मोकळे व्हा! : सासऱ्यांच्या विचित्र स्वभावाला कंटाळले आहे

डॉ. सुचेता कदम
रविवार, 22 सप्टेंबर 2019

प्रश्‍न - माझ्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. माझा नवरा व त्याची लग्न झालेली बहीण अशी दोनच भावंडे आहेत. घरात निवृत्त सासरे आहेत. माझा नवरा नोकरीनिमित्त १०-१२ तास घराबाहेर असतो. मी घरातील सर्व कामे करते. सासऱ्यांचा स्वभाव विचित्र आहे. ते सतत मुलीचे गुणगान करीत असतात. मला एकच मुलगा आहे. मी कधीही बाहेर गेले की माझ्या मुलाला तुझी आई चांगली वागत नाही, असे सांगतात. आता मला त्यांच्या विचित्र स्वभावाचा कंटाळा आला आहे. त्यांचे काहीही करण्याची इच्छा उरलेली नाही. घरातही ते अत्यंत बेतानेच खर्च करतात. मुलीला मात्र वरचेवर पैसे देत राहतात.

प्रश्‍न - माझ्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. माझा नवरा व त्याची लग्न झालेली बहीण अशी दोनच भावंडे आहेत. घरात निवृत्त सासरे आहेत. माझा नवरा नोकरीनिमित्त १०-१२ तास घराबाहेर असतो. मी घरातील सर्व कामे करते. सासऱ्यांचा स्वभाव विचित्र आहे. ते सतत मुलीचे गुणगान करीत असतात. मला एकच मुलगा आहे. मी कधीही बाहेर गेले की माझ्या मुलाला तुझी आई चांगली वागत नाही, असे सांगतात. आता मला त्यांच्या विचित्र स्वभावाचा कंटाळा आला आहे. त्यांचे काहीही करण्याची इच्छा उरलेली नाही. घरातही ते अत्यंत बेतानेच खर्च करतात. मुलीला मात्र वरचेवर पैसे देत राहतात. मुलगी जर इतकी प्रिय आहे तर त्यांनी तिच्याकडेच जाऊन राहावे, असे विचार माझ्या मनात येतात. कारण, त्यांच्यामुळे मला घरात काहीच प्रायव्हसी मिळत नाही. हळूहळू मला नैराश्‍य येऊ लागले आहे. माझा नवरा स्वभावाने गरीब असल्याने तो वडिलांना व बहिणीला कधीच बोलू शकणार नाही. माझी रोज घुसमट होते. जीवनाचाच कंटाळा आला आहे. काय करावे ते कळत नाही.

घरातील गृहिणी सर्व कामे बिनबोभाट करत असते. या कामाच्या धबडग्यातून त्यांना इतरांसाठी वेळ देता येत नाही. अशावेळी लग्न झालेली मुलगी घरी येऊन आपुलकीने चौकशी करते, याचे त्यांना कौतुक वाटते. निवृत्त व्यक्तीकडे रिकामा वेळ भरपूर असतो. आपल्या वेळेचे योग्य नियोजन न केलेल्या व्यक्ती घरातील इतर व्यक्तींच्या नातेसंबंधात लुडबूड करणे, तक्रारी करणे, असा त्रास देऊ शकतात. ही शक्‍यता लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे तुमची होणारी घुसमट व्यक्त केली पाहिजे. नवऱ्याला व मुलाला तुमच्या कष्टांची जाणीव असेल, तर कोणीही काहीही तुमच्याविरोधात सांगितले तरी तुमच्याबाबत त्यांचे मत दूषित होण्याची शक्‍यता कमी आहे. नवरा व मुलगा यांना घेऊन अधूनमधून एक-दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेल्याने तुम्हाला प्रायव्हसी मिळाल्यास मनावरील ताण कमी होऊन रोजचे आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची उभारी येते. दिवसभरातील कामात नियमितपणा व शिस्त याचा वापर करून स्वतःसाठी स्वतंत्र वेळ निर्माण करून तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात काही नव्याने शिकता येऊ शकते का? नवऱ्याला आर्थिक मदतीचा आधार होईल, असे काम करू शकता का? याचा शोध घ्या. आयुष्यात स्वतःचे ध्येय निर्माण केले की आजूबाजूची माणसे/ परिस्थिती कितीही त्रासदायक असली तरी जगण्यामध्ये उत्साह निर्माण होतो.

व्यवसायातील अपयशामुळे नैराश्‍य आले आहे
प्रश्‍न - मी ३५ वर्षांचा व्यावसायिक आहे. लग्नाला १२ वर्षे झाली असून, दोन मुले आहेत. सध्याच्या काळात स्पर्धेमुळे सतत कामाचा ताण असतोच. मला धंद्यामध्ये हवे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे सतत आर्थिक टेन्शन असते. त्यामुळे घराकडे व मुलांकडे लक्ष देता येत नाही. माझी पत्नी ग्रॅज्युएट आहे. परंतु घरातील इतर जबाबदाऱ्या सर्व तिच्याकडे असल्याने नोकरी करू शकत नाही. परंतु, माझे बिझनेससाठी सतत घराबाहेर राहणे तिला खटकत आहे. त्यातून आमचे वारंवार वाद होतात. आता तर ती माझ्यावर संशयही घेऊ लागली आहे. खरेतर माझे तसे काहीही नाही. धंदाच नीट व्हावा, यासाठी प्रयत्न करतो. परंतु, वारंवार अपयश येत आहे. बिझनेसमधील ताण शिवाय घरातही शांतता नाही, यामुळे आत्महत्येचे विचार मनात येतात. मुलेही माझ्याशी फारसे बोलत नाही. मी घरात असलो की एकदम शांत राहतात. परंतु, आईसोबत चांगले बोलतात. आपले काय चुकते आहे तेच कळत नाही? कृपया मार्गदर्शन करा.

