Loksabha 2019 : आउटसोर्सिंगचा पोलिटिकल फंडा

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबईतून 2009 साली एकही भाजप शिवसेना उमेदवार दिल्लीत पोहोचला नाही. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचंड मते मिळवली. त्याचा फटका बसल्याने युतीचे सर्व उमेदवार पडले. मनसे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. महाराष्ट्राच्या राजकारणात यापक्षाने त्यावेळी तूफान माजवले, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत नाराजी असतानाही सत्तेत येण्याचे भाजपसेनेचे प्रयत्न निष्प्रभ ठरले. आता 2019च्या निवडणुकांचे पर्व सुरू आहे, दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

नरेंद्र मोदी या काळात भारतीय राजकारणात आले अन भाजपला 2014 ला स्वबळावर बहुमत मिळवुन देत पंतप्रधान झाले. विरोधी पक्ष त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरला. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या तीन राज्यातील निवडणुकात काँग्रेस पुन्हा सत्तेत परतली असली तरी अद्याप मोदींची लोकप्रियता आपले अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त आहे असे काँग्रेसला वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला समवेत घेतले. आज महाराष्ट्रातले बहुतांश निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने होत आहेत. राहुल गांधी यांनी मी साम्यवाद्यांबद्दल काहीही बोलणार नाही असे सांगत आपल्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज असल्याचे दाखवले आहे. राज ठाकरे यांचीही त्यांनी मदत मागितली आहे काय माहित नाही पण मोदींना विरोध करण्याचे काम काँग्रेस राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्याकडे अंशत: आउटसोर्स केल्याचे दिसते. हा आउटसोर्स मोदींच्या आणि भाजपच्या विजयाची शक्‍यता महाराष्ट्रापुरता दुरापास्त करतो काय ते बघायचे.

2009 मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत झाली होती,आताही होईल काय? 2019 साली मोदी पुन्हा एकदा मतदानाला सामोरे जात असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या टिकेवर आसूड ओढायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात एकही विरोधी नेता प्रभावी बोलू शकत नाही. तळमळ असेल, मुददे असतील, पाच वर्षात विरोधी बाकांवर बसल्यामुळे मनात आक्रोश निर्माण झाला असेल, जे खटले समोर आहेत त्यामुळे मनात चीड असेल, विचारधारेच्या संघर्षामुळे मनात विखार निर्माण झाला असेल पण एकाहीकडे राज यांच्यासारखे व्यक्‍तीमत्व नाही, वक्‍तृत्वही नाही. त्यांचे सगळ्यांचेच हात दगडाखाली असल्याने राज यांच्या प्रचारसभा हेच विरोधकांच्या भात्यातले सर्वाधिक प्रभावी अस्त्र आहे.त्यांच्या सभा उत्सुकतेचा विषय ठरल्या नसत्या तरच नवल.

तशीही राज ठाकरे यांची भाषणे उत्तम असतात, ती गर्दी खेचतात. वक्‍तृत्व हे राज ठाकरे यांच्या हातातले अमोघ अस्त्र. त्यांचे अत्यंत वाईट सुरू असतानाही ते काय बोलतात याबददल कमालीची उत्सुकता असे. शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी तरूण वयात बंडाचा झेंडा उभारून निर्माण केलेल्या मनसेने काही गोष्टी शिवसेनेशी समांतर ठेवल्या आहेत. शिवसेना दसऱ्याला मेळावा घेते, त्याच धर्तीवर मनसेने गुढीपाडव्याला मेळावा घेण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. कालचा मेळावा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत होता त्यामुळे त्याबददल कमालीची उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली, प्रचंड आणि तशी प्रभावीही. हरीसाल येथील डिजीटल गावाबददलचा दावा असो किंवा बालाकोटमध्ये मृत्यू पावलेल्या दशहतवाद्यांबद्दल अमित शहा यांनी केलेला दावा असो, प्रश्‍न उपस्थित करण्यात राज यशस्वी ठरले. आजकाल वर्तमानपत्रातील कात्रणे तसेच जुन्या चित्रफिती मदतीला घेवून ते आपली भूमिका मांडतात. ती आधुनिक काळाला सुसंगत असते. मोदींचे प्रयत्न पूर्णत: यशस्वी झालेले नसले, त्यांनी स्वत:च अच्छे दिनबददलच्या अपेक्षा वाढवून ठेवल्याने त्या पूर्ण झाल्या नसल्या तरी जनतेला त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते असे वाटते. निरनिराळ्या पहाण्यातून हे चित्र समोर येते आहे. तरीही मोदी पूर्वीप्रमाणे स्वबळावर बहुमत मिळवू शकणार नाहीत असेही भाकित केले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्य असावे असेही निवडणूकविश्‍लेषक, पत्रपंडित मानून चालतात. मात्र भाजपच्या धुरीणांना हे चित्र मान्य नाही.

