mother and father Samskara That patriotism
mother and father Samskara That patriotismsakal

आई-वडिलांचे संस्कार हेच देशभक्तीचं बीज

प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजे बालपण होय. बालपणीची आठवण आली म्हणजे प्रत्येक व्यक्ती भूतकाळात रमतो. मग आपण बालपणीच्या सर्व आठवणींचे एकेक करून डोंगर पोखरू लागतो. बालपणातील आठवणी म्हणजे, भावी आयुष्यातील वाळवंटात तहानलेल्या जीवासाठी जणू शीतल पाण्याचा शिडकावा असतो. बालपण हे श्रीमंतीत गेलेले असो किंवा गरिबीत. बालपणीच्या आठवणी या संपूर्ण आयुष्यातील अप्रतिम असा ठेवा असतो. मुलगा असो किंवा मुलगी. कडू- गोड, चांगल्या- वाईट आठवणींनी बालपण नेहमीच भरलेले असते.

एका आयुष्यात बालपण हे एकदाच मिळते. त्यामुळेच सर्वजण आपापल्या पद्धतीने बालपणीच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. बालपण नेहमीच हवेहवेसे वाटते. म्हणूनच असं म्हटलं जातं, की प्रत्येकाच्या जीवनातील सुंदर क्षण हे बालपणीच असतात. माझ्या सुंदर बालपणाला जबाबदारीची किनारही आहे. माझा जन्म ३१ मे १९६० मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा या गावी म्हणजेच पूर्वीच्या बस्ती जिल्हा व अलीकडच्या काळातील सिद्धार्थनगर व गौतम बुद्धनगर येथे झाला. माझे वडील श्यामसुंदर पांडे हे पोलिस खात्यात कार्यरत होते. नवनियुक्त पोलिसांना ते ट्रेनिंग देण्याचे काम करीत असत. ते एक हाडाचे निष्णात प्रशिक्षक होते. तसा आमचा मूळ व्यवसाय शेतीचा. माझी आई शांती‍देवी ही शेतीकामांमध्ये वडिलांना मदत करत असे. असा आमचा प्रपंच अतिशय सुख-समाधानाने व गुण्यागोविंदाने आई-वडिलांच्या सान्निध्यात सुरू होता. पण मी सहा वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. बालमनावर परिणाम करणाऱ्या या घटनेनंतर माझे संपूर्ण आयुष्य पूर्ण बदलून गेले. वयाच्या सहाव्या वर्षी खेळण्या-बागडण्याच्या वयात खरं काय खोटं काय, याच्या जाणिवेशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो. या वयातच वडिलांचा अंत्यविधी बघण्याचे माझ्या नशिबी आले. या घटनेनंतर जणू आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, असे मला वाटायला लागले. मात्र अशा बिकट प्रसंगांमध्येही माझी आई शांतीदेवी अत्यंत धीरोदात्तपणे स्वतःला सावरून उभी राहिली. तिने आम्हाला घडवताना आई आणि वडील असे दुहेरी प्रेम, जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली.

आईचे महत्त्व मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्वश्रुत आहे. जगातील सर्व भाषांमधून आणि साहित्यातून आईचे माहात्म्य जगभरातील लोकांनी मुक्तकंठाने व्यक्त केले आहे. एखादं घाबरलेलं, बावरलेलं मूल मायेच्या स्पर्शानं आईच्या कुशीत भयमुक्त होते. स्वतःला सुरक्षित समजते. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा वडिलांची जरुरी भासते. तर मुलांचा योग्य सांभाळ व संगोपनाबाबत वडिलांपेक्षा मुलांची आई जास्त योग्यरीतीने काळजी घेऊ शकते, यावर नेहमीच एकमत झालेले आहे. माझ्या आईने आम्हा दोघा भावंडांना जसे घडविले, त्याहून ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. पण मनुष्याचं एक वैशिष्ट आहे, की कितीही संकट आले तरी मनुष्यजात संघर्षातून उभी राहत असते, हे मानवी जीवनाचे सर्वांत मोठे चिरंतन वैशिष्ट्य होय. या भावनेतून मी व माझा लहान भाऊ रमेश, आई शांतीदेवी आम्ही उभे राहिलो.

शेती व्यवसायात वडिलांच्या पेन्शनच्या माध्यमातून आम्हाला मोठे सहाय्य झाले. उच्च दर्जाचे शिक्षण, योग्य संस्कार, सेवाभाव व चिकाटी हे गुण आईने आमच्यामध्ये रुजविले. यासोबतच किंवा याहीपेक्षा सर्वांत मोठी आई-वडिलांची शिकवण आम्हाला सदैव मिळाली, ती म्हणजे स्वाभिमान होय. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले असतानासुद्धा मी शाळेत नेहमीच टॉपर होतो. आई-वडिलांची सुरवातीपासूनची इच्छा होती, की मी युनिफॉर्म असलेलीच सेवा स्वीकारावी. त्यात करिअर करावे. त्या संस्कारातून शिस्त व देशभक्ती माझ्यामध्ये बालपणापासूनच ओतप्रोत भरलेली होती. पोलिस खात्यात जाऊन देशकार्य करण्याची माझी जिज्ञासा होती. पुढे मी भारतीय संरक्षण दलामध्ये करिअर करण्याचे निश्चित करून तशी खूणगाठ मनाशी बांधली. त्यानंतर देशभक्तीच्या एका अध्यायाला सुरवात झाली.

(लेखक हे सिन्नर येथे स्थापित जगप्रसिद्ध गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com