भारती गावित
भारती गावितesakal

नियतीवर मात करत उभ्या राहिल्या खिराडच्या भारती गावित

खिराड (जि. नाशिक) : आदिवासी आणि दुर्गम भागातील पुरेशा सोयीसुविधांची वानवा असलेल्या काळात कुटुंबाला पुढे नेताना अडचणी येत होत्या. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नियतीलाच आव्हान दिलं. याचदरम्यान पतीचं निधन झाल्याने खचून जाण्याच्या प्रसंगात भक्कमपणे पाय रोवून परिस्थितीलाच बदलण्याचा जणू चंगच बांधला होता. परिस्थिती बदलण्याची क्षमता प्रत्येकातच असते, या निर्धारावर कळवण तालुक्यातील खिराडच्या भारतीताई गावित यांनी कुटुंबाला उभे करतानाच महिला म्हणून इतरांसाठी नक्कीच जगण्याचं बळ भक्कम केलंय ते आत्मविश्वासाच्या बळावर..!

शिवणकाम करणाऱ्या साहेबराव आनंदराव बस्ते यांच्या कुटुंबातील कन्या असलेल्या भारतीताई यांचे माहेर कळवण तालुक्यातील खिराडचे... शिक्षण जेमतेम दहावी पास. तीन भाऊ आणि बस्ते कुटुंबातील एकुलत्या असलेल्या भारतीताईंना डी. एड. करून विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न पाहिलं होतं. मात्र कुटुंबातील परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षिका होण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं.

शिवणकामाबरोबरच वडिलांकडे म्हशीपालनाचा व्यवसाय होता. मात्र ग्रामीण भागातील पुरेशा संधी नसलेल्या परिसरात भारतीताई यांचे १९९८ मध्ये वणी येथील राजेंद्र गावित यांच्याशी विवाह झाला. पती राजेंद्र यांचेही शिक्षण जेमतेम दहावी. पती खासगी दवाखान्यात कंपाउंडर म्हणून तुटपुंज्या पगारावर सेवा देत होते.

मात्र भविष्यातील भक्कम अशी परिस्थिती भारतीताई यांच्या कुटुंबात नव्हती. लग्नानंतर भारतीताई आणि परिवाराची प्रगती होईल, अशी फारशी परिस्थिती नव्हती. केवळ खासगी दवाखान्यातील तुटपुंज्या पगारावरील नोकरीच्या आधाराने कुटुंब चालविणे अवघड जात होते. याच काळात कुटुंबात नरेंद्र, मोहिनी आणि अंकुश या मुलांच्या निमित्ताने भारतीताईंच्या कुटुंबातील सदस्यसंख्या वाढल्याने कुटुंबाला परिस्थितीचे चटके बसत होते.

आर्थिक ओढाताणीत कुटुंबात खटके उडण्याच्या प्रसंगात भारतीताई यांनी संयमाने परिस्थिती हाताळत पती राजेंद्र यांना धीर देत काहीतरी करण्याचा ध्यास घेत थेट नाशिक गाठले. मात्र नाशिकमध्ये जम बसेल, अशी कोणतीही वाट दिसत नव्हती.

परिस्थितीला आव्हान देत जगण्याची लढाई लढत असतानाच २०१२ मध्ये पतीचं छत्र हरपलं. आयुष्याच्या लढाईशी दोन हात करत असतानाच तिघा मुलांसाठी भारतीताई स्वतः आधार बनल्या. नियतीनं कुंकू हिरावले असताना भारतीताईंनी थेट खिराड गाठले. याच काळात भारतीताईंना खिराड येथे अंगणवाडीसेविका म्हणून नोकरी मिळाली. ९०० रुपये तुटपुंज्या मानधनावर सेवा देत असल्या तरी कुटुंबासाठी हा आधार लाखमोलाचा ठरला.

याच काळात बचतगटाच्या सीआरपी विमलताई ठाकरे यांच्या सहकार्याने खिराडमध्ये बचतगटाची स्थापना केली. येथूनच भारतीताईंच्या आयुष्यातील सूर्याची किरणे बळकट होत गेली. बचतगटाच्या माध्यमातून भांडवलाची सोय झाल्याने खिराडमध्ये भारतीताईंनी किराणा दुकान सुरू केले.

खिराडसारख्या दुर्गम भागातील गरज आणि शहरापासून दूर असलेल्या गुजरात सीमेवरील गावाची गरज लक्षात घेऊन भारतीताई यांचा किराणा दुकान सुरू करण्याचा निर्णय सार्थ ठरला. याच माध्यमातून नियतीने दिलेली संकटं परतवून लावत असतानाच कुटुंबाला स्थिर करण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण काढताना मात्र भारतीताई यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

मुलांसाठी धावल्या...

पतीचं अकाली जाणं... आर्थिक परिस्थिती जेमतेम... स्थलांतरित आयुष्य... या सगळ्यांना पूर्णविराम देत मुलांच्या शिक्षणाकडे भारतीताईंनी विशेष लक्ष पुरवले. माहेर आणि सासरच्या सदस्यांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. किराणा दुकानाकडे लक्ष पुरवतानाच आज भारतीताई यांनी स्वमालकीचा ट्रॅक्टरही खरेदी केला आहे.

भारती गावित
अपयशाने न खचता साधली यशाची ‘तमन्ना’

ट्रॅक्टर, बचतगट आणि किराणा व्यवसायातील भरभराटीच्या जोरावर मुलगा नरेंद्र इंजिनिअरिंगचे शिक्षण करून नोकरीत, मुलगी मोहिनी नाशिकमध्ये परिचारिका, तर लहान मुलगा खिराडमध्ये ट्रॅक्टर व्यवसायात. भारतीताईंनी आज वणी शहरासह कळवण तालुक्यातील खिराडसारख्या गुजरात सीमेवरील परिसरात स्वतःला उभे करतानाच परिसरातील दहा बचतगटांच्या स्थापनेबरोबरच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यातही त्यांनी आपला वाटा उचललाय.

भारती गावित
'चिमणी-पाखरांच्या' आधाराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com