छोट्या बिझनेसमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव असल्यास प्लॅनिंग कमी पडू शकते. त्यामुळे येणारी समस्या, तिची सोडवणूक, त्यातून ताण, कटकटी यात श्रम व वेळ वाया जातो. बिझनेसमध्ये दूरगामी ध्येय पक्के ठरवायला पाहिजे. मग ते ध्येय साध्य करण्यासाठी काय करायला पाहिजे याचे एक वर्ष/ सहा महिने ते रोजचे प्लॅनिंग असेल, त्याप्रमाणे प्लॅन व चेकलिस्ट बनविता येते. एकदा ते ठरविले तर कोणीही लक्ष देणारे नसले तरी स्वतःचे काम योग्य वेळेत शिस्तीत नियमितपणे पूर्ण करणे यासाठी खूप सकारात्मकता असावी लागते. व्हॅल्यू ॲडेड कोणत्या गोष्टी आहेत, त्यांना प्राधान्य देणे निरर्थक गोष्टीमधील वेळ कमी करणे, बिझनेससाठी ठराविक वेळ निश्‍चित करणे, शक्‍य असल्यास त्याप्रमाणे नियोजन करू शकता. यातून स्वतःसाठी घरासाठी वेगळा वेळ उपलब्ध होऊ शकतो. ज्या कामामध्ये पत्नीची मदत होऊ शकते, तेथे तिचा सहभाग करून घेतल्यास एकमेकांच्या अडचणी समजू शकण्यास मदत होते. मुद्दामहून वेळ काढून तिच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास घरातील तणाव कमी होऊ शकतो. ज्याच्यासाठी तुम्ही पैसे कमवत आहात, त्यांच्याशीच नातेसंबंध चांगले राहिले नाही, तर सर्व निरर्थक वाटू शकते.

मित्राच्या पत्नीमुळे मानसिक स्वास्थ बिघडलेय
प्रश्‍न - मी विवाहीत असून, लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. माझी पत्नी व मी दोघेही नोकरी करतो. पत्नी घरातील सर्व व्यवस्थित करते. मुलगाही शिक्षण घेत आहे. परंतु, पाच वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या घरातील अडचणींमुळे त्याच्या पत्नीला मी आर्थिक मदत केली. त्यातून आमच्यात जवळीक वाढली. मित्राच्या पत्नीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही मदत केली. परंतु, एक वर्षापूर्वी तिने माझ्याकडे पुन्हा एक लाख रुपये मागितले. त्या वेळी मी तिला पैशांची मदत करू शकत नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर तिने माझ्याशी पूर्णपणे संबंध तोडून टाकले. माझा मोबाईलनंबरही ब्लॉक केला. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. मित्रालाही माझ्याशी संबंध तोडण्यास सांगितले. तिने माझा वापर करून घेतला या भावनेने माझे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. पत्नीला सर्व सांगून तिच्यामार्फत खर्च केलेले पैसे परत घ्यावेत, असेही वाटते. परंतु, यातून पत्नीचे माझ्याविषयीचे मत दूषित होईल, अशी भीतीही वाटते. मी सद्यपरिस्थितीत पत्नीसोबत सुखी आहे. परंतु, तरीही मनातील विचार कमी होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे.

तुम्ही स्वतः विवाहीत असताना दुसऱ्या स्त्रीसोबत जवळीक निर्माण केली. कायदेशीररीत्या विवाहबाह्य संबंधाला मान्यता नाही. अडचणीच्या काळात सहजतेने मदत करणे ही मोठेपणाची गोष्ट आहे. परंतु, त्या मदतीच्या बदल्यात आपणही चुकीच्या अपेक्षा निर्माण केल्यास कधीतरी त्याचे फळही चुकीचे मिळू शकते. जे झाले ते विसरून जाऊन आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा प्रयत्न करा. अनेक कारणांमुळे पैशाचे नुकसान होते. त्याचप्रमाणे गेलेल्या पैशांबाबत चुकीचा विचार करून पुढील आयुष्यावर त्याचा परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करा. पत्नीसोबत सद्यपरिस्थितीत सुखी आहात तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे वेळ देऊन त्यांच्याशी नातेसंबंध समृद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास नैराश्‍य येणार नाही. आपल्याला आवडणारी माणसे आयुष्यभर सोबतच राहिली पाहिजेत हा अट्टहास असतो. परंतु काही कारणांमुळे बदलणारी परिस्थिती स्वीकारता आली, तर आयुष्यात प्रगती होण्यास मदतच होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vya Lifestyle