जनतेत मोदींबददल विश्‍वास आहे,त्यामुळे निकालांबददलची पुन्हा स्वबळावर सत्तेत येण्याची खात्री अनाठायी नाही असे भाजपनेते कमालीच्या ठामपणे सांगत असतात. मोदी अजेय नाहीत हे सांगण्याची जबाबदारी महाराष्ट्रात राज यांच्यावर सोपवली तरी असावी किंवा ती त्यांनी स्वहून स्वीकारली असावी. मोदींविरोधात रान उठवण्याचे काम राज करू शकतात असे काँग्रेस राष्ट्रवादीला वाटते. राज यांची या समजाला खरे ठरवण्याची ताकद आहे काय ? त्यांच्या भाषणात,दाव्यात आणि आरोपात तेवढा जोर आहे काय हा खरा प्रश्‍न. मोदींची लाट ओसरल्याचे सांगत आता जातीच्या निकषाने मतदान होईल, स्थानिक उमेदवाराची राजी नाराजी चर्चेत येईल असे भाकित केले जाते आहे. स्वत:मोदी यांनी गेल्या सहा वर्षात प्रथमच हिंदुत्वाचा उल्लेख प्रचारात केला आहे,ते कॉंग्रेसबददल सतत बोलतात त्यामुळे त्यांनाही निकालांबददल धास्ती आहे काय असा प्रश्‍न आहेच. धृवीकरणाची भाषा ते का करत आहेत असा प्रश्‍न पडतोच. हवा कमी झाली असेल तर चिंता आहेच पण ती खरेच अन्य पक्षांच्या जागा निवडून येतील इतकी कमी झाली आहे काय? कदाचित त्यामुळेच आउटसोर्सचे परिणाम काय होताहेत ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी फेकू आहेत, त्यांच्या आईचा उपयोगही ते राजकारणासाठी करतात इथवर राज ठाकरे यांनी टीका केली आहे.मोदींचे व्यक्‍तीमत्व धृवीकरणाला जन्म देते. त्यामुळे त्यांचे विरोधक तीव्र प्रतिक्रिया देतात अन भक्‍त टीकेवर कमालीची भडक उत्तरे देतात. मोदी ,शहांना दूर करा हे सांगताना विरोधी मताचा ज्यांना फायदा होईल त्यांना होवू दे म्हणत अखेर राज ठाकरे यांनी राहुल निवडून आला तर येवू दे असेही म्हंटले.राज यांनी असा उघड पाठिंबा दिला म्हणून मनसेला पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत स्थान देण्याचे बक्षिस मिळेल का ते दिसेलच.

2009 मध्ये मनसेच्या हल्ल्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यां ना पसंती देत मत वाया घालण्यापेक्षा आघाडीला देवून टाका असे आवाहन केले होते. ते अनावधानाने केले होते की वैफल्याने ते तेंव्हा राजकीय भाष्यकारांना कळेलच नाही. आत्ता मात्र राज ठाकरे मोदी नकोत, राहुलही नकोत म्हणून नोटाला मते दया असे न सांगता थेट पाठिंबा देत आहेत, मोदींना पाडा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला जिंकवा असाच त्याचा अर्थ. येथे राजकीय पक्षांचे उमेदवार जिंकवून दिले जातील अशी पाटी कृष्णकुंजवर लावली आहे काय माहित नाही. गुढीपाडव्याचे भाषण उत्तम होते.तयारी छान होती.जनताही हजर झाली होती.आता ते महाराष्ट्रातल्या दहा ठिकाणी भाषण देणार आहेत.कुठे कुठे ते कळेलच. बाबासाहेब पुरंदरेंसारख्या महनीय तपस्वी व्यक्‍तीमत्वाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला तेंव्हा राळ उठवली गेली. फार दुर्दैवी प्रसंग होता तो.त्या वेळी राज यांनी निर्णयाची बाजू उचलून धरत सरकारला सर्वशक्‍तीनिशी मदत केली होती. आता राज विरोधी गटात आहेत.त्यांच्या सभा उपयोगी ठराव्यात अशी विरोधी पक्षांची इच्छा असणार.हे आउटसोर्सिंग यशस्वी होते का ते पहायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com