत्रिका जमल्याने माझ्या घरच्यांनी लग्न ठरवले. आमची २ ते ३ वेळेस भेट झाली. पालकांसहित आम्ही एकमेकांना भेटलो. आमच्यामध्ये मेसेजवर बोलणे सुरू होते. मी माझ्या प्रोजेक्टसाठी चार दिवस बाहेरगावी जाणार असल्याने माझ्याकडून पुन्हा मेसेज झाले नाहीत. आम्ही वीकेंडला भेटायचे ठरवले होते; पण त्यांनी अचानक मी सध्या लग्न करणार नाही आपण थांबूया असे कळविले. यामुळे मला खूपच नैराश्य आले आहे. मुलींच्या भावनांशी असे खेळ का होतात?
- नियोजित विवाह ठरवीत असताना अशा प्रकारचे प्रसंग येतात. तुमची पत्रिका जमली आणि एकमेकांशी बोलणे झाले, याचा अर्थ लग्नाला त्याचा होकार आहे असा तू घेतलास. नियोजित विवाहात दोघेही एकमेकांना अजमावत असतात. एकमेकांची माहिती काढत असतात. ‘लग्नाबाबत माझी पसंती आहे पुढे जाण्यास हरकत नाही’, अशी स्पष्टता आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी गृहीत धरू नये. तुझ्यासाठी नक्कीच कोणीतरी दुसरा आहे, या गोष्टींचा स्वीकार करून तुझ्या मनातील नैराश्याचे विचार काढून टाक. योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी अशा अनेक प्रसंगांतून जावे लागते. फक्त दोघांनीही आपली मते ठाम झाल्याशिवाय उगाचच या माध्यमांचा वापर करून एकमेकांशी बोलत राहू नये. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या प्रेमविवाहाला ३ वर्षे झाली. पण आता तो छोट्या-छोट्या गोष्टींवरून खूप चिडतो. त्यामुळे आमच्यात खूप वाद होतात. त्याच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप आमच्या संसारात खूप आहे. प्रत्येकवेळी मलाच नमते घ्यावे लागते, त्याच्या चुका तो कधीच मान्य करीत नाही. मी या गोष्टींवरून बोलल्यामुळे तो चिडून गेले ६ महिने माझ्याशी बोलत नाहीये. माझी काहीच चूक नसल्याने मी आता माफी मागणार नाही. पण मला लग्न मोडायचे नाही, त्याला कशाप्रकारे आणि कोणाकडून समजावून सांगता येईल?
- तुम्ही प्रेमविवाह केला असल्याने एकमेकांना चांगलेच ओळखत होतात, म्हणूनच एकमेकांबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बरोबरीची वागणूक मिळावी, असा दोघांचाही अट्टहास आहे. संसार करताना कधी तुझे, कधी माझे असे करावेच लागते. मीच का माघार घ्यायची, हा दृष्टिकोन ठेवल्यास वाद मिटणार नाहीत. नाती टिकविण्यासाठी कोणी माघार घेतल्यास, तो हरला असे होत नाही. कारण पतिपत्नीच्या नात्यात कधी हारजीत नसतेच. प्रत्येकवेळी मीच का, हाही प्रश्न स्वतःला विचारू नये. तुझ्या पतीला तुझ्याशिवाय कोणी समजावून सांगणे योग्य नाही, तू कोणाला मध्ये घेऊ नकोस. तूच त्याच्याशी बोल आणि विषय मिटव. सगळे व्यवस्थित झाल्यानंतर तुझ्याही अपेक्षा योग्य शब्दांत त्याला सांग. लग्न झाल्यानंतरच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, ते स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली असल्यास अशा अडचणींना आपण स्वतःच सामोरे जाऊ शकतो. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com